Sunday, 24 August 2008

सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...

प्रिय गुरुजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधूचरित पुरुषोत्तम.
स्वार्थी राजकारणी असतात जगात
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.

मला माहित आहे
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत... तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा त्याला विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला

गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !

जमेल तेवढं दाखवित चला त्याला
ग्रंथ भाण्डाराचं अद्भुत वैभव,
मात्र त्या बरोबरच
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला.
पाहू दे त्याला
पक्षांची अस्मान भरारी...
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...
आणि हिरव्यागार डोंगरउतारावर डोलणारी चिमुकली फुलं.

शाळेत त्याला हा धडा मिळू दे -फसवून मिळवलेल्या यशापेक्षा
सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.

आपल्या कल्पना आपले विचार
यांच्यावर दृढविश्वास ठेवायला हवा त्यानं बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्याला सांगा
त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्दल घडवावी.
माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणार्‍या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद
त्यानं कमवायला हवी.
पुढे हेही सांगा त्याला
ऐकावं जनांचं अगदी सर्वांचं... पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्य तेव्हढं स्वीकारावं.

जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा - हसत राहावं उरातलं दु:ख दाबून.
आणि म्हणावं त्याला,
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको.

त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला
अन् चाटुगिरीपासून सावध राहायला. त्याला हे पुरेपुर समजवा की
करावी कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा !

धिक्कार करणार्‍यांच्या झुंडी आल्या तर काणाडोळा करायला शिकवा त्याला,
आणि ठसवा त्याच्या मनावर –
जे सत्य आणि न्याय्य वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.

त्याला ममतेनं वागवा पण
लाडावून ठेऊ नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा
अधीर व्हायचं धैर्य,
आणि धरला पाहिजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत राहा त्याला –
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर.

माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे... पण पहा..
जमेल तेव्हढं अवश्य कराच.

माझा मुलगा - भलताच गोड छोकरा आहे हो तो.

- श्री. अब्राहम लिंकन
- अनुवाद कवि श्री. वसंत बापट

तहान

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।
व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।
फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।
राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।
- म. म. देशपांडे.

छातीत निर्भय श्वास दे...

छातीत निर्भय श्वास दे...

छातीत निर्भय श्वास दे, साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्‍या संकटांना ठेचणारे पाय दे ।।

ध्येय दे उत्तुंग मंगलअढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू देहृदयातून गंगेपरी ।।

दीनदुबळ्या रक्षणा रे, शस्त्र दे माझ्या करी ।
दु:शासनाच्या दानवी रुधिरांत धरती न्हाऊ दे।।

निष्पाप जे ते रुप तुझे उमजूं दे माझे मला ।
धर्म, जाती, पंथ यांच्या तोड आता श्रुंखला ।।

नवीन गगने, नवीन दिनकर, नवीन चंद्राच्या कला,
या नव्या विश्वात तुझ्यान्याय नीती नांदू दे ।।

छातीत निर्भय श्वास दे...

स्वर्ग

कालच सकाळी मराठीच्या तासालापहिल्या बाकावरील तिने वळून पाहिले मलादोन्ही बाजूने कोपरखळ्या आल्या आणि शब्द मध्येच "मजा आहे तुझी साल्या"मग मी ही लिहिलं एक प्रेमपत्र,'प्रिये तुझ्या प्रीतीस होईन का ग पात्र?'संध्याकाळी निघालो तिच्या भेटीला,डोळे लाऊन बसलो तिच्या घरी जायच्या वाटेला,एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली,हृदयाचे दरवाजे लागले धडधडू,'तिच्याशी बोलायला विषय कसा काढू?'एव्हढ्यात एका गुंडाने तिची छेड काढलीअन् त्या गुंडाची कानफडं रंगली.. तिने धावत येऊन माझा हात धरला,'आता स्वर्ग मला दोनच बोटे उरला'पण क्षणातच या सुखाला झालो मी पारखा कारण ती म्हणाली,"कसा रे धावून आलास,पाठच्या भावासारखा..."

लिलीची फुले




लिलीची फुले

तिने एकदा चुंबिता,

डोळां पाणी मी पाहिले....!

लिलीची फुले

आता कधीही पाहता, डोळां

पाणी हे साकळे....!
- पु. शि. रेगे

घाटातील वाट,






घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ ।।
निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती ।।
खाली खोल दरी, वर उंच कडा, भला मोठा नाग, जणू वर काढून फणा ।।
भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।।
- बालभारती इ. ३ री (१९८४)

परिमळांमाजी कस्तुरी...

जैसे हरळांमाजी रत्नकिळा ।
कि रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा ।
भाषा मराठी ।।
जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी ।
परिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी ।
भाषा मराठी ।।
पखियांमध्ये मयोरु ।
रुखियांमध्ये कल्पतरु ।
भाषांमध्ये मान थोरु ।
मराठीयेसी ।।
तारांमध्ये बारा राशी ।
सप्तवारांमध्ये रवि-शशि ।
या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी ।
बोली मराठीया ।।
- फादर स्टिफन्स

Saturday, 23 August 2008

विदर्भातला शेतकरी..

शेतकर्‍यांना कर्जमाफ झाल्यापासून गेल्या विदर्भात ८ दिवसांत २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही बातमी खरोखरच चटका लावणारी आहे.
बळीराजा हा आपला अन्नदाता, त्याच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघायला हवा पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही ह्याचे मुख्य कारण ह्या सततच्या आत्महत्या केवळ विदर्भापुरत्याच मर्यादित आहेत.
तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे प्रामुख्याने ४ प्रकार१) कोकणातला २) खानदेशातला ३) विदर्भातला ४) मावळ प्रांतातला.
कोकण प्रांतात पाऊस भरपुर पण पाणी साठवण्याची तंत्रे कमी त्यामुळे बहुतांश पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. नगदी पीके (ऊस, कापूस) नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांकडे मुळातच पैसा कमी (पैसा मुख्यत: आंबा बागायतदारांकडे). परिणामी अंथरुण पाहून पाय पसरायची प्रवृत्ती. खानदेशात पण पाण्याचे दुर्भिक्ष्य पण द्राक्ष, केळीने हात दिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र सुपीक आणि जलसंपन्न तसेच सत्ताधार्‍यांचे लाडके अपत्य. सत्ताधार्‍यांचे अनेक निर्णय मावळाला विशेषत: बारामतीला पूरक.
राहता राहिला विदर्भ. माझे विदर्भाबद्दलचे ज्ञान तोकडे आहे पण मी असे वाचले आहे की विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर कोकणी शेतकर्‍यापेक्षा बरी. पण सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च विशेषत: प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अपरंपार.
कोकणातली लग्ने, बारशी किंवा इतर विधी झेपेल तेव्हढ्या परिस्थितीत होतो. हुंडा व्यवहार कमी. तो पण सक्तीचा नव्हे. मुख्य म्हणजे त्यासाठी मोठ्या रकमेची कर्जे काढली जात नाहीत. मात्र विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच. परिणामी ह्या कर्जाच्या डोंगरामुळेच विदर्भात आत्महत्यांचे लोण.