Sunday, 1 December 2013

विहिरीत पाव

चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३९ साली उत्तर कोकणातून धर्मांध आणि क्रूर पोर्तुगीजांची कायमची हकालपट्टी केली आणि तेथील जनतेला दोनशे वर्षापासून चालत आलेल्या ‘इनक्विझीशन’ नावाच्या सैतानी वरवंट्यातून सुटका केली. इनक्विझीशन म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माला अनुसरण्यास नकार देणाऱ्या माणसांची प्रथम चाप लावून नखे खेचून काढणे, जीभ कापणे, यंत्राने हाडे चुरणे, शरीर सोलणे अश्या शारीरिक छळांपासून सुरूवात करून त्याचा शेवट तेलात भिजवलेली गोणती अंगावर घालून माध्यान्हीच्या भर उन्हात सार्वजनिक स्थळी जिवंत जाळण्यात होत असे. साने गुरूजींनी ह्या प्रथेला मध्ययुगीन रानटीपणा असे नाव दिले आहे.
युरोपात चालू केलेली ही भीषण प्रथा पोर्तुगीजांनी येताना आपल्या सोबत आणली. सहासष्ट गावांचा समूह असलेला सहासष्टी (साष्टी) प्रांत तसेच गोवा, दीव-दमण हे पोर्तुगीज अमलाखालील प्रदेश त्यात भरडून निघाले. पोर्तुगीजांच्या जुलमाच्या कथा ऐकून लोक खचून जात होते. मनात येईल त्यावेळी लोकांना पकडून आणायचे आणि कॅथॉलिक ख्रिश्चन बनण्याची सक्ती करायची आणि विरोध करणाऱ्यांवर पाशवी अत्याचार करायचे हे ठरूनच गेलेले होते. असे असताना प्राणभयाने ख्रिस्ती होणारे किती आणि विहिरीत पाव टाकल्याने ख्रिस्ती झालेले किती हे संशोधन करायची वेळ आली आहे. माझ्या स्वतःच्या मते पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने हिंदुंनी धर्माबाहेर काढले ही सांगोवानगीची गोष्ट आहे. एकतर मैद्याचा पाव म्हणजे गोमांस नव्हे. तसेच कोकण, गोवा ह्यां सारख्या प्रांतांमध्ये जिथे घरटी एक विहिर होती तिथे नक्की किती विहिरींमध्ये पोर्तुगीज लोक पाव टाकत बसले असतील ते कळायला मार्ग नाही. एक गाव एक पाणवठा अशी स्थिती असती तर आपण म्हणू शकलो असतो की विहिरींत पाव टाकल्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. असे घडलेच नसेल असे नाही पण त्याचे प्रमाण किती हे तपासायला हवे. कारण सैतानी पोर्तुगीज अत्याचारांना धीराने तोंड देणारी आणि तरीही जमेल तसा आपला धर्म शिल्लक ठेवणारी हिंदु जनता मैद्याचा पाव खाल्ल्याने कोणाला धर्माबाहेर काढेल हे जरा कठीणच वाटते. एकुणात विहिरीत पाव टाकल्याने बाटणे ही दुर्मिळ घटना असावी. हिंदुंनी धर्म न सोडण्यासाठी जे हाल सोसले ते पाहता ही अफवाच जास्त वाटते. केतकर ज्ञानकोश लिहितो - एखाद्या विहिरीत पावाचा तुकडा टाकून सबंध गावचा गांव बाटवीत असे “म्हणतात”. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानकोशही असे काही घडले आहे असे छातीठोकपणे म्हणत नाही. आज हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे सध्या गोवा आणि उत्तर कोकणात काही धर्मांतरित ख्रिस्ती लोकांमध्ये पोर्तुगीजांविषयी प्रेम उचंबळून आले आहे. त्यांनी इतिहासाचे सोयीस्कर पुनर्कथन चालू केले आहे. त्यांच्या दृष्टिने धर्मभीरू पोर्तुगीज हे प्रेमळ आणि वत्सल होते आणि त्यांचे झालेले धर्मांतर (पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने) हिंदुंनी धर्माबाहेर काढल्याने नाईलाजास्तव झालेले धर्मांतर आहे. पोर्तुगीजांचा ख्रिस्ती धर्म म्हणजे दया, क्षमा, शांती, करूणा ह्यांचे प्रतीक आहे.
अवांतर – ह्या नव्याने उत्पन्न झालेल्या पोर्तुगीज प्रेमाची एकच कथा सांगते - मध्यंतरी वसई किल्ला परिसरात एक मोठ्या आकाराची मानवी कवटी सापडली. त्या कवटीचे कार्बन डेटिंग न करता काही पाद्री मंडळींनी तिची पालखीतून मिरवणूक काढली आणि सर्वांना सांगत सुटले की बघा पोर्तुगीज लोक कसे शरीराने धिप्पाड होते, (अंगाने किरकोळ असलेले) मराठे ह्यांना हरवणे शक्यच नाही. ती पालखी जेव्हा वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिराबाहेर ठेवली गेली तेव्हा नागेश्वर मंदिराचे पुजारी ती पाहायला गेले. त्यावेळी त्यांना तीच कथा ऐकवली गेली. त्यावर त्या मंदिराचे पुजारी म्हणाले की ही कवटी पोर्तुगीजांची असेल ही पण मी ते मनगट शोधतो आहे ज्याने ही कवटी धडावेगळी केली. त्यानंतर त्या पाद्री लोकांनी पुन्हा कधी त्या कवटीचा पालखीत घालून प्रचार केला नाही.
असो. मी माझ्या अनेक इतिहासप्रेमी मित्रांना त्याकाळच्या मोडी तसेच उर्दू कागदपत्रांत ‘विहिरीत पाव‘ नावाच्या दंतकथेविषयी काही उल्लेख मिळतो का ते पाहायला सांगितले आहेच. पण आपणापैकी कोणास असा लिखित पुरावा माहित असल्यास कृपया विनाविलंब त्याविषयी इथे सांगावे ही विनंती.

