Friday, 20 August 2010

देसी अभियांत्रिकी

१) माझ्या सीपीयू मध्ये जर चुकून सीडी ठेवायची विसरले आणि सीडी प्लेयरचा खाचा (स्लॉट) रिकामा राहिला तर तो इजेक्ट बटन दाबला तरी बाहेर येत नाही. तो सहज बाहेर यावा ह्यासाठी माझ्या हार्डवेयर अभियंत्याने अगदी सोपी युक्ती सांगितली आहे. प्रत्येक सीडी ड्राईव्हवर इजेक्ट बटनाशेजारी एक उघडझाप करणारा छोटा दिवा असतो. त्या दिव्याच्यावर एक बारीक भोक असते. त्या बारीक भोकात सहज जाईल अशी पण टाचणीपेक्षा जरा जाड तार घालायची आणि तिच्या टोकाला किंचित दाब द्यायचा आणि त्याच वेळी इजेक्ट बटन दाबत राहायचे. ती तार हळू हळू आत जाते आणि सीडी खाचा बाहेर येतो.

२)आमच्या इथे एक दुग्धशाळा आहे. तिथे विशाल औद्योगिक शीतयंत्रे आहेत. त्या शीतयंत्रात पाणी भरतात आणि त्या पाण्यात मोठे दुधाचे कॅन ठेवतात. सतत हे वजनी कॅन ठेवत राहिल्याने त्या शीतयंत्राच्या पत्र्याला तळाला बारीक छिद्रे पडतात आणि त्यातून पाणी झिरपते. त्यावर तिथल्या गवळ्यांनी एक सोपा उपाय काढला आहे आणि तो म्हणजे जास्ती चिकटपणा असलेल्या मातीची वस्त्रगाळ पूड करायची आणि ती वस्त्रगाळ पूड हलक्या हाताने त्या पाण्यात सोडायची. मग ती वस्त्रगाळ पूड सावकाश तळाला जाते आणि त्या छिद्रांमध्ये जाऊन घट्ट बसते आणि ती छिद्रे कायमची बुजतात.

असे हे देसी अभियांत्रिकी (Engineering), केवळ आपल्या पैशाचीच बचत करते असे नाही तर वस्तुंच्या पुनर्वापरामुळे आणि टिकाऊपणामुळे पर्यावरणाचे पण संरक्षण करते. कारण एकदा वापरा आणि फेकून द्या (Use & Throw) ह्या विकृतीमुळे पर्यावरण ढासळत चालले आहे.

Original post : देसी अभियांत्रिकी

दही बटर

जिन्नस

* साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे भुकटी, चाट मसाला
* बटर
* दही

मार्गदर्शन

घट्ट दही प्रथम थोडेसे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे. त्यात रुचीप्रमाणे साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे यांची भुकटी, चाट मसाला घालावे. पुन्हा थोडे एकजीव करावे.


मग कोमटपेक्षा थोडे गरम पाणी करावे, वाडग्यात घ्यावे आणि बटर (खारी बिस्किट कुटुंबातले) एकावेळी २-३ त्या कोमट पाण्यात तळाकडच्या बाजूला बुडवावेत. तो भाग किंचित मऊ झाला असे वाटले की बटर पालथे करून शिखराचा भागसुद्धा मऊ करून घ्यावा.
दोन्ही भाग पुरेसे मऊ झाले वाटले की एक एक बटर दोन हातांच्या तळव्यात चेपून दह्यात घालावा. मराठमोळे दहीवडे तयार. सर्व साहित्य असेल तर हा पदार्थ सातव्या मिनिटाला तयार.
टीपा
१) बटर शक्यतो मध्यम आकाराचे चांगल्या प्रतिचे असावेत (जिरे बटर). २) पाणी जास्त गरम असले तर हात भाजतो आणि कमी गरम असेल तर ४-५ बटर मऊ होईपर्यंत थंड होते. ३) पहिला प्रयत्न मनाजोगा झाला नाही तर नाउमेद होऊ नये. २ ऱ्या -३ ऱ्या वेळेपासून सर्व नीट जमून येते. ४) लहान मुलांना आवडते. पण बरेचदा करू नये कारण बटर मैद्यापासून बनविलेले असतात. मजा म्हणून महिन्यातून १-२ वेळा हरकत नाही. ५) पाहुण्यांना देताना थोडी बुंदी, लाल डाळिंबदाणे पेरून द्यावेत. ६) बटर फार वेळ पाण्यात किंवा दह्यात ठेऊ नयेत. लगेच पोटात टाकावेत नाही तर ते पाणी शोषून घेतात आणि फुगून पानचट लागतात.
माहितीचा स्रोत
घर

Original post : दही बटर

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ६)

विष्णुपंतांचे शब्द प्रांताच्या पाठीत बुक्क्या बसल्याप्रमाणे बसून तो नरमून म्हणाला, "मग आम्ही काय करावे म्हणता?"


