उरलेले लोक आपआपल्या घरी परतले. मुराने आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला.
त्याच्या मागून ते दीडशे गडी निघाले. निवडुंगात हत्यारे चमकली.
गावाबाहेर पडून मार्गाला लागल्यावर बळीने हळूच विचारले,
"मुरा कुठं जायचं?"
"मालेवाडीच्या मठकर्याला लुटाय." मुरा समोर पाहून उद्गारला आणि वादळाप्रमाणे धावत निघाला.
मालेवाडी शांत होती. गुडघे पोटाशी धरून खोपीत बसलेल्या माणसाप्रमाणे ती डोंगराच्या खोदर्यात बसली होती. रात्रीच्या रंगात एकरुप झाली होती. गावाच्या एका टोकावर मठकर्यांचा भव्य वाडा वाळीत टाकल्याप्रमाणे दूर बसला होता. त्याच्या चिरेबंदी भिंतीवर रात्र टकरा घेत होती.
फार पूर्वी एका उदार राजाने एका पुजार्याला मठाची देखरेख करण्यासाठी १४ गावची जहागिर दान केली होती. त्या दानावर मठकरी मठाचा खर्च करीत असे. आजपर्यंत मठाचा पुजारी आणि त्या दौलतीचा मालक होण्यासाठी त्या गावात भयंकर होड लागली होती.
मोठमोठी धेंडे त्या मालकीवर टपून बसली होती. एक दुसर्याचा खून करून स्वत: दत्तक जात होता आणि तिसरा त्याचा मुडदा पाडून आपली मालकी प्रस्थापित करीत होता. आजपर्यंत कित्येक दत्तकांनी कित्येकांना वाटे लावले होते. आजही वाड्यात पाच मालकीणी रांडपण रेटीत होत्या.
तिथे पेवांत किडे नांदावेत तशी माणसे नांदत होती. मठकर्याच्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला एक अशा कैक धान्याच्या कणगी उभ्या होत्या. त्या साखळदंडाने जखडल्या होत्या. जागोजाग चाकर निजले होते. शिकारी कुत्री खुरमांडी घालून बसली होती. अंगणात पलंग टाकून मठकरी निजला होता. तिथे निर्भय निजणार्यांच्या घोरण्याने रातकिड्यांची चिरचिर बंद पाडली होती. चौदा गावचे धान्य आणि जीवन पोटात घेऊन वाड्याचा कुसव धापा टाकीत होता.
त्या दगडांना मुराचे हात भिडले. त्याच्या दीडशे लोकांनी नाकेबंदी करून पहिला आडणा मारायचे काम पुरे केले. वाड्याभोवती वादळापूर्वीची शांतता कुजबुजत होती.
एकाएकी लाकडी घाण्याप्रमाणे तो दरवाजा ओरडला. सारा वाडा हादरला आणि मशालीचा प्रकाश नि हत्यारे यांनी मठकर्याचे अंगण भरले. दावणीच्या गुरांनी धडपड चालू केली. कुत्र्यांनी वाडा डोक्यावर घेतला. मठकर्याने किंचाळून, लाथा मारून गडी जागे केले आणि बोंब ठोकली. " धावा! धावा!"
मुरा त्वेषाने पुढे जाऊन ओरडला, "बोंबलू नगं, न्हाय तर मुंडकं मारीन."
क्षणात सर्व काही पूर्ववत् झाले. उठलेले सर्व गडी पुन: पडून पाहू लागले. कुत्री भुंकत राहिली. कुर्हाडीचे घाव कणगीवर पडू लागले. मुक्त धान्याचा लोंढा अंगणात आला. पोती भरली जाऊन ती अंधारात पळू लागली.
मुराला समोर पाहून मठकर्याला हरिश्चंद्राला स्वप्नात लुटणार्या विश्वामित्राची आठवण झाली. त्याने पळ काढला, तो गावात जाऊन ओरडला, "वाचवा! धावा!"
उभी मालेवाडी उठली, मशाली पेटल्या, हत्यारे निघाली आणि गावकर्यांनी मुराच्या मुख्य वाटेची पांद रोखून धरली.
मुराभोवती वेढा पडला.
(क्रमश:)
Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ३)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment