Sunday, 28 September 2008

माऊचे बारसे




आमच्याकडे फार पूर्वी एक कुत्रा होता. तो दिसायला उग्र होता. मराठीप्रेमापोटी त्याचे नाव टॉम्या, टायगर वै. असे विदेशी न ठेवता त्याला वाघ्या हे अस्सल मराठी नाव ठेवले. ह्या वाघ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अनोळखी माणूस दिसला की भलताच प्रेमात यायचा. शेपुट पायात घालून प्रेमाने त्या माणसाला चाटायचा. एकुणच नाव सोनुबाई असा प्रकार होता. हा आमचा वाघ्या पूर्णपणे अहिंसक होता.

६ महिन्यापूर्वी मी एक मांजराचे पिल्लू रस्त्यावरून उचलून आणले. मागील अनुभव गाठीशी असल्याने जाणीवपूर्वक नाव न ठेवायचे ठरवले. आणले तेव्हा ते अतिशय दुबळे, अशक्त व काळवंडलेले होते. त्याच्या दुबळेपणाकडे पाहून पहिले २-३ दिवस त्याला अंघोळ घालायचा धीर होईना कारण कोणीतरी म्हणाले होते की मांजरांना अंघोळ सहन होतेच असे नाही. त्यावेळी मी त्याला प्रेमाने कालुंद्री, डुक्लीन असे म्हणत असे. ४-५ दिवसांनी त्याला कोमट पाण्याने अंघोळ घातली, स्वच्छ खसाखसा पुसले आणि कापसाने त्याच्या कानातला मळ सुद्धा हळूवार काढला. मग कायापालटच झाल्यासारखे ते मांजरू छान दिसायला लागले. मग मी त्याचे नाव शुंदडी ठेवले. हळू हळू ते पिल्लू आमच्याकडे रुळले.

पहिले ५-६ दिवस केवळ दुधावर ठेवले. कारण पोळीचे तुकडे आणि भात ते खात नसे. पण १-२ दा लक्षात आले की ते पिल्लू पातळ प्लॅस्टिक आणि रबरबँड खाते. आता आली का पंचाईत. [मुंबईत लोकं अन्न प्लॅस्टिक पिशवीत बांधून उकिरड्यावर टाकतात आणि कळत नकळत त्या अन्नाबरोबर प्लॅस्टिकसुद्धा उकिरड्यावर राहणाऱ्या प्राण्यांच्या पोटात जाते (मध्यंतरी एका मरणासन्न गायीच्या पोटातून न पचलेले ५ किलो प्लॅस्टिक काढल्याचा स्लाईड शो मी पाहिला होता)].

आमच्या मांजराला तर त्याचीच चटक लागली होती. आता काय करायचे? काळजी वाटायला लागली. जालावर व इतर सर्वत्र शोधाशोध केली पण हा प्रकार जरा नवीन होता. निश्चित उपाय मिळेना. कितीही काळजी घेतली आणि काहीही चांगले चुंगले खायला दिले तरी हे माऊ सांदी कपाटीतून पातळ प्लॅस्टिक व रबरबँड शोधून काढून खायचे आणि ह्या अभक्ष्य भक्षणाचे परिणाम लवकरच दिसायला लागले.

आधीच दुबळेपणा त्यात हे असे प्लॅस्टिक व रबर खाणे. त्याने हळू हळू त्याचे एका बाजूचे केस झडायला लागले, डोळ्यातून घाण यायला लागली, तोंडाला बुरशी आली, पोट फुगले, पाय फेंगाडत चालायला लागले. मग त्याला बैल घोडा रुग्णालयात नेले. तिथल्या डॉक्टरांनी वेगवेगळी औषधे लिहून दिली.

पण ह्या सर्व औषधांचा परिणाम दिसायला १-२ महिने जावे लागले. हळू हळू ते चांगले दिसू लागले. पण अनुभवी लोकं म्हणू लागली, मांजराला नॉन-व्हेज हवेच.

मग त्याच्यासाठी उकडलेले अंडे आणायला लागलो. त्याला पण आता चांगले अन्न खायची सवय लागली होती. मधल्या काळात माझ्या मित्र मैत्रिणींनी त्याचे नाव टकलू आणि फेंगाडू ठेवले होते. ते जाऊन परत त्याला सर्व लोक शुंदडी म्हणायला लागले. एकंदरीत माझे माऊ आता छान व्हायला लागले होते. अंगावर सोनेरी लव आली.

पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कालांतराने लक्षात आले की ते माऊ मागील पाय ओढत चालत आहे आणि त्याने उडी मारणेच सोडून दिले आहे. तसेच जेव्हा ते नखे बाहेर काढी तेव्हा ती त्याला आत घेता येत नसत. नखे सतत चादरी, कपडे ह्यात रुतून बसत. तसे मी स्वत: डॉक्टर व औषधे ह्याच्या विरुद्ध आहे. आजारी पडले तर आपोआप, नैसर्गिक रीत्या किंवा घरगुती औषधांनी तो कसा बरा होईल ह्यावर माझा जास्त भर असतो. पण मांजराच्या बाबतीत हा धोका पत्करायचा नाही असे मी ठरवले होते. म्हणून तातडीने त्याला टोपलीत घालून परत दवाखान्यात नेले. तिथल्या डॉक्टरांनी त्याला तपासले व जाहिर केले की त्याला "तात्पुरता पक्षाघात" झाला आहे.

गंमत म्हणजे केस पेपर भरायची वेळ आली, डॉक्टरांनी विचारले काय नाव आहे मांजराचे आणि माझी पंचाईत झाली. आता काय सांगायचे बरे? आयत्या वेळी चांगले नावही सुचेना. डॉक्टर मग आपुलकीच्या स्वरात म्हणाले, मांजराचा मान राखावा, त्याला ‘मीनू’ म्हणत जा.

असो. आता परत गोळ्या, औषधे चालू झाली होती. मात्र आता हे माऊ बरेच मोठे झाले होते. गोळ्या घ्यायला त्याला अजिबात आवडायचे नाही. तीक्ष्ण घ्राणेंद्रियामुळे गोळ्या काढल्या की त्याला लगेच वास यायचा. जवळ गेले की दात आवळून घ्यायचे. नखं मारायचे (म्हणून मी त्याला भुसनळी, चामुंडेश्वरी म्हणायचे). पण तरीही मी नेटाने औषधे देत राहिले.

आता हे मांजर छान झाले आहे. तब्येत खणखणीत झाली आहे. अंगावरची सोनेरी लव परत आली आहे. रोज १ अंडे, दुध, बिस्किटे, १ उकडलेला बटाटा असे काय काय खाते. मुख्य म्हणजे आता माकडासारख्या इकडून तिकडे उड्या मारते.

अधून मधून प्लस्टिक खाण्याचा प्रयत्न करते पण "माकलू हुं, कोण प्लॅस्टिक खातयं, फटके हवे का?" असे दरडावले की गुपचुप प्लॅस्टिकपासून लांब जाते. हे म्हणजे लहान मुलासारखे आहे, पालक ओरडतात म्हटल्यावर तिच गोष्ट हिरीरीने करायची.
पण शेवटी प्लॅस्टिक हानिकारक आहे हे त्याला त्याच्या भाषेत समजावणार तरी कसे?

पण चांगली गोष्ट म्हणजे आता त्याला अन्न खायला आवडू लागले आहे. ये, हे घे म्हटले की असेल तिथून धावत येते (मात्र नुसते ये म्हटले की ढुंकूनही पाहात नाही). थोडक्यात काय तर मांजराला नावाची गरज नसते. 'सोयरा' मध्ये म्हटल्याप्रमाणे
प्राण्यांना फक्त नाद कळतो.

आज जेव्हा मी जालावर मांजराच्या नावासाठीची संस्थळे बघते तेव्हा मला वाटते की मांजराला नावाची गरजच काय? आणि मांजराचे बारसे करणारे आपण कोण? शांताबाई म्हणतात त्याप्रमाणे, आपण मांजर पाळत नसतो तर ते आपल्याला पाळत असते.

1 comment:

  1. Hoy, tu khare mhantes.
    Mi sudha ek manjar aaplese kele hote aani nantar mala tyachi etki odh lagali hoti ki tyachyasivay jevan sudha jevat nase.

    Kharech mansani naati banavali phakta navalach aani tya natyana aapan barase karun nave thevatat.

    Konatyahi natyana sabdanchi nahi tar tya sabdat daadalelya bhavananchi khari janiv aasavi lagate ho na!

    ReplyDelete