"तुम्ही सरकार आहात." पंत ठासून म्हणाले, "हा दुष्काळ निवारा. साथीचा बंदोबस्त करा आणि लोकांना दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढा."


विष्णुपंत बोलत होते, लोक ऐकत होते, प्रांत ऐकत होता. सर्वत्र शांतता निर्माण झाली. पंत क्षणभर थांबले. प्रांत काहीच बोलेना.


तो निरुत्तर झाल्याचे लक्षात येताच पंतानी बजावले, "साहेब, हे लोक मढी नाहीत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार त्यांच्यावर काबू करू शकत नाही."


एकाएकी प्रांत चटकन् उठला. त्याच्या रागीट चेहर्‍यावर हास्य तळपले. त्याने पंतांचा हात हातात धरून म्हटले, "आम्ही तुमचे वय आणि दर्जा लक्षात घेतले नाही म्हणून राग मानू नका. आम्ही दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू."


विष्णुपंत शांत झाले. त्यांनी मुरावर नजर फेकली. मुराच्या सुटकेचा हुकुम प्रांतसाहेबांच्या मुखातून पोलिसांच्या कानात शिरला. मुराची बेडी निखळली. लोकांनी नि:श्वास टाकला. सर्व नजरा पंतांवर स्थिर झाल्या.


तो काळ गेला, तो दुष्काळ गेला, ते विष्णुपंतही गेले. पण विष्णुपंतांचे शब्द अजूनही लोक विसरले नाहीत. कोणीही विसरू नयेत इतके खोल माणसांच्या हृदयांत ते घर करून बसले आहेत. कधी कधी ते कानात गुणगुणू लागतात

- "तुम्ही जगलंच पाहिजे!".


(समाप्त)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ६)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ५)

हातापायांची आग झाल्याप्रमाणे पंत चुळबुळ करत सभोवार पाहू लागले आणि प्रांत गोंधळून म्हणाला, "पंत तुम्हाला म्हणायचंय काय?"


"मग ऐका तर" पंत निर्भीडपणे खणखणीत आवाजात बोलू लागले, "साहेब, माझा गाव दुष्काळाच्या छायेत असून लोक कुरडूचा पाला खात आहेत आणि साथीच्या रोगाने घरे बसत आहेत हे सर्व मी तुम्हाला कळविले होते की नाही?"


पंतांच्या सरबत्तीने प्रांत चमकला. तो मटकन् खुर्चीवर बसला. "खरं आहे" तो पुटपुटला.


"मग उत्तर का दिले नाही?" पंत वेड्यासारखे ओरडले.


"उत्तर दिले नाही म्हणून लोकांनी अराजकता माजवावी, लुटालुट करावी हे आम्हाला मान्य नाही" प्रांत खेकसला.


पंत भाला भोसकल्याप्रमाणे बिथरून ओरडले, "मग काय मान्य आहे? लोकांनी कुत्र्याच्या मौतीने मरावे? साहेब, मलाही हे मान्य नाही."


"मग काय मान्य आहे?" प्रांत किंचाळला, "लुटालुट आणि बेबंदशाही?" त्याने चावडी डोक्यावर घेतली.


"ह्याला उत्तर होय!" पंत गंभीरपणे उद्गारले.


"ठीक आहे, करा लुटालुट, आम्ही आरोपींना घेऊन आताच सातार्‍याला जातो" प्रांत डोळे बारीक करून म्हणाला.


त्यावर पंत निर्भयपणे म्हणाले, "जा, खुशाल जा. पण लवकर परत या."


"का, कशाला?" प्रांत चमकून म्हणाला.


"मला, - विष्णुपंताला अटक करायला" पंतांनी उग्र आवाजात तंबी दिली.


