- अण्णा भाऊ साठे
कडूसं पडून तोंडओळख मोडली होती. अंधाराच्या लाटा गावाच्या डोकीवर नाचत होत्या. कभिन्न काळोखाने विष्णुपन्तांच्या वाड्याची उंची भुईसपाट केली होती. लूत भरलेल्या कुत्र्याप्रमाणे ओसाड वातावरण कण्हत होते. चोहोकडे नि:शब्दता नांदत होती.
विष्णुपन्त कुलकर्णांच्या वाड्यात विष्णुपन्त आणि मुरा बोलत उभे होते. देवळीत मंद जळणार्या निरांजनाचा थरथरता प्रकाश त्या दोघांवर खेळत होता.
विष्णुपन्तांच्या वयाने पन्नाशी मागे टाकली होती तरी त्यांचा धिप्पाड देह दणदणीत होता. त्यांच्या प्रचंड मस्तकावरचे टक्कल, रुंद गर्दन, टपोरे डोळे आणि पल्लेदार गालमिशा यांमुळे पंताना पाहताच ढाण्या वाघाची आठवण होत होती. आज ते गंभीरपणे बोलत होते.
मुरा खिन्न होऊन पंताकडे पाहत होता. त्याने आपले मजबूत हात पाठीमागे धरले होते. घोंगड्याची खोळ घेतली होती. घोंगड्याच्या दशा त्याच्या पीळदार पोटर्यांवर निर्जीव लोंबत होत्या. त्याचे तरुण, रसरसणारे डोळे पंतांवर स्थिरावले होते. त्यात चिंता भरली होती. त्याच्या नाकाचा शेंडा घामाने डबडबला होता. रुबाबदार चेहरा काळवंडला होता.
"आतापर्यंत किती माणसे दगावली?" पंतानी विचारले.
"ईस बारीकमोठी." मुरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चरफडत गेले.
"मग तुझं काय म्हणणं आहे?" पंतानी पुन्हा प्रश्न केला.
मुराने ओठांवरून जीभ फिरवली आणि तो शांतपणे म्हणाला, "भाकरी भाकरी करून पोरांचं चरफडून मरनं आणि त्यांचा हंबरडा आता माझ्याने ऐकवंना. ढेकळावानी काळीज ईरगाळतय माझं." त्याच्या पापणीला प्रकाशाचे कण लोंबकळू लागले. त्याने मान फिरवून आसू दडविण्याचा प्रयत्न केला.
"तसं नाही." पंत समजावणीच्या स्वरात म्हणाले, "धीराने घ्यायला पाहिजे मुरा."
"आबा," मुरा म्हणाला, "भोवळीचा अन् कुरडूचा पाला खाऊन जगतोय; पन जमंना. नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळीज शाबुत ठिवलं असतं. पन ह्या साथीनं कडेलोट केलाय आमचा."
मुरा थांबला. त्याने पुढचे शब्द गिळून घेतले आणि पंतानी पुन: तोच प्रश्न उच्चारला.
"मग पुढं काय?" पंतांचा धीरगंभीर आवाज घुमला.
"तुमीच सांगा?" मुराने उलट प्रश्न केला.
"मी काय सांगू?" पंत बोलले, "गाव दुष्काळाच्या छायेत आहे हे मी सरकारात कळविलं आहे पण टीचभर चिठ्ठीने उत्तर नाही. मी केवळ मृतांची नोंद करणारा झालो आहे".
"मग आमास्नी धनी कोण?" मुरा वैतागून उद्गारला.
"कोण कुणाचा धनी नाही." पंत चटकन बोलू लागले, माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे, परन्तु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे."
"पन आबा, कसं?" मुरा अधिकच चिडक्या स्वरात उद्गारला.
"जसं जमेल तसं" पंत त्याला पुढे बोलू न देता म्हणाले, काहिही करा परन्तु जगा." त्यांनी झेप घेऊन निरांजनातील वात सारून प्रकाश मोठा केला. प्रकाशाची पाचर अंधारात खोलवर गेली.
"मग आम्ही काय करावं?" मुराने विचारले. परन्तु पंतांचा चेहरा बिथरला. त्यांचा आवाज कडवट झाला.
"ते मला कळत नाही." पंत म्हणाले, "तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका."
(क्रमश:)
Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग १)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment