वेदांमध्ये ऋषी काकुळतीने परमेश्वराकडे प्रार्थना करतात -
हे देवा, आम्हाला सुपथावर ठेव, आमच्या सभोवताली शुभदायी वातावरण असू दे, सर्वत्र मांगल्य असू दे, आम्हाला सदैव प्रसन्नचित्त ठेव, आमच्या चित्तांत सुविचार असू देत आणि वाणीत माधुर्य, आम्ही सदा आनंदी आणि आमचे आयुष्य निरामय असू दे, आमचे जीवन सन्मार्गावरून चालू दे.
पण आपण कितीही सद्विचारांचे असलो तरी दुष्टांच्या दुष्कृत्यांची फळे आपल्याला भोगावीच लागतात. कारण विश्वात आपण सारे एकमेकांशी अदृश्य पाशांनी जखडलेले आहोत. कोणीही स्वतंत्र नाही. दुर्जनांच्या कृत्यांचे परिणाम सज्जनांवर होतच राहातात.
दुष्ट लोकांचे मन दुर्बळ असते. आपण चुकीचे वागतो आहोत हे त्यांना कळत नाही असे नाही पण चांगले वागण्यासाठी त्यांच्याकडे मनाची सिद्धता नसते. कित्येकदा मनात असूनही ते चांगले वागू शकत नाहीत. स्वतःचा दुबळेपणा जाणून ते इतर दुष्टांशी जवळीक करतात आणि मग त्यांच्या मनाने कितीही चांगले वागायचे ठरवले तरी त्यांचे दुष्ट मित्र त्यांना चांगुलपणापासून दूर ठेवतात आणि ही दुष्टांची मांदियाळी सज्जनांना जीव नकोसा करून सोडते आणि अखेरीस ही दुराचारी मंडळी स्वतःच्या वागण्याने दुर्गतीला जातात.
अश्या परिस्थितीत, ऋषींना जाणवते की केवळ आपण सद्वर्तनी असून उपयोगाचे नाही म्हणून ते अग्नीची प्रार्थना करतात आणि म्हणतात -
मा वः एनः अन्यऽकृतं भुजेम ।
हे अग्ने, दुसऱ्यांनी केलेल्या दुष्कृत्यांची फळे आम्हाला भोगायला न लागोत.
No comments:
Post a Comment