Tuesday 30 September 2008

उपवास

आज नवरात्राचा पहिला दिवस. आपल्याकडे सण म्हटले की उपास-तापास, व्रत-कैवल्ये यांची रेलचेल असते. पण नव्या शतकात ह्या सर्व धार्मिक रीतींचा नव्याने विचार करायची वेळ आली आहे.

उपास : मूळ शब्द - उप (जवळ) वास (राहणे) म्हणजे (परमेश्वराच्या) जवळ राहणे. पूर्वीच्या काळी लोक उपास करायचे. ह्या उपासाचे स्वरुप मुख्यत: पचायला हलक्या वस्तू उदा. कंद, मुळं खाणे आणि परमेश्वराच्या नाम स्मरणात तल्लीन होणे. असे वागणे जेणे करून आपण जास्तीत जास्त परमेश्वराच्या जवळ राहू. माझी आजी, पणजी ह्या उपासाच्या दिवशी निर्जळा व्रत करीत. उपासाच्या दिवशी काही खाणे तर दूरच त्या पाणी पण पीत नसत. ह्या मुळे दोन गोष्टी साध्य होत असत १) मनाचा निग्रह २) पचन शक्तीला आराम.

हा त्यांचा मनोनिग्रह खरोखरच कमालीचा होता. त्या दोघींचे अख्खे आयुष्य चुली शेजारी गेले होते. उपासाच्या दिवशी सुद्धा त्या इतरांसाठी केळे, शिंगाडे, रताळे ह्यांचे रुचकर पदार्थ बनवित असत. तसेच ह्या निर्जला उपासाची त्यांच्यावर कोणतीही सक्ती नसे.
उलट कुटुंब प्रमुख ह्या नात्याने सर्व कौटुंबिक निर्णय त्या घ्यायच्या. त्यांनी मनांत आणले असते तर चविष्ट पदार्थ खाणे त्यांना सहज जमले असते. दुसरे मी पाहिले आहे की त्यांना ह्या उपासाचे अजिबात कष्ट होत नसत. दिवसभर काम करता करता स्तोत्रे, आर्या म्हणणे चालूच. तेही हसतमुखाने. ओढलेल्या चेहऱ्याने, कष्टी होऊन कधी काम केलेले मी पाहिलेच नाही.

ज्ञानोबा म्हणतात, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या. मी तर म्हणेन, आपल्या वागण्याने दोघीही देवाचिये द्वारी अखंड उभ्या होत्या. बरेच लोक म्हणतील की चूल आणि मुल एव्हढेच विश्व असलेल्या काळात हे कदाचित् शक्य असेल. पण ह्या दोघींच्या बाबतीत अजून ही काही गोष्टी होत्या. दोघींना ही वृत्तपत्र वाचनाची आवड होती. आजुबाजूला घडणाऱ्या घटनांचे, राजकारणाचे अद्ययावत् ज्ञान होते. माझी पणजी तर वेळप्रसंगी नऊवारीला काचा मारून सायकलवरून जाऊन भाजी वै. आणत असे जी १९५५-६० च्या सुमारास मुंबईत नवलाची गोष्ट असे.

मग असे असताना, कोणीही जबरदस्ती केली नसताना कठोर व्रतांची गरजच काय होती? ह्याचे कारण म्हणजे त्यांच्या नजरेत उपास म्हणजे आत्म-संयमन, परमेशाचे चिंतन असे होते. हा असा उपास करताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही ताण, चिडचिड, वैताग, क्लेष दिसत नसे.

हे सर्व आज आठवायचे कारण म्हणजे मी एके ठिकाणी नोकरी करीत होते. तिथे राऊळ नावाचे साहेब होते. ते दर मंगळवारी उपास करतात. उपासाच्या दिवशी साबुदाणा, शेंगदाणे आणि बटाटा ह्या विविध पचायला जड अश्या पदार्थांवर ताव मारतात. मात्र दिवसभर मनात अखंड विष्णुच्या पहिल्या अवताराचे चिंतन करतात. मला म्हणायचे, मासे म्हणजे माझा जीव की प्राण. मला इथून घरी जायला ११, ११. ३० होतात. मग मी बारा वाजण्याची वाट पाहतो. मग मस्तपैकी माश्यांचा आस्वाद घेतो.

