माझे वडिल इझ्रायल प्रेमी असल्याकारणाने आमच्या घरात सर्वांत जास्त पुस्तके इझ्रायल, ज्यू, ज्यू तत्वज्ञान, दुसरे महायुद्ध ह्या संदर्भात होती. ना.ह. पालकरांचे "इझ्रायल, छळाकडून बळाकडे" मी अनेकदा वाचले. त्यावेळी मला दोन गोष्टींचा प्रचंड अभिमान वाटत असे - १) जगाच्या पाठीवर भारत हा असा एकच देश आहे जिथे ज्यू धर्मीयांचा केवळ ते ज्यू आहेत ह्या एका गोष्टीमुळे छळ झाला नाही. २) ना.ह. पालकरांच्या लिखाणाची दखल घेऊन त्यांना अभिवादन म्हणून इझ्रायलमध्ये एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले (लक्षात घ्या की इझ्रायल हा एक आकारमानाने महाराष्ट्राच्या १/३ देश आहे).
त्यानंतर वि. ग. कानेटकरांचे "इझ्रायल, युद्ध, युद्ध आणि युद्धच" हे पुस्तक वाचले. इझ्रायल सारखे एक चिमुकले राष्ट्र जन्मल्याक्षणी सहा क्रुर व खुनशी इस्लामी शेजार्यांशी कसा लढा देते व पुढे पण वेळोवेळी अतुट राष्ट्रनिष्ठा, विजिगिषु वृत्ती आणि योग्य राजकीय डावपेच ह्यांच्या जोरावर ते कसे सततच्या लढाया जिंकत जाते ते मूळातूनच वाचण्याजोगे आहे.
मी अनेकदा पाहते की लोक म्हणतात की अमेरिकेचा पाठिंबा होता म्हणून इझ्रायल तगले. पण इझ्रायल जरी अमेरिकेचे सहाय घेत असले तरी ते एक व्यापाराचा भाग म्हणून. त्यात कोणताही मिंधेपणा नाही. अनेकदा इझ्रायलने अमेरिकेला न पटणारे निर्णय घेतलेला आहेत. प्रत्येक इझ्रायली परराष्ट्रमंत्र्याने अमेरिकेला बजावले आहे की इझ्रायलला अमेरिकेची गरज नसून अमेरिकेला शीतयुद्धात मध्यपूर्वेत गैर-इस्लामिक सहयोगी म्हणून इझ्रायलची गरज आहे व अमेरिकेची अर्थव्यवस्था ज्यू धनिकांच्या हातात आहे.
तसेच केवळ अमेरिकेच्या पाठिंब्यावर जर कोणतेही राष्ट्र सशक्त बनू शकते असे जर कोणाला म्हणायचे असेल तर त्यांनी आज पाकिस्तानची अवस्था पाहावी. असो.
पुढे पुढे, इ. ९-१० मध्ये असताना इंग्रजी पुस्तके वाचायची सवय लागली. एनिड ब्लिटन, एरिक क्येस्तनर वैगरेंची पुस्तके वाचता वाचता लिऑन युरिसचा "एक्सोडस" हा पहिलाच मोठा ग्रंथ वाचला. खरेतर ती एक सुरस कादंबरी आहे. मात्र त्यातील प्रसंग हे सत्य घटनेवर आधारित आहेत. कादंबरी वाचत गेले आणि मला तिचे वेडच लागले. तिचे इतके वेळा पारायण केले की कित्येक उतारे तोंडपाठ झाले. सुरवातीला इंग्रजी शब्दांचे अर्थ संदर्भाने कळायचे. मग मी एकदा न कळलेले शब्द लिहून काढायचा व शब्दकोशात त्याचा अर्थ शोधायचा व मग पुन्हा एकदा तो उतारा वाचायचा असे चालू केले. मग ही कादंबरी पुन्हा नवी होऊन समोर आली.
विशेषत: ऑश्विट्झ, ट्रेबलिंका, बिर्केनाऊ वै. ची वर्णने वाचून अंगावर काटा उभा राहिला. युरोप आणि रशियातून ज्यूंचा समूळ नि:पात करायचा ह्या वेड्या विचारांपायी ज्या क्रुरतेने ६० लाख ज्यूंची ह्या छळछावण्यातून निर्मम हत्या करण्यात आली ती वर्णने वाचवत नाहीत. त्यातूनही जे बचावले त्यांची, विशेषत: मुलांची शारीरिक व त्याहीपेक्षा जास्त मानसिक अवस्था पाहून मन विदीर्ण होते.
आज हे सर्व आठवायचे कारण की भारतात सध्या हिस्टरी वाहिनीवर आश्विट्झ विषयी विशेष मालिका चालू आहे. ती पाहिल्यावर मनाला प्रश्न पडतो की कोणाचीही एखाद्या गोष्टीबद्दल, समाजाबद्दल इतकी टोकाची मते कशी काय बनू शकतात? मात्र जर समाजातील काहींची अशी मते बनली तरी त्यांच्या अमानवी आज्ञांचे पालन समाजातील इतर माणसे उदा. आईखमन, डॉ. योसेफ मिंगेल इ. कशी काय करू शकतात?
एखादा डेन्मार्क सारखा देश सोडला तर सरसकट सर्व युरोपीय देश ह्या ज्यूंच्या कत्तलीकडे डोळेझाक करतात किंवा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याकरता स्वत:हून आपल्या देशातील ज्यूंना जर्मनांच्या ताब्यात देतात. जणू काही ज्यूंचे शिरकाण ही त्यांची स्वत:चीच इच्छा जर्मन गेस्टापो पूर्ण करीत असते. उदा. रशियामध्ये अनेक शतके ज्यूंच्या कत्तली (पोग्रोम) उघड चालू होत्या. रस्त्यात चालणार्या एकट्या दुकट्या ज्यूंना ठार मारणे हा काहींचा छंद होता. रशियन सरकारच अश्या गोष्टींना सतत प्रोत्साहन देत असे.
पुढे ऑश्विट्झ सारख्या छळ छावण्या झाल्यावर गाड्या भरभरून ज्यू संपूर्ण युरोप आणि रशियातून आणण्यात आले. फार कमी सहृदय लोकांनी ह्या काळात ज्यूंना आश्रय व रसद दिली. पोलंडसारख्या देशात तर दुसरे महायुद्ध संपल्यावर जे दुर्दैवी ज्यू छळ छावण्यांमधून कसेबसे वाचून परत आपल्या घरी परतायचे ह्या विचारांनी परत येताना दिसले त्यांना पोलिश लोकांनी प्रचंड विरोध केला. हे सर्व समाजशास्त्राच्या दृष्टीने अनाकलनीय आहे.