Sunday 1 December 2013

विहिरीत पाव

चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३९ साली उत्तर कोकणातून धर्मांध आणि क्रूर पोर्तुगीजांची कायमची हकालपट्टी केली आणि तेथील जनतेला दोनशे वर्षापासून चालत आलेल्या ‘इनक्विझीशन’ नावाच्या सैतानी वरवंट्यातून सुटका केली. इनक्विझीशन म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माला अनुसरण्यास नकार देणाऱ्या माणसांची प्रथम चाप लावून नखे खेचून काढणे, जीभ कापणे, यंत्राने हाडे चुरणे, शरीर सोलणे अश्या शारीरिक छळांपासून सुरूवात करून त्याचा शेवट तेलात भिजवलेली गोणती अंगावर घालून माध्यान्हीच्या भर उन्हात सार्वजनिक स्थळी जिवंत जाळण्यात होत असे. साने गुरूजींनी ह्या प्रथेला मध्ययुगीन रानटीपणा असे नाव दिले आहे.
युरोपात चालू केलेली ही भीषण प्रथा पोर्तुगीजांनी येताना आपल्या सोबत आणली. सहासष्ट गावांचा समूह असलेला सहासष्टी (साष्टी) प्रांत तसेच गोवा, दीव-दमण हे पोर्तुगीज अमलाखालील प्रदेश त्यात भरडून निघाले. पोर्तुगीजांच्या जुलमाच्या कथा ऐकून लोक खचून जात होते. मनात येईल त्यावेळी लोकांना पकडून आणायचे आणि कॅथॉलिक ख्रिश्चन बनण्याची सक्ती करायची आणि विरोध करणाऱ्यांवर पाशवी अत्याचार करायचे हे ठरूनच गेलेले होते. असे असताना प्राणभयाने ख्रिस्ती होणारे किती आणि विहिरीत पाव टाकल्याने ख्रिस्ती झालेले किती हे संशोधन करायची वेळ आली आहे. माझ्या स्वतःच्या मते पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने हिंदुंनी धर्माबाहेर काढले ही सांगोवानगीची गोष्ट आहे. एकतर मैद्याचा पाव म्हणजे गोमांस नव्हे. तसेच कोकण, गोवा ह्यां सारख्या प्रांतांमध्ये जिथे घरटी एक विहिर होती तिथे नक्की किती विहिरींमध्ये पोर्तुगीज लोक पाव टाकत बसले असतील ते कळायला मार्ग नाही. एक गाव एक पाणवठा अशी स्थिती असती तर आपण म्हणू शकलो असतो की विहिरींत पाव टाकल्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. असे घडलेच नसेल असे नाही पण त्याचे प्रमाण किती हे तपासायला हवे. कारण सैतानी पोर्तुगीज अत्याचारांना धीराने तोंड देणारी आणि तरीही जमेल तसा आपला धर्म शिल्लक ठेवणारी हिंदु जनता मैद्याचा पाव खाल्ल्याने कोणाला धर्माबाहेर काढेल हे जरा कठीणच वाटते. एकुणात विहिरीत पाव टाकल्याने बाटणे ही दुर्मिळ घटना असावी. हिंदुंनी धर्म न सोडण्यासाठी जे हाल सोसले ते पाहता ही अफवाच जास्त वाटते. केतकर ज्ञानकोश लिहितो - एखाद्या विहिरीत पावाचा तुकडा टाकून सबंध गावचा गांव बाटवीत असे “म्हणतात”. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानकोशही असे काही घडले आहे असे छातीठोकपणे म्हणत नाही. आज हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे सध्या गोवा आणि उत्तर कोकणात काही धर्मांतरित ख्रिस्ती लोकांमध्ये पोर्तुगीजांविषयी प्रेम उचंबळून आले आहे. त्यांनी इतिहासाचे सोयीस्कर पुनर्कथन चालू केले आहे. त्यांच्या दृष्टिने धर्मभीरू पोर्तुगीज हे प्रेमळ आणि वत्सल होते आणि त्यांचे झालेले धर्मांतर (पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने) हिंदुंनी धर्माबाहेर काढल्याने नाईलाजास्तव झालेले धर्मांतर आहे. पोर्तुगीजांचा ख्रिस्ती धर्म म्हणजे दया, क्षमा, शांती, करूणा ह्यांचे प्रतीक आहे.
अवांतर – ह्या नव्याने उत्पन्न झालेल्या पोर्तुगीज प्रेमाची एकच कथा सांगते - मध्यंतरी वसई किल्ला परिसरात एक मोठ्या आकाराची मानवी कवटी सापडली. त्या कवटीचे कार्बन डेटिंग न करता काही पाद्री मंडळींनी तिची पालखीतून मिरवणूक काढली आणि सर्वांना सांगत सुटले की बघा पोर्तुगीज लोक कसे शरीराने धिप्पाड होते, (अंगाने किरकोळ असलेले) मराठे ह्यांना हरवणे शक्यच नाही. ती पालखी जेव्हा वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिराबाहेर ठेवली गेली तेव्हा नागेश्वर मंदिराचे पुजारी ती पाहायला गेले. त्यावेळी त्यांना तीच कथा ऐकवली गेली. त्यावर त्या मंदिराचे पुजारी म्हणाले की ही कवटी पोर्तुगीजांची असेल ही पण मी ते मनगट शोधतो आहे ज्याने ही कवटी धडावेगळी केली. त्यानंतर त्या पाद्री लोकांनी पुन्हा कधी त्या कवटीचा पालखीत घालून प्रचार केला नाही.
असो. मी माझ्या अनेक इतिहासप्रेमी मित्रांना त्याकाळच्या मोडी तसेच उर्दू कागदपत्रांत ‘विहिरीत पाव‘ नावाच्या दंतकथेविषयी काही उल्लेख मिळतो का ते पाहायला सांगितले आहेच. पण आपणापैकी कोणास असा लिखित पुरावा माहित असल्यास कृपया विनाविलंब त्याविषयी इथे सांगावे ही विनंती.

