Wednesday 14 October 2009

काही साहित्यिक भोग

स्थळ : पुणे शहरातील एक बस स्टॉप.
पात्रे : खडूस ह्या शब्दाखेरीज दुसरा शब्द सापडू नये असल्या नमुन्याचे सत्तरीच्या घरातले गृहस्थ. मी त्यांच्या बाजुला जाऊन रांग धरतो. आश्चर्य म्हणजे रांग नाही. आम्ही दोघेच. काही क्षण ते गृहस्थ मला खालपासून वरपर्यंत न्याहाळतात. मी समोरच्या करांडे टेलर्स चे करांडे एका लठ्ठ गृहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचे सुखद दृश्य पाहण्याचा बहाणा करतो.

इतक्यात कानावर आवाज...

ते उपाख्य बाजी गणेश जोशी : दशभुजा गणपतीचे देऊळ कुठे आहे हो?
मी : काही कल्पना नाही बुवा?
बा.ज.गो. : पुण्यातच राहता ना? (ह्या त्यांच्या प्रश्नावरून ते पुण्यात राहतात हे लक्षात आले.)
मी : हो.
बा.ज.गो. : किती वर्षे?
मी : बरीच.
बा.ज.गो. : काय व्यवसाय?
मी : पुस्तके वैगरे लिहितो.
बा.ज.गो. : म्हणजे साहित्यिक आणि तरीही तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठौक नाही?
मी : आपण कुठल्या गावाहून आलात?
बा.ज.गो. : मी कशाला कुठल्या गावाहून येतोय? इथेच जन्मलो आणि इथेच मरणार.
मी : ('कधी' हा प्रश्न गिळून) इथेच मरणार कशावरून?
बा.ज.गो. : दशभुजा गणपती ठौक नाही हे सरळ सांगा. आमच्या मरणाची काळजी करू नका. तुम्हाला काही मी खांद्याला बोलावणार नाही.
मी : खांद्याची आमंत्रणं काय स्वत: मृतांच्या सहीने जातात वाटतं?
बा.ज.गो. : हे पहा, तुम्ही साहित्यिक असल्याने भाषाप्रभुत्व हा तुमचाच जन्मसिद्ध हक्क मानायची गरज नाही. मी देखील पुण्याचाच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून स्वत:ला साहित्यिक म्हणवणार्‍या माणसाला दशभुजा गणपती ठौक नसावा? ही तुमची समाजाविषयी आस्था... उद्या शनवारवाडा ठौक नाही म्हणाल, परवा पर्वती ठौक नाही म्हणाल.
मी : तुम्हाला तरी कुठे ठाऊक आहे दशभुजा गणपती?
बा.ज.गो. : ठौक आहे.
मी : मग मला कशाला विचारताय?
बा.ज.गो. : तुम्हाला ठौक आहे की नाही ते पाहायला.
मी : पण दशभुजा गणपतीशी माझा काय संबंध?
बा.ज.गो. : सांगतो. 'पुणे शहरातील ढासळती धर्मभावना' ह्या विषयावर लेखमाला लिहितोय मी. ह्या स्टॉपवर सकाळी सात पासून उभा आहे मी. बेचाळीस लोकांत दशभुजा गणपती ठौक असलेला केवळ एक निघाला. पण त्या देवळासमोर त्याचे ष्टो दुरुस्तीचे दुकान आहे अकरा वर्षे. कधी आत दर्शनाला गेला नाही.
मी : म्हणजे दशभुजा गणपती फक्त पत्त्यापुरता.
बा.ज.गो. : हीच तर ट्रॅजेडी. देवळांचा उपयोग पत्त्यासाठी? एकदा आम्ही विचारले, डॉ. मंजुळाबाई सपाते प्रसुतीगृह कुठे आहे? तर एक गृहस्थ म्हणाला, 'सोमण मारुतीपुढे!' अरे काही सारासारविवेकबुद्धी? अरे निदान प्रसुतीगृहाच्या पत्त्यासाठी तरी मारुतीराया वापरू नका ! काय?
मी : खरे आहे.
बा.ज.गो. : एक साहित्यिक म्हणून तरी देवळात जाणे तुम्ही तुमचे कर्तव्य मानता की नाही?
मी : (देवावर भार घालून) मानतो तर...
बा.ज.गो. : मग जाता का?
मी : दशभुजा गणपतीला जात नाही.
बा.ज.गो. : I'm not particular about this Ganpati or that. (रिटायर्ट म्हातारा भडकला की इंग्रजीत फुटतो.) Any temple for the matter of that. (प्रत्येक 'द्याट' वर पाय आपटून) रोज जाता?
मी : (देवा! क्षमा कर. आपली जेव्हा भेट होईल तेव्हा खुलासा करेन.) हो. रोजच म्हणायला हरकत नाही. बा.ज.गो. : मला 'होय की नाही' चा रकाना भरायचा आहे. हो किंवा नाही.
मी : (Forgive me Oh Lord!) हो. (आता हे खोटे नाही. रोज रात्री गुडकुले विठोबाच्या देवळात काणे भटजी, विठोबा टेलर, सोपानराव हेयरड्रेसर आणि मी वरच्या नगारखान्यात रमी खेळतो. एक पैसा, शंभर पाँईंट. आषाढी कार्तिकीला काणे भटजी पाँईंट वाढवा म्हणतात पण आम्ही ऐकत नाही).
बा.ज.गो. : एक साहित्यिक ह्या दृष्टीने तुमची धर्मावर श्रद्धा आहे की नाही?
मी : श्रद्धा ही वस्तुच मुळी देव आणि धर्म ह्यांच्यावर ठेवायला तयार केली आहे असे माझे मत आहे.

