मराठी मातीवर आणि ह्या मातीच्या सन्मान्य इतिहासाचा अभिमान बाळगणार्या सर्व भारतीयांना कळकळीचे आवाहन.
नुकताच आम्ही शिवशौर्य ट्रेकर्स द्वारे कुलाबा किल्ला - पद्मदूर्ग -
जंजिरा - खांदेरी आणि कणकेश्वर मंदिर असा दौरा करून आलो. त्यात
पद्मदूर्गाला भेट देणे हा अनुभव विशेष संस्मरणीय होता. कारण पद्मदूर्ग
किल्ल्यावर सहजासहजी जाता येत नाही. मुरुड किनार्यावरील कोळीबांधवांशी
काही दिवस अगोदर बोलून तिथे जाण्यासाठी बोट निश्चित करावी लागते. ती मिळतेच
असे नाही. मिळाली तर कोळीबांधव आपले नित्याचे व्यवहार सोडून आपल्या सवे
येत असल्या कारणाने बोटीचे भाडे थोडेफार जास्त असू शकते. मात्र आयत्या वेळी
बोट भाड्याने मिळणे केवळ अशक्य. त्यामुळे जंजिर्यापासून हाकेच्या अंतरावर
असूनही ह्या किल्ल्यावर पर्यटकांचा राबता अतिशय कमी आहे.
पद्मदूर्ग हा किल्ला मुरुड गावापासून अगदी जवळ आहे. तो नऊ एकरावर
फैलावलेला असून किल्ल्याचे बांधकाम पाहून डोळ्याचे पारणे फिटते. असा हा
बुलंद, बेलाग, अवाढव्य किल्ला जंजिरेकर सिद्ध्याच्या नाकावर टिच्चून बांधणे
सोपे नव्हे. मराठेशाहीचे हे अस्तित्व आणि ते ही हाकेच्या अंतरावर हे
जंजिरेकर सिद्धीच्या अवघड जागीचे दुखणेच बनले होते. एक वेळ तर अशी आली होती
की पद्मदूर्गाच्या मदतीने महापराक्रमी लाय पाटील हा जंजिरेकर सिद्ध्याचा
खेळच आटोपणार होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून सिद्ध्याची गादी टिकून राहिली
(पार १९४७ पर्यंत). असो.
असा हा दुर्लक्षित दूर्ग खरोखरच पाहण्या जोगा आहे आणि हा किल्ला समुद्र
सपाटीवर असल्याने कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट न होता ह्या किल्ल्यावर
जाता येते. त्यामुळे एक पर्यटक म्हणून आपण आपल्या कुटुंबियांना घेऊनही ह्या
किल्ल्यावर जाऊ शकता. तसेच केसरी, सचिन सारख्या मोठ्या पर्यटन संस्थांनी
ठरवले तर तिथे नियोजित पर्यटन सुद्धा होऊ शकते. केवळ एकच अडचण म्हणजे तिथे
बोटी लावण्यासाठी धक्का बांधलेला नसल्या कारणामुळे पाण्यात उतरावे लागते.
पण सोबत एखादी छोटी शिडी नेली तर ही अडचण सुद्धा दूर होऊ शकते.
सिद्धीच्या प्रतिकाराची तमा न बाळगता दौलतखानाच्या अतुल योगदानाने
निर्माण झालेला हा किल्ला नऊ एकरावर वसलेला आहे. कमळाचा आकार असलेला पडकोट
हे ह्याचे मुख्य वैशिष्ट्य. तसेच किल्ल्याचे बांधकाम करताना काळ्या
पत्थरापेक्षा जास्त बळकट असे वापरलेले चुना आणि इतर घटकांचे मिश्रण जे आजही
पुरातन वास्तु कौशल्याची साक्ष देत खंबीरपणे उभे आहे. गडाला एकूण सहा
बुरुज असून त्यात ३८ तोफासुद्धा आहेत. असा हा अनवट किल्ला पाहताना
क्षणोक्षणी मनात विचार येत होता की जंजिर्यासारखाच महत्त्वाचा असून ही हा
दूर्गाधिराज दुर्लक्षित का? पर्यटक जंजिरा पाहायला आवर्जून येतात तर
पद्मदूर्ग पाहायला का नाही?
अधिक चौकशी करता असे कळले की जंजिरा हे आज मोठे पर्यटन केंद्र आहे जे
तिथल्या लोकांना आज मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देत आहे. तेथे वसलेले
सिद्धीचे वंशज पद्मदूर्गाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होऊ नये म्हणून
मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. कारण पद्मदूर्गाला महत्त्व प्राप्त झाले
तर त्याचा फायदा मुरुड गावास तसेच मुरुड समुद्र किनार्यावरील हिंदु कोळी
बांधवांना होईल. ह्या सिद्धीच्या वंशजांना पद्मदूर्ग म्हणजे वैर्याचे
अस्तित्व वाटते. वाईट इतकेच आहे की महाराष्ट्र शासन आणि स्थानिक
आमदार-खासदार हे त्यांचीच पाठराखण करत आहेत. निदान शिवसेना आणि मनसे
ह्यांनी तरी राज्यपातळीवर प्रयत्न करून पद्मदूर्गाला गतवैभव प्राप्त करून
दिले पाहिजे. पद्मदूर्गावर बोटी लावण्यासाठी एक साधा धक्का बांधला तरी
पर्यटकांचे पद्मदूर्गावर येणे जाणे चालू होईल आणि मुरुड गावाला त्याचा
आर्थिक फायदा पण होईल.
पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ति हवी जी सध्यातरी दृष्टिक्षेपात नाही.
ह्याचे मुख्य कारण म्हणजे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात जंजिरेकरांचे
असलेले आर्थिक वर्चस्व आणि हे वर्चस्व आले आहे जंजिरा किल्ल्याला भेट
देणार्या पर्यटकांना लुटून.
"लुटून" हाच शब्द खरा आहे कारण किनार्यावरील दुकाने, किल्ल्यातील
वाटाडे हे पर्यटकांकडून अवास्तव किंमती वसूल करतात. वाटाड्यांनी तर बोट
मालकांच्या साथीने एकाधिकार निर्माण केला आहे. साधा किल्ला दाखवण्याचे आणि
माहिती सांगण्याचे वाटाड्यांने आमच्याकडून रु. १२०० मागितले. इतके होऊनही
श्री. सुशील जे एक स्थानिक आहेत आणि ज्यांनी आम्हाला पूर्ण मोहिमेत सोबत
केली ते असे म्हणाले की हे वाटाडे (हबशी) सिद्धीचे थेट वंशज आहेत आणि जो
इतिहास सांगतात तो केवळ सिद्धीच्या पराक्रमाचा सांगतात आणि त्यांच्या
सोयीचाच सांगतात.
ह्या सर्व परिस्थितीत मराठी इतिहास प्रेमी सर्व भारतीयांना एकच करणे
शक्य आहे आणि जे अत्यंत आवश्यक सुद्धा आहे ते म्हणजे पद्मदूर्गावर आवर्जून
आणि वारंवार जाणे. एकदा का राबता वाढला की शासनाला पण नाईलाजाने
पद्मदूर्गावर जाण्यासाठी धक्का तसेच नौका-सेवा द्यावीच लागेल. ह्यामुळे
मुरुडकर एतद्देशीयांना पण लाभ होईल.
Photo courtesy - www.shivchhatrapati.com
Sunday, 13 May 2012
Subscribe to:
Posts (Atom)