Thursday 30 October 2008

Complaint

----- Original Message -----
From:
Billie Shearer
To:
mrud75@gmail.com
Sent: Thursday, October 30, 2008 5:11 PM
Subject: Re NW3C Website Inquiry


If you suspect fraud or are the victim of an Internet crime, you can file a complaint on our website at
www.ic3.gov. Be sure to include as much information as possible about yourself (i.e. name, e-mail address, mailing address, etc.), the perpetrator, and the Internet crime that you are reporting in order to expedite your complaint

From: mrud75@gmail.com

Comments:

Last fortnight, I uploaded a photo taken by me at Flickr and displayed at the site called mr.upkram.org where I write regularly. There, one senior Member not only downloaded that photo but did some work in Photoshop and added the tomb, vultures in that photo and re-publish at the same site which hurt me much. Then I wrote letter to the site-owner but in vain. They turn deaf ear to me and other members who are requesting to remove that modified picture. Despite having screenshots of this theft, I keep a mum since I thought to let it go because it is a festival period.

But yesterday, I found that the article I wrote on my Blogspot is stolen fully and re-publish in other name at a site called misalpav.com may be by the same person but with the pseudo name. Thankfully, this time after giving enough proof this site's owner removed that article within 2-3 hours. I fear, it is going to repeat in the future. So for the safer side, I humbly want to know 1] What are the preventive measures 2] What action can be taken on that thief 3] What action is taken on the sites encouraging and supporting such theft and displaying the stolen / modified art for the longer period despite giving enough proofs and requesting repeatedly. 4] What does International law says about it. Thanks in advance, Wishing you a great Sunday and the tranquil week ahead.

Wednesday 29 October 2008

'विसरलेला पियानो'

आमच्याकडे कॅस लागू झाल्यावर सुमारे २ वर्ष आम्ही फुकट दिसणाऱ्या वाहिन्याच पाहत होतो. मात्र ऑलिंपिक तोंडावर आले तसे विकतच्या वाहिन्या दाखवणारी एखादी सेवा घ्यावी की काय असा विचार मनात डोकवू लागला. टाटा स्काय, डिश टिव्ही, डब्ल्यू अँड डब्ल्यू अश्या बऱ्याचश्या सेवा त्यावेळी उपलब्ध होत्या पण अभ्यासांती केबलवाल्याचा सेट टॉप बॉक्स घेणे चांगले वाटले. त्यापाठी आर्थिक विचार तर होताच पण त्याहीपेक्षा डिडब्ल्यू हि जर्मन वाहिनी व टीव्ही ५ मोंडे ही फ्रेंच वाहिनी पहायला मिळणे आणि ते पण चकटफू हा त्या मागचा मुख्य हेतू होता. डिडब्ल्यू ही वाहिनी थोडिशी रुक्ष आणि प्रचारकीच्या अंगाने जाणारी आहे मात्र टिव्ही ५ मोंडे ही फ्रेंच वाहिनी मात्र रसिक प्रेक्षकांची मेजवानीच आहे. रोज सायंकाळी ६. ३० व ९ वाजता फ्रेंच भाषेतले उत्तमोत्तम चित्रपट व मालिका ही फ्रेंच वाहिनी इंग्रजी अनुवादासह दाखवते. ते चित्रपट व त्या मालिका पाहताना रंगून जायला होते. नुकताच पाहिलेला
'विसरलेला पियानो' हा असाच एक चित्रपट.

चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरची गोष्ट आहे. ज्युलियन हा मुलगा एका छोट्या खेड्यात राहत आहे. पियानोवादन हेच त्याच्या जीवनाचे खरे ध्येय आहे आणि वयाच्या ९-१० व्या वर्षीच त्याने ते ओळखले आहे.

मात्र त्याच्या वडिलांना हे त्याचे पियानोवादन अजिबात पसंत नाही. ज्युलियनने शाळेच्या शिक्षिकेकडून बरेच वर्ष पियानोवादनाचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले असते. तसेच तो सलग ३ वर्ष एका महत्वाच्या पियानोवादनाच्या स्पर्धेत पहिला येत असतो.

मात्र जेव्हा तो आपल्या वडिलांना आपण जन्मभर पियानो वाजवणार असे म्हणतो तेव्हा त्याचे वडिल नुसते त्याच्या पियानो वाजवण्यावरच बंदी घालतात असे नाही तर त्याला शाळा सुटल्यावर थेट आपल्या छापखान्यात कामाला ये असे बजावतात. छोट्या ज्युलियनला छापखान्यात खिळे जुळवण्याचे काम अजिबात आवडत नसते. पण तापट वडिलांपुढे त्याचे काही चालत नसते. कारण वाद घातला की फटके मिळणार हे त्याला चांगलेच माहित असते.

ही त्याची उलघाल, हा त्याचा कोंडमारा त्याची वर्ग मैत्रिण रोझीन हिला मुळीच पाहवत नाही आणि ती युक्ती काढते की ज्युलियनने शाळा सुटल्यावर थेट तिच्याकडे अभ्यासाला यावे. ह्या श्रीमंत मुलीच्या आईची रदबदली ज्युलियनचे वडिल नाकारू शकत नाहीत व त्याला नाईलाजाने रोझीनकडे अभ्यासाला जायची परवानगी देतात.

अभ्यासाच्या नावाखाली ज्युलियन आणि रोझीन रोज संध्याकाळी सायकलवरून भटकायला सुरवात करतात आणि एक दिवस ते गावकुसाबाहेरील एका निर्जन ठिकाणी असलेल्या एका छोट्याश्या खोपटात येऊन पोहोचतात आणि ज्युलियनला तिथे एक धुळ खात पडलेला एक पियानो दिसतो.

त्याचा आनंद गगनात मावत नाही. मात्र जेव्हा तो धुळ झटकून पियानो वाजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला तो पियानो बेसुर असल्याचे आढळते. दुसऱ्या दिवशी शाळेत एका मुलाबरोबर झालेल्या भांडणात तो मुलगा ज्युलियनला "देशद्रोह्याचा मुलगा" अशी शिवी देतो. ज्युलियनला ही गोष्ट लागते. तो आपल्या परीने असे का म्हटले गेले ह्याचा शोध घ्यायला सुरवात करतो.

थोडे दिवसांनी त्याचे पियानो वरून परत आपल्या वडिलांशी मोठे भांडण होते आणि तो रागाने सायकल घेऊन थेट गावकुसाबाहेरील निर्जन घरात जातो आणि त्याला तिथेच झोप लागते. योगायोगाने त्या रात्री त्या घराचा मालक बेंजामीन रोझेनबाऊम तिथे येतो आणि त्याला हा झोपलेला ज्युलियन उचल्या वाटतो. तो ज्युलियनला उठवतो आणि पोलिसात द्यायची धमकी देतो. त्यावर ज्युलियन धीटपणे त्याला आपण चोर नसून पियानो वाजवण्याच्या ओढीने इथे येतो असे सांगतो. ह्यावर बेंजामीन त्याला घरचे काळजी करत असतील असे सांगतो आणि आता घरी जा, नंतर पुन्हा ये असे सांगतो. मात्र ज्युलियन जाण्यापूर्वी बेंजामिनला सांगतो की त्याचा पियानो बेसुर आहे आणि ज्युलियनची स्वर ज्ञान अचुक असल्याने तो बेंजामिनला पियानो सुरात लावायला मदत करू शकतो. बेंजामिनला ह्या छोट्या मुलाचे कौतुक वाटते.

इथे घरी आल्यावर नियमाप्रमाणे ज्युलियनला वडिलांचा मार मिळतो पण आपण रात्रभर कुठे होतो ते तो वडिलांना कळू देत नाही. २-३ दिवसांनी तो पुन्हा त्या निर्जन घराकडे जायला सुरुवात करतो आणि बेंजामीन त्याच्या मदतीने स्वत:चा पियानो दुरुस्त तर करतोच पण छोट्या ज्युलियनला पियानो वाजवण्याचे रीतसर प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतो.

त्याची शिकवणी ज्युलियनला बेहद्द आवडते. पण आपल्यासाठी बेंजामीन शहरातून सारखे सारखे त्या निर्जन घरी का येतो, आला तरी गावातील त्याच्या प्रशस्त बंगल्यात का रहायला जात नाही हे काही ज्युलियनला कळत नाही. बेंजामीन विषयी सर्व माहिती काढायचा तो निश्चय करतो.

थोडेच दिवसात त्याला कळते की बेंजामीन रोझेनबाऊम हा फ्रांसमधील सर्वोत्कृष्ट पियानोवादक म्हणून ओळखला जात असतो. अजून थोडी माहिती काढल्यावर त्याला कळते की बेंजामीन हा ज्यू असून जर्मन छळछावणीत त्याचे आई-वडिल, बायको-मुले सर्वजण हाल अपेष्टा सहन करत मेलेली आहेत.

स्वत: बेंजामीन कसाबसा बिर्केनाऊ छळछावणीतून वाचलेला असतो आणि ह्या सर्व दुख:द घटनांना त्याचे सख्खे आजोबाच जबाबदार असतात. छापखान्यात लागणारा कागद युद्धकाळात स्वस्तात मिळावा म्हणून त्याच्याच आजोबांनी गेस्टापोला रोझेनबाऊम कुटुंबाचा ठावठिकाणा सांगितलेला असतो.

बेंजामिनवर मुलाप्रमाणे प्रेम करणारा आणि त्याला आपला गुरू मानणारा छोटा ज्युलियन हे समजल्यावर मुळापासून हादरतो. त्याचे भाव विश्व पूर्ण ढवळून निघते. तो बेंजामिनला आपले कुटुंब हेच त्याला उध्वस्त करून टाकण्यास कारणीभूत ठरले हे सत्य सांगायचा निर्णय घेतो.

हाच ज्युलियन पुढे जाऊन फ्रांसमधील अव्वल पियानोवादक बनतो. मात्र त्याचा पुढचा प्रवास अतिशय रोचक आहे. बेंजामिनला सत्य कळते का? कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय आहे? बेंजामीन नंतर ज्युलियनचा दुसरा गुरू कोण? ज्युलियनला त्याचे संगीत द्वेष्टे वडिल पियानो शिकू देतात का? बेंजामिनचे काय होते? ह्या आणि अश्या अनेक हृदयभेदक प्रश्नांची उत्तरे पाहायची असतील तर हा सुंदर चित्रपट पहायलाच हवा.

हा दुवा क्र. १ संपूर्ण चित्रपट म्हणजे कानसेनांसाठी एक अप्रतिम मेजवानी आहे. द पियानिस्ट मधील पियानो वादन दुवा क्र. २ जसे कठोर जर्मन अधिकाऱ्याच्या मनात माणुसकी जागृत करते तसे ह्या चित्रपटातील पियानोवादन सुद्धा आपल्याला त्यातील नजाकतीने अंतर्बाह्य हेलावून सोडते.

Tuesday 28 October 2008

Through

Be someone with big broad smile,
Try to be happy all the while,
If things go wrong,
Don't get Blue,
Just smile and say,
"I'll get through".

कुसुमाग्रजांची एक सुरेख कविता...

परमेश्वर नाही,
घोकत मन मम बसले ।
मी एक रात्री,
त्या नक्षत्रांना पुसले ॥

परी तुम्ही चिरंतन
विश्वातील प्रवासी ।
का चरण केधवा
तुम्हास त्याचे दिसले ॥ १ ॥

स्मित करून म्हणल्या
मला चांदण्या काही ।
तो नित्य प्रवासी
फिरत सदोदित राही ॥

उठतात तमावर
त्याची पाऊलचिन्हे ।
त्यांनाच पुससी तू,
आहे तो की नाही ॥ २ ॥

शाश्वताची निळी टिंबे..

आला श्रावण श्रावण
गुच्छ रंगांचे घेऊन,
ऊनपावसाचे पक्षी
आणी ओंजळीमधून.

निळे स्वप्न कुजबुजे
हळू पाखरांच्या कानी,
ऊन कोवळे दाटले
केशराच्या रानोरानी.

आता मेल्या मरणाला
जिती पालवी फुटेल,
गोठलेल्या आसवांना
पंख नवीन येतील.

आता धरतील फेर
कवडशांची डाळिंबे,
वर्षतील नभातून
शाश्वताची निळी टिंबे.

