Monday 15 July 2013

केसांचे चाप

मी सात वर्षांची असताना एकदा मी आईने तिच्या मैत्रिणीला दुसऱ्या दिवशी तिचा तिसावा वाढदिवस असल्याचे सांगताना सहजच ऐकले. ते ऐकून मला दोन गोष्टी जाणवल्या – १) माझ्या आईचा पण वाढदिवस असू शकतो हे मला पूर्वी कधीच कळले नव्हते २) मी तिला कधीही वाढदिवसाची भेट स्वीकारताना पाहिले नव्हते. मी नक्कीच ह्या बाबत काहीतरी करू शकत होते. मी माझ्या खोलीत गेले आणि माझी पेटी उघडली. त्यातले सगळे पैसे काढले. ते तब्बल पाच रुपये होते, माझी पाच आठवड्यांची कमाई. नंतर मी कोपऱ्यावरच्या छोट्या दुकानात गेले आणि भिंगार्डेकाकांना मी आईसाठी काहीतरी वाढदिवसाची भेटवस्तू घेऊ इच्छिते असे सांगितले. त्यांनी पाच रुपयांत येतील अशा अनेक गोष्टी दाखवल्या. सुंदर काचेच्या बशीपासून रंगीत खडूपर्यंत सर्व काही. पण आमचे घर त्या सगळ्या वस्तूंनी भरलेले होते आणि आठवड्यातून एकदा मलाच त्या सगळ्या वस्तूंवर फडका मारावा लागे. तिथे एक खाऊच्या गोळ्यांची डबी पण होती पण आईला गोड खायचे नसल्यामुळे ती डबी भेटवस्तू म्हणून अगदीच अयोग्य होती. शेवटची गोष्ट श्री. भिंगार्डे ह्यांनी मला दाखवली ते होते केस कुरळे करायचे केसांचे चाप. माझ्या आईचे केस हे काळे, घनदाट आणि लांबसडक होते. आठवड्यातून दोनदा ती ते केस धुवायची आणि त्यांना केसाचे चाप लावून ठेवायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ते चाप काढायची आणि तिचे ते लांबसडक केस जेव्हा तिच्या खांद्याभोवती मोकळे सोडायची तेव्हा ती अगदी एखाद्या प्रसिद्ध नटी प्रमाणे देखणी दिसायची. मला वाटले की हे केसांचे चाप तिच्यासाठी उत्कृष्ट अशी वाढदिवसाची भेटवस्तू ठरेल आणि पाच रुपये देऊन मी ते चाप विकत घेतले. मी घरी आल्यावर ते चाप वर्तमानपत्राच्या रविवारच्या रंगीत पुरवणीत काळजीपूर्वक गुंडाळले (जिलेटिन कागद विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसेच उरले नव्हते). दुसऱ्या दिवशी जेव्हा नाश्त्यासाठी घरचे सारे लोक एकत्र जमले तेव्हा मी हळूच आईकडे गेले आणि तिला ती गुंडाळी दिली आणि म्हटले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! " माझी आई क्षणभर सुन्न होऊन बसून राहिली. नंतर ओल्या डोळ्यांनी तिने ती गुंडाळी उघडायला सुरुवात केली. ज्या वेळेपर्यंत तिच्या हातांत ते चाप आले त्यावेळी ती हुंदके देऊन रडत होती. "आई! मला माफ कर, मला तुला रडवायचे नव्हते, मला केवळ तुझा वाढदिवस आनंदी करायचा होता", मी आईची क्षमा मागितली. "अगं छकुले! मी अतिशय आनंदात आहे गं", माझी आई म्हणाली. तिच्या अश्रू भरल्या डोळ्यांत मला आता आनंद दिसत होता. "का माहीत आहे का, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेली पहिलीच वाढदिवसाची भेटवस्तू आहे", ती पुढे म्हणाली. नंतर तिने माझ्या गालांचा पापा घेतला आणि माझे आभार पण मानले. मग तिने माझ्या बहिणीला म्हटले, "हे बघ तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग तिने माझ्या भावाकडे वळून म्हटले, "हे बघ तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग ती माझ्या बाबांना म्हणाली, "हे बघा तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग ती ते चाप लावून आपले केस कुरळे करण्यासाठी केस धुवायला गेली. ती केस धुवायला जाताच माझे बाबा मला म्हणाले, "सोनू मी ज्या कोंकणातल्या एका छोट्या खेड्यात वाढलो तिथे मोठ्या माणसांचे वाढदिवस साजरे करायची पद्धत नव्हती. केवळ लहान मुलांचेच वाढदिवस साजरे केले जात असत. पण तुझ्या आईचे कुटुंब इतके गरीब होते की ते तेव्हढे पण करू शकत नसत. पण आज तू आईला किती आनंदी केले आहेस ते पाहून मला ह्या वाढदिवस प्रकरणाचा पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. म्हणजे मला म्हणायचे आहे की सोनू तू एक नवा पायंडा पाडला आहेस". मग खरोखरच ही एक प्रथाच पडून गेली. त्यानंतर प्रत्येक वर्षी माझ्या आईवर तिच्या वाढदिवसाला भेटवस्तुंचा वर्षावच होऊ लागला, माझ्या बहिणीकडून, भावाकडून, बाबांकडून व माझ्याकडून. अर्थातच आम्ही जसे जसे मोठे होत गेलो तशी तशी आमची कमाई वाढू लागली आणि तिला मिळणाऱ्या भेटवस्तू अधिकाधिक चांगल्या होऊ लागल्या. मी चोविशीची झाल्यावर तिला रेडियो, रंगीत टी. व्ही. आणि एक मायक्रोव्हेव ओव्हन भेट दिला. तिच्या पन्नाशीला आम्ही भावंडांनी आपली सर्व जमापुंजी एकत्र केली आणि तिच्यासाठी वाढदिवसाची भेट म्हणून एक नेत्रदीपक वस्तू आणली, एक रत्नजडित मोत्याचा हार. जेव्हा माझ्या सर्वांत मोठ्या भावाने तिच्यासाठी आयोजित केलेल्या मेजवानीत आलेल्या सर्व पाहुण्यांसमोर तिच्या हातात ती हाराची पेटी दिली तेव्हा तिने ती पेटी उघडून त्या हाराकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि मग ती उघडलेली पेटी सर्वांना दिसेल अशी धरून ती म्हणाली, "आहेत की नाही माझी मुले अनमोल"? मग तिने ती पेटी सर्वांना पाहण्यासाठी म्हणून पुढे सरकवली. तो हार पाहून प्रत्येकाने टाकलेले उसासे ऐकणे खरोखर रोमांचक होते. सर्व पाहुणे गेल्यावर साफसफाई साठी मी मागे राहिले. मी स्वयंपाकघरात भांडी स्वच्छ करताना पुढल्या खोलीत चाललेला आई-बाबांचा संवाद माझ्या कानावर पडला. बाबा म्हणत होते, "प्रमिला! किती गं महागडा हार आहे हा, मला तर वाटते की तुला मिळालेली ही एक सर्वोत्कृष्ट भेटवस्तू आहे". त्यापुढची वाक्ये ऐकताना मला भरून आले. आई आपल्या मृदू आवाजात म्हणाली, "खरोखरच हा महागडा हार सुंदरच आहे आणि दुर्मिळ पण. मात्र मला मिळालेली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट भेटवस्तू आहे, ते केसाचे चाप".
- भावानुवाद - मूळ कथा - – द बॉबी पिन्स – लेखिका - सौ. लिंडा गुडमन.