Thursday, 14 November 2013

एक महायुद्ध

सध्या चेन्नई मध्ये जागतिक बुद्धिबळ स्पर्धा चालू आहे. तासंतास चालणाऱ्या त्या लढती केवळ पाहाणे हे पण अतिशय संयमाचे काम आहे. जणू धैर्याची परीक्षाच. असे असताना खेळाडूंनी तर ह्या लढतीसाठी किती परिश्रम घेतले असतील त्यांचे त्यांनाच ठाऊक.
अशीच एक प्रचंड मोठी लढत मराठेशाहीने दिली. त्या लढतीला 'वसईचा लढा' म्हणण्यापेक्षा मी त्या एक महायुद्धच म्हणेन. साष्टी बेटाला पोर्तुगीजांच्या अघोरी धार्मिक उन्मादातून सोडवण्यासाठी सुमारे तीन वर्ष घरापासून दूर राहून, अत्यंत असमतोल शस्त्रसज्जता असताना लहान-मोठे ११४ गडकोट जिंकून, तसेच अभेद्य वसईचा किल्ला जिंकण्यासाठी पराक्रमाची शर्थ करून चिमाजी अप्पांच्या कुशल नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गणपतराव मेहेंदळे, रामचंद्र पटवर्धन, बापूजी भिवराव, विठोजी कदम, जिवाजीराव विचारे, गंगोजी नाईक शंकराजी केशव, अणजूरकर मंडळी आदींचा समावेश असलेल्या पराक्रमी मराठी सैन्याने अखेर उत्तर कोकणातून धर्मांध आणि क्रूर पोर्तुगीजांची कायमची हकालपट्टी केली आणि तेथील जनतेला दोनशे वर्षापासून चालत आलेल्या ‘इनक्विझीशन’ नावाच्या सैतानी वरवंट्यातून सुटका केली. ह्या लढाईत नऊ लाख बांगडी फुटली म्हणजेच सुमारे ४३ हजार मराठे कामी आले. हे इनक्विझीशन म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माला अनुसरण्यास नकार देणाऱ्या माणसांची प्रथम चाप लावून नखे खेचून काढणे, जीभ कापणे, शरीर सोलणे अश्या शारीरिक छळांपासून सुरूवात करून त्याचा शेवट तेलात भिजवलेली गोणती अंगावर घालून माध्यान्हीच्या भर उन्हात सार्वजनिक स्थळी जिवंत जाळण्यात होत असे. साने गुरूजींनी ह्या प्रथेला मध्ययुगीन रानटीपणा असे नाव दिले आहे. युरोपात चालू केलेली ही भीषण प्रथा पोर्तुगीजांनी येताना आपल्या सोबत आणली. सहासष्ट गावांचा समूह असलेला सहासष्टी (साष्टी) प्रांत तसेच गोवा, दीव-दमण हे पोर्तुगीज अमलाखालील प्रदेश त्यात भरडून निघाले. पोर्तुगीजांच्या जुलमाच्या कथा ऐकून लोक खचून जात होते. मनात येईल त्यावेळी लोकांना पकडून आणायचे आणि कॅथॉलिक ख्रिश्चन बनण्याची सक्ती करायची आणि विरोध करणाऱ्यांवर पाशवी अत्याचार करायचे हे ठरूनच गेलेले होते. पांढरा झगा घालून तोंडाने कितीही दया, क्षमा, शांती, प्रभूची लेकरे वै. पुटपुटले तरी इतिहासात केलेली काळी, अधम, नीच कृत्ये झाकली जात नाहीत. आज साष्टीतील कॅथॉलिक ख्रिश्चन नागरिकांनी कितीही वेळा पोर्तुगीज अवशेषांची पालखीतून मिरवणूक काढली आणि त्यांचे गोडवे गायले तरी त्याने इतिहासातील कलंक लपला जाणार नाही आहे. साष्टी बेटावर जिथे घरटी एक विहिर परसदारी असायची तिथे विहिरीत पाव टाकल्यामुळे हिंदुंनी किती ख्रिश्चनांना धर्मातून बाहेर काढले त्या विहिरी नेमक्या किती आणि पाशवी छळामुळे, जीवाच्या भीतीने, यमयातना टळाव्यात म्हणून नाईलाजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांचे प्रमाण किती ह्याचे संशोधन व्हायलाच हवे. असो. उत्तर कोकणातील तसेच गोव्यातील जनतेला ह्या नरकातून सोडवण्यासाठी छ. शिवाजी राजांनी आणि छ. संभाजी राजांनी अतोनात प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले. बिचाऱ्या जनतेचे मदतीसाठी टाहो फोडणे चालूच होते. पुढे शाहू राजांनी जुलमी सिद्दी साताला ठार करणाऱ्या भीमपराक्रमी चिमाजी अप्पांवर साष्टी बेटातून पोर्तुगीजांचे अस्तित्व नष्ट करण्याची कामगिरी सोपवली. १७३७ च्या आरंभी चिमाजी अप्पांनी ह्या ऐतिहासिक मोहिमेला सुरवात केली. तेवढ्यात त्यांचे थोरले भाऊ बाजीराव पेशवे ह्यांची भोपाळला निजामाशी जुंपली आणि बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पांना निजामाला दक्षिणेतून कुमक/रसद मिळू नये ह्यासाठी नेमले. मात्र निजाम त्या युद्धात हरल्यावर अजिबात विश्रान्ती न घेता १७३८ साली चिमाजी अप्पांनी पुन्हा वसईकडे आपले लक्ष केंद्रित केले. लढाई असतोल होती. पोर्तुगीज हे सशक्त आरमारी ताकद असलेले, उत्तम दर्जाच्या, पितळ व जस्ताच्या एकसंध तोफांचा ताफा असलेले तसेच शूर आणि धिप्पाड हबशी सैनिक व कुशल गोलंदाज (तोपची) पदरी बाळगून असलेले धनिक राज्यकर्ते होते. ह्या उलट मराठे सततच्या लढायांनी कर्जबाजारी झालेले होते. (लढाया करताना ४६ प्रकारचे बुणगे पदरी असणे आवश्यक असते. उदा. घोड्यांना खरारा करणारे, घोड्यांच्या पार्श्वभागाला तेलाने मालीश करणारे, तलवारीला धार लावणारे इ. ह्या (घरापासून लढाई करण्यासाठी दूर असलेल्या) बुणग्यांचा आणि सैन्याचा पगार वेळेवर होणे सैन्याच्या मनस्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असते. सैन्य हे पोटावरच चालते.) मराठ्यांची जहाजे ही आकाराने छोटी होती. तर पोर्तुगीजांची जहाजे ही अत्याधुनिक तोफांनी युक्त अशी मोठाली तरंगती शहरेच होती.
परत पोर्तुगीजांच्या क्रौर्याचा दरारा इतका की मराठ्यांना मदत करणे म्हणजे स्वतःचा यातनामय मृत्यु स्वतःच लिहिणे. यदाकदाचित् मराठे हे युद्ध हरले असते तर तमाम जनतेला ह्याची किंमत मोजावी लागली असती. मात्र चिमाजी हा कुशल सेनानी आणि रणनीतिज्ञ होता. त्याने जागोजागी बांधलेली पोर्तुगीजांची सशस्त्र ठाणी/छोटे गडकोट लढाई करून ताब्यात घ्यायला सुरूवात केली. पण पोर्तुगीज सुद्धा कसलेले राजकारणी होते. आरमाराच्या मदतीने आपले गेलेले ठाणे ते पुन्हा घेत असत. हा पाठशिवणीचा खेळ चालूच होता. मराठ्यांना कोणतेही ठाणे घेतले तरी सतर्क राहावे लागे. कारण पोर्तुगीज पुन्हा आपले ठाणे परत घेत आणि तोफांनी सुसज्ज करीत. म्हणूनच हे युद्ध दीर्घकाळ चालले. पण चांगली गोष्ट ही की पोर्तुगीज आरमार बुलंद असले तरी मानाजी आंग्रे ह्यांनी अतुलनीय पराक्रम करून, गनिमी काव्याने गोव्यातून त्यांना होणारा सागरी रसद पुरवठा थांबवला. ह्याचवेळी मराठ्यांनी गोव्यात एक आघाडी उघडली. चिमाजीने धुरंधर सेनापती प्रमाणे अनेक खेळ्या करून पद्धतशीर पणे फास आवळत आवळत शेवटी मराठ्यांनी वसई किल्ल्याभोवतीची सारी जमीन जिंकली. मात्र सागरी वर्चस्व केवळ पोर्तुगीज आरमाराचेच होते. वसई किल्ल्याच्या तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला दलदल होती. मराठ्यांना लढाई करता करता दोन वर्षे झाली होती तर वसई किल्ला हा लांब पल्ल्याच्या तोफांनी सुसज्ज, धान्यकोठारांनी परिपूर्ण तसेच हबशी लढवय्यांनी भरलेला होता. त्यातच १७३५ ला स्पेनने पोर्तुगालवर आक्रमण केल्याने ताज्या दमाचे पोर्तुगीज समुद्र मार्गे भारतात आश्रयाला आले होते. आपली ही वसाहत पोर्तुगाल सहजासहजी सोडणार नव्हता. किल्ला ताब्यात राहिला असता तर आसपासची जमीन पुन्हा मिळवता आली असती. आता नाही तर कधीच नाही हे जाणून चिमाजी अप्पा ह्यांनी पुन्हा निकराचे प्रयत्न केले. ते आणि इतर मराठे समोरासमोरील युद्धात प्रवीण होते पण इथे शत्रुच लांब होता. एवढेच नव्हे तर लांब बसून मराठ्यांना खिजवत होता. सागरी मार्गाने पोर्तुगीजांवर आक्रमण म्हणजे आत्महत्याच होती. म्हणून मराठ्यांनी दलदलीच्या मार्गाने आक्रमणे करून पाहिली पण जीवितहानी शिवाय काहीच पदरी पडत नव्हते. मराठ्यांचा धीर आता खचत चालला होता. दोन वर्षे सतत युद्धपरिस्थिती आणि वसईच्या किल्ल्याच्या जवळपास जायची पण शाश्वती नाही. अखेर चिमाजी अप्पांनी इंग्रजांना मदतीला बोलावले. इंग्रजांकडे दलदलीत सुरूंग लावण्याचे तंत्रज्ञान होते. मराठ्यांच्या हस्ते पोर्तुगीजांचा नायनाट होईल, महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर आपले वर्चस्व राहील आणि मराठे मोहिम सोडल्यावर साष्टी बेटावर आपला कब्जा राहील ह्या विचारांनी इंग्रज चिमाजी अप्पांना मदत द्यायला तयार झाले. पण इंग्रज रात्री दलदलीत जे सुरूंग लावायचे ते कधी उडायचेच नाहीत, तर कधी उशीरा उडून मराठेच मरायचे. आत पोर्तुगीज मात्र निवान्त होते. रसद न मिळताही तो अभेद्य किल्ला अजून वर्षभर सहज तगला असता. १७३९ चा एप्रिल उजाडला. युद्ध सुरू होऊन अडीच वर्षे झाली होती. मराठ्यांची बेचैनी वाढू लागली. बरेच जणांना घरी परतायचे वेध लागले होते. आपण आता परत गेलो तर साष्टीकर जनतेचे हाल कुत्रे पण खाणार नाही, त्यांच्या नरक यातनांत वाढ होईल हे चिमाजी अप्पा जाणून होते. अशावेळी एक निपुण सेनानी करेल तेच त्यांनी केले. “तोफेच्या तोंडी मलाच द्या म्हणजे माझे मस्तक तरी वसई किल्लात जाऊन पडेल“असे काळजाला हात घालणारे आवाहन केले. त्यामुळे मराठ्यांच्यात जोश निर्माण झाला. ते सारे मारू किंवा मरू ह्या ध्येयाने दलदलीतून वसई किल्ल्यावर चालून गेले आणि २ मे १७३९ ला पोर्तुगीज आणि मराठ्यांमध्ये समोरासमोरच्या, हातघाईच्या लढाईला प्रारंभ झाला. पण मराठ्यांना स्फुरण इतके चढले होते की दोन दिवसांमध्ये पोर्तुगीज शरण आले आणि वसई किल्ल्यावर भगवा फडकला. मात्र मराठ्यांनी कोणतीही सुडबुद्धि न ठेवता पोर्तुगीजांना बायका-मुलांसह गोव्याला जाऊ दिले. तसेच तेथील चर्चेस ना तसेच बाटलेल्या ख्रिस्ती बांधवांना हात लावला नाही. वसई किल्ल्याच्या पाडावानंतर मराठेशाहीला भरपूर महसूल मिळाला. पेशव्यांनी तो निधी अर्नाळा किल्ला बांधण्यासाठी वापरला. हा अर्नाळा एकच किल्ला असा होता की मराठेशाहीच्या पतनानंतर ही तो किल्ला श्री. माधव बेलोसे ह्या धाडसी किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली इंग्रजांशी लढत राहीला. चिमाजी अप्पांनी सोबतच्या मराठी अधिकाऱ्यांना साष्टी बेटावर ठिकठिकाणी अधिकारपदे दिली आणि ते स्वतः पुन्हा पुण्याकडे गेले. मात्र जाताना पोर्तुगीज ज्या घंटांचा नाद करून धर्मभीरू मंडळींच्या मनात धडकी भरवायचे त्या तीन घंटा मात्र सोबत घेऊन गेले जेणे करून कोणत्याही नागरिकाला पुन्हा कधीही दिवाभीताचे जीवन जगायला लागणार नाही. ह्या महायुद्धातील विजयाने मराठ्यांचे मनोधैर्य उंचावले. त्याचा परिणाम असा झाला की पुढच्याच वर्षी १७४० मध्ये मानाजी आंग्रे ह्या मराठी आरमारप्रमुखाने पोर्तुगीजांची उत्तर कोकण किनाऱ्यावरील बलाढ्य जहाजे बुडवून टाकली आणि महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांवरील पोर्तुगीजांचे नामोनिशान मिटवले. पण दुर्दैवाने सततच्या लढायांमुळे थकलेले, मराठी साम्राज्याचे बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा हे दोन चिरे ऐन तारूण्यात लागोपाठ निखळले (इ.स. १७४० व इ.स. १७४१) आणि गोवा प्रदेश पोर्तुगीजांच्या क्रूर पंजातून सोडवायचा राहीला. असे झाले असते तर इन्क्विझीशन अमलात आणण्यात ज्याची प्रमुख भूमिका होती आणि जो लाखो लोकांच्या वेदनादायी मृत्युस कारणीभूत ठरला त्या फ्रांसिस झेवियरला कधीही संतपद मिळाले नसते. संदर्भ - मराठ्यांचा युद्धेतिहास १६०० - १८१८ ले. ब्रिगेडियर का. ग. पित्रे. (अ.वि.से.प.) श्रीदत्त राऊत - shridattaraut@gmail.com
आणि काही माहिती अंतर्जालावरून साभार.

Saturday, 17 August 2013

अश्वारूढ पुतळा

शिवाजी महाराजांचे असंख्य पुतळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही उभारण्यात आले आहेत, त्यामध्ये श्री. विनायक पांडुरंग करमरकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्थान अद्वितीय आहे. त्याविषयी त्यांनी लिहिलेला लेख ‘एका पुतळ्याची जन्मकथा’ हा कलावंताची वेदना आणि कलेच्या निर्मितिचा आनंद ह्यांचा पुरेपुर अनुभव देणारा आहे. सुरूवातीला त्यांनी ह्या अश्वारूढ पुतळ्याचा साडेतीन फूटाचे मॉडेल बनवले. हे मॉडेल करणे अतिशय कठीण असते कारण ते घोड्याच्या तीन नाजूक पायांवरच तोलले जाईल असे बनवावे लागते. शिवाय ते सर्व दृष्टिने परिपूर्ण असावे लागते. कारण त्यावरूनच मोठ्या आकारचे मातीचे मॉडेल तयार होते. पुतळ्याचा घोडा बनवण्यासाठी करमरकरांनी घोड्याचा अभ्यास केला. त्यासाठी स्टुडियोत राजाराममहाराजांचा ‘शाहनवाझ’ नावाचा अरबी घोडा आणून ठेवला. करमरकरांनी शिल्प घडवताना त्या घोड्याची गती, पाय उचलण्याची रीत, तोल सांभाळण्याची तऱ्हा, मानेचा डौल, शेपटीचा डौल इ. गोष्टींचा असा अभ्यास केला की अश्वतज्ज्ञांनीही त्या घोड्याच्या शिल्पाची तारीफ केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणामुळेच आजही हा घोड्याचा पुतळा व त्यावरील शिवाजी महाराज आजही जिवंत वाटतात. छोटे मॉडेल तयार झाल्यावर मोठ्या पुतळ्याची ‘उंची साडेतेरा फूट, लांबी तेरा फूट आणि रूंदी साडेतीन फूट’ ठरवण्यात आली. त्यासाठी मातीचे मॉडेल बनवण्यासाठी चार टन माती आणण्यात आली आणि तीन टनाचा लाकडी सांगाडा तयार करण्यात आला. आता ह्या मातीच्या मॉडेल मध्ये सोळा टनाचा तापलेला कास्याचा रस टाकला जाणार होता. त्या साडेतेरा फूट उंचीच्या पुतळ्याचे एकसंध कास्टींग करण्याचे अशक्य वाटणारे काम करमरकरांनी केवळ स्वीकारलेच नाही तर यशस्वीही करून दाखवले. त्या काळात मॅकेनॉन व मॅकेन्झी कंपनीची माझगाव डॉक फाऊंड्री सर्वांत मोठी होती. त्याचा फोरमन रॉसमिसन हा गोरा साहेब होता. तो त्या मातीच्या पुतळ्याचे मॉडेल पाहून हबकला व म्हणाला, “पुतळा म्हणजे जिवंत कला आहे. ह्या पुतळ्याचे कास्टींग आमच्याच्याने होणार नाही. तुम्हाला त्यासाठी विलायतेलाच गेले पाहिजे”. त्यावर करमरकर आत्मविश्वासाने म्हणाले, “मी हे कास्टींग करू शकतो, इतकेच नव्हे तर एकसंध करू शकतो”. हे ऐकून तो गोरा साहेब काही क्षण करमरकरांकडे आश्चर्यचकित होऊन पाहात राहिला व नंतर त्यांचे दोन्ही हात हातांत घेऊन म्हणाला, “मित्रा तू धाडसी आहेस, मी आणि माझी माणसे तुला हवे ते करायला तयार आहोत. तू फक्त हुकूम कर”. १ जून, १९२८ च्या रात्री सोळा टन धातूचा रस बनवण्यात आला. करमरकर लिहितात, हा दिवस आणि ही रात्र माझ्या जीवनाचे भवितव्य ठरवणार होती. हे भवितव्य पाताळात गाडणार किंवा स्वर्गात नेणार अशा धारेवर मी उभा होतो. रॉसमिसन सुद्धा तणावाखालीच होता. प्रत्यक्ष तो तापलेला रस ओतण्याच्या वेळी तो सर्वांना ओरडून म्हणाला, “करमरकर रस ओता सांगतील व मी रिव्हॉल्व्हरने गोळी हवेत झाडून आवाज करीन. तो आवाज झाल्याबरोबर दोन्ही बाजूंनी रस ओतायला सुरूवात केली पाहिजे. सुरूवात एकाच क्षणाला झाली नाही किंवा रस ओतण्याची धार तुटली तर तुमच्यावर गोळ्या झाडेन व नंतर स्वतःवरही गोळी झाडून घेईन. माझ्याकडे सातबारी पिस्तुल आहे हे लक्षात ठेवा. फाऊंड्रीचे व करमरकरांचे नाव राखा किंवा मरून जा”. हे ऐकून सैनिकांप्रमाणे सर्व कामगार पुतळ्याच्या कामावर तुटून पडले व कास्टींग यशस्वी झाले. हे काम पाहण्यासाठी अनेक युरोपियन स्त्री-पुरूष, मुले तसेच माझगांव गोदीतील सर्व ऑफिसर्स, कर्मचारी जमले होते. क्रेनने जेव्हा तो पुतळा जमिनीवर ठेवला तेव्हा त्याचा धातू चकाकत होता. काही जण तर म्हणाले की घोडा श्वास टाकतो आहे आणि ते आम्हाला ऐकू येत आहेत. _____________________________________________________________________________________ गोऱ्या कातडीचे लांगूलचलन करण्याच्या वृत्ती अनुसार पुतळ्याच्या कामाच्या तपासणीसाठी जे. जे. स्कूलचे तत्कालीन डायरेक्टर कॅप्टन सॉलोमन ह्यांची निवड करण्यात आली. करमरकरांना ते पटले नाही. त्यांनी ह्या गोऱ्या साहेबाला केवळ एकदाच स्टुडियोत येऊ दिले आणि विचारले, “शिवाजी महाराजांचा इतिहास तू वाचून आला आहेस का”? साहेब ‘नाही’ म्हणाला. त्यावर करमरकर म्हणाले, “तू जर इतिहास वाचलेला नसशील तर तुला पॅनेल्स समजणार नाहीत”. हे ऐकून कॅप्टन सॉलोमन व त्याच्यासोबत आलेले चित्रकार धुरंधर हैराण झाले. करमरकरांनी लिहून ठेवले आहे, कलेची बाजू माझी मी पाहून घेण्यास समर्थ होतो. _____________________________________________________________________________________ सौजन्य - हा लेख नित्यनवा कलास्पर्श ह्या मासिकाच्या दिवाळी २०११ च्या अंकातून साभार घेण्यात आला आहे. ह्या लेखातील परिच्छेदांचे मूळ लेखक श्री. सुहास बहुळकर व श्री. विनायक पांडुरंग करमरकर आहेत.

Friday, 9 August 2013

ग्राहक राजा

मुंबईत, हॉटेल व्यवसायावर तुळू लोकांचे अतिक्रमण होण्यापूर्वी, मराठी व इराणी उपाहारगृहांमध्ये ग्राहक सन्माननीय असायचा. इराणी उपाहारगृहांमध्ये तर शिरताच क्षणी हा ग्राहक राजा 'बन-मस्का, मसालानी चा, आजनुं छापु अने पंखो फुल (आजचे वर्तमानपत्र आणि पंखा पूर्ण वेगात)' अशी टेचात आज्ञा सोडायचा. असाच एक कोकणी दर्दी, खवैय्या ग्राहक गिरगावातल्या कोनातल्या एका उपाहारगृहात नियमित यायचा. जाताना प्रत्येक खाल्लेल्या पदार्थाचे विना संकोच विश्लेषण करायचा व न चुकता शेवटी एक वाक्य म्हणायचा - तां तुमचा चा काय गरम नवता हां.... ग्राहकाचा संतोष हेच ध्येय मानणाऱ्या त्या उपाहारगृहाच्या मालकाचा चेहरा कोमेजून जायचा. रोज संध्याकाळी कामगारांची हजेरी मांडताना त्या ग्राहकाला चहा आणून देणाऱ्या वाढप्याचे केस व्यवस्थित भादरले जायचे. मग त्या वाढप्याने संबंधित ग्राहकाला सणसणीत गरम चहा मिळावा म्हणून हर प्रकारे प्रयत्न केले. तो बिचारा दर दिवशी चहा कपात ओतल्याक्षणी धावत चहा आणून द्यायला लागला. पण त्याच्या प्रगतिपुस्तकावरील गार चहाचा लाल शेरा काही चुकला नाही. :( नंतर नंतर त्याला लक्षात यायला लागले की त्या मिश्किल ग्राहकाला गरमागरम चहा पिण्यापेक्षा सुद्धा, जाताना चहाविषयी मत व्यक्त केल्यावर त्या मालकाचा कसनुसा होणारा चेहरा पाहण्यात जास्त स्वारस्य आहे. :) एके दिवशी त्या गुणी वाढप्याने त्या ग्राहकाला गरम चहा देण्यापूर्वी त्या पितळी कपाचा कान सणसणीत तापवला (त्याकाळी उपाहारगृहांमध्ये चहासाठी पितळेचे कप ठेवलेले असत). त्यानंतर त्या चोखंदळ ग्राहकाने कधीही चहाच्या तपमानाची चर्चा केली नाही. :P