(गोल पोटावरून तळव्यापर्यंत प्यांटीचं माप घेताना समोरच्या करांडे टेलर्सने टेप बेंबीपासून ओळंबा धरावा तशी सोडली आहे. हे मोहक दृश्य पाहायला मला उसंत न देता...)
बा.ग.जो. : तुम्ही सरळ हो की नाही सांगा.
मी : हो. कारण धर्मावर श्रद्धा ठेवायची नाही तर काय मुन्सिपालटी, जिल्हाबोर्ड, बसवाले, हॉटेलवाले ह्यांच्यावर ठेवायची ?
बा.ग.जो. : तुम्ही कृपा करून वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल असे उत्तर द्या. शेवटी प्रश्नचिन्ह नको.
मी : (मुकाट्याने) बरं.
बा.ग.जो. : आता सांगा धर्मावर तुमची श्रद्धा आहे की नाही ?
मी : यथेच्छ श्रद्धा आहे कारण धर्म नसता तर दसरा, होळी, दिवाळी, नारळी पौर्णिमा म्हणजे पुरणपोळी, कडबू, मोदक बघायला सुद्धा मिळाले नसते. सत्यनारायण नसता तर असला शेराला सव्वाशेर तुपाचा शिरा खायला मिळाला नसता.
बा.ग.जो. : तुमच्या बोलण्यात थट्टेचा सूर आहे. धर्म काय शिरा खाण्यासाठी आहे? (इथे बा.ग.जो. नी शीरा ताणून हा प्रश्न विचारला).
मी : शिर्‍याशिवाय सत्यनारायण करून दाखवा, होडी बुडेल.
बा.ग.जो. : तो शिरा नसतो, प्रसाद असतो.
मी : सत्यनारायणाला खारीक वाटता येणार नाही. प्रसाद म्हणून सुद्धा. माफ करा, पण तुम्ही मला छुपे कम्युनिस्ट दिसता. (होतकरू साहित्यिकांस सूचना : अधून मधून अशी टफ लाईन स्वीकारावी. कम्युनिस्ट कसे बिगर कम्युनिस्टांना प्रतिक्रांतिवादी म्हणतात तीच स्टाईल.)
बा.ग.जो. : मी कम्युनिस्ट ? दशभुजा गणपती कुठे आहे हे तुम्हाला ठौक नाही आणि मी कम्युनिस्ट ? मी : (पुण्यात नव्या एका देवाला जन्म देत) झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगा पाहू ?
बा.ग.जो. : झोपाळू नरसोबा ? पहिल्यांदाच ऐकतोय.
मी : झोपाळू नरसोबा पहिल्यांदाच ऐकताय काय? अरेरे. प्रश्न आला. झोपाळू नरसोबा सारख्या जागृत देवाचे नाव पहिल्यांदाच ऐकताय हे ऐकून आश्चर्य वाटलं. जाऊ द्या मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघाले आहेत. (होतकरू साहित्यिक प्लीज नोट : वादाच्या प्रसंगी प्रतिपक्षाने न केलेल्या मुद्द्यांवर जोर द्यावा.) सत्यनारायणाला खारका ? उद्या गोकुळाष्टमीला केक वाटाल..
बा.ग.जो. : तुम्ही हे कोणाला सांगता आहात?
मी : तुम्हाला ! इथे दुसरे आहे कोण? सॉरी, दुसरे कोणी नाही. पूर्णविराम.