"म्हणजे तुम्ही स्वत: लुटालुट करणार तर?" प्रांताने विचारले.


पंतांनी उपरण्याने कंबर बांधली. प्रांतावर करडी नजर रोखली आणि मान उंचावून उत्तर दिले, "साहेब, जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला एक तर कुत्र्याच्या मौतीने मरावे लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावे लागेल आणि मी कुत्र्या सारखा मरणारा माणूस नाही साहेब!"


(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ५)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ४)

मुराचे पुष्कळ लोक धान्याची पोती घेऊन दूर गेले होते आणि निवडक लोकांनिशी मुरा त्या वेढ्यात अडकून पडला होता. गावकर्‍यांनी पांद रोखल्याचे लक्षात येताच बळी धावत येऊन म्हणाला, "मुरा, गावकर्‍यांनी पांद आडवली, आता?" क्षणभर विचार करून मुरा म्हणाला,"दावण कापून सारी गुरं पांदीत घाला आणि मागनं गोफणीने जोडून वाट काढीत चला."

बळीने दावण कापली. सर्व गुरे पांदीत लोटून मागे दंगल उडवून दिली. वर शेपट्या करून गुरे पांदीने पळू लागताच त्या भयंकर दंगलीने गावकर्‍यांची भंबेरी उडाली. त्यांनी पळ काढला. गुरांचा गळा मोकळा करून मुराने स्वत:चा गळा सोडवून घेतला.

पहाट झाली होती. उषा हर्षभरित होऊन वर येत होती. कितीतरी दिवसानी आनंद त्या निवडुंगात परत आला होता. मशालीच्या प्रकाशात मुराच्या दारात दाणे वाटण्याचे काम चालू होते. पाट्या, बुट्ट्या, शिवडी घेतलेले लोक रांगेने बसले होते. त्यांच्या भकास चेहर्‍यांवर आनंदाच्या छटा उमटल्या होत्या. धान्याचा ढीग पाहूनच त्यांची तहानभूक हरपली होती. मोडून पडलेल्या मानवाला अन्नातील किमया हसवीत होती.

धान्य वाटून झाले. एक लहानसा ढीग शिल्लक राहिला. तो मापाने मोजता येण्यासारखा नव्हता. तेव्हा बळीने मुराला विचारले, " दाणं कसं मोजावं?" त्यावर मुरा विचार करून म्हणाला, "डाव घेऊन डावीने बराबर वाटा, एक दाणा एका माणसाला एक दिवस जगवील हे विसरू नका."

सूर्योदयाच्या आत वाटण्या झाल्या. कित्येक दिवसांची निश्चल जाती घरघरली, थंड चुलींना उबारा आला, तव्यांना झळा लागल्या. घराघरावर धूर घोटाळत फिरू लागला आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांत दारात बसून पोरे ऊन ऊन भाकरी खाऊ लागली.


तिसर्‍या दिवशी चावडी पुढे बुच्याड लागले. सातार्‍याहून प्रांतसाहेब आले. कैक फौजदार धावपळ करू लागले. पोलिसांनी वेशी दाबून ठेवल्या आणि मुराला अटक झाली. चावडीपुढे तर रीघ लागली होती. त्या गर्दीत तो मालेवाडीचा मठकरी मिरवत होता.


मुराच्या अटकेची बातमी बातमी ऐकून विष्णुपंत धावतच आले. लोकांनी मागे सरून त्यांना वाट दिली; परन्तु पंत चावडीची पायरी चढले नाहीत. ते दारात उभे राहूनच बोलले, "साहेब, काय आरंभले आहे हे?"


"आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे," प्रांतसाहेब ओट्यावरून उत्तरले.


"आम्ही या गावचे सरकारी नोकर आहोत हे मान्य आहे का आपणांला?" पंतांनी सहज प्रश्न केला.


"हो खरं आहे ते." प्रांत उत्तरला.


"मग आम्हाला न विचारता ही धरपकड का?" पंतांनी गाव-कामगाराचा नियम पुढे केला. त्यांचा स्वर किंचित चढला होता.


परन्तु प्रांतसाहेब चिडक्या आवाजात उत्तरले, "तसा आम्हाला अधिकार आहे आणि यांनी तर या मालेवाडीच्या मठकर्‍यांना लुटलं आहे."