Monday, 15 July 2013

केसांचे चाप

मी सात वर्षांची असताना एकदा मी आईने तिच्या मैत्रिणीला दुसऱ्या दिवशी तिचा तिसावा वाढदिवस असल्याचे सांगताना सहजच ऐकले. ते ऐकून मला दोन गोष्टी जाणवल्या – १) माझ्या आईचा पण वाढदिवस असू शकतो हे मला पूर्वी कधीच कळले नव्हते २) मी तिला कधीही वाढदिवसाची भेट स्वीकारताना पाहिले नव्हते. मी नक्कीच ह्या बाबत काहीतरी करू शकत होते. मी माझ्या खोलीत गेले आणि माझी पेटी उघडली. त्यातले सगळे पैसे काढले. ते तब्बल पाच रुपये होते, माझी पाच आठवड्यांची कमाई. नंतर मी कोपऱ्यावरच्या छोट्या दुकानात गेले आणि भिंगार्डेकाकांना मी आईसाठी काहीतरी वाढदिवसाची भेटवस्तू घेऊ इच्छिते असे सांगितले. त्यांनी पाच रुपयांत येतील अशा अनेक गोष्टी दाखवल्या. सुंदर काचेच्या बशीपासून रंगीत खडूपर्यंत सर्व काही. पण आमचे घर त्या सगळ्या वस्तूंनी भरलेले होते आणि आठवड्यातून एकदा मलाच त्या सगळ्या वस्तूंवर फडका मारावा लागे. तिथे एक खाऊच्या गोळ्यांची डबी पण होती पण आईला गोड खायचे नसल्यामुळे ती डबी भेटवस्तू म्हणून अगदीच अयोग्य होती. शेवटची गोष्ट श्री. भिंगार्डे ह्यांनी मला दाखवली ते होते केस कुरळे करायचे केसांचे चाप. माझ्या आईचे केस हे काळे, घनदाट आणि लांबसडक होते. आठवड्यातून दोनदा ती ते केस धुवायची आणि त्यांना केसाचे चाप लावून ठेवायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ते चाप काढायची आणि तिचे ते लांबसडक केस जेव्हा तिच्या खांद्याभोवती मोकळे सोडायची तेव्हा ती अगदी एखाद्या प्रसिद्ध नटी प्रमाणे देखणी दिसायची. मला वाटले की हे केसांचे चाप तिच्यासाठी उत्कृष्ट अशी वाढदिवसाची भेटवस्तू ठरेल आणि पाच रुपये देऊन मी ते चाप विकत घेतले. मी घरी आल्यावर ते चाप वर्तमानपत्राच्या रविवारच्या रंगीत पुरवणीत काळजीपूर्वक गुंडाळले (जिलेटिन कागद विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसेच उरले नव्हते). दुसऱ्या दिवशी जेव्हा नाश्त्यासाठी घरचे सारे लोक एकत्र जमले तेव्हा मी हळूच आईकडे गेले आणि तिला ती गुंडाळी दिली आणि म्हटले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! " माझी आई क्षणभर सुन्न होऊन बसून राहिली. नंतर ओल्या डोळ्यांनी तिने ती गुंडाळी उघडायला सुरुवात केली. ज्या वेळेपर्यंत तिच्या हातांत ते चाप आले त्यावेळी ती हुंदके देऊन रडत होती. "आई! मला माफ कर, मला तुला रडवायचे नव्हते, मला केवळ तुझा वाढदिवस आनंदी करायचा होता", मी आईची क्षमा मागितली. "अगं छकुले! मी अतिशय आनंदात आहे गं", माझी आई म्हणाली. तिच्या अश्रू भरल्या डोळ्यांत मला आता आनंद दिसत होता. "का माहीत आहे का, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेली पहिलीच वाढदिवसाची भेटवस्तू आहे", ती पुढे म्हणाली. नंतर तिने माझ्या गालांचा पापा घेतला आणि माझे आभार पण मानले. मग तिने माझ्या बहिणीला म्हटले, "हे बघ तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग तिने माझ्या भावाकडे वळून म्हटले, "हे बघ तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग ती माझ्या बाबांना म्हणाली, "हे बघा तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग ती ते चाप लावून आपले केस कुरळे करण्यासाठी केस धुवायला गेली. ती केस धुवायला जाताच माझे बाबा मला म्हणाले, "सोनू मी ज्या कोंकणातल्या एका छोट्या खेड्यात वाढलो तिथे मोठ्या माणसांचे वाढदिवस साजरे करायची पद्धत नव्हती. केवळ लहान मुलांचेच वाढदिवस साजरे केले जात असत. पण तुझ्या आईचे कुटुंब इतके गरीब होते की ते तेव्हढे पण करू शकत नसत. पण आज तू आईला किती आनंदी केले आहेस ते पाहून मला ह्या वाढदिवस प्रकरणाचा पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. म्हणजे मला म्हणायचे आहे की सोनू तू एक नवा पायंडा पाडला आहेस". मग खरोखरच ही एक प्रथाच पडून गेली. त्यानंतर प्रत्येक वर्षी माझ्या आईवर तिच्या वाढदिवसाला भेटवस्तुंचा वर्षावच होऊ लागला, माझ्या बहिणीकडून, भावाकडून, बाबांकडून व माझ्याकडून. अर्थातच आम्ही जसे जसे मोठे होत गेलो तशी तशी आमची कमाई वाढू लागली आणि तिला मिळणाऱ्या भेटवस्तू अधिकाधिक चांगल्या होऊ लागल्या. मी चोविशीची झाल्यावर तिला रेडियो, रंगीत टी. व्ही. आणि एक मायक्रोव्हेव ओव्हन भेट दिला. तिच्या पन्नाशीला आम्ही भावंडांनी आपली सर्व जमापुंजी एकत्र केली आणि तिच्यासाठी वाढदिवसाची भेट म्हणून एक नेत्रदीपक वस्तू आणली, एक रत्नजडित मोत्याचा हार. जेव्हा माझ्या सर्वांत मोठ्या भावाने तिच्यासाठी आयोजित केलेल्या मेजवानीत आलेल्या सर्व पाहुण्यांसमोर तिच्या हातात ती हाराची पेटी दिली तेव्हा तिने ती पेटी उघडून त्या हाराकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि मग ती उघडलेली पेटी सर्वांना दिसेल अशी धरून ती म्हणाली, "आहेत की नाही माझी मुले अनमोल"? मग तिने ती पेटी सर्वांना पाहण्यासाठी म्हणून पुढे सरकवली. तो हार पाहून प्रत्येकाने टाकलेले उसासे ऐकणे खरोखर रोमांचक होते. सर्व पाहुणे गेल्यावर साफसफाई साठी मी मागे राहिले. मी स्वयंपाकघरात भांडी स्वच्छ करताना पुढल्या खोलीत चाललेला आई-बाबांचा संवाद माझ्या कानावर पडला. बाबा म्हणत होते, "प्रमिला! किती गं महागडा हार आहे हा, मला तर वाटते की तुला मिळालेली ही एक सर्वोत्कृष्ट भेटवस्तू आहे". त्यापुढची वाक्ये ऐकताना मला भरून आले. आई आपल्या मृदू आवाजात म्हणाली, "खरोखरच हा महागडा हार सुंदरच आहे आणि दुर्मिळ पण. मात्र मला मिळालेली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट भेटवस्तू आहे, ते केसाचे चाप".
- भावानुवाद - मूळ कथा - – द बॉबी पिन्स – लेखिका - सौ. लिंडा गुडमन.

Thursday, 6 June 2013

प्रार्थना

वेदांमध्ये ऋषी काकुळतीने परमेश्वराकडे प्रार्थना करतात -
हे देवा, आम्हाला सुपथावर ठेव, आमच्या सभोवताली शुभदायी वातावरण असू दे, सर्वत्र मांगल्य असू दे, आम्हाला सदैव प्रसन्नचित्त ठेव, आमच्या चित्तांत सुविचार असू देत आणि वाणीत माधुर्य, आम्ही सदा आनंदी आणि आमचे आयुष्य निरामय असू दे, आमचे जीवन सन्मार्गावरून चालू दे.
पण आपण कितीही सद्विचारांचे असलो तरी दुष्टांच्या दुष्कृत्यांची फळे आपल्याला भोगावीच लागतात. कारण विश्वात आपण सारे एकमेकांशी अदृश्य पाशांनी जखडलेले आहोत. कोणीही स्वतंत्र नाही. दुर्जनांच्या कृत्यांचे परिणाम सज्जनांवर होतच राहातात. दुष्ट लोकांचे मन दुर्बळ असते. आपण चुकीचे वागतो आहोत हे त्यांना कळत नाही असे नाही पण चांगले वागण्यासाठी त्यांच्याकडे मनाची सिद्धता नसते. कित्येकदा मनात असूनही ते चांगले वागू शकत नाहीत. स्वतःचा दुबळेपणा जाणून ते इतर दुष्टांशी जवळीक करतात आणि मग त्यांच्या मनाने कितीही चांगले वागायचे ठरवले तरी त्यांचे दुष्ट मित्र त्यांना चांगुलपणापासून दूर ठेवतात आणि ही दुष्टांची मांदियाळी सज्जनांना जीव नकोसा करून सोडते आणि अखेरीस ही दुराचारी मंडळी स्वतःच्या वागण्याने दुर्गतीला जातात. अश्या परिस्थितीत, ऋषींना जाणवते की केवळ आपण सद्वर्तनी असून उपयोगाचे नाही म्हणून ते अग्नीची प्रार्थना करतात आणि म्हणतात -
मा वः एनः अन्यऽकृतं भुजेम । हे अग्ने, दुसऱ्यांनी केलेल्या दुष्कृत्यांची फळे आम्हाला भोगायला न लागोत.

Tuesday, 4 June 2013

धनुर्धारी

धनुर्धारी ह्या टोपण नावाने लिहिणाऱ्या कै. श्री. रामचंद्र विनायक टिकेकर ह्यांची ‘वाईकर भटजी’ ही कादंबरी सध्या वाचत आहे. कादंबरी तर सुंदर आहेच पण त्याला श्री. अरूण टिकेकरांनी लिहिलेली प्रस्तावना पण अत्यंत रोचक आहे. प्रस्तावनेत धनुर्धारींच्या लेखनप्रवासाचा सविस्तर वृतान्त दिला आहे. 1880 च्या दशकात लिहिलेल्या धनुर्धारींच्या कादंबऱ्यांमध्ये/लेखांमध्ये पेशवाईच्या अस्तानंतर आलेली इंग्रजी शिक्षणाची लाट, इंग्रजी शिकल्याने नव्या पिढींत हातात खुळखुळणारा पैसा, बिघडलेली कुटुंबव्यवस्था, आमिषे दाखवून तसेच हिंदुधर्मावर टीका करून/दिशाभूल करून केली जाणारी तत्कालीन ख्रिस्ती धर्मांतरे असे शहरी विषय तर आहेतच पण मराठ्यांच्या मर्दुमकी, वीरस्नुषा राधाबाई, उमाबाई दाभाडे, अहिल्याबाई होळकरीण, पानपतचा मोहरा, शूर अबला अश्या ऐतिहासिक कादंबऱ्या/लेख पण आहेत तसेच ‘व्यापारी-वाचन-पाठ’, ‘व्यापारी भूगोल (कमर्शियल जॉग्राफी)’, ‘आमची गळितांची धान्ये/उपाशी महाराष्ट्रास उद्योग’, ‘धावता धोटा’ अशी अर्थशास्त्रावरील पुस्तके पण आहेत. श्री. अरूण टिकेकर लिहितात - धनुर्धारींच्या लेखनात स्वजनोद्धाराची तळमळ दिसून येते. त्यातील वाक्ये आजच्या काळातही प्रत्ययकारी वाटतात –
शेतातील राब, गिरण्यातील मजुरी, बाजारातील हमाली आणि मग कापडाच्या खपाची गिऱ्हाईकी एवढीच कामे महाराष्ट्र या कापसाच्या व्यापारात करत आहे. आमच्या ह्या नीचंतर दैनेचे मुख्य कारण अपरिहार्य अशी परदेशी व्यापारउद्योगांची आम्हाबरोबर लागलेली झटापट आणि त्यांच्याशी सामना देण्याला अवश्य असणाऱ्या साधनांची अननुकूलता हेच होय. ज्ञान आणि उद्योग हे सध्याच्या काळी असेच नव्हे तर सर्वदा कल्पवृक्ष होत. परवशतेला ज्ञान आणि दारिद्र्याला उद्योग अमृतसंजीवनी होय.
तसेच (डॉ. आनंद यादव ह्यांनी पहिली ग्रामीण कादंबरी म्हणून मान दिलेल्या) पिराजी पाटील ह्या 1903 साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या कादंबरीत धनुर्धारी म्हणतात –
महाराष्ट्र देशांत दोन कोटी मनुष्ये आहेत. मराठी भाषा बोलणारे दोन कोटी... उणी अधिक व जवळ जवळ पंचवीस हजार खेडी... गेल्या पाच वर्षांत तीन दुष्काळ कोसळले.. खडतर हाल भोगण्याचा वखत आला आहे! दर शंभर लोकांपैकी नव्वद जण महाराष्ट्रातील खेडेगावांत राहतात. दर शंभर लोकांपैकी ऐंशी पेक्षा जास्त लोक शेतकीवर आपली उपजीविका करून घेत आहेत आणि सध्या या महाराष्ट्रातील यच्चयावत् खेडी मोडकळीस लागली आहेत! महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग धुळीचे दिवे खात उधळत सुटला आहे. त्याची मिराशी जमीन, जिवापेक्षाही प्यार, ती सावकार सारखा बळकावत आहे. त्यांची जनावरे पोटच्या पोरांइतकी लाडकी, ती त्याच्या डोळ्यांदेखत पटापट मरून गेली. सर्व दुःखांची जननी क्षुधा, उपासमार ती त्याला घट्ट मगरमिठी मारून बसली आहे! शेतकरी राष्ट्रांतल्या अन्नाचा पुरवठा करणारा, शेतकरी मिजासी लोकांच्या हौशी पुरवणारा, शेतकरी सरकारचा पाया, शेतकरी राष्ट्राचा आधार, शेतकरी राष्ट्राचा अभिमान, शेतकरी देशाचे सौभाग्य, शेतकरी शहाण्यांचा पोशिंदा आणि तो हा आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी उपासमारीत दिवस काढत आहे...
(मात्र धनुर्धारी केवळ बोरूबहाद्दर नव्हते तर त्यांनी अक्कलकोट संस्थानात शेतकऱ्यांसाठी सिंडीकेट काढली, साधारण 300-400 गायी शेतकऱ्यांत वाटल्या तसेच विणकरांचे धंदे वाचवण्यासाठी सोलापुरात वीव्हर्सगिल्ड स्थापली, धावत्या धोट्याचे माग बनवले आणि जिन्स, बार्शी येथे कापडगिरण्या सुरू केल्या.) तत्कालीन महाराष्ट्रावर छाप पाडणारा हा कार्यकुशल उद्योजक आणि लेखक वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी 1907 मध्ये क्षयाची बाधा होऊन स्वर्गस्थ झाला. धुळीचे दिवे खात जाणें - To beg about in great disgrace and wretchedness. मिराशी - Hereditary.