बा.ग.जो. : तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. आपण राहता कुठे ?
मी : (मी इथे खरी कसोटी आहे. डिटेलवार पत्ता देऊन गोंधळात टाकायच्या शास्त्राचा अभ्यास असल्याखेरीज ह्या कसोटीला उतरता येणार नाही.) तुम्हाला झोपाळू नरसोबा ठाऊक नाही, बरं रेडेकर तालीम तरी ठाऊक असेल !
बा.ग.जो. : ती कुठेशी आली ?
मी : रविवारात. घाणेकरांच्या कोळश्याच्या वखारीला लागून.
बा.ग.जो. : काढीन शोधून. घाणेकर तालीम...
मी : घाणेकर तालीम नाही घाणेकर कोळश्याची वखार. त्याला लागून रेडेकर तालीम. रास्ते वाड्यावरून खाली या सरळ (इथे खाली येणे ह्याचा हवा तसा अर्थ घ्यावा). तिथे घाणेकर कोळश्याची वखार विचारा. तिथे घाणेकरांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठेशी राहतात? पापडवाल्या बेंद्र्यांच्या वाड्यावरून गल्ली जाते. तिच्या टोकाला माशेलकर बखळ (गल्लीला दोन टोके असतात ते विसरणे). माशेलकर बखळीत विचारायचे संपतराव लाँड्री कुठे आहे?
बा.ग.जो. : जरा सावकाश सांगा मी लिहून घेतो आहे. आताशा कापडवाल्या बेंद्र्यांच्या पर्यंत आलेलो आहे. मी : कापडवाले बेंद्रे नाहीत पापडवाले बेंद्रे. तिथे सोवळ्यातले पापड मिळतात. मग माशेलकर बखळ, मग संपतराव लाँड्री. (बस येईपर्यंत बा.ग.जो. ना घुमवायच्या बेताने) संपतराव लाँड्रीत सोनार आहेत का विचारायचे. ते तुम्हाला भोरप्यांचा वाडा दाखवतील.
बा.ग.जो. : भोरप्यांचा ? थांबा, जरा सावकाश सांगा.
मी : सावकाश काय सांगा, बस आली म्हणजे?
बा.ग.जो. : बस कशी येईल ?
मी : म्हणजे?
बा.ग.जो. : हा बस स्टॉप क्यान्सल झाला आहे.
मी : काय म्हणता ? बा.ग.जो. : अहो ! पंधरा दिवस झाले हा वनवे झालेला आहे. इकडून प्रवेश बंद. एकतरी बस इथून येऊन तिथे गेली का?
मी : मग मघाशी का नाही सांगितलत?
बा.ग.जो. : वा ! मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो, साहित्यिक असून तुम्हाला गावातले वनवे ठौक नाहीत. कमाल आहे. काय नाव तुमचे ?
मी : (स्वत:चे नवीन बारसे साजरे करत) गोविंद गोपाळ दहिभाते.
बा.ग.जो. : आजच हे नाव ऐकतोय.
मी : मी सुद्धा! (बा.ग.जो. शुद्धीवर आहेत की बेशुद्ध आहेत ते न पाहता मी सटकतो. तात्पर्य : देवावर भार घालून सुद्धा भोग सुटतातच असे नाही.)

लेखक - पु.ल. देशपांडे.