आला श्रावण श्रावण
ओल्या सोनपावलांनी,
दाही दिशा महिरल्या
यौवनाच्या मंजिर्‍यांनी.

- प्रा. सदानंद रेगे.

तहान

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।

व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।

फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।

राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।

- म. म. देशपांडे

Friday 24 October 2008

उत्थान

पुण्यातील श्री. अरविंद हर्षे प्रत्येक दिवाळीला आम्हाला पत्र पाठवून एखाद्या तळागाळातील संस्थेला दिवाळीसाठी धनरुप / वस्तुरुप मदत करण्याविषयी सुचवितात. ह्या वेळी त्यांनी डॉ. भीमराव गस्ती ह्यांच्या संस्थेविषयी लिहून पाठवले आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा.

स. न. वि. वि.,

एका समर्पित कार्यकर्त्याचा अल्प परिचय - डॉ. भीमराव गस्ती, एम. टेक. पीएच. डी. मूळ बेळगावचे. रशियातून डॉक्टरेट मिळाल्यावर त्यांनी देवदासींच्या उत्थानाचे कार्य हाती घेतले. ते दु:ख त्यांनी स्वत:च्याच घरी अनुभवले होते. त्यांच्या २५ / ३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार इ. झालेल्या आहेत. निपाणीस त्यांनी १८० मुलींसाठी वसतीगृह चालू केले आहे. नुकताच त्यांना इंडियन एक्सप्रेस समुहाचा मॅन ऑफ द ईयर, २००७ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. ते अ. भा. बेरड रामोशी सेवा समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांनी विपुल लेखन सुद्धा केले आहे. त्यांचे बेरड हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांनी सामाजिक समरसता मंच प्रणित समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा भूषवले आहे. दीपावलीच्या मंगल प्रसंगी आपल्या देवदासी भगिनींची आठवण ठेऊन त्यांना भाऊबीज पाठवावी ही कळकळीची विनंती.

डॉ. भीमरावजी गस्ती, उत्थान ट्रस्ट, १७९, मारुती गल्ली, यमुनापुर, बेळगाव - ५९००१०. दु. क्र. ९७४०६३८९३०.

जळती कितीक युवती वणव्यात त्या रुढीच्या - धृ.
देवीस त्या वाहती लेकीच त्या स्वत:च्या दासी बनून जगती भोळ्या अजाण बाला - १
दृष्टीस भक्ष्य पडता झडपाच घालती ते असती दलाल जगी या नाही तयांस माया - २
स्वप्नेच रंगविती देऊन भूलथापा मुंबापुरीस नेती सांगून त्या कळ्यांना - ३
भगिनीच त्या अभागी चुकताच वाट त्यांची कोणी नुरेच वाली नरकात त्या पडता - ४
आक्रोश ऐकुनिया कृष्णापरीस 'गस्ती' जाती धावूनी ते साह्यार्थ द्रौपदीच्या - ५
'उत्थान' ते घडाया, झिजवीच 'भीम' काया नाही विराम यत्नां साथीस जाऊ त्यांच्या - ६

कळावें, आपला नम्र, अ. स. हर्षे.