Thursday, 28 March 2013

लबाड सभ्य

सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे. अफझलखानाला पिता मानणारी मंडळी सध्या कृष्णाजी भास्कर ह्या अफझलखानाच्या वकिलावर चिखलफेक करताना आढळतात. ह्यात त्यांनी आनंद मानायला कोणाची हरकत असायला काहीच कारण नाही. कारण कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्वघोषित विद्वज्जनांना महाराजांचे वकील श्री. गोपीनाथपंत बोकील ह्यांचा अनायास विसर पडलेला दिसतो. हे तेच गोपीनाथपंत आहेत जे स्वराज्यावर अफझलखानासारखी विलक्षण धूर्त, कपटी आणि कावेबाज वावटळ आली असताना शिवाजी राजांना ओतप्रोत विश्वासाने म्हणतात, “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ शिवाजीराजे म्हणजे लखलखता हिरा तर त्यांचे सहायक मंत्रीगण म्हणजे जणू सोन्याचे कोंदण. पाहाण्यासारखी गोष्ट आहे की खान राजांच्या मुलुखात आल्यावर साम-दाम-दंड भेदाने राजांची माणसे फोडायचा प्रयत्न करतो. वतनाच्या लोभाने त्याला बळी पडणार्‍यांत मंबाजी भोसले (महाराजांचे चुलत काका), केदारजी व खंडोजी खोपडे, जाधवराव, रविराज ढोणे, शेडगे, धायगुडे, कोकरे, इंगळे, सुलतानजी जगदाळे ह्यांच्यासारखी माणसे आहेत पण गोपीनाथपंत बोकीलांसारखा सामान्य कुलकर्णी मात्र राजांशी एकनिष्ठ राहतो. आज गोपीनाथपंत बोकीलांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही पण सासवड जवळील हिवरे गावाचे जोशी-कुलकर्णीपद ह्यांच्याकडे पूर्वापार चालत आले होते. शिवाय सुपे परगणा आणि कर्यात बारामतिचे देशकुलकर्णी पदाचे वतनही त्यांच्याकडे चालत आलेले असावे. १६४० मध्ये ते पुण्याचे मुजुमदार होते आणि १६५६ पासून राजांचे चिटणीस. ह्या तालेवार, मातब्बर असामीला राजांच्या कुटुंबात एखाद्या ज्येष्ठ माणसाप्रमाणे मान होता. त्यांचा घरोबा होता इतका की सगळे त्यांना काकाच म्हणत, ‘पंताजी काका ह्यांचा मान तो इतका की त्यांनी आऊसाहेबांसोबत सोंगट्या खेळाव्या’ असा त्यांचा उल्लेख आढळतो. राजे पंताना म्हणतात की खानाने बोलणी करताना बेलभंडारा (क्रियाशपथ) मागीतला तरी खुशाल द्यावा. अनमान करू नये. त्या काळात शत्रुचाही ब्राह्मणांच्या सत्यकथनावर विश्वास होता. त्यामुळे शपथेवर खोटे बोलणे पंतांना किती कठीण असेल पण त्यांनी स्वराज्यासाठी तेही केले.खानाने पंताकडून जानव्याची शपथ घेतली. ह्याच कपटी खानाने श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरीरंगन ह्याला तहाच्या मिषे बोलावून त्याचा खून केलेला असतो. त्यामुळे अश्या धूर्त, चाणाक्ष व विजयासाठी कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध न बाळगणार्‍या ह्या खानाला आपल्या वाक्पटुतेने जावळी सारख्या कुबल जागी बोलवून आणणे ही पंतांच्या बुद्धिचातुर्याची कमालच म्हणायला हवी. आपल्याकडे विनोदाने म्हणतात की चीनशी भारताच्या वाटाघाटी म्हणजे वाटा त्यांना आणि घाटा आपल्याला. पण पंत इतकी सावध पण लाघवी बोलणी करतात की खानासारखा कसलेला मुत्सद्दी पण पाघळतो आणि सह्याद्री हे मृत्युमुख आहे हे माहित असताना सुद्धा राजांना अपेक्षित अटींवर जावळीत येतो. हे घडणे केवळ पंतांच्या कौटिल्याचे फळ आहे. पंत खानासोबत केवळ वाटाघाटीच करतात असे नाही तर खानाच्या छावणीत राहून खानाचे विचार, त्याचे सैन्य, प्रमुख सेनानी, सैन्यरचना, अश्वदळ, तोफखाना इ. बित्तंबातमी काढतात. म्हणूनच बाबासाहेब पुरंदरे गोपीनाथपंतांना सभ्य लबाड किंवा लबाड सभ्य म्हणतात, वकील असावा तर असाच. पण पंतांचे हे प्रसंगावधान, ही धूर्तता इथेच संपत नाही. खान व राजांच्या भेटीच्या दिवशी गोपीनाथपंत खानाला आणण्यासाठी खानाच्या छावणीत पोहोचले. पाहातात तो खानाने ठरलेल्या अटींना डावलून १५०० हशम सोबत घेतले होते. सुरूवातीला पंतांनी ह्या सैन्याला हरकत घेतली नाही. मात्र खानाचा हा लवाजमा जनीच्या टेंबाच्या पायथ्याशी “खाड्याच्या खोंडात“ आल्याबरोबर पंत काहीतरी अचानक जाणवल्यागत उभे राहिले आणि बोलले, “इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धास्त खाईल. माघारा गडावरी जाईल. भेटी होणार नाही.... शिवाजी म्हणजे काय? त्यास इतका सामान काय करावा?“ खानाचा आता नाईलाज झाला. ह्या तुकडीचे येणे ठरलेल्या अटींच्या विरूद्ध होते हे खरेच आणि परत भेटीची वेळही पुढे पुढे सरकत होती. अश्या रीतीने पंतांनी खानाच्या खास तुकडीला खानापासून वेगळे केले व अडनिड्या जागी आणून ठेवले. परकी मुलुख आणि जावळीसारखे घनदाट, कीर्र जंगल. खानाच्या हत्येनंतर सर्वप्रथम ही तुकडी विनासायास कापली गेली.
अजून एक अतिशय स्तुत्य गोष्ट म्हणजे वृद्ध पंतांना वारंवार खानाच्या भेटीला जावे लागते. थकलेले, वाकलेले काका प्रतापगड १६ कोस हे अंतर कधी पायी तर कधी पालखीतून तर कधी घोड्यावरून करतात. बरं हा मार्ग तरी साधा, सोपा, सरळ आहे का?... तर नाही.एकतर जावळीचे घनदाट जंगल त्यातून अर्ध्या कोसाचा प्रतापगड उतरायचा, दीड कोसाचा महाबळेश्वराचा डोंगर चढायचा, परत दीड कोसाचा पसरणीचा घाट उतरायचा. हे श्रम विलक्षणच म्हणायला हवेत.
ह्यावरून कळते की अफजलखानाच्या ससैन्य विनाशात पंतांची कामगिरी किती महत्त्वाची आहे आणि हे जाणूनच राजांनी पंतांचा विशेष सत्कार केला. त्यांना एक लक्ष (आकडा पुन्हा वाचावा) होन इनाम दिले. त्यांचे राहते गाव मौजे हिरवे तर इनाम दिलेच पण सोबत शिरवळ परगण्यातील मौजे भोळी व मौजे मांडकी येथे प्रत्येकी १ चावर जमीन इनाम दिली. तसेच त्याच शिरवळ परगण्यातील मौजे घरवाडा व मौजे मांडकी येथे सेटेपणाचे वतन इनाम दिले. खरोखरच माणसे निवडून, वेचून, जोडून त्यांच्याकडून ईश्वरी कार्य घडवावे आणि त्या कार्याची दखल घ्यावी ती जाणत्या शिवाजी राजांनीच. असो. गोपीनाथपंतांच्या उत्तरायुष्याबाबत अधिक माहिती मिळत नाही पण वाईमध्ये सर्वात जुना वाडा गोपीनाथ पंत ह्यांचा आहे अशी माहिती महागणपतिवाई ह्या संकेतस्थळावर मिळते. अर्थातच गोपीनाथपंतांसारख्या अनमोल रत्नावर अजून संशोधन होण्याची आवश्यकता आहे आणि तेही मनात कोणतेही किल्मिष न ठेवता. कारण जोतिबा आपल्या फुले रचनावली २/७७ येथे म्हणतात – हरामखोर गोपीनाथपंतांच्या मदतीने शिवाजीने दगलबाजीने अफजलखानाची हत्या केली. सहाजिकच मनात प्रश्न येतात – १) शिवाजीराजांना “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ असे आत्मविश्वासाने सांगणारे स्वराज्याशी एकनिष्ठ आणि निबिड अरण्यातून १६ कोस अंतर कापून अनेकदा खानाच्या भेटीला जाणारे आणि हिंदवी स्वराज्यासाठी खानाच्या सैन्याविषयी बित्तंबातमी काढणारे गोपीनाथपंत हरामखोर कसे? 2) श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरीरंगन ह्याला आणाशपथा देऊन तहासाठी बोलावून त्याचा खून करणार्‍या अनैतिक, कपटी खानाचा जर शिवाजीराजांनी भेटीला बोलवल्यावर स्वसंरक्षणासाठी जर कोथळा बाहेर काढला तर ती दगलबाजी कशी काय? ३) (प्रेमात आणि) युद्धात सर्व काही क्षम्य असते. मानवाचा वैश्विक स्तरावरील राजकारण व युद्धेतिहास हा धोका, धूर्तता, दगलबाजी, विश्वासघात, गनिमी कावा ह्यांनीच भरलेला आहे. प्रश्न केवळ इतकाच असतो की हे सर्व करणार्‍याचा अंतर्हेतु काय आहे. शिवाजीराजांचे राज्य हे लोककल्याणासाठीच होते हे जोतिबांना ठाऊक नव्हते का? ४) केवळ विशिष्ट जमातीविषयी द्वेष मनात ठेऊन पूर्वग्रहदूषित, एकांगी इतिहासलेखन करणे म्हणजे सत्यशोधन होते का? . . . . संदर्भग्रंथ :– वेध महामानवाचा – लेखक - डॉ. श्रीनिवास सामंत राजा शिवछत्रपति - लेखक – ब. मो. पुरंदरे