Thursday 14 November 2013

एक महायुद्ध

सध्या चेन्नई मध्ये जागतिक बुद्धिबळ स्पर्धा चालू आहे. तासंतास चालणाऱ्या त्या लढती केवळ पाहाणे हे पण अतिशय संयमाचे काम आहे. जणू धैर्याची परीक्षाच. असे असताना खेळाडूंनी तर ह्या लढतीसाठी किती परिश्रम घेतले असतील त्यांचे त्यांनाच ठाऊक.
अशीच एक प्रचंड मोठी लढत मराठेशाहीने दिली. त्या लढतीला 'वसईचा लढा' म्हणण्यापेक्षा मी त्या एक महायुद्धच म्हणेन. साष्टी बेटाला पोर्तुगीजांच्या अघोरी धार्मिक उन्मादातून सोडवण्यासाठी सुमारे तीन वर्ष घरापासून दूर राहून, अत्यंत असमतोल शस्त्रसज्जता असताना लहान-मोठे ११४ गडकोट जिंकून, तसेच अभेद्य वसईचा किल्ला जिंकण्यासाठी पराक्रमाची शर्थ करून चिमाजी अप्पांच्या कुशल नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गणपतराव मेहेंदळे, रामचंद्र पटवर्धन, बापूजी भिवराव, विठोजी कदम, जिवाजीराव विचारे, गंगोजी नाईक शंकराजी केशव, अणजूरकर मंडळी आदींचा समावेश असलेल्या पराक्रमी मराठी सैन्याने अखेर उत्तर कोकणातून धर्मांध आणि क्रूर पोर्तुगीजांची कायमची हकालपट्टी केली आणि तेथील जनतेला दोनशे वर्षापासून चालत आलेल्या ‘इनक्विझीशन’ नावाच्या सैतानी वरवंट्यातून सुटका केली. ह्या लढाईत नऊ लाख बांगडी फुटली म्हणजेच सुमारे ४३ हजार मराठे कामी आले. हे इनक्विझीशन म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माला अनुसरण्यास नकार देणाऱ्या माणसांची प्रथम चाप लावून नखे खेचून काढणे, जीभ कापणे, शरीर सोलणे अश्या शारीरिक छळांपासून सुरूवात करून त्याचा शेवट तेलात भिजवलेली गोणती अंगावर घालून माध्यान्हीच्या भर उन्हात सार्वजनिक स्थळी जिवंत जाळण्यात होत असे. साने गुरूजींनी ह्या प्रथेला मध्ययुगीन रानटीपणा असे नाव दिले आहे. युरोपात चालू केलेली ही भीषण प्रथा पोर्तुगीजांनी येताना आपल्या सोबत आणली. सहासष्ट गावांचा समूह असलेला सहासष्टी (साष्टी) प्रांत तसेच गोवा, दीव-दमण हे पोर्तुगीज अमलाखालील प्रदेश त्यात भरडून निघाले. पोर्तुगीजांच्या जुलमाच्या कथा ऐकून लोक खचून जात होते. मनात येईल त्यावेळी लोकांना पकडून आणायचे आणि कॅथॉलिक ख्रिश्चन बनण्याची सक्ती करायची आणि विरोध करणाऱ्यांवर पाशवी अत्याचार करायचे हे ठरूनच गेलेले होते. पांढरा झगा घालून तोंडाने कितीही दया, क्षमा, शांती, प्रभूची लेकरे वै. पुटपुटले तरी इतिहासात केलेली काळी, अधम, नीच कृत्ये झाकली जात नाहीत. आज साष्टीतील कॅथॉलिक ख्रिश्चन नागरिकांनी कितीही वेळा पोर्तुगीज अवशेषांची पालखीतून मिरवणूक काढली आणि त्यांचे गोडवे गायले तरी त्याने इतिहासातील कलंक लपला जाणार नाही आहे. साष्टी बेटावर जिथे घरटी एक विहिर परसदारी असायची तिथे विहिरीत पाव टाकल्यामुळे हिंदुंनी किती ख्रिश्चनांना धर्मातून बाहेर काढले त्या विहिरी नेमक्या किती आणि पाशवी छळामुळे, जीवाच्या भीतीने, यमयातना टळाव्यात म्हणून नाईलाजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांचे प्रमाण किती ह्याचे संशोधन व्हायलाच हवे. असो. उत्तर कोकणातील तसेच गोव्यातील जनतेला ह्या नरकातून सोडवण्यासाठी छ. शिवाजी राजांनी आणि छ. संभाजी राजांनी अतोनात प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले. बिचाऱ्या जनतेचे मदतीसाठी टाहो फोडणे चालूच होते. पुढे शाहू राजांनी जुलमी सिद्दी साताला ठार करणाऱ्या भीमपराक्रमी चिमाजी अप्पांवर साष्टी बेटातून पोर्तुगीजांचे अस्तित्व नष्ट करण्याची कामगिरी सोपवली. १७३७ च्या आरंभी चिमाजी अप्पांनी ह्या ऐतिहासिक मोहिमेला सुरवात केली. तेवढ्यात त्यांचे थोरले भाऊ बाजीराव पेशवे ह्यांची भोपाळला निजामाशी जुंपली आणि बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पांना निजामाला दक्षिणेतून कुमक/रसद मिळू नये ह्यासाठी नेमले. मात्र निजाम त्या युद्धात हरल्यावर अजिबात विश्रान्ती न घेता १७३८ साली चिमाजी अप्पांनी पुन्हा वसईकडे आपले लक्ष केंद्रित केले. लढाई असतोल होती. पोर्तुगीज हे सशक्त आरमारी ताकद असलेले, उत्तम दर्जाच्या, पितळ व जस्ताच्या एकसंध तोफांचा ताफा असलेले तसेच शूर आणि धिप्पाड हबशी सैनिक व कुशल गोलंदाज (तोपची) पदरी बाळगून असलेले धनिक राज्यकर्ते होते. ह्या उलट मराठे सततच्या लढायांनी कर्जबाजारी झालेले होते. (लढाया करताना ४६ प्रकारचे बुणगे पदरी असणे आवश्यक असते. उदा. घोड्यांना खरारा करणारे, घोड्यांच्या पार्श्वभागाला तेलाने मालीश करणारे, तलवारीला धार लावणारे इ. ह्या (घरापासून लढाई करण्यासाठी दूर असलेल्या) बुणग्यांचा आणि सैन्याचा पगार वेळेवर होणे सैन्याच्या मनस्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असते. सैन्य हे पोटावरच चालते.) मराठ्यांची जहाजे ही आकाराने छोटी होती. तर पोर्तुगीजांची जहाजे ही अत्याधुनिक तोफांनी युक्त अशी मोठाली तरंगती शहरेच होती.