"पुरावा काय?" पंतांनी चढत्या स्वरात पुराव्याची मागणी केली आणि कमरेवर हात ठेवून प्रांतसाहेब शांतपणे म्हणाले, "मठकर्‍यांच्या धान्याचा माग या गावच्या सीमेला भिडला असून या लोकांच्या घरात भाकरी सापडली आहे."


पण विष्णुपंत खवळून गरजले, "मग मला का नाही अटक करीत? तो माग माझ्याच गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला भाकरी सापडेल."

(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ४)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ३)

उरलेले लोक आपआपल्या घरी परतले. मुराने आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला.

त्याच्या मागून ते दीडशे गडी निघाले. निवडुंगात हत्यारे चमकली.

गावाबाहेर पडून मार्गाला लागल्यावर बळीने हळूच विचारले,

"मुरा कुठं जायचं?"

"मालेवाडीच्या मठकर्‍याला लुटाय." मुरा समोर पाहून उद्गारला आणि वादळाप्रमाणे धावत निघाला.

मालेवाडी शांत होती. गुडघे पोटाशी धरून खोपीत बसलेल्या माणसाप्रमाणे ती डोंगराच्या खोदर्‍यात बसली होती. रात्रीच्या रंगात एकरुप झाली होती. गावाच्या एका टोकावर मठकर्‍यांचा भव्य वाडा वाळीत टाकल्याप्रमाणे दूर बसला होता. त्याच्या चिरेबंदी भिंतीवर रात्र टकरा घेत होती.

फार पूर्वी एका उदार राजाने एका पुजार्‍याला मठाची देखरेख करण्यासाठी १४ गावची जहागिर दान केली होती. त्या दानावर मठकरी मठाचा खर्च करीत असे. आजपर्यंत मठाचा पुजारी आणि त्या दौलतीचा मालक होण्यासाठी त्या गावात भयंकर होड लागली होती.

मोठमोठी धेंडे त्या मालकीवर टपून बसली होती. एक दुसर्‍याचा खून करून स्वत: दत्तक जात होता आणि तिसरा त्याचा मुडदा पाडून आपली मालकी प्रस्थापित करीत होता. आजपर्यंत कित्येक दत्तकांनी कित्येकांना वाटे लावले होते. आजही वाड्यात पाच मालकीणी रांडपण रेटीत होत्या.

तिथे पेवांत किडे नांदावेत तशी माणसे नांदत होती. मठकर्‍याच्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला एक अशा कैक धान्याच्या कणगी उभ्या होत्या. त्या साखळदंडाने जखडल्या होत्या. जागोजाग चाकर निजले होते. शिकारी कुत्री खुरमांडी घालून बसली होती. अंगणात पलंग टाकून मठकरी निजला होता. तिथे निर्भय निजणार्‍यांच्या घोरण्याने रातकिड्यांची चिरचिर बंद पाडली होती. चौदा गावचे धान्य आणि जीवन पोटात घेऊन वाड्याचा कुसव धापा टाकीत होता.

त्या दगडांना मुराचे हात भिडले. त्याच्या दीडशे लोकांनी नाकेबंदी करून पहिला आडणा मारायचे काम पुरे केले. वाड्याभोवती वादळापूर्वीची शांतता कुजबुजत होती.

एकाएकी लाकडी घाण्याप्रमाणे तो दरवाजा ओरडला. सारा वाडा हादरला आणि मशालीचा प्रकाश नि हत्यारे यांनी मठकर्‍याचे अंगण भरले. दावणीच्या गुरांनी धडपड चालू केली. कुत्र्यांनी वाडा डोक्यावर घेतला. मठकर्‍याने किंचाळून, लाथा मारून गडी जागे केले आणि बोंब ठोकली. " धावा! धावा!"

मुरा त्वेषाने पुढे जाऊन ओरडला, "बोंबलू नगं, न्हाय तर मुंडकं मारीन."

क्षणात सर्व काही पूर्ववत् झाले. उठलेले सर्व गडी पुन: पडून पाहू लागले. कुत्री भुंकत राहिली. कुर्‍हाडीचे घाव कणगीवर पडू लागले. मुक्त धान्याचा लोंढा अंगणात आला. पोती भरली जाऊन ती अंधारात पळू लागली.