Wednesday, 30 January 2013

शिवराजाभिषेक

काल रायगडी अप्पांसोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्रात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल. असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता. ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.' असे असताना बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. -------------------------------------------------------------------------- राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल. संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.

Saturday, 8 September 2012

A fantastic day in lush greenery....


Few years back, I was working as a teacher in a school. Often, on my way to the staff-room, I used to see many students punished for indiscipline out side the drawing room. I made a note that whoever is that drawing teacher, s/he must be very strict kind of person. But since that teacher is from higher secondary section, I did not know him/her personally. Few months later, I acquitted with that drawing teacher whose name is Mr. Sadashiv Kulkarni, a very kind hearted, witty, and pun loving personality.


Shri. Sadashiv Kulkarni


Unlike most of the teachers who are interested in spying, gossiping, mud-slinging, his interest was in inculcating the love about his subject in students. His tagline was “Respect my subject”. (Unfortunately, we Indians developed an ear for the music but not the eyes for great paintings, drawings, and sculptures. And we give weight-age to scoring subjects more rather than grading subjects in school life.)

Though his company was a sheer pleasure, we were not in contact much due to my hectic teaching schedule in those days. And later, I left the school and continued with my own business.

However, few months back, he added me to his Facebook a/c and I started sharing magnificent artistic pieces posted on his wall.

And then, one fine day, he announced a drawing and painting tour to Vasai Fort and there was no criterion. It was an open invitation to all those who love nature, colours irrespective of that person’s ability to draw.

Fort Vasai


On 26th August, 2012, along with my aunt and a cousin, I joined that tour. Since after my school days, I hardly was in touch with drawing and painting, my idea was to enjoy the tour merely as a picnic. At 7.00 am, we left Thane. There were total 17 people, many of them were known faculty of (World-famous) J.J. School of art and yet were far from ego-ism. The atmosphere was full of kindness and affection.

On the way, there was introduction session and I came to know that most of the painters are specialized in various drawing and painting skills like Charcoal Drawing, oil painting, fabric painting, wax painting, sketching etc. and have painted pictures worth in crores. It was a nice feeling to be in company of gifted artists like Anant Kulkarni, Dr. Bal Bendakhale, Shreekant Chougule, Shreekant Jadhav, Sadashiv Kulkarni, Yeshwant Patil, Vijayraj Bodhankar and so on.

We reach Vasai in an hour and had delicious breakfast and continued our journey to the Fort. After reaching the fort, firstly we met officers of Archaeological Department of Govt. of India and intimated them our interest of visiting the fort and they were delighted by hearing our purpose.  


Then Mr. Bal Bendkhade enlightened us the history of the fort and its impact on the designing of the fort. After wandering the fort for say 15 minutes we stopped at a spot where numbers of good structures were present. Everyone chose the spot and tools of own liking, and started working on the canvas. 




Artists at work
Shri. Bal Bendkhale

Gautam Choughule

Shri. Vijayraj Bodhankar

Damle Duo (Sr. and Jr.)

Shri. Shrikant Choughule


I opted for pencil sketching.

My drawing


Occasionally, I was serving mini-burgers to the participants.

At 1.00 pm, we revisited the Vasai village, had lunch and then we return to the fort and chose another suitable spot. While some of us continued their creativity, we continued our activity.


Shri. Vijayraj Bodhankar

Shri. Shreekant Jadhav Sir and Shri. Anant Kulkarni Sir

Shri. Yeshwant Patil Sir

The Bus Driver inspired by our activity.




At 5.00 pm we gathered together, Mr. Sadashiv Kulkarni told us about his organization Kalasparsh which is dedicated to art and innovation, the history of this painting tour. Then we exhibited our work till now, decided about next tour (which will be announced in coming days), had a special journey via Hiranandani and Brahmand for “Nectar like Tea” in heavy rain and came back to Thane at 7.00 pm.
  

It was a breathtaking experience in the company of splendid people. And the greenery, insect-life and the diversity of trees at Vasai fort was amazing. After 6 days of work in an artificial atmosphere, sitting next to computer 8 hours a day with strained eyes, this experience with rich oxygen, was incredible.

   









Picture courtesy - Ms. Anuradha Damle, Mr. Sadashiv Kulkarni and the internet.

Sunday, 13 May 2012

कळकळीचे आवाहन

मराठी मातीवर आणि ह्या मातीच्या सन्मान्य इतिहासाचा अभिमान बाळगणार्‍या सर्व भारतीयांना कळकळीचे आवाहन.

नुकताच आम्ही शिवशौर्य ट्रेकर्स द्वारे कुलाबा किल्ला - पद्मदूर्ग - जंजिरा - खांदेरी आणि कणकेश्वर मंदिर असा दौरा करून आलो. त्यात पद्मदूर्गाला भेट देणे हा अनुभव विशेष संस्मरणीय होता. कारण पद्मदूर्ग किल्ल्यावर सहजासहजी जाता येत नाही. मुरुड किनार्‍यावरील कोळीबांधवांशी काही दिवस अगोदर बोलून तिथे जाण्यासाठी बोट निश्चित करावी लागते. ती मिळतेच असे नाही. मिळाली तर कोळीबांधव आपले नित्याचे व्यवहार सोडून आपल्या सवे येत असल्या कारणाने बोटीचे भाडे थोडेफार जास्त असू शकते. मात्र आयत्या वेळी बोट भाड्याने मिळणे केवळ अशक्य. त्यामुळे जंजिर्‍यापासून हाकेच्या अंतरावर असूनही ह्या किल्ल्यावर पर्यटकांचा राबता अतिशय कमी आहे.

पद्मदूर्ग हा किल्ला मुरुड गावापासून अगदी जवळ आहे. तो नऊ एकरावर फैलावलेला असून किल्ल्याचे बांधकाम पाहून डोळ्याचे पारणे फिटते. असा हा बुलंद, बेलाग, अवाढव्य किल्ला जंजिरेकर सिद्ध्याच्या नाकावर टिच्चून बांधणे सोपे नव्हे. मराठेशाहीचे हे अस्तित्व आणि ते ही हाकेच्या अंतरावर हे जंजिरेकर सिद्धीच्या अवघड जागीचे दुखणेच बनले होते. एक वेळ तर अशी आली होती की पद्मदूर्गाच्या मदतीने महापराक्रमी लाय पाटील हा जंजिरेकर सिद्ध्याचा खेळच आटोपणार होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून सिद्ध्याची गादी टिकून राहिली (पार १९४७ पर्यंत). असो.

असा हा दुर्लक्षित दूर्ग खरोखरच पाहण्या जोगा आहे आणि हा किल्ला समुद्र सपाटीवर असल्याने कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट न होता ह्या किल्ल्यावर जाता येते. त्यामुळे एक पर्यटक म्हणून आपण आपल्या कुटुंबियांना घेऊनही ह्या किल्ल्यावर जाऊ शकता. तसेच केसरी, सचिन सारख्या मोठ्या पर्यटन संस्थांनी ठरवले तर तिथे नियोजित पर्यटन सुद्धा होऊ शकते. केवळ एकच अडचण म्हणजे तिथे बोटी लावण्यासाठी धक्का बांधलेला नसल्या कारणामुळे पाण्यात उतरावे लागते. पण सोबत एखादी छोटी शिडी नेली तर ही अडचण सुद्धा दूर होऊ शकते.

सिद्धीच्या प्रतिकाराची तमा न बाळगता दौलतखानाच्या अतुल योगदानाने निर्माण झालेला हा किल्ला नऊ एकरावर वसलेला आहे. कमळाचा आकार असलेला पडकोट हे ह्याचे मुख्य वैशिष्ट्य. तसेच किल्ल्याचे बांधकाम करताना काळ्या पत्थरापेक्षा जास्त बळकट असे वापरलेले चुना आणि इतर घटकांचे मिश्रण जे आजही पुरातन वास्तु कौशल्याची साक्ष देत खंबीरपणे उभे आहे. गडाला एकूण सहा बुरुज असून त्यात ३८ तोफासुद्धा आहेत. असा हा अनवट किल्ला पाहताना क्षणोक्षणी मनात विचार येत होता की जंजिर्‍यासारखाच महत्त्वाचा असून ही हा दूर्गाधिराज दुर्लक्षित का? पर्यटक जंजिरा पाहायला आवर्जून येतात तर पद्मदूर्ग पाहायला का नाही?

अधिक चौकशी करता असे कळले की जंजिरा हे आज मोठे पर्यटन केंद्र आहे जे तिथल्या लोकांना आज मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देत आहे. तेथे वसलेले सिद्धीचे वंशज पद्मदूर्गाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. कारण पद्मदूर्गाला महत्त्व प्राप्त झाले तर त्याचा फायदा मुरुड गावास तसेच मुरुड समुद्र किनार्‍यावरील हिंदु कोळी बांधवांना होईल. ह्या सिद्धीच्या वंशजांना पद्मदूर्ग म्हणजे वैर्‍याचे अस्तित्व वाटते. वाईट इतकेच आहे की महाराष्ट्र शासन आणि स्थानिक आमदार-खासदार हे त्यांचीच पाठराखण करत आहेत. निदान शिवसेना आणि मनसे ह्यांनी तरी राज्यपातळीवर प्रयत्न करून पद्मदूर्गाला गतवैभव प्राप्त करून दिले पाहिजे. पद्मदूर्गावर बोटी लावण्यासाठी एक साधा धक्का बांधला तरी पर्यटकांचे पद्मदूर्गावर येणे जाणे चालू होईल आणि मुरुड गावाला त्याचा आर्थिक फायदा पण होईल.
पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ति हवी जी सध्यातरी दृष्टिक्षेपात नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात जंजिरेकरांचे असलेले आर्थिक वर्चस्व आणि हे वर्चस्व आले आहे जंजिरा किल्ल्याला भेट देणार्‍या पर्यटकांना लुटून.