परत पोर्तुगीजांच्या क्रौर्याचा दरारा इतका की मराठ्यांना मदत करणे म्हणजे स्वतःचा यातनामय मृत्यु स्वतःच लिहिणे. यदाकदाचित् मराठे हे युद्ध हरले असते तर तमाम जनतेला ह्याची किंमत मोजावी लागली असती. मात्र चिमाजी हा कुशल सेनानी आणि रणनीतिज्ञ होता. त्याने जागोजागी बांधलेली पोर्तुगीजांची सशस्त्र ठाणी/छोटे गडकोट लढाई करून ताब्यात घ्यायला सुरूवात केली. पण पोर्तुगीज सुद्धा कसलेले राजकारणी होते. आरमाराच्या मदतीने आपले गेलेले ठाणे ते पुन्हा घेत असत. हा पाठशिवणीचा खेळ चालूच होता. मराठ्यांना कोणतेही ठाणे घेतले तरी सतर्क राहावे लागे. कारण पोर्तुगीज पुन्हा आपले ठाणे परत घेत आणि तोफांनी सुसज्ज करीत. म्हणूनच हे युद्ध दीर्घकाळ चालले. पण चांगली गोष्ट ही की पोर्तुगीज आरमार बुलंद असले तरी मानाजी आंग्रे ह्यांनी अतुलनीय पराक्रम करून, गनिमी काव्याने गोव्यातून त्यांना होणारा सागरी रसद पुरवठा थांबवला. ह्याचवेळी मराठ्यांनी गोव्यात एक आघाडी उघडली. चिमाजीने धुरंधर सेनापती प्रमाणे अनेक खेळ्या करून पद्धतशीर पणे फास आवळत आवळत शेवटी मराठ्यांनी वसई किल्ल्याभोवतीची सारी जमीन जिंकली. मात्र सागरी वर्चस्व केवळ पोर्तुगीज आरमाराचेच होते. वसई किल्ल्याच्या तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला दलदल होती. मराठ्यांना लढाई करता करता दोन वर्षे झाली होती तर वसई किल्ला हा लांब पल्ल्याच्या तोफांनी सुसज्ज, धान्यकोठारांनी परिपूर्ण तसेच हबशी लढवय्यांनी भरलेला होता. त्यातच १७३५ ला स्पेनने पोर्तुगालवर आक्रमण केल्याने ताज्या दमाचे पोर्तुगीज समुद्र मार्गे भारतात आश्रयाला आले होते. आपली ही वसाहत पोर्तुगाल सहजासहजी सोडणार नव्हता. किल्ला ताब्यात राहिला असता तर आसपासची जमीन पुन्हा मिळवता आली असती. आता नाही तर कधीच नाही हे जाणून चिमाजी अप्पा ह्यांनी पुन्हा निकराचे प्रयत्न केले. ते आणि इतर मराठे समोरासमोरील युद्धात प्रवीण होते पण इथे शत्रुच लांब होता. एवढेच नव्हे तर लांब बसून मराठ्यांना खिजवत होता. सागरी मार्गाने पोर्तुगीजांवर आक्रमण म्हणजे आत्महत्याच होती. म्हणून मराठ्यांनी दलदलीच्या मार्गाने आक्रमणे करून पाहिली पण जीवितहानी शिवाय काहीच पदरी पडत नव्हते. मराठ्यांचा धीर आता खचत चालला होता. दोन वर्षे सतत युद्धपरिस्थिती आणि वसईच्या किल्ल्याच्या जवळपास जायची पण शाश्वती नाही. अखेर चिमाजी अप्पांनी इंग्रजांना मदतीला बोलावले. इंग्रजांकडे दलदलीत सुरूंग लावण्याचे तंत्रज्ञान होते. मराठ्यांच्या हस्ते पोर्तुगीजांचा नायनाट होईल, महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर आपले वर्चस्व राहील आणि मराठे मोहिम सोडल्यावर साष्टी बेटावर आपला कब्जा राहील ह्या विचारांनी इंग्रज चिमाजी अप्पांना मदत द्यायला तयार झाले. पण इंग्रज रात्री दलदलीत जे सुरूंग लावायचे ते कधी उडायचेच नाहीत, तर कधी उशीरा उडून मराठेच मरायचे. आत पोर्तुगीज मात्र निवान्त होते. रसद न मिळताही तो अभेद्य किल्ला अजून वर्षभर सहज तगला असता. १७३९ चा एप्रिल उजाडला. युद्ध सुरू होऊन अडीच वर्षे झाली होती. मराठ्यांची बेचैनी वाढू लागली. बरेच जणांना घरी परतायचे वेध लागले होते. आपण आता परत गेलो तर साष्टीकर जनतेचे हाल कुत्रे पण खाणार नाही, त्यांच्या नरक यातनांत वाढ होईल हे चिमाजी अप्पा जाणून होते. अशावेळी एक निपुण सेनानी करेल तेच त्यांनी केले. “तोफेच्या तोंडी मलाच द्या म्हणजे माझे मस्तक तरी वसई किल्लात जाऊन पडेल“असे काळजाला हात घालणारे आवाहन केले. त्यामुळे मराठ्यांच्यात जोश निर्माण झाला. ते सारे मारू किंवा मरू ह्या ध्येयाने दलदलीतून वसई किल्ल्यावर चालून गेले आणि २ मे १७३९ ला पोर्तुगीज आणि मराठ्यांमध्ये समोरासमोरच्या, हातघाईच्या लढाईला प्रारंभ झाला. पण मराठ्यांना स्फुरण इतके चढले होते की दोन दिवसांमध्ये पोर्तुगीज शरण आले आणि वसई किल्ल्यावर भगवा फडकला. मात्र मराठ्यांनी कोणतीही सुडबुद्धि न ठेवता पोर्तुगीजांना बायका-मुलांसह गोव्याला जाऊ दिले. तसेच तेथील चर्चेस ना तसेच बाटलेल्या ख्रिस्ती बांधवांना हात लावला नाही. वसई किल्ल्याच्या पाडावानंतर मराठेशाहीला भरपूर महसूल मिळाला. पेशव्यांनी तो निधी अर्नाळा किल्ला बांधण्यासाठी वापरला. हा अर्नाळा एकच किल्ला असा होता की मराठेशाहीच्या पतनानंतर ही तो किल्ला श्री. माधव बेलोसे ह्या धाडसी किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली इंग्रजांशी लढत राहीला. चिमाजी अप्पांनी सोबतच्या मराठी अधिकाऱ्यांना साष्टी बेटावर ठिकठिकाणी अधिकारपदे दिली आणि ते स्वतः पुन्हा पुण्याकडे गेले. मात्र जाताना पोर्तुगीज ज्या घंटांचा नाद करून धर्मभीरू मंडळींच्या मनात धडकी भरवायचे त्या तीन घंटा मात्र सोबत घेऊन गेले जेणे करून कोणत्याही नागरिकाला पुन्हा कधीही दिवाभीताचे जीवन जगायला लागणार नाही. ह्या महायुद्धातील विजयाने मराठ्यांचे मनोधैर्य उंचावले. त्याचा परिणाम असा झाला की पुढच्याच वर्षी १७४० मध्ये मानाजी आंग्रे ह्या मराठी आरमारप्रमुखाने पोर्तुगीजांची उत्तर कोकण किनाऱ्यावरील बलाढ्य जहाजे बुडवून टाकली आणि महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांवरील पोर्तुगीजांचे नामोनिशान मिटवले. पण दुर्दैवाने सततच्या लढायांमुळे थकलेले, मराठी साम्राज्याचे बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा हे दोन चिरे ऐन तारूण्यात लागोपाठ निखळले (इ.स. १७४० व इ.स. १७४१) आणि गोवा प्रदेश पोर्तुगीजांच्या क्रूर पंजातून सोडवायचा राहीला. असे झाले असते तर इन्क्विझीशन अमलात आणण्यात ज्याची प्रमुख भूमिका होती आणि जो लाखो लोकांच्या वेदनादायी मृत्युस कारणीभूत ठरला त्या फ्रांसिस झेवियरला कधीही संतपद मिळाले नसते. संदर्भ - मराठ्यांचा युद्धेतिहास १६०० - १८१८ ले. ब्रिगेडियर का. ग. पित्रे. (अ.वि.से.प.) श्रीदत्त राऊत - shridattaraut@gmail.com
आणि काही माहिती अंतर्जालावरून साभार.

Saturday 17 August 2013

अश्वारूढ पुतळा

शिवाजी महाराजांचे असंख्य पुतळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही उभारण्यात आले आहेत, त्यामध्ये श्री. विनायक पांडुरंग करमरकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्थान अद्वितीय आहे. त्याविषयी त्यांनी लिहिलेला लेख ‘एका पुतळ्याची जन्मकथा’ हा कलावंताची वेदना आणि कलेच्या निर्मितिचा आनंद ह्यांचा पुरेपुर अनुभव देणारा आहे. सुरूवातीला त्यांनी ह्या अश्वारूढ पुतळ्याचा साडेतीन फूटाचे मॉडेल बनवले. हे मॉडेल करणे अतिशय कठीण असते कारण ते घोड्याच्या तीन नाजूक पायांवरच तोलले जाईल असे बनवावे लागते. शिवाय ते सर्व दृष्टिने परिपूर्ण असावे लागते. कारण त्यावरूनच मोठ्या आकारचे मातीचे मॉडेल तयार होते. पुतळ्याचा घोडा बनवण्यासाठी करमरकरांनी घोड्याचा अभ्यास केला. त्यासाठी स्टुडियोत राजाराममहाराजांचा ‘शाहनवाझ’ नावाचा अरबी घोडा आणून ठेवला. करमरकरांनी शिल्प घडवताना त्या घोड्याची गती, पाय उचलण्याची रीत, तोल सांभाळण्याची तऱ्हा, मानेचा डौल, शेपटीचा डौल इ. गोष्टींचा असा अभ्यास केला की अश्वतज्ज्ञांनीही त्या घोड्याच्या शिल्पाची तारीफ केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणामुळेच आजही हा घोड्याचा पुतळा व त्यावरील शिवाजी महाराज आजही जिवंत वाटतात. छोटे मॉडेल तयार झाल्यावर मोठ्या पुतळ्याची ‘उंची साडेतेरा फूट, लांबी तेरा फूट आणि रूंदी साडेतीन फूट’ ठरवण्यात आली. त्यासाठी मातीचे मॉडेल बनवण्यासाठी चार टन माती आणण्यात आली आणि तीन टनाचा लाकडी सांगाडा तयार करण्यात आला. आता ह्या मातीच्या मॉडेल मध्ये सोळा टनाचा तापलेला कास्याचा रस टाकला जाणार होता. त्या साडेतेरा फूट उंचीच्या पुतळ्याचे एकसंध कास्टींग करण्याचे अशक्य वाटणारे काम करमरकरांनी केवळ स्वीकारलेच नाही तर यशस्वीही करून दाखवले. त्या काळात मॅकेनॉन व मॅकेन्झी कंपनीची माझगाव डॉक फाऊंड्री सर्वांत मोठी होती. त्याचा फोरमन रॉसमिसन हा गोरा साहेब होता. तो त्या मातीच्या पुतळ्याचे मॉडेल पाहून हबकला व म्हणाला, “पुतळा म्हणजे जिवंत कला आहे. ह्या पुतळ्याचे कास्टींग आमच्याच्याने होणार नाही. तुम्हाला त्यासाठी विलायतेलाच गेले पाहिजे”. त्यावर करमरकर आत्मविश्वासाने म्हणाले, “मी हे कास्टींग करू शकतो, इतकेच नव्हे तर एकसंध करू शकतो”. हे ऐकून तो गोरा साहेब काही क्षण करमरकरांकडे आश्चर्यचकित होऊन पाहात राहिला व नंतर त्यांचे दोन्ही हात हातांत घेऊन म्हणाला, “मित्रा तू धाडसी आहेस, मी आणि माझी माणसे तुला हवे ते करायला तयार आहोत. तू फक्त हुकूम कर”. १ जून, १९२८ च्या रात्री सोळा टन धातूचा रस बनवण्यात आला. करमरकर लिहितात, हा दिवस आणि ही रात्र माझ्या जीवनाचे भवितव्य ठरवणार होती. हे भवितव्य पाताळात गाडणार किंवा स्वर्गात नेणार अशा धारेवर मी उभा होतो. रॉसमिसन सुद्धा तणावाखालीच होता. प्रत्यक्ष तो तापलेला रस ओतण्याच्या वेळी तो सर्वांना ओरडून म्हणाला, “करमरकर रस ओता सांगतील व मी रिव्हॉल्व्हरने गोळी हवेत झाडून आवाज करीन. तो आवाज झाल्याबरोबर दोन्ही बाजूंनी रस ओतायला सुरूवात केली पाहिजे. सुरूवात एकाच क्षणाला झाली नाही किंवा रस ओतण्याची धार तुटली तर तुमच्यावर गोळ्या झाडेन व नंतर स्वतःवरही गोळी झाडून घेईन. माझ्याकडे सातबारी पिस्तुल आहे हे लक्षात ठेवा. फाऊंड्रीचे व करमरकरांचे नाव राखा किंवा मरून जा”. हे ऐकून सैनिकांप्रमाणे सर्व कामगार पुतळ्याच्या कामावर तुटून पडले व कास्टींग यशस्वी झाले. हे काम पाहण्यासाठी अनेक युरोपियन स्त्री-पुरूष, मुले तसेच माझगांव गोदीतील सर्व ऑफिसर्स, कर्मचारी जमले होते. क्रेनने जेव्हा तो पुतळा जमिनीवर ठेवला तेव्हा त्याचा धातू चकाकत होता. काही जण तर म्हणाले की घोडा श्वास टाकतो आहे आणि ते आम्हाला ऐकू येत आहेत. _____________________________________________________________________________________ गोऱ्या कातडीचे लांगूलचलन करण्याच्या वृत्ती अनुसार पुतळ्याच्या कामाच्या तपासणीसाठी जे. जे. स्कूलचे तत्कालीन डायरेक्टर कॅप्टन सॉलोमन ह्यांची निवड करण्यात आली. करमरकरांना ते पटले नाही. त्यांनी ह्या गोऱ्या साहेबाला केवळ एकदाच स्टुडियोत येऊ दिले आणि विचारले, “शिवाजी महाराजांचा इतिहास तू वाचून आला आहेस का”? साहेब ‘नाही’ म्हणाला. त्यावर करमरकर म्हणाले, “तू जर इतिहास वाचलेला नसशील तर तुला पॅनेल्स समजणार नाहीत”. हे ऐकून कॅप्टन सॉलोमन व त्याच्यासोबत आलेले चित्रकार धुरंधर हैराण झाले. करमरकरांनी लिहून ठेवले आहे, कलेची बाजू माझी मी पाहून घेण्यास समर्थ होतो. _____________________________________________________________________________________ सौजन्य - हा लेख नित्यनवा कलास्पर्श ह्या मासिकाच्या दिवाळी २०११ च्या अंकातून साभार घेण्यात आला आहे. ह्या लेखातील परिच्छेदांचे मूळ लेखक श्री. सुहास बहुळकर व श्री. विनायक पांडुरंग करमरकर आहेत.

