Tuesday 30 September 2008

उपवास

आज नवरात्राचा पहिला दिवस. आपल्याकडे सण म्हटले की उपास-तापास, व्रत-कैवल्ये यांची रेलचेल असते. पण नव्या शतकात ह्या सर्व धार्मिक रीतींचा नव्याने विचार करायची वेळ आली आहे.

उपास : मूळ शब्द - उप (जवळ) वास (राहणे) म्हणजे (परमेश्वराच्या) जवळ राहणे. पूर्वीच्या काळी लोक उपास करायचे. ह्या उपासाचे स्वरुप मुख्यत: पचायला हलक्या वस्तू उदा. कंद, मुळं खाणे आणि परमेश्वराच्या नाम स्मरणात तल्लीन होणे. असे वागणे जेणे करून आपण जास्तीत जास्त परमेश्वराच्या जवळ राहू. माझी आजी, पणजी ह्या उपासाच्या दिवशी निर्जळा व्रत करीत. उपासाच्या दिवशी काही खाणे तर दूरच त्या पाणी पण पीत नसत. ह्या मुळे दोन गोष्टी साध्य होत असत १) मनाचा निग्रह २) पचन शक्तीला आराम.

हा त्यांचा मनोनिग्रह खरोखरच कमालीचा होता. त्या दोघींचे अख्खे आयुष्य चुली शेजारी गेले होते. उपासाच्या दिवशी सुद्धा त्या इतरांसाठी केळे, शिंगाडे, रताळे ह्यांचे रुचकर पदार्थ बनवित असत. तसेच ह्या निर्जला उपासाची त्यांच्यावर कोणतीही सक्ती नसे.
उलट कुटुंब प्रमुख ह्या नात्याने सर्व कौटुंबिक निर्णय त्या घ्यायच्या. त्यांनी मनांत आणले असते तर चविष्ट पदार्थ खाणे त्यांना सहज जमले असते. दुसरे मी पाहिले आहे की त्यांना ह्या उपासाचे अजिबात कष्ट होत नसत. दिवसभर काम करता करता स्तोत्रे, आर्या म्हणणे चालूच. तेही हसतमुखाने. ओढलेल्या चेहऱ्याने, कष्टी होऊन कधी काम केलेले मी पाहिलेच नाही.

ज्ञानोबा म्हणतात, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या. मी तर म्हणेन, आपल्या वागण्याने दोघीही देवाचिये द्वारी अखंड उभ्या होत्या. बरेच लोक म्हणतील की चूल आणि मुल एव्हढेच विश्व असलेल्या काळात हे कदाचित् शक्य असेल. पण ह्या दोघींच्या बाबतीत अजून ही काही गोष्टी होत्या. दोघींना ही वृत्तपत्र वाचनाची आवड होती. आजुबाजूला घडणाऱ्या घटनांचे, राजकारणाचे अद्ययावत् ज्ञान होते. माझी पणजी तर वेळप्रसंगी नऊवारीला काचा मारून सायकलवरून जाऊन भाजी वै. आणत असे जी १९५५-६० च्या सुमारास मुंबईत नवलाची गोष्ट असे.

मग असे असताना, कोणीही जबरदस्ती केली नसताना कठोर व्रतांची गरजच काय होती? ह्याचे कारण म्हणजे त्यांच्या नजरेत उपास म्हणजे आत्म-संयमन, परमेशाचे चिंतन असे होते. हा असा उपास करताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही ताण, चिडचिड, वैताग, क्लेष दिसत नसे.

हे सर्व आज आठवायचे कारण म्हणजे मी एके ठिकाणी नोकरी करीत होते. तिथे राऊळ नावाचे साहेब होते. ते दर मंगळवारी उपास करतात. उपासाच्या दिवशी साबुदाणा, शेंगदाणे आणि बटाटा ह्या विविध पचायला जड अश्या पदार्थांवर ताव मारतात. मात्र दिवसभर मनात अखंड विष्णुच्या पहिल्या अवताराचे चिंतन करतात. मला म्हणायचे, मासे म्हणजे माझा जीव की प्राण. मला इथून घरी जायला ११, ११. ३० होतात. मग मी बारा वाजण्याची वाट पाहतो. मग मस्तपैकी माश्यांचा आस्वाद घेतो.

मला वाटायचे, हे अश्या प्रकारच्या उपासाचे जोखड फेकून का देत नाहीत? आहारशास्त्र म्हणते, मासे पचायला हलके. मग उपासाच्या दिवशी हा विष्णुचा पहिला अवतार पोटात टाकून देवाचे नाव घेऊन एखादे चांगले काम करायला काय हरकत आहे? केवळ मासेच नव्हे तर साबुदाणा, शेंगदाणे व बटाटा ह्यांचे जू तरी मानेवर बाळगायचे कारणच काय? मुळात कुठल्याही प्राचीन भारतीय धर्म ग्रंथात उपास ही संकल्पना अशी असल्याचे मी तरी अजुनपर्यंत वाचलेले नाही.

शेवटी सर्व ग्रंथ एकच सांगतात, चांगले वागा व आपले काम निष्ठेने करा. (नियतं कुरू कर्मं त्वम् । गीता ३-८)

साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाणे इच्छा होईल तेव्हा खा. मात्र त्यांना उपासाच्या नावाखाली खाऊ नका. वैतागाने, नाईलाजाने केलेला तो उपवास नक्कीच नव्हे. अश्याने धार्मिकच काय पण शारीरिक वा मानसिक दृष्टीने पण काहीही लाभ होणार नाही.

(क्रमश:)

No comments:

Post a Comment