मला वाटायचे, हे अश्या प्रकारच्या उपासाचे जोखड फेकून का देत नाहीत? आहारशास्त्र म्हणते, मासे पचायला हलके. मग उपासाच्या दिवशी हा विष्णुचा पहिला अवतार पोटात टाकून देवाचे नाव घेऊन एखादे चांगले काम करायला काय हरकत आहे? केवळ मासेच नव्हे तर साबुदाणा, शेंगदाणे व बटाटा ह्यांचे जू तरी मानेवर बाळगायचे कारणच काय? मुळात कुठल्याही प्राचीन भारतीय धर्म ग्रंथात उपास ही संकल्पना अशी असल्याचे मी तरी अजुनपर्यंत वाचलेले नाही.

शेवटी सर्व ग्रंथ एकच सांगतात, चांगले वागा व आपले काम निष्ठेने करा. (नियतं कुरू कर्मं त्वम् । गीता ३-८)

साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाणे इच्छा होईल तेव्हा खा. मात्र त्यांना उपासाच्या नावाखाली खाऊ नका. वैतागाने, नाईलाजाने केलेला तो उपवास नक्कीच नव्हे. अश्याने धार्मिकच काय पण शारीरिक वा मानसिक दृष्टीने पण काहीही लाभ होणार नाही.

(क्रमश:)

Sunday 28 September 2008

मिसळण्याचा डबा

आपल्या प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकघरात स्टीलचा किंवा प्लॅस्टिकचा बऱ्याच उभट गोल वाट्या असलेला रोजच्या वापरातील
डबा असतो ज्याला मिसळण्याचा / मसाल्याचा डबा असे म्हणतात.

आमच्याकडे असा पारंपारीक स्टीलचा डबा असून त्यात सात वाट्या आहेत. ज्यात मोहरी, उडिद, हळद, जीरे, तीळ, लाल तिखट
ठेवलेले आहेत. (तीळ अश्यासाठी की ते खाल्ले पाहिजेत म्हणून. मिसळण्याचा डब्यात ते ठेवले की इतर पदार्थांसोबत घातले
जातात).

मुंबईच्या हवेला टोके, पोरकिडे, केंब्र रोजच्या वापरातील वस्तुंना सुद्धा होतात. म्हणून हळद, लाल तिखट ह्यांत बिब्बे घातलेले असतात. देशावर काही ठिकाणी मी हिंग, मसाले सुद्धा ह्या डब्यात ठेवलेले पाहिले आहेत. पण ह्या हवेंत हिंग व मसाले हवा लागली तर लवकर दगड
बनतात. म्हणून ते मिसळण्याच्या डब्यात आम्ही ठेवत नाही. तुमच्या घरातील मिसळण्याचा डब्यात काय काय असते?

झटपट बटाटा पोळी



जिन्नस -
२ पोळ्या,
१ उकडलेला बटाटा,
लाल तिखट,
मीठ,
जीरं-धने भुकटी,
तेल

मार्गदर्शन -
१ उकडलेला बटाटा घ्यावा. त्यात आवडीनुसार लाल तिखट, मीठ, भाजेलेली जीरं-धने भुकटी घालावी. ही भुकटी तयार
नसल्यास नुसते जीरे घातले तरी चालते. हे मिश्रण नीट मळून एकजीव करावे. नंतर शक्यतो जर शिळी पोळी असेल तर ती घ्यावी. तिच्या अर्ध्या भागावर हे मिश्रण नीट लावून उरलेला अर्धा भाग करंजी प्रमाणे त्यावर पालथा घालावा. तसेच दुसऱ्या पोळीच्या
बाबतीत ही करावे. आता तव्यावर मंद आचेवर हे दोन्ही भाग ठेवावेत व बाजूने चमच्याने किंचित तेल घालावे. उलथण्याने ही पोळी हळूवारपणे दाबत राहावी. दोन्ही बाजू लालसर कुडकुडित झाल्या की ह्या पोळ्या खाली काढाव्यात. पोळीचा वरचा भाग उलथण्याने उघडावा. एकदम वाफेचा लोट येईल. तो जाऊ द्यावा. पोळी थोडी निवली की परत वरचा
भाग लाऊन फ्रँकी प्रमाणे खावे.

टीपा -
पौष्टिकतेसाठी इतर भाज्या बारीक चिरून पण घालता येतात. मात्र त्या शिजायला वेळ लागतो. पोळी करपू शकते. कारण ती आधीच बनवलेली असते. मात्र सिमला मिरची, कांदा व इतर भाज्या वेगळ्या वाफवून घेऊन नंतर
त्या शिळ्या पोळीत ठेवून फ्रँकी बनविता येते. तो जरा वेळखाऊ प्रकार आहे. वरील बटाटा मिश्रणात मी थोडे तीळ सुद्धा घालते.

माऊचे बारसे




आमच्याकडे फार पूर्वी एक कुत्रा होता. तो दिसायला उग्र होता. मराठीप्रेमापोटी त्याचे नाव टॉम्या, टायगर वै. असे विदेशी न ठेवता त्याला वाघ्या हे अस्सल मराठी नाव ठेवले. ह्या वाघ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अनोळखी माणूस दिसला की भलताच प्रेमात यायचा. शेपुट पायात घालून प्रेमाने त्या माणसाला चाटायचा. एकुणच नाव सोनुबाई असा प्रकार होता. हा आमचा वाघ्या पूर्णपणे अहिंसक होता.

६ महिन्यापूर्वी मी एक मांजराचे पिल्लू रस्त्यावरून उचलून आणले. मागील अनुभव गाठीशी असल्याने जाणीवपूर्वक नाव न ठेवायचे ठरवले. आणले तेव्हा ते अतिशय दुबळे, अशक्त व काळवंडलेले होते. त्याच्या दुबळेपणाकडे पाहून पहिले २-३ दिवस त्याला अंघोळ घालायचा धीर होईना कारण कोणीतरी म्हणाले होते की मांजरांना अंघोळ सहन होतेच असे नाही. त्यावेळी मी त्याला प्रेमाने कालुंद्री, डुक्लीन असे म्हणत असे. ४-५ दिवसांनी त्याला कोमट पाण्याने अंघोळ घातली, स्वच्छ खसाखसा पुसले आणि कापसाने त्याच्या कानातला मळ सुद्धा हळूवार काढला. मग कायापालटच झाल्यासारखे ते मांजरू छान दिसायला लागले. मग मी त्याचे नाव शुंदडी ठेवले. हळू हळू ते पिल्लू आमच्याकडे रुळले.

पहिले ५-६ दिवस केवळ दुधावर ठेवले. कारण पोळीचे तुकडे आणि भात ते खात नसे. पण १-२ दा लक्षात आले की ते पिल्लू पातळ प्लॅस्टिक आणि रबरबँड खाते. आता आली का पंचाईत. [मुंबईत लोकं अन्न प्लॅस्टिक पिशवीत बांधून उकिरड्यावर टाकतात आणि कळत नकळत त्या अन्नाबरोबर प्लॅस्टिकसुद्धा उकिरड्यावर राहणाऱ्या प्राण्यांच्या पोटात जाते (मध्यंतरी एका मरणासन्न गायीच्या पोटातून न पचलेले ५ किलो प्लॅस्टिक काढल्याचा स्लाईड शो मी पाहिला होता)].

आमच्या मांजराला तर त्याचीच चटक लागली होती. आता काय करायचे? काळजी वाटायला लागली. जालावर व इतर सर्वत्र शोधाशोध केली पण हा प्रकार जरा नवीन होता. निश्चित उपाय मिळेना. कितीही काळजी घेतली आणि काहीही चांगले चुंगले खायला दिले तरी हे माऊ सांदी कपाटीतून पातळ प्लॅस्टिक व रबरबँड शोधून काढून खायचे आणि ह्या अभक्ष्य भक्षणाचे परिणाम लवकरच दिसायला लागले.

आधीच दुबळेपणा त्यात हे असे प्लॅस्टिक व रबर खाणे. त्याने हळू हळू त्याचे एका बाजूचे केस झडायला लागले, डोळ्यातून घाण यायला लागली, तोंडाला बुरशी आली, पोट फुगले, पाय फेंगाडत चालायला लागले. मग त्याला बैल घोडा रुग्णालयात नेले. तिथल्या डॉक्टरांनी वेगवेगळी औषधे लिहून दिली.

पण ह्या सर्व औषधांचा परिणाम दिसायला १-२ महिने जावे लागले. हळू हळू ते चांगले दिसू लागले. पण अनुभवी लोकं म्हणू लागली, मांजराला नॉन-व्हेज हवेच.