Wednesday 22 October 2008

मुंडल्यांची भाजी

जिन्नस
मुंडल्या
तूप
जिरे
शेंगदाणे
हिरव्या मिरचीचे तुकडे
मीठ
साखर
दाण्याचे कुट
ओले खोबरे
लाल तिखट
मार्गदर्शन
मुंडल्या हे रताळ्यांसारखे कंद आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे उपासासाठी वापरतात. भैय्या भाजी विक्रेत्यांच्या प्रभावामुळे बरेच लोक त्याला आर्वी असेही म्हणतात पण त्याचे मराठी नाव मुंडल्याच आहे. त्याची भाजी करायची लोक टाळतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे उकडल्यावर हा कंद चिकचिकित होतो. म्हणून काही लोक तो भाजूनसुद्धा खातात. मात्र ह्याची भाजी अप्रतिम लागते ह्यात शंका नाही.
प्रथम १ किलो कंद बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवावेत आणि त्यावरील माती गेली ह्याची खात्री करावी. मग ते कुकरमध्ये कमी पाण्यात मध्यम आचेवर २ शिट्यांपर्यंत उकडावेत. मग पाण्याचा निचरा करून कंद थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर शीतयंत्रात ठेवावेत. २-४ तासांनी चांगले थंड झाले की बाहेर काढावेत आणि त्यांचा थंडावा जायच्या आत त्याची साले काढावीत. ह्या युक्तीमुळे ते हाताला फारसे बुळबुळीत लागत नाहीत. मग सुरी एकदा पाण्यात बुडवून सर्व कंद चौकोनी चिरावेत.
एका पळीत १. ५ चमचा तूप तापवावे. त्यात आधी जिरे, शेंगदाणे, हिरव्या मिरचीचे तुकडे थोड्या थोड्या वेळाने घालावे. मिरची पुरेशी तळली गेली की विस्तव बंद करावा. मग कंदाच्या चौकोनी तुकड्यांवर आवडीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर, वर ही फोडणी, दाण्याचे कुट आणि ओले खोबरे घालावे.
मग हलक्या हाताने हे सर्व मिश्रण एकत्र करावे. मग नुसते अथवा पोळीला / चपातीला लावून खावे.
टीपा
ही भाजी महापौष्टिक आहे.
देशावर हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखटाचा पण प्रयोग केला जातो.
माहितीचा स्रोत
घरी, उपासाच्या दिवशी हा प्रकार करत असत.

Tuesday 14 October 2008

भाग्याचे नीलमणी (२)

आता तो निश्चिंत होता. प्रेमाने त्याने आपल्या टाय-पीन वरील नीलमण्यांचे चुंबन घेतले व मनाशी म्हणाला, "आता झटपट कामाला लागले पाहिजे. हां हां म्हणता कॅरव्हॅन येऊन उभी राहिल. तसा अजून पाऊण तासापेक्षाही जास्त वेळ आहे म्हणा. "
मग त्याने बायकोचे प्रेत एका मोठ्या गोणत्यात घातले. नीट निरखून पाहिले. कुठेही रक्ताचा टिपूससुद्धा नव्हता.
त्याने मनातल्या मनात स्वत:चीच पाठ थोपटली. मग ते प्रेत घेऊन गॅरेजमध्ये आला.
तिथली एक विशिष्ट फरशी बाजूला केली. त्याच्या खालती त्याने बेमालूनपणे केलेले तळघर होते. त्याने खाली बनविलेल्या उतारावर गोणी ढकलली आणि स्वत:ही आत उतरला. मग फरशी आतून लावून घेतली आणि बिनधास्त आपल्या कामाला सुरवात केली. प्रेताच्या गोणीवर माती पसरली. वर अनेक रसायने फवारली.
सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे उरकून बरोबर ८व्या मिनिटाला तो बाहेर सुद्धा आला. त्याला स्वत:चेच कौतुक वाटले. घरात आल्यावर त्याने परत सर्व आलबेल असल्याची खात्री केली व १० मिनिटांचा गजर लावून एक डुलकी काढण्यासाठी तो पलंगावर पसरला.
उठल्यावर त्याला अगदी ताजेतवाने वाटले. मनात परत व्हेरोनिकाचे विचार यायला लागले. मन प्रफुल्लित झाले. सहज चाळा म्हणून त्याने भाग्याचे टायवरून हात फिरवला तर भाग्याचे खडे असलेली टाय-पीन कुठेतरी पडल्याचे त्याला लक्षात आहे. तो आठवू लागला तसे त्याच्या लक्षात आले की मगाशी ती गोणी खाली वाकून ठेवत असताना कदाचित ती टाय-पीन पडली असल्याची दाट शक्यता होती. त्याने घड्याळात पाहिले तर ३. ४०. अजून कॅरव्हॅन यायला तब्बल २० मिनिटे होती.
त्याने बॅटरी शोधून काढली. परत गॅरेज मधील तळघरात शिरला. बॅटरीने तळघराचा कोपरा न कोपरा शोधायला लागला. तेव्हढ्यात बॅटरी विझली. तो चडफडला. म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. त्याला आठवले, खिशात लायटर आहे. लायटरच्या प्रकाशात घड्याळ्यात दिसले की ३. ५०.
वा, अजून तब्बल १० मिनिटे आहेत तो स्वत:शी म्हणाला. सुदैवाने ती टाय-पीन त्याला लगेच मिळाली.
तेव्हढ्यात त्याला गाडीच्या चाकाची घरघर ऐकू आली. कॅरव्हॅनवाल्याने ती कॅरव्हॅन ८-१० मिनिटे लवकर आणली होती. पण आपण तळघराचे दार लावून घेतले होते हे जाणवून त्याला हुश्श वाटले. ठरल्याप्रमाणे कॅरव्हॅन पोहोचवणारा माणूस कॅरव्हॅन ठेऊन परत कंपनीत गेला.
कॅरव्हॅनवाल्याच्या लांब जाणाऱ्या पावलांचा आवाज ऐकून त्याला हायसे वाटले. एक ५ मिनिटांनी त्याने अदमास घेतला आणि सर्वत्र निस्तब्ध शांतता झाल्याचे जाणवून त्याने जोर लावून तळघराचे दार उघडायचा प्रयत्न केला.
पण हाय रे कर्मा! कॅरव्हॅनवाल्याने ती कॅरव्हॅन गॅरेजमध्येच उभी केलेली होती आणि तिचे एक चाक नेमके त्याच विशिष्ट फरशीवर आले होते.
(बायकोच्या प्रेताशेजारी बसून, आपली बायको किती चांगली होती हे आठवून हळूहळू मरणे हेच त्याच्या भाग्यात लिहिलेले होते आणि भाग्याच्या नीलमण्यांनी त्यांचे काम चोख केले होते. )