Friday 9 August 2013

ग्राहक राजा

मुंबईत, हॉटेल व्यवसायावर तुळू लोकांचे अतिक्रमण होण्यापूर्वी, मराठी व इराणी उपाहारगृहांमध्ये ग्राहक सन्माननीय असायचा. इराणी उपाहारगृहांमध्ये तर शिरताच क्षणी हा ग्राहक राजा 'बन-मस्का, मसालानी चा, आजनुं छापु अने पंखो फुल (आजचे वर्तमानपत्र आणि पंखा पूर्ण वेगात)' अशी टेचात आज्ञा सोडायचा. असाच एक कोकणी दर्दी, खवैय्या ग्राहक गिरगावातल्या कोनातल्या एका उपाहारगृहात नियमित यायचा. जाताना प्रत्येक खाल्लेल्या पदार्थाचे विना संकोच विश्लेषण करायचा व न चुकता शेवटी एक वाक्य म्हणायचा - तां तुमचा चा काय गरम नवता हां.... ग्राहकाचा संतोष हेच ध्येय मानणाऱ्या त्या उपाहारगृहाच्या मालकाचा चेहरा कोमेजून जायचा. रोज संध्याकाळी कामगारांची हजेरी मांडताना त्या ग्राहकाला चहा आणून देणाऱ्या वाढप्याचे केस व्यवस्थित भादरले जायचे. मग त्या वाढप्याने संबंधित ग्राहकाला सणसणीत गरम चहा मिळावा म्हणून हर प्रकारे प्रयत्न केले. तो बिचारा दर दिवशी चहा कपात ओतल्याक्षणी धावत चहा आणून द्यायला लागला. पण त्याच्या प्रगतिपुस्तकावरील गार चहाचा लाल शेरा काही चुकला नाही. :( नंतर नंतर त्याला लक्षात यायला लागले की त्या मिश्किल ग्राहकाला गरमागरम चहा पिण्यापेक्षा सुद्धा, जाताना चहाविषयी मत व्यक्त केल्यावर त्या मालकाचा कसनुसा होणारा चेहरा पाहण्यात जास्त स्वारस्य आहे. :) एके दिवशी त्या गुणी वाढप्याने त्या ग्राहकाला गरम चहा देण्यापूर्वी त्या पितळी कपाचा कान सणसणीत तापवला (त्याकाळी उपाहारगृहांमध्ये चहासाठी पितळेचे कप ठेवलेले असत). त्यानंतर त्या चोखंदळ ग्राहकाने कधीही चहाच्या तपमानाची चर्चा केली नाही. :P

Monday 15 July 2013

केसांचे चाप

मी सात वर्षांची असताना एकदा मी आईने तिच्या मैत्रिणीला दुसऱ्या दिवशी तिचा तिसावा वाढदिवस असल्याचे सांगताना सहजच ऐकले. ते ऐकून मला दोन गोष्टी जाणवल्या – १) माझ्या आईचा पण वाढदिवस असू शकतो हे मला पूर्वी कधीच कळले नव्हते २) मी तिला कधीही वाढदिवसाची भेट स्वीकारताना पाहिले नव्हते. मी नक्कीच ह्या बाबत काहीतरी करू शकत होते. मी माझ्या खोलीत गेले आणि माझी पेटी उघडली. त्यातले सगळे पैसे काढले. ते तब्बल पाच रुपये होते, माझी पाच आठवड्यांची कमाई. नंतर मी कोपऱ्यावरच्या छोट्या दुकानात गेले आणि भिंगार्डेकाकांना मी आईसाठी काहीतरी वाढदिवसाची भेटवस्तू घेऊ इच्छिते असे सांगितले. त्यांनी पाच रुपयांत येतील अशा अनेक गोष्टी दाखवल्या. सुंदर काचेच्या बशीपासून रंगीत खडूपर्यंत सर्व काही. पण आमचे घर त्या सगळ्या वस्तूंनी भरलेले होते आणि आठवड्यातून एकदा मलाच त्या सगळ्या वस्तूंवर फडका मारावा लागे. तिथे एक खाऊच्या गोळ्यांची डबी पण होती पण आईला गोड खायचे नसल्यामुळे ती डबी भेटवस्तू म्हणून अगदीच अयोग्य होती. शेवटची गोष्ट श्री. भिंगार्डे ह्यांनी मला दाखवली ते होते केस कुरळे करायचे केसांचे चाप. माझ्या आईचे केस हे काळे, घनदाट आणि लांबसडक होते. आठवड्यातून दोनदा ती ते केस धुवायची आणि त्यांना केसाचे चाप लावून ठेवायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ते चाप काढायची आणि तिचे ते लांबसडक केस जेव्हा तिच्या खांद्याभोवती मोकळे सोडायची तेव्हा ती अगदी एखाद्या प्रसिद्ध नटी प्रमाणे देखणी दिसायची. मला वाटले की हे केसांचे चाप तिच्यासाठी उत्कृष्ट अशी वाढदिवसाची भेटवस्तू ठरेल आणि पाच रुपये देऊन मी ते चाप विकत घेतले. मी घरी आल्यावर ते चाप वर्तमानपत्राच्या रविवारच्या रंगीत पुरवणीत काळजीपूर्वक गुंडाळले (जिलेटिन कागद विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसेच उरले नव्हते). दुसऱ्या दिवशी जेव्हा नाश्त्यासाठी घरचे सारे लोक एकत्र जमले तेव्हा मी हळूच आईकडे गेले आणि तिला ती गुंडाळी दिली आणि म्हटले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! " माझी आई क्षणभर सुन्न होऊन बसून राहिली. नंतर ओल्या डोळ्यांनी तिने ती गुंडाळी उघडायला सुरुवात केली. ज्या वेळेपर्यंत तिच्या हातांत ते चाप आले त्यावेळी ती हुंदके देऊन रडत होती. "आई! मला माफ कर, मला तुला रडवायचे नव्हते, मला केवळ तुझा वाढदिवस आनंदी करायचा होता", मी आईची क्षमा मागितली. "अगं छकुले! मी अतिशय आनंदात आहे गं", माझी आई म्हणाली. तिच्या अश्रू भरल्या डोळ्यांत मला आता आनंद दिसत होता. "का माहीत आहे का, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेली पहिलीच वाढदिवसाची भेटवस्तू आहे", ती पुढे म्हणाली. नंतर तिने माझ्या गालांचा पापा घेतला आणि माझे आभार पण मानले. मग तिने माझ्या बहिणीला म्हटले, "हे बघ तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग तिने माझ्या भावाकडे वळून म्हटले, "हे बघ तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग ती माझ्या बाबांना म्हणाली, "हे बघा तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग ती ते चाप लावून आपले केस कुरळे करण्यासाठी केस धुवायला गेली. ती केस धुवायला जाताच माझे बाबा मला म्हणाले, "सोनू मी ज्या कोंकणातल्या एका छोट्या खेड्यात वाढलो तिथे मोठ्या माणसांचे वाढदिवस साजरे करायची पद्धत नव्हती. केवळ लहान मुलांचेच वाढदिवस साजरे केले जात असत. पण तुझ्या आईचे कुटुंब इतके गरीब होते की ते तेव्हढे पण करू शकत नसत. पण आज तू आईला किती आनंदी केले आहेस ते पाहून मला ह्या वाढदिवस प्रकरणाचा पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. म्हणजे मला म्हणायचे आहे की सोनू तू एक नवा पायंडा पाडला आहेस". मग खरोखरच ही एक प्रथाच पडून गेली. त्यानंतर प्रत्येक वर्षी माझ्या आईवर तिच्या वाढदिवसाला भेटवस्तुंचा वर्षावच होऊ लागला, माझ्या बहिणीकडून, भावाकडून, बाबांकडून व माझ्याकडून. अर्थातच आम्ही जसे जसे मोठे होत गेलो तशी तशी आमची कमाई वाढू लागली आणि तिला मिळणाऱ्या भेटवस्तू अधिकाधिक चांगल्या होऊ लागल्या. मी चोविशीची झाल्यावर तिला रेडियो, रंगीत टी. व्ही. आणि एक मायक्रोव्हेव ओव्हन भेट दिला. तिच्या पन्नाशीला आम्ही भावंडांनी आपली सर्व जमापुंजी एकत्र केली आणि तिच्यासाठी वाढदिवसाची भेट म्हणून एक नेत्रदीपक वस्तू आणली, एक रत्नजडित मोत्याचा हार. जेव्हा माझ्या सर्वांत मोठ्या भावाने तिच्यासाठी आयोजित केलेल्या मेजवानीत आलेल्या सर्व पाहुण्यांसमोर तिच्या हातात ती हाराची पेटी दिली तेव्हा तिने ती पेटी उघडून त्या हाराकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि मग ती उघडलेली पेटी सर्वांना दिसेल अशी धरून ती म्हणाली, "आहेत की नाही माझी मुले अनमोल"? मग तिने ती पेटी सर्वांना पाहण्यासाठी म्हणून पुढे सरकवली. तो हार पाहून प्रत्येकाने टाकलेले उसासे ऐकणे खरोखर रोमांचक होते. सर्व पाहुणे गेल्यावर साफसफाई साठी मी मागे राहिले. मी स्वयंपाकघरात भांडी स्वच्छ करताना पुढल्या खोलीत चाललेला आई-बाबांचा संवाद माझ्या कानावर पडला. बाबा म्हणत होते, "प्रमिला! किती गं महागडा हार आहे हा, मला तर वाटते की तुला मिळालेली ही एक सर्वोत्कृष्ट भेटवस्तू आहे". त्यापुढची वाक्ये ऐकताना मला भरून आले. आई आपल्या मृदू आवाजात म्हणाली, "खरोखरच हा महागडा हार सुंदरच आहे आणि दुर्मिळ पण. मात्र मला मिळालेली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट भेटवस्तू आहे, ते केसाचे चाप".
- भावानुवाद - मूळ कथा - – द बॉबी पिन्स – लेखिका - सौ. लिंडा गुडमन.