मग त्याच्यासाठी उकडलेले अंडे आणायला लागलो. त्याला पण आता चांगले अन्न खायची सवय लागली होती. मधल्या काळात माझ्या मित्र मैत्रिणींनी त्याचे नाव टकलू आणि फेंगाडू ठेवले होते. ते जाऊन परत त्याला सर्व लोक शुंदडी म्हणायला लागले. एकंदरीत माझे माऊ आता छान व्हायला लागले होते. अंगावर सोनेरी लव आली.

पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कालांतराने लक्षात आले की ते माऊ मागील पाय ओढत चालत आहे आणि त्याने उडी मारणेच सोडून दिले आहे. तसेच जेव्हा ते नखे बाहेर काढी तेव्हा ती त्याला आत घेता येत नसत. नखे सतत चादरी, कपडे ह्यात रुतून बसत. तसे मी स्वत: डॉक्टर व औषधे ह्याच्या विरुद्ध आहे. आजारी पडले तर आपोआप, नैसर्गिक रीत्या किंवा घरगुती औषधांनी तो कसा बरा होईल ह्यावर माझा जास्त भर असतो. पण मांजराच्या बाबतीत हा धोका पत्करायचा नाही असे मी ठरवले होते. म्हणून तातडीने त्याला टोपलीत घालून परत दवाखान्यात नेले. तिथल्या डॉक्टरांनी त्याला तपासले व जाहिर केले की त्याला "तात्पुरता पक्षाघात" झाला आहे.

गंमत म्हणजे केस पेपर भरायची वेळ आली, डॉक्टरांनी विचारले काय नाव आहे मांजराचे आणि माझी पंचाईत झाली. आता काय सांगायचे बरे? आयत्या वेळी चांगले नावही सुचेना. डॉक्टर मग आपुलकीच्या स्वरात म्हणाले, मांजराचा मान राखावा, त्याला ‘मीनू’ म्हणत जा.

असो. आता परत गोळ्या, औषधे चालू झाली होती. मात्र आता हे माऊ बरेच मोठे झाले होते. गोळ्या घ्यायला त्याला अजिबात आवडायचे नाही. तीक्ष्ण घ्राणेंद्रियामुळे गोळ्या काढल्या की त्याला लगेच वास यायचा. जवळ गेले की दात आवळून घ्यायचे. नखं मारायचे (म्हणून मी त्याला भुसनळी, चामुंडेश्वरी म्हणायचे). पण तरीही मी नेटाने औषधे देत राहिले.

आता हे मांजर छान झाले आहे. तब्येत खणखणीत झाली आहे. अंगावरची सोनेरी लव परत आली आहे. रोज १ अंडे, दुध, बिस्किटे, १ उकडलेला बटाटा असे काय काय खाते. मुख्य म्हणजे आता माकडासारख्या इकडून तिकडे उड्या मारते.

अधून मधून प्लस्टिक खाण्याचा प्रयत्न करते पण "माकलू हुं, कोण प्लॅस्टिक खातयं, फटके हवे का?" असे दरडावले की गुपचुप प्लॅस्टिकपासून लांब जाते. हे म्हणजे लहान मुलासारखे आहे, पालक ओरडतात म्हटल्यावर तिच गोष्ट हिरीरीने करायची.
पण शेवटी प्लॅस्टिक हानिकारक आहे हे त्याला त्याच्या भाषेत समजावणार तरी कसे?

पण चांगली गोष्ट म्हणजे आता त्याला अन्न खायला आवडू लागले आहे. ये, हे घे म्हटले की असेल तिथून धावत येते (मात्र नुसते ये म्हटले की ढुंकूनही पाहात नाही). थोडक्यात काय तर मांजराला नावाची गरज नसते. 'सोयरा' मध्ये म्हटल्याप्रमाणे
प्राण्यांना फक्त नाद कळतो.

आज जेव्हा मी जालावर मांजराच्या नावासाठीची संस्थळे बघते तेव्हा मला वाटते की मांजराला नावाची गरजच काय? आणि मांजराचे बारसे करणारे आपण कोण? शांताबाई म्हणतात त्याप्रमाणे, आपण मांजर पाळत नसतो तर ते आपल्याला पाळत असते.

सह्याद्री वाहिनी विकली?

