Wednesday, 8 October 2008

किटक नाश

बरेच वर्षापूर्वी आम्ही घरी पहिल्यांदाच किटक नाशक फवारणी करून घेतली. त्या फवारणीच्या काळात व त्यानंतर सांगितले गेल्याप्रमाणे ४-५ तास बाहेर राहिलो. परत आलो तेव्हा घरातील कुंडीतील झाडे मरून पडली होती. ते पाहून अतिशय वाईट वाटले आणि राग ही आला की जे किटक नाशक फवारणी करतात त्यांनी ह्या झाडांबाबत काहीच सांगितले नव्हते. आमचा जरी हा पहिलाच अनुभव होता तरी ज्यांचा हाच व्यवसाय आहे त्यांना तरी हे कळायला नको का?
त्यानंतर अनेक अनुभव येत गेले. १) ह्या फवारणीने पाली देखील मेल्या होत्या त्यामुळे काही महिन्यातच झुरळांची अतोनात वाढ झाली. २) ह्या फवारणीने कोळी मेले होते त्यामुळे काही महिन्यात चिलटं, रातकिडे ह्यांची वाढ झाली. ३) सर्वत्र भरपुर काळ्या मुंग्या दिसायला लागल्या होत्या.
हे पाहिल्यावर मनात विचार आले की खरोखरच ह्या जहरील्या रासायनिक फवारणीची आपल्या घराला इतकी आवश्यकता होतीच का? पाली व कोळी नैसर्गिक किटक नाशक नाहीत का? विषारी रासायनिक फवारणी करून आपण पर्यावरणाचा र्‍हास तर करत नाही ना?
मग लक्षात आले की पाली व कोळी जरी दिसायला विद्रुप असले तरीते माणसासाठी निरुपद्रवी आणि अत्यंत उपयोगी आहेत. त्यानंतर आम्ही आजतागायत कधीच घरात विषारी रासायनिक किटक नाशक फवारणी केली नाही.

No comments:

Post a Comment