"लुटून" हाच शब्द खरा आहे कारण किनार्‍यावरील दुकाने, किल्ल्यातील वाटाडे हे पर्यटकांकडून अवास्तव किंमती वसूल करतात. वाटाड्यांनी तर बोट मालकांच्या साथीने एकाधिकार निर्माण केला आहे. साधा किल्ला दाखवण्याचे आणि माहिती सांगण्याचे वाटाड्यांने आमच्याकडून रु. १२०० मागितले. इतके होऊनही श्री. सुशील जे एक स्थानिक आहेत आणि ज्यांनी आम्हाला पूर्ण मोहिमेत सोबत केली ते असे म्हणाले की हे वाटाडे (हबशी) सिद्धीचे थेट वंशज आहेत आणि जो इतिहास सांगतात तो केवळ सिद्धीच्या पराक्रमाचा सांगतात आणि त्यांच्या सोयीचाच सांगतात.
ह्या सर्व परिस्थितीत मराठी इतिहास प्रेमी सर्व भारतीयांना एकच करणे शक्य आहे आणि जे अत्यंत आवश्यक सुद्धा आहे ते म्हणजे पद्मदूर्गावर आवर्जून आणि वारंवार जाणे. एकदा का राबता वाढला की शासनाला पण नाईलाजाने पद्मदूर्गावर जाण्यासाठी धक्का तसेच नौका-सेवा द्यावीच लागेल. ह्यामुळे मुरुडकर एतद्देशीयांना पण लाभ होईल.

Photo courtesy - www.shivchhatrapati.com

Thursday, 10 March 2011

Asha, police and me


Last year, I said to my uncle that I am thinking to buy a scooter since reaching my workplace in share rickshaw is quite dangerous as cab drivers put 4-5 people in Rickshaw and drive speedily (The conversation was in Marathi). 

My uncle said, it seems Thane police is HATBAL (feeble) against the cab drivers. I said, they are not HATBAL (feeble) but they are HAPTA-ABAL (Weak or passive because of being bribed).  
It was just a habit of us to play with words as the language lovers and that time I did not have any harsh opinion about police as today also since I strongly feel that police is a part of a society and most of the people in the society are opting for easy money nowadays. Why to blame police alone? I also feel that Maharashtra Police is still far better than rest of India.

Incidentally, last Sunday, I had been to a well known garden, along with my nephew. Since it was Sunday, the garden was quite crowded especially with tourist from other states. While roaming, I found a child crying out loudly and I lifted him. I tried to console him by wiping his tears and tried all the Indian language that I know. Also, inquired with other spectators. All of a sudden, felt that I should hand him over to Govt. Authority since it is not wise to carry unknown child for a long period. And fortunately, I saw a policeman. I had gone to him and handed him the child and started for the bus. Within a minute or two, a man came running to the police and said that it is his child. And that child also stopped crying since that man said something to that child in his colloquial Gujarati. Undoubted, that man was his father. 

The policeman asked the father to come to police station and sign the documents to take charge of the child. And a Young Turks walking behind me said abruptly, “Apane hi bachche ko lene ke liye, gaya bechare ka do sau” (that the father has to bribe Rs. 200/- to take charge of his child). This was something that I wasn't expected.

I ran to the policeman and talked to him and ask him to handover the child to his father. Firstly, he kept on saying that it is a legal process. But at the end, because of my constant polite plea, he handed over the child but I could see clearly disappointment of losing money on his face. He said, “Madam, because of you I am handing over this child to his father.  If anything is wrong, you will be responsible”.  
_____________________________________________________________________________________

I just read some comments about Asha Bhosale’s remark on the Police on FB and it reminded me these incidents. 

(Also, I must mention, while talking to that child, I used Aai, Amma, Maa, Maai and all the known words for mother but he did not respond and the policeman said, "Teri Mommy kidhar hain? (Where is your Mommy)" and the child started crying loudly, Mommy, Mommy. It didn’t strike using the word MOMMY. It seems, I am lagging behind the world).

Friday, 20 August 2010

कोबीची वेगळी भाजी


जिन्नस

* साखर,
* मीठ,
* ओले खोबरे,
* फोडणी साहित्य,
* अर्धा किलो कोबी,
* आले

मार्गदर्शन

अर्धा किलो कोबीच्या सळप्या (फ्राईड राईसमध्ये घालतो तसे उभे लांबट तुकडे) काढाव्यात.


फोडणी - मंद आचेवर कढईत अर्धी वाटी तेलात प्रथम मोहरी तडतडवावी. तडतडण्याचा आवाज
थांबलाकी लगेच उडिद डाळ घालावी. ती लालसर झाली की त्यात ४-५ पाने कढीलिंब, एक कमी
तिखट मिरचीमध्यात चिरून, अर्धा चमचा जिरे, हळद थोड्या थोड्या वेळाने घालावे.

मग चिरलेला कोबी घालून उलथण्याने हे मिश्रण नीट सारखे करावे. मग अर्धा इंच आले नीट
ठेचूनत्यात घालावे. सोबत चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर घालावी. ५ मिनिटे कढईला पूर्ण
झाकेलअसे झाकण घालून मंद आचेवर ही भाजी शिजू द्यावी. मग झाकण काढल्यावर कोबीला
पाणीसुटलेले दिसेल. मग उलथण्याने भाजी पुन्हा पुन्हा खालीवर करावी आणि कोबी पारदर्शक
दिसलाकी विस्तव बंद करून त्यावर ओले खोबरे पेरावे.

आता भाजी खायला घ्यावी.

टीपा
कोबी अर्ध कच्चा शिजवावा. तो जास्त शिजला तर भाजी छान लागत नाही. मिरच्या २ पण
घातल्या तरी चालतात पण आल्यामुळे भाजी जास्त तिखट व्हायची पण शक्यता असते.

भाजी झाली की ती कढईच्या बाजूंना थोडी वर चढवून ठेवावी. फोडणीचे तेल कढईच्या खोलगट
भागातजमा होते. ही बिनतेलाची भाजी वरच्या वरती काढून घ्यावी व निथळून आलेल्या तेलात
जाड पोहे घालावेत. हे जाड पोहे भाजून, साखर, मीठ, फरसाण, खोबरे घालून खावे.

हीच भाजी पुरीच्या सारणात भरून कोबीच्या करंज्या पण करता येतात. ह्या भाजीत वाटाणे घालणे
ऐच्छिक आहे.

माहितीचा स्रोत
घर

Original post : कोबीची वेगळी भाजी

खाद्यविवेक

माझ्या एका मावशीला वाटते की तिने अभिमन्युप्रमाणे गर्भावस्थेतच वैद्यकशास्राचे ज्ञान घेतलेले आहे. वेगवेगळी वैद्यकशास्राची पुस्तके वाचणे आणि सतत आहार बदल आणि निरनिराळी औषधे घेणे तसेच लोकांना मोफत वैद्यकीय सल्ले देणे ह्या गोष्टी ती इमाने इतबारे करीत असते. काही वर्षापूर्वी तिला किरकोळ सांधेदुखी चालू झाली. ती बरी होईना. शेवटी तिने नाईलाजाने एका वैद्यांचा सल्ला घ्यायचे ठरवले.

वैद्यांकडे गेल्यावर तिने तिची अद्भूत वैद्यकज्ञानाची पोतडी उघडली. वैद्यांनी शांतपणे तिचे सर्व प्रवचन ऐकून घेतले आणि मृदू आवाजात विचारले, तुम्ही तेल आणि तुप किती खाता?

त्यावर तिने आपण पाण्यात कशी कणीक भिजवतो आणि भाज्या कश्या बिनतेलाच्या करतो हे अभिमानाने सांगितले. तुप खाणे तर तिने केव्हाच सोडून दिले होते. त्यावर त्या वैद्यांनी तिला एकच सल्ला दिला. चौरस आहाराचा भाग म्हणून तेल, तूप खात जा आणि जे सांधे दुखतात त्याना हळुवारपणे तीळाचे तेल चोळत जा. काही महिन्यातच तिची सांधेदुखी थांबली. तेल, तुप ह्या इंधनांनी आपले काम चोख बजावले होते. ही सत्यघटना आहे.

त्यानंतर तिने कणीक भिजवताना गोडे तेल, तीळाचे तेल, एरंडेल, सूर्यफुलाचे तेल, मेथीचे तेल एकत्र घालायला सुरवात केली.

आज बऱ्याच वर्षांनी ही गोष्ट आठवायचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात आमचे कुटुंब वैद्य श्री. शेंडे मला सहज म्हणाले, तेलकट खा, तुपकट खा पण तळकट खाऊ नकोस.

त्यांच्या म्हणण्यानुसार पोळी, भाजी, आमटी ह्यात आवश्यक तेव्हढे तेल, तूप नक्की खावे. तसेच चटणीबरोबर कच्चे तेल घेण्याची पद्धत आहे ती पण योग्यच आहे. मात्र तळकट पदार्थ उदा. वडे, भजी इ. जमेल तितके टाळावेत. कारण वडे, भजी वैगरे करताना एकच तेल वारंवार तापवतात, त्याला धूर येतो.

घराबाहेर उपाहारगृह, फेरीवाले यांच्याकडे खाताना सुद्धा शक्यतो मिसळ, पाणीपुरी, भेळपुरी, टोस्टेड सँडविच इ. इ. खावे. याला अनेक कारणे आहेत. १) मुगाच्या पाणीपुरीत मोड आलेले कडधान्य, पुदिना, सैधव मीठ, कोथिंबीर इ. असते. पांढऱ्या वाटाण्याच्या पाणीपुरीपेक्षा मुगाची पाणीपुरी मागवावी. २) मिसळीत तर अनेक मोड आलेली कडधान्ये असतात. ३) साध्या सँडविचपेक्षा टोस्टेड सँडविच चांगले तरी शक्यतो पाव टाळलेलाच बरा. ४) ऐकिव माहिती अशी आहे की अनेक महागडे फरसाणवाले आपले फरसाण एका तेलातून काढतात आणि नंतर ते तेल वडेवाले विकत घेतात. ५) अनेकदा गरम केलेले तेल शरीराला घातक.

माझ्या ओळखीतील एकजण महिन्यातून एकदा रत्नागिरीहून मुंबईला येतात. येताना रत्नागिरी रेलस्थानकावरील एका ठेल्यावर पाव, बटर विकत घेतात आणि ओळखीमुळे तो ठेलावाला त्यांना वड्याची चटणी मोफत देतो. मग हे प्रवासात बटर, चटणी, पाव खातात आणि जोडीला कोकण रेल्वेतील चविष्ट टॉमॅटो सूप पितात.

