Friday, 20 August 2010

खाद्यविवेक

माझ्या एका मावशीला वाटते की तिने अभिमन्युप्रमाणे गर्भावस्थेतच वैद्यकशास्राचे ज्ञान घेतलेले आहे. वेगवेगळी वैद्यकशास्राची पुस्तके वाचणे आणि सतत आहार बदल आणि निरनिराळी औषधे घेणे तसेच लोकांना मोफत वैद्यकीय सल्ले देणे ह्या गोष्टी ती इमाने इतबारे करीत असते. काही वर्षापूर्वी तिला किरकोळ सांधेदुखी चालू झाली. ती बरी होईना. शेवटी तिने नाईलाजाने एका वैद्यांचा सल्ला घ्यायचे ठरवले.

वैद्यांकडे गेल्यावर तिने तिची अद्भूत वैद्यकज्ञानाची पोतडी उघडली. वैद्यांनी शांतपणे तिचे सर्व प्रवचन ऐकून घेतले आणि मृदू आवाजात विचारले, तुम्ही तेल आणि तुप किती खाता?

त्यावर तिने आपण पाण्यात कशी कणीक भिजवतो आणि भाज्या कश्या बिनतेलाच्या करतो हे अभिमानाने सांगितले. तुप खाणे तर तिने केव्हाच सोडून दिले होते. त्यावर त्या वैद्यांनी तिला एकच सल्ला दिला. चौरस आहाराचा भाग म्हणून तेल, तूप खात जा आणि जे सांधे दुखतात त्याना हळुवारपणे तीळाचे तेल चोळत जा. काही महिन्यातच तिची सांधेदुखी थांबली. तेल, तुप ह्या इंधनांनी आपले काम चोख बजावले होते. ही सत्यघटना आहे.

त्यानंतर तिने कणीक भिजवताना गोडे तेल, तीळाचे तेल, एरंडेल, सूर्यफुलाचे तेल, मेथीचे तेल एकत्र घालायला सुरवात केली.

आज बऱ्याच वर्षांनी ही गोष्ट आठवायचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात आमचे कुटुंब वैद्य श्री. शेंडे मला सहज म्हणाले, तेलकट खा, तुपकट खा पण तळकट खाऊ नकोस.

त्यांच्या म्हणण्यानुसार पोळी, भाजी, आमटी ह्यात आवश्यक तेव्हढे तेल, तूप नक्की खावे. तसेच चटणीबरोबर कच्चे तेल घेण्याची पद्धत आहे ती पण योग्यच आहे. मात्र तळकट पदार्थ उदा. वडे, भजी इ. जमेल तितके टाळावेत. कारण वडे, भजी वैगरे करताना एकच तेल वारंवार तापवतात, त्याला धूर येतो.

घराबाहेर उपाहारगृह, फेरीवाले यांच्याकडे खाताना सुद्धा शक्यतो मिसळ, पाणीपुरी, भेळपुरी, टोस्टेड सँडविच इ. इ. खावे. याला अनेक कारणे आहेत. १) मुगाच्या पाणीपुरीत मोड आलेले कडधान्य, पुदिना, सैधव मीठ, कोथिंबीर इ. असते. पांढऱ्या वाटाण्याच्या पाणीपुरीपेक्षा मुगाची पाणीपुरी मागवावी. २) मिसळीत तर अनेक मोड आलेली कडधान्ये असतात. ३) साध्या सँडविचपेक्षा टोस्टेड सँडविच चांगले तरी शक्यतो पाव टाळलेलाच बरा. ४) ऐकिव माहिती अशी आहे की अनेक महागडे फरसाणवाले आपले फरसाण एका तेलातून काढतात आणि नंतर ते तेल वडेवाले विकत घेतात. ५) अनेकदा गरम केलेले तेल शरीराला घातक.

माझ्या ओळखीतील एकजण महिन्यातून एकदा रत्नागिरीहून मुंबईला येतात. येताना रत्नागिरी रेलस्थानकावरील एका ठेल्यावर पाव, बटर विकत घेतात आणि ओळखीमुळे तो ठेलावाला त्यांना वड्याची चटणी मोफत देतो. मग हे प्रवासात बटर, चटणी, पाव खातात आणि जोडीला कोकण रेल्वेतील चविष्ट टॉमॅटो सूप पितात.

ह्याचा अर्थ वडे, भजी खाऊच नयेत असे नाही पण प्रमाण कमी करावे किंवा हे पदार्थ घरी करून खावेत. कारण वडे, भजींचा जो मोह टाळतो त्याला जितेंद्रियच म्हणावे लागेल. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचे ते कामच नव्हे.

पण निदान पावसाळ्यात तरी बाहेरचे वडे आणि भजी ह्यांचे प्रमाण कमी करणे सहज शक्य आहे. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे भजी घरी करून खावीत म्हणजे वांग्याची, पालकाची, पनीरची, शिराळ्याची, दुधीची, चुक्याची आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे शिळ्या, उरलेल्या भाजीची भजी असे त्यात वैविध्य आणता येते.

बाहेर मिळणार आहेत का अशी छान छान भजी?

Original post: खाद्यविवेक

No comments:

Post a Comment