आमच्याकडे कुठलाही आम्ही चित्रपट पाहात असलो की माझा भाऊ विचारतो, ही नटी कुठली, तो नट कुठला आणि मी नेहेमी गोंधळते. माणसांचे नाव व चेहरे लक्षात ठेवणे, पटकन डावी बाजू
किंवा उजवी बाजू सांगणे, लिहिताना ट, ठ, ढ, छ, झ ह्यांच्यात गोंधळ ठरलेलाच असतो (पुढे बी.
एड. ला आल्यावर कळले की ह्याला डिसग्राफिया दुवा क्र. १ म्हणतात).
त्यामुळे बऱ्याच गमतीदार गोष्टी घडतात. एकदा जालावर मी पत्त्यांचा खेळ छब्बू लिहिले आणि प्रतिसाद
आला, तुम्हाला झब्बू म्हणायचे आहे का? एकदा रिक्शावाल्याला मी म्हटले, आता लेफ्ट घ्या आणि
तो म्हणाला, मॅडम, समुद्रात जाऊन आपण काय करणार? खरेतर मला सांगायचे होते उजवीकडे. पूर्वी दंतमंजन घेताना मी सहज उजवा हात पुढे करायचे. एखाद्या माणसाशी तो दुसराच कोणीतरी
आहे असे समजून बोलणे हे तर हमखास.
पण अशी काही न्यूने माझ्यात असली तरी काही खुबी पण आहेत. त्यातली महत्वाची खुबी म्हणजे
रस्ते लक्षात ठेवणे. मी जवळ जवळ सर्व मुंबई (उपनगरे नव्हेत) पायी हिंडलेले आहे. मला रस्ते, चौक, महामार्ग, गल्ल्या नीट लक्षात राहतात. अगदी भुलेश्वरचा भुलभुलैय्या असू दे किंवा पूर्वेकडचा बंदरभाग, मला कुठूनही जाताना रस्त्यांचे नकाशे झटपट मनात तयार होतात. खरेतर ह्या खुबीमुळे व्यावहारिक
फायदा शुन्य आहे. पण तरी मला त्याचा अभिमान आहे.
तसेच एक माझ्या नात्यात गतिमंद भाऊ आहे. त्याला ईसवी सनापासून कुठल्या तारखेला कुठला वार
होता ते चटकन मनात गणित करून सांगता येते. त्याला १०००-२००० हजार लोकांचे वाढदिवस लक्षात आहेत.
खरेतर आपल्या सर्वांकडेच लोकांना माहित नसलेली एखादी खुबी वा एखादे न्यून असते. मात्र आपण
जास्त भर आपल्यात एखादा गुण कसा नाही ह्याचाच विचार करण्यात घालवतो. थोडा विचार केला तर
तुम्हाला ही तुमच्यातील एखादे न्यून आणि एखादी खुबी नक्की सांगता येईल. पाहा प्रयत्न करून. मात्र ही खुबी अथवा हे न्यून व्यावहारिक दृष्ट्या फार काही मोलाचेच असलेच पाहिजे असे ही काही नाही.
Showing posts with label खुबी आणि न्यून. Show all posts
Showing posts with label खुबी आणि न्यून. Show all posts
Wednesday, 8 October 2008
Subscribe to:
Posts (Atom)