Thursday 6 June 2013

प्रार्थना

वेदांमध्ये ऋषी काकुळतीने परमेश्वराकडे प्रार्थना करतात -
हे देवा, आम्हाला सुपथावर ठेव, आमच्या सभोवताली शुभदायी वातावरण असू दे, सर्वत्र मांगल्य असू दे, आम्हाला सदैव प्रसन्नचित्त ठेव, आमच्या चित्तांत सुविचार असू देत आणि वाणीत माधुर्य, आम्ही सदा आनंदी आणि आमचे आयुष्य निरामय असू दे, आमचे जीवन सन्मार्गावरून चालू दे.
पण आपण कितीही सद्विचारांचे असलो तरी दुष्टांच्या दुष्कृत्यांची फळे आपल्याला भोगावीच लागतात. कारण विश्वात आपण सारे एकमेकांशी अदृश्य पाशांनी जखडलेले आहोत. कोणीही स्वतंत्र नाही. दुर्जनांच्या कृत्यांचे परिणाम सज्जनांवर होतच राहातात. दुष्ट लोकांचे मन दुर्बळ असते. आपण चुकीचे वागतो आहोत हे त्यांना कळत नाही असे नाही पण चांगले वागण्यासाठी त्यांच्याकडे मनाची सिद्धता नसते. कित्येकदा मनात असूनही ते चांगले वागू शकत नाहीत. स्वतःचा दुबळेपणा जाणून ते इतर दुष्टांशी जवळीक करतात आणि मग त्यांच्या मनाने कितीही चांगले वागायचे ठरवले तरी त्यांचे दुष्ट मित्र त्यांना चांगुलपणापासून दूर ठेवतात आणि ही दुष्टांची मांदियाळी सज्जनांना जीव नकोसा करून सोडते आणि अखेरीस ही दुराचारी मंडळी स्वतःच्या वागण्याने दुर्गतीला जातात. अश्या परिस्थितीत, ऋषींना जाणवते की केवळ आपण सद्वर्तनी असून उपयोगाचे नाही म्हणून ते अग्नीची प्रार्थना करतात आणि म्हणतात -
मा वः एनः अन्यऽकृतं भुजेम । हे अग्ने, दुसऱ्यांनी केलेल्या दुष्कृत्यांची फळे आम्हाला भोगायला न लागोत.

