माझे कोकणात पूर्वी बरेचदा येणे जाणे असल्याने प्रवासाच्या दृष्टिने माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्या इथे नमुद करू इच्छिते.
१) कोकण रेल्वे - हिचे नाव बदलून गोवा - मंगळूर रेल्वे करायला हरकत नाही. कारण गाड्यांना कोकणात थांबे कमी. बर्याच स्थानकांवर गाड्या थांबत नाही. काही ठिकाणी तर किमान राजापुर सारख्या महत्त्वांच्या स्थानकांवर तरी ही रेल्वे थांबवावी म्हणून लोकांना आंदोलने करावी लागली. मुख्य महसूल गोवा आणि पुढच्या भागातील स्थानकांवर उतरणार्या प्रवाशांकडून. २) एकच रुळ असल्या कारणाने लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य. बरेचदा गाड्यांच्या वेळापत्रकात गडबड झाली की लहान अंतरावर जाणार्या गाड्यांना बाजूला ठेऊन लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुढे काढले जाते. ३) भुसभुशीत जमीन पोतामुळे दरडी कोसळणे, रुळावरून गाडी घसरणे इ. प्रकार घडतात (विशेषत: पावसाळ्यात). ४) बरीचशी स्थानके मूळ गावापासून बरीच लांब. त्यामुळे रेल्वे तिकिट दर कमी असले तरी पुढे रिक्षाने त्याच्या २-३ पट पैसे टाकून आपल्या गावाला जाणे म्हणजे पैशाचा अपव्यव तर होतोच पण रिक्षा मिळाली नाही तर टेम्पो वैगरेने किमान महामार्गाने तरी कसबसे यावे लागते. मगच पुढचे वाहन मिळू शकते. उदा. आमच्या गावाला जर जायचे असेल तर आडवली ह्या स्थानकावर (इथे कोकण रेल्वेच्या काही मोजक्याच गाड्या थांबतात) उतरून (रु. १००) रिक्षाने किंवा टेम्पोने लांज्यापर्यंत (रु. १००) आणि मग एस्टीने किंवा ती मिळाली नाही तर पुन्हा स्थानिक रिक्षाने (रु. १००) गावापर्यंत पोहोचावे लागते. ५) सुट्ट्यांच्या दिवसात आरक्षण मिळणे कठिण. आरक्षण असले तरी बरेचदा गाडीत इतकी प्रचंड गर्दी असते की जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. असो.
दुसरा पर्याय खुष्कीच्या मार्गाचा - बरेच जण स्वत:च्या वाहनाने कोकणात जातात. मात्र सार्वजनिक वाहतुकीने जायचे असेल तर एस्टीने जाणे सर्वाधिक सुरक्षित. कारण प्रशिक्षित चालक आणि बस पंक्चर (मराठी?) झाली तर तातडीने जवळपासच्या आगारातून दुसर्या बसची सोय केली जाते. तिसरे महत्त्वाचे म्हणजे चालकांना दारू पिण्यास मनाई आहे. तसेच एस्टी ठरल्या वेळेला निघते. प्रवासी (सीटा) भरेपर्यंत खोळंबा करत नाही. तसेच एस्टिचे जाळे सर्वदूर पसरले आहे. एका ठिकाणी गेले किदुसर्या ठिकाणी जावयाची एस्टी संबद्ध (Connected) एस्टी त्याच आगारात मिळू शकते. आम्ही आजही कोकणात जाताना लाल रंगाच्या / एशियाड एस्टीने जाणे पसंद करतो. पण चांगल्या स्वच्छतागृहांचा अभाव हे मात्र एस्टी प्रवास टाळण्यास कारणीभूत ठरू शकते.
कोकणात खाजगी ट्रॅव्हलर्सच्या व्होल्व्हो वाहतुकीने जाणे हे मात्र एक दिव्य आहे. १) गाड्या बेदम हाणणे. वेगाची ऐशी तैशी. १ दिवसात एकच वाहन चालक एकाच गाडीला सहज ६००-७०० कि.मी.चा प्रवास घडवतो. २) अशिक्षित चालक ३) व्यसनी चालक ४) बसमधील प्रत्येक सीट भरेपर्यंत जागोजागी गाडी थांबवणे. ५) नंतर वाट्टेल तशी गाडी हाणून वेळेची भरपाई करणे. ६) गाड्या केवळ महागड्या धाब्यांवरच थांबवणे जिथे अनेकदा जेवण शिळे, बेचव असते किंवा उपलब्ध नसते. ७) अपघात झाला तर प्रवाश्यांसाठी विमा संरक्षण नसणे. ८) क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे. ९) प्रवाश्यांशी दादागिरी / पैशावरून भांडणे. १०) ह्या खाजगी गाड्या अनेकदा भंगारातून सेकंडहँड घेतलेल्या असतात. त्यांची पुरेशी देखभाल केलेली नसते. ११) टुकार मराठी चित्रपट भसाड्या आवाजात लावणे.
तिसरा मुद्दा येतो तो महामार्ग १७ वरील रस्त्यांची स्थिती आणि वाहतुक खोळंबा (Traffic Jam) ह्यांचा.
सध्या कोकणातील मुख्य रस्ते नारायणकृपेने चांगले झाले आहेत. मात्र अनेक ठिकाणी ते रुंदीला कमी आहेत. वडखळ नाका वैगरे अशी ठिकाणे आहेत जिथे हमखास वाहतुक खोळंबा होतोच होतो. तसेच घाटात अशिक्षित चालकांमुळे / डुलकी लागल्यामुळे होणारे अपघात, खाजगी वाहतुकदारांच्या बेफाम गाड्या हाकण्यामुळे होणारे अपघात, पावसाळ्यात रस्ते निसरडे झाल्याने अपघात अश्या अनेक कारणामुळे अनेकदा प्रवास ५-६ तास विलंबाने होतो. जो प्रवास एर्हवी ८ तासांत होतो त्याला कधीकधी १४-१६ तास सुद्धा लागतात. तसेच पावसाळ्यात कित्येकदा पूर येतात. प्रवास अधिकच अवघड ठरतो.
ह्या सर्व गोष्टींना चांगला पर्याय हा जलवाहातुकीचा ठरू शकतो. कोकणातील मुख्य बंदरांचा सर्वांगीण विकास करणे त्यासाठी महत्त्वाचे ठरेल. १) गाळ काढणे २) व्यावसायिक जेट्टी बांधणे ३) संबद्ध वाहतुकीचा योग्य पर्याय ठेवणे. उदा. गेटवेला अलिबाग तिकिट काढले तर रेवस पर्यंत बोटीने प्रवास करावा लागतो आणि तिच बोट कंपनी पुढे त्याच तिकिटात अलिबाग पर्यंत आपल्या बसने लगेच नेऊन सोडते. ४) वेगवेगळ्या प्रकारची वाहतुक उपलब्ध करणे उदा. सामान्य, जलद, ऐषो-आरामी इ. तसेच वेगवेगळ्या प्रवासी आणि पर्यटन योजना जाहीर करणे. ५) व्यापारी वाहतुकीसाठी गोद्या बांधणे.
ह्या पर्यायामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल ह्यात शंका नाही मात्र त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी. (क्रमश:)
Thursday, 23 April 2009
Subscribe to:
Posts (Atom)