Friday, 9 August 2013
ग्राहक राजा
मुंबईत, हॉटेल व्यवसायावर तुळू लोकांचे अतिक्रमण होण्यापूर्वी, मराठी व इराणी उपाहारगृहांमध्ये ग्राहक सन्माननीय असायचा. इराणी उपाहारगृहांमध्ये तर शिरताच क्षणी हा ग्राहक राजा 'बन-मस्का, मसालानी चा, आजनुं छापु अने पंखो फुल (आजचे वर्तमानपत्र आणि पंखा पूर्ण वेगात)' अशी टेचात आज्ञा सोडायचा.
असाच एक कोकणी दर्दी, खवैय्या ग्राहक गिरगावातल्या कोनातल्या एका उपाहारगृहात नियमित यायचा. जाताना प्रत्येक खाल्लेल्या पदार्थाचे विना संकोच विश्लेषण करायचा व न चुकता शेवटी एक वाक्य म्हणायचा - तां तुमचा चा काय गरम नवता हां....
ग्राहकाचा संतोष हेच ध्येय मानणाऱ्या त्या उपाहारगृहाच्या मालकाचा चेहरा कोमेजून जायचा. रोज संध्याकाळी कामगारांची हजेरी मांडताना त्या ग्राहकाला चहा आणून देणाऱ्या वाढप्याचे केस व्यवस्थित भादरले जायचे.
मग त्या वाढप्याने संबंधित ग्राहकाला सणसणीत गरम चहा मिळावा म्हणून हर प्रकारे प्रयत्न केले. तो बिचारा दर दिवशी चहा कपात ओतल्याक्षणी धावत चहा आणून द्यायला लागला. पण त्याच्या प्रगतिपुस्तकावरील गार चहाचा लाल शेरा काही चुकला नाही. :(
नंतर नंतर त्याला लक्षात यायला लागले की त्या मिश्किल ग्राहकाला गरमागरम चहा पिण्यापेक्षा सुद्धा, जाताना चहाविषयी मत व्यक्त केल्यावर त्या मालकाचा कसनुसा होणारा चेहरा पाहण्यात जास्त स्वारस्य आहे. :)
एके दिवशी त्या गुणी वाढप्याने त्या ग्राहकाला गरम चहा देण्यापूर्वी त्या पितळी कपाचा कान सणसणीत तापवला (त्याकाळी उपाहारगृहांमध्ये चहासाठी पितळेचे कप ठेवलेले असत).
त्यानंतर त्या चोखंदळ ग्राहकाने कधीही चहाच्या तपमानाची चर्चा केली नाही. :P
Subscribe to:
Post Comments (Atom)
mastach
ReplyDeleteSurekh
ReplyDelete