Sunday 12 October 2008

भाग्याचे नीलमणी (१)

त्याला खात्री होती आजचा दिवस त्याचे जीवन पालटणार होता. आजपासून तो स्वत:चे निर्णय स्वत:च घेणार होता. इतके वर्ष, खरेतर समजायला लागल्यापासून तो आईचे ऐकत आला होता. स्वत:चे निर्णय स्वत: न घेऊ शकण्यातील घुसमट त्याने अनुभवली होती. सतत दबावाखाली राहण्याने त्याचे मन बंड करून उठले होते. गेल्याच महिन्यात आईच्या कॉफिनवर फुले ठेवताना आपले जीवन सुखी करण्याचा त्याने निश्चय केला होता. त्याची सुरुवात आज होणार होती.
आज सकाळीच त्याने एक कॅरव्हॅन मागवली होती. ती बरोबर ४. ०० वाजता येणार होती. सगळे काही व्यवस्थित झाले तर तो उद्या ह्याच वेळेला व्हेरोनिकासोबत दूरवर सॅंटा कॅटालिना बेटावर असेल.
व्हेरोनिकाच्या आठवणीने त्याचे मन प्रफुल्लित झाले. तिने जेव्हापासून त्याच्या ऑफिसमध्ये पाऊल टाकले होते त्याच्या मनाने तिचाच ध्यास घेतला होता. "अजून फक्त काही तास", त्याने आपल्या टाय पिनशी चाळा करीत म्हटले.
ती चांदीची टाय पीन आणि त्यावरचे ते सुबक नीलमणी म्हणजे त्याचा जीव की प्राण. हे नीलमणीच माझे भाग्य ठरवेल, तो मनात म्हणाला.
त्याने बायकोकडे, मरियनकडे पाहिले. ती उत्साहाने कोणाला तरी पुढचे सहा महिने ते दोघे सॅंटा कॅटालिनावर काय काय मजा करणार आहेत ते कोणाला तरी सांगत होती. त्याचे विचारचक्र चालू झाले. मरियन काही अगदीच वाईट नाही. एक बायको म्हणून तिने माझे सर्व काही केले. पण फटाकड्या व्हेरोनिका पुढे ती अगदीच फिकी वाटते.
तशी ती बरी आहे. पण फोनवर तासंतास बोलते इतकेच. एकाएकी त्याच्या मनात तिच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली.
"बिल्ली अगर चुंहेसे प्यार करेगी तो खाएगी क्या... ऑम्लेट खायचे तर अंड फोडलेच पाहिजे", तो मनात म्हणाला. आपले मरियनवर प्रेम नाही हे आज आपण तिला जाणवून दिले पाहिजे.
त्याने घड्याळ्यात पाहिले. दुपारचे तीन वाजले होते. वेळ कसा गेला कळलेच नाही. तो शांतपणे उठला, तिच्या जवळ जाऊन म्हणाला, प्रिये, किती बोलत राहशील, लाँग ड्राईव्हला जायचयं ना, चल तयार हो. निघायची वेळ झाली.
तिच्या चेहऱ्यावर अस्फुट हसू उमटले. तिने जुजबी बोलून फोन ठेवला. त्याने ही तिच्याकडे पाहून मंद स्मित केले.
मग खिशातून सुंभ काढला आणि त्याने तिचा गळा आवळला. तिचा प्राण पूर्ण गेला आहे ह्याची खात्री केली आणि हलकेच एक शीळ घातली.
(क्रमश:)

Wednesday 8 October 2008

किटक नाश

बरेच वर्षापूर्वी आम्ही घरी पहिल्यांदाच किटक नाशक फवारणी करून घेतली. त्या फवारणीच्या काळात व त्यानंतर सांगितले गेल्याप्रमाणे ४-५ तास बाहेर राहिलो. परत आलो तेव्हा घरातील कुंडीतील झाडे मरून पडली होती. ते पाहून अतिशय वाईट वाटले आणि राग ही आला की जे किटक नाशक फवारणी करतात त्यांनी ह्या झाडांबाबत काहीच सांगितले नव्हते. आमचा जरी हा पहिलाच अनुभव होता तरी ज्यांचा हाच व्यवसाय आहे त्यांना तरी हे कळायला नको का?
त्यानंतर अनेक अनुभव येत गेले. १) ह्या फवारणीने पाली देखील मेल्या होत्या त्यामुळे काही महिन्यातच झुरळांची अतोनात वाढ झाली. २) ह्या फवारणीने कोळी मेले होते त्यामुळे काही महिन्यात चिलटं, रातकिडे ह्यांची वाढ झाली. ३) सर्वत्र भरपुर काळ्या मुंग्या दिसायला लागल्या होत्या.
हे पाहिल्यावर मनात विचार आले की खरोखरच ह्या जहरील्या रासायनिक फवारणीची आपल्या घराला इतकी आवश्यकता होतीच का? पाली व कोळी नैसर्गिक किटक नाशक नाहीत का? विषारी रासायनिक फवारणी करून आपण पर्यावरणाचा र्‍हास तर करत नाही ना?
मग लक्षात आले की पाली व कोळी जरी दिसायला विद्रुप असले तरीते माणसासाठी निरुपद्रवी आणि अत्यंत उपयोगी आहेत. त्यानंतर आम्ही आजतागायत कधीच घरात विषारी रासायनिक किटक नाशक फवारणी केली नाही.

दहशतवाद्यांचे बदलते स्वरुप

गेल्या शतकातील भारतातील मुस्लिम दहशतवादी हे अशिक्षित, गरीब होते. त्यावेळी समाजशास्त्रज्ञांनी म्हटले होते की गरीबीमुळे पैश्याच्या आमिषाला भुलून तसेच मदरश्यातील मौलवींच्या कडव्या विचारसरणीला भुलून हे दहशतवादी अशी कृत्ये करायला तयार होतात. सरकारने त्यांना योग्य शैक्षणिक सुविधा व रोजगार दिला तर असे दहशतवादी तयार होणार नाहीत.
मात्र आज नेमकी उलट स्थिती आहे. जे आझमगड दहशतवाद स्रोत आहे तिथे आखातातील प्रचंड पैसा आहे. सध्या पकडलेले बहुतेक दहशतवादी उच्चशिक्षित आणि मोठ्या प्रमाणात पगार घेणारे तरुण आहेत.
असे वाटते की ह्या नव्या स्वरुपाचे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विश्लेषण होणे गरजेचे आहे कारण हे दहशतवादी मानवतेचे शत्रु आहेत.

आपल्याला काय वाटते?
(अपेक्षा इतकीच की कंधमालचा विषय मधे आणून ह्या गंभीर विषयाला फाटे फोडू नयेत. त्यासाठी हवा तर वेगळा चर्चा विषय काढावा.)

राजस फ्लॉवर

जिन्नस
अर्धा किलो फ्लॉवर
मीठ
ओले खोबरे
मिरेपुड
मार्गदर्शन
एकीकडे फ्लॉवरची फुले धुवून मीठाच्या पाण्यात शिजवायला ठेवावी आणि दुसरीकडे नारळाची वाटी खवणावी. फ्लॉवरची फुले चांगल्या पैकी शिजली की चाळणीवर काढून पाणी जाऊ द्यावे. आता ही फुले ताटात घेऊन त्यावर मिरेपुड व ओले खोबरे भुरभुरावे. हलक्या हाताने हे मिश्रण खाली वर करावे आणि खावे.
टीपा
फ्लॉवर अति शिजवू नये. तसेच बाजारातून फ्लॉवर पांढरट न आणता किंचित पिवळट आणावा. पांढरा धोप फ्लॉवर खायला चांगला लागत नाही. शक्यतो फ्लॉवर, ओले खोबरे ताजेच असावे.
माहितीचा स्रोत
घरी, उपासाच्या दिवशी हा फ्लॉवर प्रकार करत असत.

खुबी आणि न्यून

आमच्याकडे कुठलाही आम्ही चित्रपट पाहात असलो की माझा भाऊ विचारतो, ही नटी कुठली, तो नट कुठला आणि मी नेहेमी गोंधळते. माणसांचे नाव व चेहरे लक्षात ठेवणे, पटकन डावी बाजू
किंवा उजवी बाजू सांगणे, लिहिताना ट, ठ, ढ, छ, झ ह्यांच्यात गोंधळ ठरलेलाच असतो (पुढे बी.
एड. ला आल्यावर कळले की ह्याला डिसग्राफिया दुवा क्र. १ म्हणतात).

त्यामुळे बऱ्याच गमतीदार गोष्टी घडतात. एकदा जालावर मी पत्त्यांचा खेळ छब्बू लिहिले आणि प्रतिसाद
आला, तुम्हाला झब्बू म्हणायचे आहे का? एकदा रिक्शावाल्याला मी म्हटले, आता लेफ्ट घ्या आणि
तो म्हणाला, मॅडम, समुद्रात जाऊन आपण काय करणार? खरेतर मला सांगायचे होते उजवीकडे. पूर्वी दंतमंजन घेताना मी सहज उजवा हात पुढे करायचे. एखाद्या माणसाशी तो दुसराच कोणीतरी
आहे असे समजून बोलणे हे तर हमखास.

पण अशी काही न्यूने माझ्यात असली तरी काही खुबी पण आहेत. त्यातली महत्वाची खुबी म्हणजे
रस्ते लक्षात ठेवणे. मी जवळ जवळ सर्व मुंबई (उपनगरे नव्हेत) पायी हिंडलेले आहे. मला रस्ते, चौक, महामार्ग, गल्ल्या नीट लक्षात राहतात. अगदी भुलेश्वरचा भुलभुलैय्या असू दे किंवा पूर्वेकडचा बंदरभाग, मला कुठूनही जाताना रस्त्यांचे नकाशे झटपट मनात तयार होतात. खरेतर ह्या खुबीमुळे व्यावहारिक
फायदा शुन्य आहे. पण तरी मला त्याचा अभिमान आहे.

तसेच एक माझ्या नात्यात गतिमंद भाऊ आहे. त्याला ईसवी सनापासून कुठल्या तारखेला कुठला वार
होता ते चटकन मनात गणित करून सांगता येते. त्याला १०००-२००० हजार लोकांचे वाढदिवस लक्षात आहेत.

खरेतर आपल्या सर्वांकडेच लोकांना माहित नसलेली एखादी खुबी वा एखादे न्यून असते. मात्र आपण
जास्त भर आपल्यात एखादा गुण कसा नाही ह्याचाच विचार करण्यात घालवतो. थोडा विचार केला तर
तुम्हाला ही तुमच्यातील एखादे न्यून आणि एखादी खुबी नक्की सांगता येईल. पाहा प्रयत्न करून. मात्र ही खुबी अथवा हे न्यून व्यावहारिक दृष्ट्या फार काही मोलाचेच असलेच पाहिजे असे ही काही नाही.