ही ओळ वाचल्यावर साहजिकच शंका येते, कधी, केव्हा आणि कोणाला. तशी शंका मला पण आहे आणि खरी गोम तर पुढेच आहे. वृत्तपत्रांमध्ये ह्या बद्दल अवाक्षर सुद्धा नाही. पण मी गीतेवर हात ठेवून सांगायला तयार आहे की मी स्वतः: त्या वाहिनीवर ठळक अक्षरांत
वाचले, थोड्याच वेळात सह्याद्री वाहिनी विकली.

मी म्हणते, थोड्याच वेळात विकायचे कारण काय? निविदा वगैरे काढून सावकाश विकावी.

मी ह्या बाबत बरेच जणांशी बोलले. त्यातल्या अनेकांचे म्हणणे असे की हा विकली शब्द साप्ताहिकी अश्या अर्थाने असला पाहिजे. असे असेल
तर सह्याद्री वाहिनीला साप्ताहिकी हा सुंदर शब्द सोडून विकली हा शब्द का घ्यावासा वाटला आणि जर तो अट्टहासाने घेतलाच तर निदान तो
वीकली असा तरी लिहायला हवा होता ना? शेवटी ऱ्हस्व दीर्घ ह्यांच्या चुका करण्याची जबाबदारी ई टीव्ही, महाराष्ट्र टाईम्स अश्या प्रसार
माध्यमांची आहे. सह्याद्रीला व्याकरण चुकांचे हक्क दिले कोणी?

माझे एक स्नेही व निवृत्त इंग्रजी शिक्षक म्हणतात, म. टा. वाचताना त्यातील ऱ्हस्व दीर्घाच्या आणि इतर शाब्दिक चुका पाहून अंगावरून
झुरळ गेल्यासारखे वाटते.


असे असताना सह्याद्री वाहिनीने म. टा., ई. टीव्ही इ. शी स्पर्धा करायचे कारणच काय? हा तर तोंडचा घासच काढून घेतल्यासारखा नाही का?
मला तरी आता ह्या सर्वांवर एकच इलाज दिसतो, मराठीमध्ये सर्व व्याकरण नियम रद्द करणे. ज्याने ज्याला पाहिजे तशी मराठी लिहिणे. म्हणजे गैरसमजाला जागाच उरणार नाही. ई.टीव्ही वरील चलपट्ट्या (टीकर) पाहताना शहारे येणार नाहीत.

पोह्यांचे दोन झटपट प्रकार

जिन्नस -
हिंग, साखर, मीठ
जाड पोहे
हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
तुपाची बेरी
दाण्याचे कुट
पातळ पोहे
ओले खोबरे
मार्गदर्शन


१) आयत्यावेळी नारळ खवणावा. कोथिंबीर बारीक चिरावी. जाड पोहे भाजून घ्यावेत. ते वेगळे ठेवावेत. पोहे निवेपर्यंत १ -२ कमी
तिखट हिरव्या मिरच्या विस्तवावर चांगल्या भाजून घ्याव्यात. मात्र पूर्ण काळ्या करू नयेत. कात्रीने त्यांचे बारीक तुकडे करावेत. आता निवलेले पोहे घेऊन त्यात हिंग, साखर, मीठ चवीप्रमाणे घालून ते नीट मिसळून घ्यावे.

त्यात भरपूर ओले खोबरे घालून पोहे थोडे अरमळावेत (कुस्करावेत). वर मिरचीचे तुकडे घालावेत आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
पेरावी. प्रत्येक घासात निदान एक मिरचीचा तुकडा येईल अश्या रीतीने हे पोहे खावेत.

२) चांगल्या तुपाची खरपूस चॉकलेटी अशी बेरी असेल तर ती खरवडून एका तसराळ्यात काढावी. पातळ पोहे नीट भाजून घ्यावेत. वेगळे ठेवावेत. वर सांगितल्याप्रमाणे मिरची आचेवर भाजून घ्यावी आणि कात्रीने तिचे बारीक तुकडे करावेत. त्या तुकड्यात
चवीप्रमाणे हिंग, मीठ, साखर, दाण्याचे कुट घालून सर्व नीट एकत्र करून घ्यावे. मग तसराळ्यातील बेरी, निवलेले पातळ पोहे व
हे मिश्रण हलक्या हाताने एकत्र मिसळावे व खावेत. ह्यात कोथिंबीर आणि खोबरे घातलेच पाहिजेत असे नाही.
पण चवीसाठी घालायला हरकत नाही.

