Thursday, 6 June 2013

प्रार्थना

वेदांमध्ये ऋषी काकुळतीने परमेश्वराकडे प्रार्थना करतात -
हे देवा, आम्हाला सुपथावर ठेव, आमच्या सभोवताली शुभदायी वातावरण असू दे, सर्वत्र मांगल्य असू दे, आम्हाला सदैव प्रसन्नचित्त ठेव, आमच्या चित्तांत सुविचार असू देत आणि वाणीत माधुर्य, आम्ही सदा आनंदी आणि आमचे आयुष्य निरामय असू दे, आमचे जीवन सन्मार्गावरून चालू दे.
पण आपण कितीही सद्विचारांचे असलो तरी दुष्टांच्या दुष्कृत्यांची फळे आपल्याला भोगावीच लागतात. कारण विश्वात आपण सारे एकमेकांशी अदृश्य पाशांनी जखडलेले आहोत. कोणीही स्वतंत्र नाही. दुर्जनांच्या कृत्यांचे परिणाम सज्जनांवर होतच राहातात. दुष्ट लोकांचे मन दुर्बळ असते. आपण चुकीचे वागतो आहोत हे त्यांना कळत नाही असे नाही पण चांगले वागण्यासाठी त्यांच्याकडे मनाची सिद्धता नसते. कित्येकदा मनात असूनही ते चांगले वागू शकत नाहीत. स्वतःचा दुबळेपणा जाणून ते इतर दुष्टांशी जवळीक करतात आणि मग त्यांच्या मनाने कितीही चांगले वागायचे ठरवले तरी त्यांचे दुष्ट मित्र त्यांना चांगुलपणापासून दूर ठेवतात आणि ही दुष्टांची मांदियाळी सज्जनांना जीव नकोसा करून सोडते आणि अखेरीस ही दुराचारी मंडळी स्वतःच्या वागण्याने दुर्गतीला जातात. अश्या परिस्थितीत, ऋषींना जाणवते की केवळ आपण सद्वर्तनी असून उपयोगाचे नाही म्हणून ते अग्नीची प्रार्थना करतात आणि म्हणतात -
मा वः एनः अन्यऽकृतं भुजेम । हे अग्ने, दुसऱ्यांनी केलेल्या दुष्कृत्यांची फळे आम्हाला भोगायला न लागोत.

