Friday 20 August 2010

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ४)

मुराचे पुष्कळ लोक धान्याची पोती घेऊन दूर गेले होते आणि निवडक लोकांनिशी मुरा त्या वेढ्यात अडकून पडला होता. गावकर्‍यांनी पांद रोखल्याचे लक्षात येताच बळी धावत येऊन म्हणाला, "मुरा, गावकर्‍यांनी पांद आडवली, आता?" क्षणभर विचार करून मुरा म्हणाला,"दावण कापून सारी गुरं पांदीत घाला आणि मागनं गोफणीने जोडून वाट काढीत चला."

बळीने दावण कापली. सर्व गुरे पांदीत लोटून मागे दंगल उडवून दिली. वर शेपट्या करून गुरे पांदीने पळू लागताच त्या भयंकर दंगलीने गावकर्‍यांची भंबेरी उडाली. त्यांनी पळ काढला. गुरांचा गळा मोकळा करून मुराने स्वत:चा गळा सोडवून घेतला.

पहाट झाली होती. उषा हर्षभरित होऊन वर येत होती. कितीतरी दिवसानी आनंद त्या निवडुंगात परत आला होता. मशालीच्या प्रकाशात मुराच्या दारात दाणे वाटण्याचे काम चालू होते. पाट्या, बुट्ट्या, शिवडी घेतलेले लोक रांगेने बसले होते. त्यांच्या भकास चेहर्‍यांवर आनंदाच्या छटा उमटल्या होत्या. धान्याचा ढीग पाहूनच त्यांची तहानभूक हरपली होती. मोडून पडलेल्या मानवाला अन्नातील किमया हसवीत होती.

धान्य वाटून झाले. एक लहानसा ढीग शिल्लक राहिला. तो मापाने मोजता येण्यासारखा नव्हता. तेव्हा बळीने मुराला विचारले, " दाणं कसं मोजावं?" त्यावर मुरा विचार करून म्हणाला, "डाव घेऊन डावीने बराबर वाटा, एक दाणा एका माणसाला एक दिवस जगवील हे विसरू नका."

सूर्योदयाच्या आत वाटण्या झाल्या. कित्येक दिवसांची निश्चल जाती घरघरली, थंड चुलींना उबारा आला, तव्यांना झळा लागल्या. घराघरावर धूर घोटाळत फिरू लागला आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांत दारात बसून पोरे ऊन ऊन भाकरी खाऊ लागली.


तिसर्‍या दिवशी चावडी पुढे बुच्याड लागले. सातार्‍याहून प्रांतसाहेब आले. कैक फौजदार धावपळ करू लागले. पोलिसांनी वेशी दाबून ठेवल्या आणि मुराला अटक झाली. चावडीपुढे तर रीघ लागली होती. त्या गर्दीत तो मालेवाडीचा मठकरी मिरवत होता.


मुराच्या अटकेची बातमी बातमी ऐकून विष्णुपंत धावतच आले. लोकांनी मागे सरून त्यांना वाट दिली; परन्तु पंत चावडीची पायरी चढले नाहीत. ते दारात उभे राहूनच बोलले, "साहेब, काय आरंभले आहे हे?"


"आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे," प्रांतसाहेब ओट्यावरून उत्तरले.


"आम्ही या गावचे सरकारी नोकर आहोत हे मान्य आहे का आपणांला?" पंतांनी सहज प्रश्न केला.


"हो खरं आहे ते." प्रांत उत्तरला.


"मग आम्हाला न विचारता ही धरपकड का?" पंतांनी गाव-कामगाराचा नियम पुढे केला. त्यांचा स्वर किंचित चढला होता.


परन्तु प्रांतसाहेब चिडक्या आवाजात उत्तरले, "तसा आम्हाला अधिकार आहे आणि यांनी तर या मालेवाडीच्या मठकर्‍यांना लुटलं आहे."


"पुरावा काय?" पंतांनी चढत्या स्वरात पुराव्याची मागणी केली आणि कमरेवर हात ठेवून प्रांतसाहेब शांतपणे म्हणाले, "मठकर्‍यांच्या धान्याचा माग या गावच्या सीमेला भिडला असून या लोकांच्या घरात भाकरी सापडली आहे."


पण विष्णुपंत खवळून गरजले, "मग मला का नाही अटक करीत? तो माग माझ्याच गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला भाकरी सापडेल."

(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ४)

No comments:

Post a Comment