ह्याचा अर्थ वडे, भजी खाऊच नयेत असे नाही पण प्रमाण कमी करावे किंवा हे पदार्थ घरी करून खावेत. कारण वडे, भजींचा जो मोह टाळतो त्याला जितेंद्रियच म्हणावे लागेल. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचे ते कामच नव्हे.

पण निदान पावसाळ्यात तरी बाहेरचे वडे आणि भजी ह्यांचे प्रमाण कमी करणे सहज शक्य आहे. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे भजी घरी करून खावीत म्हणजे वांग्याची, पालकाची, पनीरची, शिराळ्याची, दुधीची, चुक्याची आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे शिळ्या, उरलेल्या भाजीची भजी असे त्यात वैविध्य आणता येते.

बाहेर मिळणार आहेत का अशी छान छान भजी?

Original post: खाद्यविवेक

अनोखे वंशवृक्ष

कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्‍यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा.

मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या दोन्ही बाजूला काट्याकुट्या रोवून तिमक्काने जीवापाड जपलेल्या रोपट्यांचे आता डेरेदार वटवृक्ष झाले आहेत. बाजारात सुमारे ८५ कोटी रुपये इतकी किंमत असलेले हे वृक्ष वनविभागाने नुकतेच आपल्या ताब्यात घेतले. त्या बाजारभावाचा विचार कधी न तिमक्काच्या मनाला शिवला, न आज हयात नसलेल्या बिक्कालुच्या.


तिमक्काला नुकताच पंतप्रधानांच्या हस्ते सामाजिक वनीकरणासाठीचा राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देण्यात आला. कुणाही कृतार्थ आईने म्हणावं तशी तिमक्का त्यावेळी म्हणाली, "त्यांना मोठ्ठं होताना पाहणं ह्यातच माझे सुख आहे".

- मटा १९९५

Original post : अनोखे वंशवृक्ष

देसी अभियांत्रिकी

१) माझ्या सीपीयू मध्ये जर चुकून सीडी ठेवायची विसरले आणि सीडी प्लेयरचा खाचा (स्लॉट) रिकामा राहिला तर तो इजेक्ट बटन दाबला तरी बाहेर येत नाही. तो सहज बाहेर यावा ह्यासाठी माझ्या हार्डवेयर अभियंत्याने अगदी सोपी युक्ती सांगितली आहे. प्रत्येक सीडी ड्राईव्हवर इजेक्ट बटनाशेजारी एक उघडझाप करणारा छोटा दिवा असतो. त्या दिव्याच्यावर एक बारीक भोक असते. त्या बारीक भोकात सहज जाईल अशी पण टाचणीपेक्षा जरा जाड तार घालायची आणि तिच्या टोकाला किंचित दाब द्यायचा आणि त्याच वेळी इजेक्ट बटन दाबत राहायचे. ती तार हळू हळू आत जाते आणि सीडी खाचा बाहेर येतो.

२)आमच्या इथे एक दुग्धशाळा आहे. तिथे विशाल औद्योगिक शीतयंत्रे आहेत. त्या शीतयंत्रात पाणी भरतात आणि त्या पाण्यात मोठे दुधाचे कॅन ठेवतात. सतत हे वजनी कॅन ठेवत राहिल्याने त्या शीतयंत्राच्या पत्र्याला तळाला बारीक छिद्रे पडतात आणि त्यातून पाणी झिरपते. त्यावर तिथल्या गवळ्यांनी एक सोपा उपाय काढला आहे आणि तो म्हणजे जास्ती चिकटपणा असलेल्या मातीची वस्त्रगाळ पूड करायची आणि ती वस्त्रगाळ पूड हलक्या हाताने त्या पाण्यात सोडायची. मग ती वस्त्रगाळ पूड सावकाश तळाला जाते आणि त्या छिद्रांमध्ये जाऊन घट्ट बसते आणि ती छिद्रे कायमची बुजतात.

असे हे देसी अभियांत्रिकी (Engineering), केवळ आपल्या पैशाचीच बचत करते असे नाही तर वस्तुंच्या पुनर्वापरामुळे आणि टिकाऊपणामुळे पर्यावरणाचे पण संरक्षण करते. कारण एकदा वापरा आणि फेकून द्या (Use & Throw) ह्या विकृतीमुळे पर्यावरण ढासळत चालले आहे.

Original post : देसी अभियांत्रिकी

दही बटर

जिन्नस

* साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे भुकटी, चाट मसाला
* बटर
* दही

मार्गदर्शन

घट्ट दही प्रथम थोडेसे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे. त्यात रुचीप्रमाणे साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे यांची भुकटी, चाट मसाला घालावे. पुन्हा थोडे एकजीव करावे.


मग कोमटपेक्षा थोडे गरम पाणी करावे, वाडग्यात घ्यावे आणि बटर (खारी बिस्किट कुटुंबातले) एकावेळी २-३ त्या कोमट पाण्यात तळाकडच्या बाजूला बुडवावेत. तो भाग किंचित मऊ झाला असे वाटले की बटर पालथे करून शिखराचा भागसुद्धा मऊ करून घ्यावा.
दोन्ही भाग पुरेसे मऊ झाले वाटले की एक एक बटर दोन हातांच्या तळव्यात चेपून दह्यात घालावा. मराठमोळे दहीवडे तयार. सर्व साहित्य असेल तर हा पदार्थ सातव्या मिनिटाला तयार.
टीपा
१) बटर शक्यतो मध्यम आकाराचे चांगल्या प्रतिचे असावेत (जिरे बटर). २) पाणी जास्त गरम असले तर हात भाजतो आणि कमी गरम असेल तर ४-५ बटर मऊ होईपर्यंत थंड होते. ३) पहिला प्रयत्न मनाजोगा झाला नाही तर नाउमेद होऊ नये. २ ऱ्या -३ ऱ्या वेळेपासून सर्व नीट जमून येते. ४) लहान मुलांना आवडते. पण बरेचदा करू नये कारण बटर मैद्यापासून बनविलेले असतात. मजा म्हणून महिन्यातून १-२ वेळा हरकत नाही. ५) पाहुण्यांना देताना थोडी बुंदी, लाल डाळिंबदाणे पेरून द्यावेत. ६) बटर फार वेळ पाण्यात किंवा दह्यात ठेऊ नयेत. लगेच पोटात टाकावेत नाही तर ते पाणी शोषून घेतात आणि फुगून पानचट लागतात.
माहितीचा स्रोत
घर

Original post : दही बटर

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ६)

विष्णुपंतांचे शब्द प्रांताच्या पाठीत बुक्क्या बसल्याप्रमाणे बसून तो नरमून म्हणाला, "मग आम्ही काय करावे म्हणता?"


"तुम्ही सरकार आहात." पंत ठासून म्हणाले, "हा दुष्काळ निवारा. साथीचा बंदोबस्त करा आणि लोकांना दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढा."


विष्णुपंत बोलत होते, लोक ऐकत होते, प्रांत ऐकत होता. सर्वत्र शांतता निर्माण झाली. पंत क्षणभर थांबले. प्रांत काहीच बोलेना.


तो निरुत्तर झाल्याचे लक्षात येताच पंतानी बजावले, "साहेब, हे लोक मढी नाहीत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार त्यांच्यावर काबू करू शकत नाही."


एकाएकी प्रांत चटकन् उठला. त्याच्या रागीट चेहर्‍यावर हास्य तळपले. त्याने पंतांचा हात हातात धरून म्हटले, "आम्ही तुमचे वय आणि दर्जा लक्षात घेतले नाही म्हणून राग मानू नका. आम्ही दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू."


विष्णुपंत शांत झाले. त्यांनी मुरावर नजर फेकली. मुराच्या सुटकेचा हुकुम प्रांतसाहेबांच्या मुखातून पोलिसांच्या कानात शिरला. मुराची बेडी निखळली. लोकांनी नि:श्वास टाकला. सर्व नजरा पंतांवर स्थिर झाल्या.


तो काळ गेला, तो दुष्काळ गेला, ते विष्णुपंतही गेले. पण विष्णुपंतांचे शब्द अजूनही लोक विसरले नाहीत. कोणीही विसरू नयेत इतके खोल माणसांच्या हृदयांत ते घर करून बसले आहेत. कधी कधी ते कानात गुणगुणू लागतात

- "तुम्ही जगलंच पाहिजे!".


(समाप्त)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ६)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ५)

हातापायांची आग झाल्याप्रमाणे पंत चुळबुळ करत सभोवार पाहू लागले आणि प्रांत गोंधळून म्हणाला, "पंत तुम्हाला म्हणायचंय काय?"


"मग ऐका तर" पंत निर्भीडपणे खणखणीत आवाजात बोलू लागले, "साहेब, माझा गाव दुष्काळाच्या छायेत असून लोक कुरडूचा पाला खात आहेत आणि साथीच्या रोगाने घरे बसत आहेत हे सर्व मी तुम्हाला कळविले होते की नाही?"


पंतांच्या सरबत्तीने प्रांत चमकला. तो मटकन् खुर्चीवर बसला. "खरं आहे" तो पुटपुटला.


"मग उत्तर का दिले नाही?" पंत वेड्यासारखे ओरडले.


"उत्तर दिले नाही म्हणून लोकांनी अराजकता माजवावी, लुटालुट करावी हे आम्हाला मान्य नाही" प्रांत खेकसला.


पंत भाला भोसकल्याप्रमाणे बिथरून ओरडले, "मग काय मान्य आहे? लोकांनी कुत्र्याच्या मौतीने मरावे? साहेब, मलाही हे मान्य नाही."


"मग काय मान्य आहे?" प्रांत किंचाळला, "लुटालुट आणि बेबंदशाही?" त्याने चावडी डोक्यावर घेतली.


"ह्याला उत्तर होय!" पंत गंभीरपणे उद्गारले.


"ठीक आहे, करा लुटालुट, आम्ही आरोपींना घेऊन आताच सातार्‍याला जातो" प्रांत डोळे बारीक करून म्हणाला.


त्यावर पंत निर्भयपणे म्हणाले, "जा, खुशाल जा. पण लवकर परत या."


"का, कशाला?" प्रांत चमकून म्हणाला.


"मला, - विष्णुपंताला अटक करायला" पंतांनी उग्र आवाजात तंबी दिली.


"म्हणजे तुम्ही स्वत: लुटालुट करणार तर?" प्रांताने विचारले.


पंतांनी उपरण्याने कंबर बांधली. प्रांतावर करडी नजर रोखली आणि मान उंचावून उत्तर दिले, "साहेब, जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला एक तर कुत्र्याच्या मौतीने मरावे लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावे लागेल आणि मी कुत्र्या सारखा मरणारा माणूस नाही साहेब!"


(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ५)