Sunday, 28 September 2008

पोह्यांचे दोन झटपट प्रकार

जिन्नस -
हिंग, साखर, मीठ
जाड पोहे
हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
तुपाची बेरी
दाण्याचे कुट
पातळ पोहे
ओले खोबरे
मार्गदर्शन


१) आयत्यावेळी नारळ खवणावा. कोथिंबीर बारीक चिरावी. जाड पोहे भाजून घ्यावेत. ते वेगळे ठेवावेत. पोहे निवेपर्यंत १ -२ कमी
तिखट हिरव्या मिरच्या विस्तवावर चांगल्या भाजून घ्याव्यात. मात्र पूर्ण काळ्या करू नयेत. कात्रीने त्यांचे बारीक तुकडे करावेत. आता निवलेले पोहे घेऊन त्यात हिंग, साखर, मीठ चवीप्रमाणे घालून ते नीट मिसळून घ्यावे.

त्यात भरपूर ओले खोबरे घालून पोहे थोडे अरमळावेत (कुस्करावेत). वर मिरचीचे तुकडे घालावेत आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
पेरावी. प्रत्येक घासात निदान एक मिरचीचा तुकडा येईल अश्या रीतीने हे पोहे खावेत.

२) चांगल्या तुपाची खरपूस चॉकलेटी अशी बेरी असेल तर ती खरवडून एका तसराळ्यात काढावी. पातळ पोहे नीट भाजून घ्यावेत. वेगळे ठेवावेत. वर सांगितल्याप्रमाणे मिरची आचेवर भाजून घ्यावी आणि कात्रीने तिचे बारीक तुकडे करावेत. त्या तुकड्यात
चवीप्रमाणे हिंग, मीठ, साखर, दाण्याचे कुट घालून सर्व नीट एकत्र करून घ्यावे. मग तसराळ्यातील बेरी, निवलेले पातळ पोहे व
हे मिश्रण हलक्या हाताने एकत्र मिसळावे व खावेत. ह्यात कोथिंबीर आणि खोबरे घातलेच पाहिजेत असे नाही.
पण चवीसाठी घालायला हरकत नाही.

टीपा
मिरची भाजताना नीट सर्व बाजुंनी भाजली गेली पाहिजे आणि कधी कधी आच लागताच मिरची फुटते. म्हणून ती चिमट्यात पकडून
भाजावी. ही भाजलेली मिरची सुरीने कापणे त्रासदायक असते म्हणून कात्रीने कापावी. भाजलेले पोहे नेहेमी इतर गोष्टींबरोबर
आयत्यावेळी एकत्र करावेत (नाहीतर ते चांबट होतात) आणि लगेच खावेत.

No comments:

Post a Comment