Showing posts with label मुंडल्यांची भाजी. Show all posts
Showing posts with label मुंडल्यांची भाजी. Show all posts

Wednesday, 22 October 2008

मुंडल्यांची भाजी

जिन्नस
मुंडल्या
तूप
जिरे
शेंगदाणे
हिरव्या मिरचीचे तुकडे
मीठ
साखर
दाण्याचे कुट
ओले खोबरे
लाल तिखट
मार्गदर्शन
मुंडल्या हे रताळ्यांसारखे कंद आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे उपासासाठी वापरतात. भैय्या भाजी विक्रेत्यांच्या प्रभावामुळे बरेच लोक त्याला आर्वी असेही म्हणतात पण त्याचे मराठी नाव मुंडल्याच आहे. त्याची भाजी करायची लोक टाळतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे उकडल्यावर हा कंद चिकचिकित होतो. म्हणून काही लोक तो भाजूनसुद्धा खातात. मात्र ह्याची भाजी अप्रतिम लागते ह्यात शंका नाही.
प्रथम १ किलो कंद बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवावेत आणि त्यावरील माती गेली ह्याची खात्री करावी. मग ते कुकरमध्ये कमी पाण्यात मध्यम आचेवर २ शिट्यांपर्यंत उकडावेत. मग पाण्याचा निचरा करून कंद थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर शीतयंत्रात ठेवावेत. २-४ तासांनी चांगले थंड झाले की बाहेर काढावेत आणि त्यांचा थंडावा जायच्या आत त्याची साले काढावीत. ह्या युक्तीमुळे ते हाताला फारसे बुळबुळीत लागत नाहीत. मग सुरी एकदा पाण्यात बुडवून सर्व कंद चौकोनी चिरावेत.
एका पळीत १. ५ चमचा तूप तापवावे. त्यात आधी जिरे, शेंगदाणे, हिरव्या मिरचीचे तुकडे थोड्या थोड्या वेळाने घालावे. मिरची पुरेशी तळली गेली की विस्तव बंद करावा. मग कंदाच्या चौकोनी तुकड्यांवर आवडीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर, वर ही फोडणी, दाण्याचे कुट आणि ओले खोबरे घालावे.
मग हलक्या हाताने हे सर्व मिश्रण एकत्र करावे. मग नुसते अथवा पोळीला / चपातीला लावून खावे.
टीपा
ही भाजी महापौष्टिक आहे.
देशावर हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखटाचा पण प्रयोग केला जातो.
माहितीचा स्रोत
घरी, उपासाच्या दिवशी हा प्रकार करत असत.