Sunday, 12 October 2008

भाग्याचे नीलमणी (१)

त्याला खात्री होती आजचा दिवस त्याचे जीवन पालटणार होता. आजपासून तो स्वत:चे निर्णय स्वत:च घेणार होता. इतके वर्ष, खरेतर समजायला लागल्यापासून तो आईचे ऐकत आला होता. स्वत:चे निर्णय स्वत: न घेऊ शकण्यातील घुसमट त्याने अनुभवली होती. सतत दबावाखाली राहण्याने त्याचे मन बंड करून उठले होते. गेल्याच महिन्यात आईच्या कॉफिनवर फुले ठेवताना आपले जीवन सुखी करण्याचा त्याने निश्चय केला होता. त्याची सुरुवात आज होणार होती.
आज सकाळीच त्याने एक कॅरव्हॅन मागवली होती. ती बरोबर ४. ०० वाजता येणार होती. सगळे काही व्यवस्थित झाले तर तो उद्या ह्याच वेळेला व्हेरोनिकासोबत दूरवर सॅंटा कॅटालिना बेटावर असेल.
व्हेरोनिकाच्या आठवणीने त्याचे मन प्रफुल्लित झाले. तिने जेव्हापासून त्याच्या ऑफिसमध्ये पाऊल टाकले होते त्याच्या मनाने तिचाच ध्यास घेतला होता. "अजून फक्त काही तास", त्याने आपल्या टाय पिनशी चाळा करीत म्हटले.
ती चांदीची टाय पीन आणि त्यावरचे ते सुबक नीलमणी म्हणजे त्याचा जीव की प्राण. हे नीलमणीच माझे भाग्य ठरवेल, तो मनात म्हणाला.
त्याने बायकोकडे, मरियनकडे पाहिले. ती उत्साहाने कोणाला तरी पुढचे सहा महिने ते दोघे सॅंटा कॅटालिनावर काय काय मजा करणार आहेत ते कोणाला तरी सांगत होती. त्याचे विचारचक्र चालू झाले. मरियन काही अगदीच वाईट नाही. एक बायको म्हणून तिने माझे सर्व काही केले. पण फटाकड्या व्हेरोनिका पुढे ती अगदीच फिकी वाटते.
तशी ती बरी आहे. पण फोनवर तासंतास बोलते इतकेच. एकाएकी त्याच्या मनात तिच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली.
"बिल्ली अगर चुंहेसे प्यार करेगी तो खाएगी क्या... ऑम्लेट खायचे तर अंड फोडलेच पाहिजे", तो मनात म्हणाला. आपले मरियनवर प्रेम नाही हे आज आपण तिला जाणवून दिले पाहिजे.
त्याने घड्याळ्यात पाहिले. दुपारचे तीन वाजले होते. वेळ कसा गेला कळलेच नाही. तो शांतपणे उठला, तिच्या जवळ जाऊन म्हणाला, प्रिये, किती बोलत राहशील, लाँग ड्राईव्हला जायचयं ना, चल तयार हो. निघायची वेळ झाली.
तिच्या चेहऱ्यावर अस्फुट हसू उमटले. तिने जुजबी बोलून फोन ठेवला. त्याने ही तिच्याकडे पाहून मंद स्मित केले.
मग खिशातून सुंभ काढला आणि त्याने तिचा गळा आवळला. तिचा प्राण पूर्ण गेला आहे ह्याची खात्री केली आणि हलकेच एक शीळ घातली.
(क्रमश:)

No comments:

Post a Comment