मुराला समोर पाहून मठकर्‍याला हरिश्चंद्राला स्वप्नात लुटणार्‍या विश्वामित्राची आठवण झाली. त्याने पळ काढला, तो गावात जाऊन ओरडला, "वाचवा! धावा!"

उभी मालेवाडी उठली, मशाली पेटल्या, हत्यारे निघाली आणि गावकर्‍यांनी मुराच्या मुख्य वाटेची पांद रोखून धरली.

मुराभोवती वेढा पडला.

(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ३)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग २)

पंतांच्या मुखातून शब्दाऐवजी निखारे बाहेर पडले आणि मुराच्या अंत:करणात धैर्याचा महासागर लाटा उधळीत उठला. त्याने चटकन वाकून पंतांपुढे हात टेकला आणि उठून गंभीरपणे तो म्हणाला, "आबा, मी जातो."


"जा, उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसे आहात." पंतांनी मुराला निरोप दिला.

काजळी झडताच ज्योत प्रखर व्हावी तद्वतच मुराचे मन उजळले. त्यात आकाशाला गवसणी घालण्याची प्रबलता संचारली. त्याच्या तरुण पायांत हिंमत नाचू लागली. तो बेभान होऊन विद्युत्गतीने वाड्याकडे निघाला. चिखल तुडवावा तसा तो अंधाराला तुडवीत चालत होता.

ओसाड वातावरणाने मुराच्या गावची मोट बांधली होती. आकाश आणि धरणी यांच्यामध्ये असलेली पोकळी अंधाराने भरून काढली होती. घोंगड्याच्या घडीसारख्या काळ्या जमिनी मढ्याप्रमाणे पडल्या होत्या. त्यांच्या पाठीवरून दुष्काळ सरपटत होता. जणू क्रौर्याने सृष्टी तलवारीच्या टोकावर धरली होती आणि उत्पात आरंभला होता, त्या दुष्काळापुढे माणूस पराभूत झाला होता.

उन्मत्त दुष्काळाने पृथ्वीची शोभा नष्ट करण्यासाठी नभांगणातल्या चांदण्यासुद्धा ओरबाडून गिळल्या आहेत आणि आभाळाचे पोट फुटून अंधार खाली गळत आहे असा भास होत होता.

मोकळ्या जागेतील लिंबाखाली लहानमोठी अशी दोनशे माणसे जमून बसली होती. ती मुराची वाट पाहत होती. या निकराच्या समयी मुरा काय सांगतो ते ऐकण्यासाठी ते सर्व उत्सुक झाले होते. तोच मुरा आला. सर्वांनी गंभीर होऊन कान टवकारले. पटकुरे सावरली, नि:श्वास टाकला.


"काय म्हणलंत कुलकर्णी?" बहिरुने सुरवात केली.

"त्यांनी जगाय सांगितलंय." मुरा म्हणाला.

"पन कोरड्या बोलण्यानं जगता येत न्हाय." बळी म्हणला.


"खरं हाय त्ये." मुरा लिंबाच्या मुळीवर बसून म्हणाला. "पन कुळकर्णी आणि आपुन

एकच हाय. मातूर आमी आधी मरणार आनि कुळकर्णी थोड्या उशीराने मरनार एव्हढंच."


"मग आमास्नी धनी कोण?"


"आमीच." मुरा उद्गारला.


"म्हंजी आमी मराय पायजे" किंवडा सावळा ओरडला.


"न्हाय, जगलं पायजे !"


"विठ्ठला, पांडुरंगा, माझी दोन पोरं घडीची सोबती आहेत. त्यांनी कसं जगावं?" कोंडी हात जोडून म्हणाला."


"सार्‍यांनी जगलं पायजे." मुरा ताडकन उठून म्हणाला. तो घरी जाऊन तलवार घेऊन बाहेर आला.


"पन कसं?"


"केरु, बळी, दौलु, पांडू, सावळा, सादू आनि ज्येला माझ्याबरोबर चालता येत असंल त्येनी एका बाजूवर निघावं."


खवळलेले आग्या मोहोळ घोंगावत उठावे तद्वत दीडशे गडी एका बाजूला निघून उभा राहिला आणि मुरा पुन्हा म्हणाला,

"आमी येईपतुर तुमी मढी पानी पाजून जतन करा. उद्या इथे अन्नाचा ढीग लावतो."