Tuesday 4 June 2013

धनुर्धारी

धनुर्धारी ह्या टोपण नावाने लिहिणाऱ्या कै. श्री. रामचंद्र विनायक टिकेकर ह्यांची ‘वाईकर भटजी’ ही कादंबरी सध्या वाचत आहे. कादंबरी तर सुंदर आहेच पण त्याला श्री. अरूण टिकेकरांनी लिहिलेली प्रस्तावना पण अत्यंत रोचक आहे. प्रस्तावनेत धनुर्धारींच्या लेखनप्रवासाचा सविस्तर वृतान्त दिला आहे. 1880 च्या दशकात लिहिलेल्या धनुर्धारींच्या कादंबऱ्यांमध्ये/लेखांमध्ये पेशवाईच्या अस्तानंतर आलेली इंग्रजी शिक्षणाची लाट, इंग्रजी शिकल्याने नव्या पिढींत हातात खुळखुळणारा पैसा, बिघडलेली कुटुंबव्यवस्था, आमिषे दाखवून तसेच हिंदुधर्मावर टीका करून/दिशाभूल करून केली जाणारी तत्कालीन ख्रिस्ती धर्मांतरे असे शहरी विषय तर आहेतच पण मराठ्यांच्या मर्दुमकी, वीरस्नुषा राधाबाई, उमाबाई दाभाडे, अहिल्याबाई होळकरीण, पानपतचा मोहरा, शूर अबला अश्या ऐतिहासिक कादंबऱ्या/लेख पण आहेत तसेच ‘व्यापारी-वाचन-पाठ’, ‘व्यापारी भूगोल (कमर्शियल जॉग्राफी)’, ‘आमची गळितांची धान्ये/उपाशी महाराष्ट्रास उद्योग’, ‘धावता धोटा’ अशी अर्थशास्त्रावरील पुस्तके पण आहेत. श्री. अरूण टिकेकर लिहितात - धनुर्धारींच्या लेखनात स्वजनोद्धाराची तळमळ दिसून येते. त्यातील वाक्ये आजच्या काळातही प्रत्ययकारी वाटतात –
शेतातील राब, गिरण्यातील मजुरी, बाजारातील हमाली आणि मग कापडाच्या खपाची गिऱ्हाईकी एवढीच कामे महाराष्ट्र या कापसाच्या व्यापारात करत आहे. आमच्या ह्या नीचंतर दैनेचे मुख्य कारण अपरिहार्य अशी परदेशी व्यापारउद्योगांची आम्हाबरोबर लागलेली झटापट आणि त्यांच्याशी सामना देण्याला अवश्य असणाऱ्या साधनांची अननुकूलता हेच होय. ज्ञान आणि उद्योग हे सध्याच्या काळी असेच नव्हे तर सर्वदा कल्पवृक्ष होत. परवशतेला ज्ञान आणि दारिद्र्याला उद्योग अमृतसंजीवनी होय.
तसेच (डॉ. आनंद यादव ह्यांनी पहिली ग्रामीण कादंबरी म्हणून मान दिलेल्या) पिराजी पाटील ह्या 1903 साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या कादंबरीत धनुर्धारी म्हणतात –
महाराष्ट्र देशांत दोन कोटी मनुष्ये आहेत. मराठी भाषा बोलणारे दोन कोटी... उणी अधिक व जवळ जवळ पंचवीस हजार खेडी... गेल्या पाच वर्षांत तीन दुष्काळ कोसळले.. खडतर हाल भोगण्याचा वखत आला आहे! दर शंभर लोकांपैकी नव्वद जण महाराष्ट्रातील खेडेगावांत राहतात. दर शंभर लोकांपैकी ऐंशी पेक्षा जास्त लोक शेतकीवर आपली उपजीविका करून घेत आहेत आणि सध्या या महाराष्ट्रातील यच्चयावत् खेडी मोडकळीस लागली आहेत! महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग धुळीचे दिवे खात उधळत सुटला आहे. त्याची मिराशी जमीन, जिवापेक्षाही प्यार, ती सावकार सारखा बळकावत आहे. त्यांची जनावरे पोटच्या पोरांइतकी लाडकी, ती त्याच्या डोळ्यांदेखत पटापट मरून गेली. सर्व दुःखांची जननी क्षुधा, उपासमार ती त्याला घट्ट मगरमिठी मारून बसली आहे! शेतकरी राष्ट्रांतल्या अन्नाचा पुरवठा करणारा, शेतकरी मिजासी लोकांच्या हौशी पुरवणारा, शेतकरी सरकारचा पाया, शेतकरी राष्ट्राचा आधार, शेतकरी राष्ट्राचा अभिमान, शेतकरी देशाचे सौभाग्य, शेतकरी शहाण्यांचा पोशिंदा आणि तो हा आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी उपासमारीत दिवस काढत आहे...
(मात्र धनुर्धारी केवळ बोरूबहाद्दर नव्हते तर त्यांनी अक्कलकोट संस्थानात शेतकऱ्यांसाठी सिंडीकेट काढली, साधारण 300-400 गायी शेतकऱ्यांत वाटल्या तसेच विणकरांचे धंदे वाचवण्यासाठी सोलापुरात वीव्हर्सगिल्ड स्थापली, धावत्या धोट्याचे माग बनवले आणि जिन्स, बार्शी येथे कापडगिरण्या सुरू केल्या.) तत्कालीन महाराष्ट्रावर छाप पाडणारा हा कार्यकुशल उद्योजक आणि लेखक वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी 1907 मध्ये क्षयाची बाधा होऊन स्वर्गस्थ झाला. धुळीचे दिवे खात जाणें - To beg about in great disgrace and wretchedness. मिराशी - Hereditary.

Thursday 28 March 2013

लबाड सभ्य

सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे. अफझलखानाला पिता मानणारी मंडळी सध्या कृष्णाजी भास्कर ह्या अफझलखानाच्या वकिलावर चिखलफेक करताना आढळतात. ह्यात त्यांनी आनंद मानायला कोणाची हरकत असायला काहीच कारण नाही. कारण कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्वघोषित विद्वज्जनांना महाराजांचे वकील श्री. गोपीनाथपंत बोकील ह्यांचा अनायास विसर पडलेला दिसतो. हे तेच गोपीनाथपंत आहेत जे स्वराज्यावर अफझलखानासारखी विलक्षण धूर्त, कपटी आणि कावेबाज वावटळ आली असताना शिवाजी राजांना ओतप्रोत विश्वासाने म्हणतात, “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ शिवाजीराजे म्हणजे लखलखता हिरा तर त्यांचे सहायक मंत्रीगण म्हणजे जणू सोन्याचे कोंदण. पाहाण्यासारखी गोष्ट आहे की खान राजांच्या मुलुखात आल्यावर साम-दाम-दंड भेदाने राजांची माणसे फोडायचा प्रयत्न करतो. वतनाच्या लोभाने त्याला बळी पडणार्‍यांत मंबाजी भोसले (महाराजांचे चुलत काका), केदारजी व खंडोजी खोपडे, जाधवराव, रविराज ढोणे, शेडगे, धायगुडे, कोकरे, इंगळे, सुलतानजी जगदाळे ह्यांच्यासारखी माणसे आहेत पण गोपीनाथपंत बोकीलांसारखा सामान्य कुलकर्णी मात्र राजांशी एकनिष्ठ राहतो. आज गोपीनाथपंत बोकीलांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही पण सासवड जवळील हिवरे गावाचे जोशी-कुलकर्णीपद ह्यांच्याकडे पूर्वापार चालत आले होते. शिवाय सुपे परगणा आणि कर्यात बारामतिचे देशकुलकर्णी पदाचे वतनही त्यांच्याकडे चालत आलेले असावे. १६४० मध्ये ते पुण्याचे मुजुमदार होते आणि १६५६ पासून राजांचे चिटणीस. ह्या तालेवार, मातब्बर असामीला राजांच्या कुटुंबात एखाद्या ज्येष्ठ माणसाप्रमाणे मान होता. त्यांचा घरोबा होता इतका की सगळे त्यांना काकाच म्हणत, ‘पंताजी काका ह्यांचा मान तो इतका की त्यांनी आऊसाहेबांसोबत सोंगट्या खेळाव्या’ असा त्यांचा उल्लेख आढळतो. राजे पंताना म्हणतात की खानाने बोलणी करताना बेलभंडारा (क्रियाशपथ) मागीतला तरी खुशाल द्यावा. अनमान करू नये. त्या काळात शत्रुचाही ब्राह्मणांच्या सत्यकथनावर विश्वास होता. त्यामुळे शपथेवर खोटे बोलणे पंतांना किती कठीण असेल पण त्यांनी स्वराज्यासाठी तेही केले.खानाने पंताकडून जानव्याची शपथ घेतली. ह्याच कपटी खानाने श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरीरंगन ह्याला तहाच्या मिषे बोलावून त्याचा खून केलेला असतो. त्यामुळे अश्या धूर्त, चाणाक्ष व विजयासाठी कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध न बाळगणार्‍या ह्या खानाला आपल्या वाक्पटुतेने जावळी सारख्या कुबल जागी बोलवून आणणे ही पंतांच्या बुद्धिचातुर्याची कमालच म्हणायला हवी. आपल्याकडे विनोदाने म्हणतात की चीनशी भारताच्या वाटाघाटी म्हणजे वाटा त्यांना आणि घाटा आपल्याला. पण पंत इतकी सावध पण लाघवी बोलणी करतात की खानासारखा कसलेला मुत्सद्दी पण पाघळतो आणि सह्याद्री हे मृत्युमुख आहे हे माहित असताना सुद्धा राजांना अपेक्षित अटींवर जावळीत येतो. हे घडणे केवळ पंतांच्या कौटिल्याचे फळ आहे. पंत खानासोबत केवळ वाटाघाटीच करतात असे नाही तर खानाच्या छावणीत राहून खानाचे विचार, त्याचे सैन्य, प्रमुख सेनानी, सैन्यरचना, अश्वदळ, तोफखाना इ. बित्तंबातमी काढतात. म्हणूनच बाबासाहेब पुरंदरे गोपीनाथपंतांना सभ्य लबाड किंवा लबाड सभ्य म्हणतात, वकील असावा तर असाच. पण पंतांचे हे प्रसंगावधान, ही धूर्तता इथेच संपत नाही. खान व राजांच्या भेटीच्या दिवशी गोपीनाथपंत खानाला आणण्यासाठी खानाच्या छावणीत पोहोचले. पाहातात तो खानाने ठरलेल्या अटींना डावलून १५०० हशम सोबत घेतले होते. सुरूवातीला पंतांनी ह्या सैन्याला हरकत घेतली नाही. मात्र खानाचा हा लवाजमा जनीच्या टेंबाच्या पायथ्याशी “खाड्याच्या खोंडात“ आल्याबरोबर पंत काहीतरी अचानक जाणवल्यागत उभे राहिले आणि बोलले, “इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धास्त खाईल. माघारा गडावरी जाईल. भेटी होणार नाही.... शिवाजी म्हणजे काय? त्यास इतका सामान काय करावा?“ खानाचा आता नाईलाज झाला. ह्या तुकडीचे येणे ठरलेल्या अटींच्या विरूद्ध होते हे खरेच आणि परत भेटीची वेळही पुढे पुढे सरकत होती. अश्या रीतीने पंतांनी खानाच्या खास तुकडीला खानापासून वेगळे केले व अडनिड्या जागी आणून ठेवले. परकी मुलुख आणि जावळीसारखे घनदाट, कीर्र जंगल. खानाच्या हत्येनंतर सर्वप्रथम ही तुकडी विनासायास कापली गेली.
अजून एक अतिशय स्तुत्य गोष्ट म्हणजे वृद्ध पंतांना वारंवार खानाच्या भेटीला जावे लागते. थकलेले, वाकलेले काका प्रतापगड १६ कोस हे अंतर कधी पायी तर कधी पालखीतून तर कधी घोड्यावरून करतात. बरं हा मार्ग तरी साधा, सोपा, सरळ आहे का?... तर नाही.एकतर जावळीचे घनदाट जंगल त्यातून अर्ध्या कोसाचा प्रतापगड उतरायचा, दीड कोसाचा महाबळेश्वराचा डोंगर चढायचा, परत दीड कोसाचा पसरणीचा घाट उतरायचा. हे श्रम विलक्षणच म्हणायला हवेत.
ह्यावरून कळते की अफजलखानाच्या ससैन्य विनाशात पंतांची कामगिरी किती महत्त्वाची आहे आणि हे जाणूनच राजांनी पंतांचा विशेष सत्कार केला. त्यांना एक लक्ष (आकडा पुन्हा वाचावा) होन इनाम दिले. त्यांचे राहते गाव मौजे हिरवे तर इनाम दिलेच पण सोबत शिरवळ परगण्यातील मौजे भोळी व मौजे मांडकी येथे प्रत्येकी १ चावर जमीन इनाम दिली. तसेच त्याच शिरवळ परगण्यातील मौजे घरवाडा व मौजे मांडकी येथे सेटेपणाचे वतन इनाम दिले. खरोखरच माणसे निवडून, वेचून, जोडून त्यांच्याकडून ईश्वरी कार्य घडवावे आणि त्या कार्याची दखल घ्यावी ती जाणत्या शिवाजी राजांनीच. असो. गोपीनाथपंतांच्या उत्तरायुष्याबाबत अधिक माहिती मिळत नाही पण वाईमध्ये सर्वात जुना वाडा गोपीनाथ पंत ह्यांचा आहे अशी माहिती महागणपतिवाई ह्या संकेतस्थळावर मिळते. अर्थातच गोपीनाथपंतांसारख्या अनमोल रत्नावर अजून संशोधन होण्याची आवश्यकता आहे आणि तेही मनात कोणतेही किल्मिष न ठेवता. कारण जोतिबा आपल्या फुले रचनावली २/७७ येथे म्हणतात – हरामखोर गोपीनाथपंतांच्या मदतीने शिवाजीने दगलबाजीने अफजलखानाची हत्या केली. सहाजिकच मनात प्रश्न येतात – १) शिवाजीराजांना “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ असे आत्मविश्वासाने सांगणारे स्वराज्याशी एकनिष्ठ आणि निबिड अरण्यातून १६ कोस अंतर कापून अनेकदा खानाच्या भेटीला जाणारे आणि हिंदवी स्वराज्यासाठी खानाच्या सैन्याविषयी बित्तंबातमी काढणारे गोपीनाथपंत हरामखोर कसे? 2) श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरीरंगन ह्याला आणाशपथा देऊन तहासाठी बोलावून त्याचा खून करणार्‍या अनैतिक, कपटी खानाचा जर शिवाजीराजांनी भेटीला बोलवल्यावर स्वसंरक्षणासाठी जर कोथळा बाहेर काढला तर ती दगलबाजी कशी काय? ३) (प्रेमात आणि) युद्धात सर्व काही क्षम्य असते. मानवाचा वैश्विक स्तरावरील राजकारण व युद्धेतिहास हा धोका, धूर्तता, दगलबाजी, विश्वासघात, गनिमी कावा ह्यांनीच भरलेला आहे. प्रश्न केवळ इतकाच असतो की हे सर्व करणार्‍याचा अंतर्हेतु काय आहे. शिवाजीराजांचे राज्य हे लोककल्याणासाठीच होते हे जोतिबांना ठाऊक नव्हते का? ४) केवळ विशिष्ट जमातीविषयी द्वेष मनात ठेऊन पूर्वग्रहदूषित, एकांगी इतिहासलेखन करणे म्हणजे सत्यशोधन होते का? . . . . संदर्भग्रंथ :– वेध महामानवाचा – लेखक - डॉ. श्रीनिवास सामंत राजा शिवछत्रपति - लेखक – ब. मो. पुरंदरे