टीपा
मिरची भाजताना नीट सर्व बाजुंनी भाजली गेली पाहिजे आणि कधी कधी आच लागताच मिरची फुटते. म्हणून ती चिमट्यात पकडून
भाजावी. ही भाजलेली मिरची सुरीने कापणे त्रासदायक असते म्हणून कात्रीने कापावी. भाजलेले पोहे नेहेमी इतर गोष्टींबरोबर
आयत्यावेळी एकत्र करावेत (नाहीतर ते चांबट होतात) आणि लगेच खावेत.

कॉफी करताना जायफळ पुड कधी घालायची?

हल्ली सर्वत्र, पाहावे तिथे सर्वेक्षण, मते मागविणे हा प्रकार बोकाळलेला आहे. दूरदर्शनवर तर कुठलीही वाहिनी पाहा एकच ऐकू येते... आपले मत आम्हाला नक्की कळवा, आमचा पत्ता आहे... आम्हाला एसेमेस करा इ. इ. म्हणून माझ्या पण मनात विचार आला जरा वाचकांची पण मते विचारात घ्यावीत (अर्थात त्यांना एसेमेस करण्याचा भुर्दंड न पाडता).

मुद्दा अगदी साधा सोपा आहे, कॉफी करताना जायफळ पुड कधी घालायची? आणि पर्याय आहेत १) पाणी उकळत असताना २) दुध टाकल्यावर ३) कॉफीचे भांडे विस्तवावरून खाली उतरवल्यावर ४) जायफळाने झोप येते. सबब, जायफळ घालू नये. ५) जायफळाऐवजी आले किसून घालावे. ६) जायफळ पुड कॉफी भुकटीत मिसळून ठेवावी.

मायबाप, रसिक, दर्दी व खवय्या वाचकांना विनम्र विनंती की त्यांनी आपली मते अवश्य कळवावीत.



Original post : Coffee

सागरगड

आम्ही एकदा अलिबाग जवळच्या सागरगड नावाच्या किल्ल्यावर गेलो होतो. हा किल्ला पेठ, पेब सारखा चढावयास सोपा आणि फारसा प्रसिद्ध नसल्यामुळे अजून स्वच्छ सुद्धा आहे. किल्ल्यावर अजून सुद्धा बालेकिल्ला, तटबंदी शाबूत असून पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था १२ ही महिने असते. तिथेच वांदरटोक हा कडा असून तेथून रायगड जिल्ह्याचे अत्यंत विलोभनीय दर्शन घडते.
मुख्य म्हणजे तेथील सिद्धेश्वर नावाच्या शिवमंदीरात दर शनिवार, रविवार भाविकांसाठी जेवणाची नि:शुल्क व्यवस्था असते ज्याचा गिर्यारोहक लाभ घेऊ शकतात. तसेच तिथे दर शिवरात्रीला मोठा उत्सव होतो. असा हा सागरगड, प्रत्येकाने जावे असा आणि त्याचे पावित्र्य राखावे असा.

म. टा. वर सागरगड - दुवा क्र. १
विकीमापिया वर सागरगड - दुवा क्र. २
सकाळ वृत्तसेवा - दुवा क्र. ३

अगदी तुमच्यासारखाच

त्याला जुनी हिंदी गाणी आवडतात, अगदी तुमच्यासारखीच.
तो इंजेक्शन्स ना घाबरतो, अगदी तुमच्यासारखाच.
प्रत्येक वेळा अमिताभ मेला तेव्हा तो रडला, अगदी तुमच्यासारखाच.
तो सुद्धा १-२ दा प्रेमात पडला, अगदी तुमच्यासारखाच.
त्याला मारले तर लागते, अगदी तुमच्यासारखेच.
तो घरातच सर्वात जास्त आनंदी असतो, अगदी तुमच्यासारखाच.
त्याला पहिल्या पावसाचा मृद् गंध आवडतो, अगदी तुमच्यासारखाच.
त्याने ओल्ड ट्रॅफर्डवर भारताला पाठिंबा दिला, अगदी तुमच्यासारखाच.
तो सतत आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता करतो, अगदी तुमच्यासारखाच.
तो अनोळखी व्यक्तीसाठी मृत्युमुखात गेला आहे आणि ती व्यक्ती आहेस तू.

