वाचले, थोड्याच वेळात सह्याद्री वाहिनी विकली.
मी म्हणते, थोड्याच वेळात विकायचे कारण काय? निविदा वगैरे काढून सावकाश विकावी.
मी ह्या बाबत बरेच जणांशी बोलले. त्यातल्या अनेकांचे म्हणणे असे की हा विकली शब्द साप्ताहिकी अश्या अर्थाने असला पाहिजे. असे असेल
तर सह्याद्री वाहिनीला साप्ताहिकी हा सुंदर शब्द सोडून विकली हा शब्द का घ्यावासा वाटला आणि जर तो अट्टहासाने घेतलाच तर निदान तो
वीकली असा तरी लिहायला हवा होता ना? शेवटी ऱ्हस्व दीर्घ ह्यांच्या चुका करण्याची जबाबदारी ई टीव्ही, महाराष्ट्र टाईम्स अश्या प्रसार
माध्यमांची आहे. सह्याद्रीला व्याकरण चुकांचे हक्क दिले कोणी?
माझे एक स्नेही व निवृत्त इंग्रजी शिक्षक म्हणतात, म. टा. वाचताना त्यातील ऱ्हस्व दीर्घाच्या आणि इतर शाब्दिक चुका पाहून अंगावरून
झुरळ गेल्यासारखे वाटते.
असे असताना सह्याद्री वाहिनीने म. टा., ई. टीव्ही इ. शी स्पर्धा करायचे कारणच काय? हा तर तोंडचा घासच काढून घेतल्यासारखा नाही का?
मला तरी आता ह्या सर्वांवर एकच इलाज दिसतो, मराठीमध्ये सर्व व्याकरण नियम रद्द करणे. ज्याने ज्याला पाहिजे तशी मराठी लिहिणे. म्हणजे गैरसमजाला जागाच उरणार नाही. ई.टीव्ही वरील चलपट्ट्या (टीकर) पाहताना शहारे येणार नाहीत.
No comments:
Post a Comment