Tuesday, 4 June 2013

धनुर्धारी

धनुर्धारी ह्या टोपण नावाने लिहिणाऱ्या कै. श्री. रामचंद्र विनायक टिकेकर ह्यांची ‘वाईकर भटजी’ ही कादंबरी सध्या वाचत आहे. कादंबरी तर सुंदर आहेच पण त्याला श्री. अरूण टिकेकरांनी लिहिलेली प्रस्तावना पण अत्यंत रोचक आहे. प्रस्तावनेत धनुर्धारींच्या लेखनप्रवासाचा सविस्तर वृतान्त दिला आहे. 1880 च्या दशकात लिहिलेल्या धनुर्धारींच्या कादंबऱ्यांमध्ये/लेखांमध्ये पेशवाईच्या अस्तानंतर आलेली इंग्रजी शिक्षणाची लाट, इंग्रजी शिकल्याने नव्या पिढींत हातात खुळखुळणारा पैसा, बिघडलेली कुटुंबव्यवस्था, आमिषे दाखवून तसेच हिंदुधर्मावर टीका करून/दिशाभूल करून केली जाणारी तत्कालीन ख्रिस्ती धर्मांतरे असे शहरी विषय तर आहेतच पण मराठ्यांच्या मर्दुमकी, वीरस्नुषा राधाबाई, उमाबाई दाभाडे, अहिल्याबाई होळकरीण, पानपतचा मोहरा, शूर अबला अश्या ऐतिहासिक कादंबऱ्या/लेख पण आहेत तसेच ‘व्यापारी-वाचन-पाठ’, ‘व्यापारी भूगोल (कमर्शियल जॉग्राफी)’, ‘आमची गळितांची धान्ये/उपाशी महाराष्ट्रास उद्योग’, ‘धावता धोटा’ अशी अर्थशास्त्रावरील पुस्तके पण आहेत. श्री. अरूण टिकेकर लिहितात - धनुर्धारींच्या लेखनात स्वजनोद्धाराची तळमळ दिसून येते. त्यातील वाक्ये आजच्या काळातही प्रत्ययकारी वाटतात –
शेतातील राब, गिरण्यातील मजुरी, बाजारातील हमाली आणि मग कापडाच्या खपाची गिऱ्हाईकी एवढीच कामे महाराष्ट्र या कापसाच्या व्यापारात करत आहे. आमच्या ह्या नीचंतर दैनेचे मुख्य कारण अपरिहार्य अशी परदेशी व्यापारउद्योगांची आम्हाबरोबर लागलेली झटापट आणि त्यांच्याशी सामना देण्याला अवश्य असणाऱ्या साधनांची अननुकूलता हेच होय. ज्ञान आणि उद्योग हे सध्याच्या काळी असेच नव्हे तर सर्वदा कल्पवृक्ष होत. परवशतेला ज्ञान आणि दारिद्र्याला उद्योग अमृतसंजीवनी होय.
तसेच (डॉ. आनंद यादव ह्यांनी पहिली ग्रामीण कादंबरी म्हणून मान दिलेल्या) पिराजी पाटील ह्या 1903 साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या कादंबरीत धनुर्धारी म्हणतात –
महाराष्ट्र देशांत दोन कोटी मनुष्ये आहेत. मराठी भाषा बोलणारे दोन कोटी... उणी अधिक व जवळ जवळ पंचवीस हजार खेडी... गेल्या पाच वर्षांत तीन दुष्काळ कोसळले.. खडतर हाल भोगण्याचा वखत आला आहे! दर शंभर लोकांपैकी नव्वद जण महाराष्ट्रातील खेडेगावांत राहतात. दर शंभर लोकांपैकी ऐंशी पेक्षा जास्त लोक शेतकीवर आपली उपजीविका करून घेत आहेत आणि सध्या या महाराष्ट्रातील यच्चयावत् खेडी मोडकळीस लागली आहेत! महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग धुळीचे दिवे खात उधळत सुटला आहे. त्याची मिराशी जमीन, जिवापेक्षाही प्यार, ती सावकार सारखा बळकावत आहे. त्यांची जनावरे पोटच्या पोरांइतकी लाडकी, ती त्याच्या डोळ्यांदेखत पटापट मरून गेली. सर्व दुःखांची जननी क्षुधा, उपासमार ती त्याला घट्ट मगरमिठी मारून बसली आहे! शेतकरी राष्ट्रांतल्या अन्नाचा पुरवठा करणारा, शेतकरी मिजासी लोकांच्या हौशी पुरवणारा, शेतकरी सरकारचा पाया, शेतकरी राष्ट्राचा आधार, शेतकरी राष्ट्राचा अभिमान, शेतकरी देशाचे सौभाग्य, शेतकरी शहाण्यांचा पोशिंदा आणि तो हा आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी उपासमारीत दिवस काढत आहे...
(मात्र धनुर्धारी केवळ बोरूबहाद्दर नव्हते तर त्यांनी अक्कलकोट संस्थानात शेतकऱ्यांसाठी सिंडीकेट काढली, साधारण 300-400 गायी शेतकऱ्यांत वाटल्या तसेच विणकरांचे धंदे वाचवण्यासाठी सोलापुरात वीव्हर्सगिल्ड स्थापली, धावत्या धोट्याचे माग बनवले आणि जिन्स, बार्शी येथे कापडगिरण्या सुरू केल्या.) तत्कालीन महाराष्ट्रावर छाप पाडणारा हा कार्यकुशल उद्योजक आणि लेखक वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी 1907 मध्ये क्षयाची बाधा होऊन स्वर्गस्थ झाला. धुळीचे दिवे खात जाणें - To beg about in great disgrace and wretchedness. मिराशी - Hereditary.