***
ही जाहिरात आहे कारगिल शूर सैनिक मदतनिधीसाठी, ज्यावेळी कारगिल युद्ध ऐन भरात होते.

प्रत्येकच युद्धात संवेदनशील नागरिक आपापल्या परीने युद्ध निधीला मदत करीतच असतो. अनेकदा आपण अतिशय गरीब लोकांनी पण आपली पूर्ण दिवसाची कमाई, पै पै जोडून केलेला दागिना काढून दिल्याचे वाचतो. त्यासाठी खरे तर जाहिरातीची अजिबात गरज नसते. तरीही ह्या जाहिरातीने इतिहास घडवला. ज्या दिवशीपासून ही जाहिरात प्रसिद्ध झाली त्या दिवसापासून अनेक मोठे उद्योग, उच्च स्तरीय, उच्च मध्यम वर्गीय ह्यांनी सढळ हाताने मदत केली. कारण ही जाहिरात लोकांच्या हृदयाला भिडली. विशेषत: त्यातील शेवटचे वाक्य.

तुमच्या आमच्या सारखाच एक जण आपल्यासाठी आपल्या कुटुंबियांपासून हजारो मैल दूर लढतोय. आपल्या उद्यासाठी तो त्याचा आज देत आहे. आपल्यासाठी तो स्वत:ची स्वप्नेच नव्हे तर जीवही भारतमातेवर ओवाळून टाकत आहे.

मला वाटते, आज जेव्हा आपण वैतागून म्हणतो, मला माझ्या देशाने काय दिले तेव्हा ह्या सर्वाची जाणीव आपण ठेवलीच पाहिजे.

पण

नुकतेच वाचनात आले की हिंदी चित्रपट सृष्टीतील विख्यात रचनाकार श्री. प्रसून जोशी ह्यांनी पण केला होता की ते त्यांच्या गाण्यांमध्ये
कधीही प्यार, इष्क, मोहब्बत इ. विटलेले शब्द वापरणार नाहीत त्यामुळेच की काय त्यांची अनेक गाणी सिल्क रुट, अब के सावन, रंग दे बसंती, तारे जमीन पर इ. द्वारे लोकांना भावली आणि आजही ती लोकांच्या मनांत रुंजी घालतात.

असाच एखादा पण इतरांनी करावयाचा झाला तर - मराठी चित्रपटसृष्टीला सासर, माहेर, हळद, कुंकू, पाटील, पाटलीण, साखर सम्राट
हे सोडावे लागेल. दक्षिण चित्रपट सृष्टीला भडक, बटबटीत कपडे, अनावश्यक खर्च, पांचट विनोद सोडावे लागतील (आठवा : जीन्स
नावाचा भयपट).


हिंदी चित्रपट सृष्टीत अमिताभला अर्ध्या वयाच्या नायिकेबरोबर नायक म्हणून काम करण्याचे सोडून देऊन संन्यास घ्यावा लागेल. गुजराती चित्रपट सृष्टीला अत्याचारी सरदार आणि हुंडाबळी ह्या संकल्पना सोडाव्या लागतील. अलका कुबलला रडणे सोडून द्यावे लागेल. देवोल घराण्याला बॉबी देवोल नावाचा एक बथ्थड लोकांच्या माथी मारण्याचे सोडून द्यावे लागेल.

मराठी वामि (वारंवारता अधिमिश्रण अर्थातच एफ. एम. ) च्या निवेदकांना श्रोत्यांना ऊठसूट बोधामृत पाजणे सोडून द्यावे लागेल. राखी सावंतला सवंग विधाने करणे सोडून द्यावे लागेल. मल्लिकाला राहुल बोसला अभिनयाचे धडे देणे सोडून द्यावे लागेल.
काय, खरे की नाही?