(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग २)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग १)

- अण्णा भाऊ साठे


कडूसं पडून तोंडओळख मोडली होती. अंधाराच्या लाटा गावाच्या डोकीवर नाचत होत्या. कभिन्न काळोखाने विष्णुपन्तांच्या वाड्याची उंची भुईसपाट केली होती. लूत भरलेल्या कुत्र्याप्रमाणे ओसाड वातावरण कण्हत होते. चोहोकडे नि:शब्दता नांदत होती.

विष्णुपन्त कुलकर्णांच्या वाड्यात विष्णुपन्त आणि मुरा बोलत उभे होते. देवळीत मंद जळणार्‍या निरांजनाचा थरथरता प्रकाश त्या दोघांवर खेळत होता.

विष्णुपन्तांच्या वयाने पन्नाशी मागे टाकली होती तरी त्यांचा धिप्पाड देह दणदणीत होता. त्यांच्या प्रचंड मस्तकावरचे टक्कल, रुंद गर्दन, टपोरे डोळे आणि पल्लेदार गालमिशा यांमुळे पंताना पाहताच ढाण्या वाघाची आठवण होत होती. आज ते गंभीरपणे बोलत होते.

मुरा खिन्न होऊन पंताकडे पाहत होता. त्याने आपले मजबूत हात पाठीमागे धरले होते. घोंगड्याची खोळ घेतली होती. घोंगड्याच्या दशा त्याच्या पीळदार पोटर्‍यांवर निर्जीव लोंबत होत्या. त्याचे तरुण, रसरसणारे डोळे पंतांवर स्थिरावले होते. त्यात चिंता भरली होती. त्याच्या नाकाचा शेंडा घामाने डबडबला होता. रुबाबदार चेहरा काळवंडला होता.

"आतापर्यंत किती माणसे दगावली?" पंतानी विचारले.

"ईस बारीकमोठी." मुरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चरफडत गेले.

"मग तुझं काय म्हणणं आहे?" पंतानी पुन्हा प्रश्न केला.

मुराने ओठांवरून जीभ फिरवली आणि तो शांतपणे म्हणाला, "भाकरी भाकरी करून पोरांचं चरफडून मरनं आणि त्यांचा हंबरडा आता माझ्याने ऐकवंना. ढेकळावानी काळीज ईरगाळतय माझं." त्याच्या पापणीला प्रकाशाचे कण लोंबकळू लागले. त्याने मान फिरवून आसू दडविण्याचा प्रयत्न केला.

"तसं नाही." पंत समजावणीच्या स्वरात म्हणाले, "धीराने घ्यायला पाहिजे मुरा."

"आबा," मुरा म्हणाला, "भोवळीचा अन् कुरडूचा पाला खाऊन जगतोय; पन जमंना. नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळीज शाबुत ठिवलं असतं. पन ह्या साथीनं कडेलोट केलाय आमचा."

मुरा थांबला. त्याने पुढचे शब्द गिळून घेतले आणि पंतानी पुन: तोच प्रश्न उच्चारला.

"मग पुढं काय?" पंतांचा धीरगंभीर आवाज घुमला.

"तुमीच सांगा?" मुराने उलट प्रश्न केला.

"मी काय सांगू?" पंत बोलले, "गाव दुष्काळाच्या छायेत आहे हे मी सरकारात कळविलं आहे पण टीचभर चिठ्ठीने उत्तर नाही. मी केवळ मृतांची नोंद करणारा झालो आहे".

"मग आमास्नी धनी कोण?" मुरा वैतागून उद्गारला.

"कोण कुणाचा धनी नाही." पंत चटकन बोलू लागले, माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे, परन्तु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे."

"पन आबा, कसं?" मुरा अधिकच चिडक्या स्वरात उद्गारला.

"जसं जमेल तसं" पंत त्याला पुढे बोलू न देता म्हणाले, काहिही करा परन्तु जगा." त्यांनी झेप घेऊन निरांजनातील वात सारून प्रकाश मोठा केला. प्रकाशाची पाचर अंधारात खोलवर गेली.


"मग आम्ही काय करावं?" मुराने विचारले. परन्तु पंतांचा चेहरा बिथरला. त्यांचा आवाज कडवट झाला.


"ते मला कळत नाही." पंत म्हणाले, "तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका."


(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग १)