Thursday, 14 November 2013
एक महायुद्ध
सध्या चेन्नई मध्ये जागतिक बुद्धिबळ स्पर्धा चालू आहे. तासंतास चालणाऱ्या त्या लढती केवळ पाहाणे हे पण अतिशय संयमाचे काम आहे. जणू धैर्याची परीक्षाच. असे असताना खेळाडूंनी तर ह्या लढतीसाठी किती परिश्रम घेतले असतील त्यांचे त्यांनाच ठाऊक.
अशीच एक प्रचंड मोठी लढत मराठेशाहीने दिली. त्या लढतीला 'वसईचा लढा' म्हणण्यापेक्षा मी त्या एक महायुद्धच म्हणेन. साष्टी बेटाला पोर्तुगीजांच्या अघोरी धार्मिक उन्मादातून सोडवण्यासाठी सुमारे तीन वर्ष घरापासून दूर राहून, अत्यंत असमतोल शस्त्रसज्जता असताना लहान-मोठे ११४ गडकोट जिंकून, तसेच अभेद्य वसईचा किल्ला जिंकण्यासाठी पराक्रमाची शर्थ करून चिमाजी अप्पांच्या कुशल नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गणपतराव मेहेंदळे, रामचंद्र पटवर्धन, बापूजी भिवराव, विठोजी कदम, जिवाजीराव विचारे, गंगोजी नाईक शंकराजी केशव, अणजूरकर मंडळी आदींचा समावेश असलेल्या पराक्रमी मराठी सैन्याने अखेर उत्तर कोकणातून धर्मांध आणि क्रूर पोर्तुगीजांची कायमची हकालपट्टी केली आणि तेथील जनतेला दोनशे वर्षापासून चालत आलेल्या ‘इनक्विझीशन’ नावाच्या सैतानी वरवंट्यातून सुटका केली. ह्या लढाईत नऊ लाख बांगडी फुटली म्हणजेच सुमारे ४३ हजार मराठे कामी आले.
हे इनक्विझीशन म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माला अनुसरण्यास नकार देणाऱ्या माणसांची प्रथम चाप लावून नखे खेचून काढणे, जीभ कापणे, शरीर सोलणे अश्या शारीरिक छळांपासून सुरूवात करून त्याचा शेवट तेलात भिजवलेली गोणती अंगावर घालून माध्यान्हीच्या भर उन्हात सार्वजनिक स्थळी जिवंत जाळण्यात होत असे. साने गुरूजींनी ह्या प्रथेला मध्ययुगीन रानटीपणा असे नाव दिले आहे. युरोपात चालू केलेली ही भीषण प्रथा पोर्तुगीजांनी येताना आपल्या सोबत आणली. सहासष्ट गावांचा समूह असलेला सहासष्टी (साष्टी) प्रांत तसेच गोवा, दीव-दमण हे पोर्तुगीज अमलाखालील प्रदेश त्यात भरडून निघाले. पोर्तुगीजांच्या जुलमाच्या कथा ऐकून लोक खचून जात होते. मनात येईल त्यावेळी लोकांना पकडून आणायचे आणि कॅथॉलिक ख्रिश्चन बनण्याची सक्ती करायची आणि विरोध करणाऱ्यांवर पाशवी अत्याचार करायचे हे ठरूनच गेलेले होते. पांढरा झगा घालून तोंडाने कितीही दया, क्षमा, शांती, प्रभूची लेकरे वै. पुटपुटले तरी इतिहासात केलेली काळी, अधम, नीच कृत्ये झाकली जात नाहीत. आज साष्टीतील कॅथॉलिक ख्रिश्चन नागरिकांनी कितीही वेळा पोर्तुगीज अवशेषांची पालखीतून मिरवणूक काढली आणि त्यांचे गोडवे गायले तरी त्याने इतिहासातील कलंक लपला जाणार नाही आहे. साष्टी बेटावर जिथे घरटी एक विहिर परसदारी असायची तिथे विहिरीत पाव टाकल्यामुळे हिंदुंनी किती ख्रिश्चनांना धर्मातून बाहेर काढले त्या विहिरी नेमक्या किती आणि पाशवी छळामुळे, जीवाच्या भीतीने, यमयातना टळाव्यात म्हणून नाईलाजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांचे प्रमाण किती ह्याचे संशोधन व्हायलाच हवे. असो.
उत्तर कोकणातील तसेच गोव्यातील जनतेला ह्या नरकातून सोडवण्यासाठी छ. शिवाजी राजांनी आणि छ. संभाजी राजांनी अतोनात प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले. बिचाऱ्या जनतेचे मदतीसाठी टाहो फोडणे चालूच होते. पुढे शाहू राजांनी जुलमी सिद्दी साताला ठार करणाऱ्या भीमपराक्रमी चिमाजी अप्पांवर साष्टी बेटातून पोर्तुगीजांचे अस्तित्व नष्ट करण्याची कामगिरी सोपवली. १७३७ च्या आरंभी चिमाजी अप्पांनी ह्या ऐतिहासिक मोहिमेला सुरवात केली. तेवढ्यात त्यांचे थोरले भाऊ बाजीराव पेशवे ह्यांची भोपाळला निजामाशी जुंपली आणि बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पांना निजामाला दक्षिणेतून कुमक/रसद मिळू नये ह्यासाठी नेमले. मात्र निजाम त्या युद्धात हरल्यावर अजिबात विश्रान्ती न घेता १७३८ साली चिमाजी अप्पांनी पुन्हा वसईकडे आपले लक्ष केंद्रित केले. लढाई असतोल होती. पोर्तुगीज हे सशक्त आरमारी ताकद असलेले, उत्तम दर्जाच्या, पितळ व जस्ताच्या एकसंध तोफांचा ताफा असलेले तसेच शूर आणि धिप्पाड हबशी सैनिक व कुशल गोलंदाज (तोपची) पदरी बाळगून असलेले धनिक राज्यकर्ते होते. ह्या उलट मराठे सततच्या लढायांनी कर्जबाजारी झालेले होते. (लढाया करताना ४६ प्रकारचे बुणगे पदरी असणे आवश्यक असते. उदा. घोड्यांना खरारा करणारे, घोड्यांच्या पार्श्वभागाला तेलाने मालीश करणारे, तलवारीला धार लावणारे इ.
ह्या (घरापासून लढाई करण्यासाठी दूर असलेल्या) बुणग्यांचा आणि सैन्याचा पगार वेळेवर होणे सैन्याच्या मनस्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असते. सैन्य हे पोटावरच चालते.) मराठ्यांची जहाजे ही आकाराने छोटी होती. तर पोर्तुगीजांची जहाजे ही अत्याधुनिक तोफांनी युक्त अशी मोठाली तरंगती शहरेच होती.
परत पोर्तुगीजांच्या क्रौर्याचा दरारा इतका की मराठ्यांना मदत करणे म्हणजे स्वतःचा यातनामय मृत्यु स्वतःच लिहिणे. यदाकदाचित् मराठे हे युद्ध हरले असते तर तमाम जनतेला ह्याची किंमत मोजावी लागली असती.
मात्र चिमाजी हा कुशल सेनानी आणि रणनीतिज्ञ होता. त्याने जागोजागी बांधलेली पोर्तुगीजांची सशस्त्र ठाणी/छोटे गडकोट लढाई करून ताब्यात घ्यायला सुरूवात केली. पण पोर्तुगीज सुद्धा कसलेले राजकारणी होते. आरमाराच्या मदतीने आपले गेलेले ठाणे ते पुन्हा घेत असत. हा पाठशिवणीचा खेळ चालूच होता. मराठ्यांना कोणतेही ठाणे घेतले तरी सतर्क राहावे लागे. कारण पोर्तुगीज पुन्हा आपले ठाणे परत घेत आणि तोफांनी सुसज्ज करीत. म्हणूनच हे युद्ध दीर्घकाळ चालले. पण चांगली गोष्ट ही की पोर्तुगीज आरमार बुलंद असले तरी मानाजी आंग्रे ह्यांनी अतुलनीय पराक्रम करून, गनिमी काव्याने गोव्यातून त्यांना होणारा सागरी रसद पुरवठा थांबवला. ह्याचवेळी मराठ्यांनी गोव्यात एक आघाडी उघडली.
चिमाजीने धुरंधर सेनापती प्रमाणे अनेक खेळ्या करून पद्धतशीर पणे फास आवळत आवळत शेवटी मराठ्यांनी वसई किल्ल्याभोवतीची सारी जमीन जिंकली. मात्र सागरी वर्चस्व केवळ पोर्तुगीज आरमाराचेच होते. वसई किल्ल्याच्या तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला दलदल होती. मराठ्यांना लढाई करता करता दोन वर्षे झाली होती तर वसई किल्ला हा लांब पल्ल्याच्या तोफांनी सुसज्ज, धान्यकोठारांनी परिपूर्ण तसेच हबशी लढवय्यांनी भरलेला होता. त्यातच १७३५ ला स्पेनने पोर्तुगालवर आक्रमण केल्याने ताज्या दमाचे पोर्तुगीज समुद्र मार्गे भारतात आश्रयाला आले होते. आपली ही वसाहत पोर्तुगाल सहजासहजी सोडणार नव्हता. किल्ला ताब्यात राहिला असता तर आसपासची जमीन पुन्हा मिळवता आली असती.
आता नाही तर कधीच नाही हे जाणून चिमाजी अप्पा ह्यांनी पुन्हा निकराचे प्रयत्न केले. ते आणि इतर मराठे समोरासमोरील युद्धात प्रवीण होते पण इथे शत्रुच लांब होता. एवढेच नव्हे तर लांब बसून मराठ्यांना खिजवत होता. सागरी मार्गाने पोर्तुगीजांवर आक्रमण म्हणजे आत्महत्याच होती. म्हणून मराठ्यांनी दलदलीच्या मार्गाने आक्रमणे करून पाहिली पण जीवितहानी शिवाय काहीच पदरी पडत नव्हते. मराठ्यांचा धीर आता खचत चालला होता. दोन वर्षे सतत युद्धपरिस्थिती आणि वसईच्या किल्ल्याच्या जवळपास जायची पण शाश्वती नाही. अखेर चिमाजी अप्पांनी इंग्रजांना मदतीला बोलावले. इंग्रजांकडे दलदलीत सुरूंग लावण्याचे तंत्रज्ञान होते. मराठ्यांच्या हस्ते पोर्तुगीजांचा नायनाट होईल, महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर आपले वर्चस्व राहील आणि मराठे मोहिम सोडल्यावर साष्टी बेटावर आपला कब्जा राहील ह्या विचारांनी इंग्रज चिमाजी अप्पांना मदत द्यायला तयार झाले. पण इंग्रज रात्री दलदलीत जे सुरूंग लावायचे ते कधी उडायचेच नाहीत, तर कधी उशीरा उडून मराठेच मरायचे. आत पोर्तुगीज मात्र निवान्त होते. रसद न मिळताही तो अभेद्य किल्ला अजून वर्षभर सहज तगला असता.
१७३९ चा एप्रिल उजाडला. युद्ध सुरू होऊन अडीच वर्षे झाली होती. मराठ्यांची बेचैनी वाढू लागली. बरेच जणांना घरी परतायचे वेध लागले होते. आपण आता परत गेलो तर साष्टीकर जनतेचे हाल कुत्रे पण खाणार नाही, त्यांच्या नरक यातनांत वाढ होईल हे चिमाजी अप्पा जाणून होते.
अशावेळी एक निपुण सेनानी करेल तेच त्यांनी केले. “तोफेच्या तोंडी मलाच द्या म्हणजे माझे मस्तक तरी वसई किल्लात जाऊन पडेल“असे काळजाला हात घालणारे आवाहन केले. त्यामुळे मराठ्यांच्यात जोश निर्माण झाला. ते सारे मारू किंवा मरू ह्या ध्येयाने दलदलीतून वसई किल्ल्यावर चालून गेले आणि २ मे १७३९ ला पोर्तुगीज आणि मराठ्यांमध्ये समोरासमोरच्या, हातघाईच्या लढाईला प्रारंभ झाला. पण मराठ्यांना स्फुरण इतके चढले होते की दोन दिवसांमध्ये पोर्तुगीज शरण आले आणि वसई किल्ल्यावर भगवा फडकला.
मात्र मराठ्यांनी कोणतीही सुडबुद्धि न ठेवता पोर्तुगीजांना बायका-मुलांसह गोव्याला जाऊ दिले. तसेच तेथील चर्चेस ना तसेच बाटलेल्या ख्रिस्ती बांधवांना हात लावला नाही. वसई किल्ल्याच्या पाडावानंतर मराठेशाहीला भरपूर महसूल मिळाला. पेशव्यांनी तो निधी अर्नाळा किल्ला बांधण्यासाठी वापरला. हा अर्नाळा एकच किल्ला असा होता की मराठेशाहीच्या पतनानंतर ही तो किल्ला श्री. माधव बेलोसे ह्या धाडसी किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली इंग्रजांशी लढत राहीला.
चिमाजी अप्पांनी सोबतच्या मराठी अधिकाऱ्यांना साष्टी बेटावर ठिकठिकाणी अधिकारपदे दिली आणि ते स्वतः पुन्हा पुण्याकडे गेले. मात्र जाताना पोर्तुगीज ज्या घंटांचा नाद करून धर्मभीरू मंडळींच्या मनात धडकी भरवायचे त्या तीन घंटा मात्र सोबत घेऊन गेले जेणे करून कोणत्याही नागरिकाला पुन्हा कधीही दिवाभीताचे जीवन जगायला लागणार नाही.
ह्या महायुद्धातील विजयाने मराठ्यांचे मनोधैर्य उंचावले. त्याचा परिणाम असा झाला की पुढच्याच वर्षी १७४० मध्ये मानाजी आंग्रे ह्या मराठी आरमारप्रमुखाने पोर्तुगीजांची उत्तर कोकण किनाऱ्यावरील बलाढ्य जहाजे बुडवून टाकली आणि महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांवरील पोर्तुगीजांचे नामोनिशान मिटवले.
पण दुर्दैवाने सततच्या लढायांमुळे थकलेले, मराठी साम्राज्याचे बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा हे दोन चिरे ऐन तारूण्यात लागोपाठ निखळले (इ.स. १७४० व इ.स. १७४१) आणि गोवा प्रदेश पोर्तुगीजांच्या क्रूर पंजातून सोडवायचा राहीला. असे झाले असते तर इन्क्विझीशन अमलात आणण्यात ज्याची प्रमुख भूमिका होती आणि जो लाखो लोकांच्या वेदनादायी मृत्युस कारणीभूत ठरला त्या फ्रांसिस झेवियरला कधीही संतपद मिळाले नसते.
संदर्भ -
मराठ्यांचा युद्धेतिहास १६०० - १८१८ ले. ब्रिगेडियर का. ग. पित्रे. (अ.वि.से.प.)
श्रीदत्त राऊत - shridattaraut@gmail.com
आणि काही माहिती अंतर्जालावरून साभार.
Subscribe to:
Posts (Atom)