Wednesday 3 September 2008

दुध-दुभते (भाग २)

मागील लेखात एक गोष्ट नमूद करावयाची राहिली ती म्हणजे बऱ्याच दाक्षिणात्य लोकांच्या उपाहारगृहात दहीभात मिळतो. उपाहारगृहातील आचारी रात्रीच्या वेळेस (गार) भात शितन् शित मोकळा करतात. तो व्यवस्थित दुधात कालवतात आणि त्या दुधालाच विरजण लावतात. सकाळी ताजा दहीभात तयार. त्याला थोडे मीठ आणि चेरीसारखी दिसणारी लाल बुटकी सुकी मिरची तळलेली लावून उडदाच्या तळलेल्या पापडाबरोबर तो दहीभात वाढतात. इराण्यांच्या उपाहारगृहात ज्याप्रमाणे रोज मस्कापाव खायला जाणारी खवैय्यी मंडळी आहेत त्याचप्रमाणे ह्या स्वादिष्ट दहीभाताचा सुद्धा रोज आस्वाद घेणारे खवैय्ये आहेत.
बरीच मंडळी प्रवासाला निघायच्या आदल्या दिवशी नेमाने हा दहीभात विरजतात आणि तयार झालेल्या दहीभाताला दुसऱ्या दिवशी जिरे, शेंगदाण्याची तुपाची फोडणी देऊन प्रवासात घेऊन जातात. कारण एकतर हा टिकतो आणि प्रवासात तेलकट खाण्यापेक्षा कितीतरी चांगला.
असो. आजच्या भागात आपण दुध नासू नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि नासल्यास त्यापासून बनवायचे पदार्थ पाहू.
दूध नासू नये म्हणून १) दुध-दुभत्याची भांडी व गाळणे वेगळी असावीत. (ती भांडी शक्यतो हिंडालियमची असावीत. स्टीलच्या भांड्यात दूध करपते). २) दूध आंबट पदार्थांच्या जवळ ठेऊ नये. ३) दूध शीतयंत्राच्या बाहेर ठेवले असेल तर ते उन्हाळ्यात दर ५-६ तासांनी तापवावे. हिवाळ्यात दर ७-८ तासांनी तापवावे. ४) दुधाचे भांडे उचलण्यासाठी वापरावयाची सांडशी / गावी / पक्कड प्रत्येकवेळी धुवून घ्यावी. ५) प्रत्येक वेगवेगळ्या तापवलेल्या दुधाचे भांडे वेगळे ठेवावे. दोन दुधे खात्री असल्याशिवाय एकत्र करू नयेत.
समजा, दुध नासले आहे अशी शंका आली तर थोडे दुध नमुन्यादाखल वेगळे तापवावे. ते जर फाटले तर मूळ दुधात १ लिटरला १/२ चमचा ह्या प्रमाणात खायचा सोडा लावावा आणि मग ते दुध तापवावे. अश्याने ते दुध फाटत नाही. मात्र अश्या दुधामुळे चहा किंवा दही चवीला थोडे खारट लागते.
समजा, दुध नासले आहे अशी पूर्ण खात्री झाली असेल तर ते दुध तापवायला ठेवावे आणि पहिली उकळी आली की त्यात लिंबूरस / तार्तारिक आम्ल काही थेंब घालावे. दुध नीट फाटते आणि पाणी व पांढरा अर्क वेगळा दिसायला लागतो.
हा पांढरा अर्क म्हणजेच पनीर होय. पनीर करावयाचे असेल तर प्रथम ते दुध गाळण्याने गाळून घ्यावे. गाळण्यात असलेले पांढरे अवशिष्ट पातळ, राजापुरी पंचात (किंवा तलम सुती कापडात) ठेवावे आणि तो पंचा सर्व बाजूंनी नीट गुंडाळून त्यावर वजने / मोठा दगड ठेवावा. ह्या वजनाने त्या पनीर मधले अतिरिक्त पाणी वाहून जाते आणि घट्ट पनीर मिळते.
मात्र पनीर हा उत्तर भारतात स्वयंपाकात वापरला जाणारा पदार्थ आहे. आपल्याकडे गेल्या शतकात पनीर वापरले जात नसे. त्यावेळी दुध नासले तर त्यात गुळ, वेलची, केशर घालून पीत असत आणि आंबोळ्या / आयते बुडवून खात असत. हल्ली सर्वत्र पनीरचा बोलबाला आहे.
टीपा
पनीर गाळण्यात गाळल्यावर जे पांढरे पाणी मिळते ते १) कणीक भिजवताना वापरावे २) एका बाटलीत ठेवून बाटली शीतयंत्रात ठेवावी. पुढच्या वेळी दुध नासवण्यासाठी हे पाणी उपयोगी पडते.