Wednesday, 14 October 2009

काही साहित्यिक भोग

स्थळ : पुणे शहरातील एक बस स्टॉप.
पात्रे : खडूस ह्या शब्दाखेरीज दुसरा शब्द सापडू नये असल्या नमुन्याचे सत्तरीच्या घरातले गृहस्थ. मी त्यांच्या बाजुला जाऊन रांग धरतो. आश्चर्य म्हणजे रांग नाही. आम्ही दोघेच. काही क्षण ते गृहस्थ मला खालपासून वरपर्यंत न्याहाळतात. मी समोरच्या करांडे टेलर्स चे करांडे एका लठ्ठ गृहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचे सुखद दृश्य पाहण्याचा बहाणा करतो.

इतक्यात कानावर आवाज...

ते उपाख्य बाजी गणेश जोशी : दशभुजा गणपतीचे देऊळ कुठे आहे हो?
मी : काही कल्पना नाही बुवा?
बा.ज.गो. : पुण्यातच राहता ना? (ह्या त्यांच्या प्रश्नावरून ते पुण्यात राहतात हे लक्षात आले.)
मी : हो.
बा.ज.गो. : किती वर्षे?
मी : बरीच.
बा.ज.गो. : काय व्यवसाय?
मी : पुस्तके वैगरे लिहितो.
बा.ज.गो. : म्हणजे साहित्यिक आणि तरीही तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठौक नाही?
मी : आपण कुठल्या गावाहून आलात?
बा.ज.गो. : मी कशाला कुठल्या गावाहून येतोय? इथेच जन्मलो आणि इथेच मरणार.
मी : ('कधी' हा प्रश्न गिळून) इथेच मरणार कशावरून?
बा.ज.गो. : दशभुजा गणपती ठौक नाही हे सरळ सांगा. आमच्या मरणाची काळजी करू नका. तुम्हाला काही मी खांद्याला बोलावणार नाही.
मी : खांद्याची आमंत्रणं काय स्वत: मृतांच्या सहीने जातात वाटतं?
बा.ज.गो. : हे पहा, तुम्ही साहित्यिक असल्याने भाषाप्रभुत्व हा तुमचाच जन्मसिद्ध हक्क मानायची गरज नाही. मी देखील पुण्याचाच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून स्वत:ला साहित्यिक म्हणवणार्‍या माणसाला दशभुजा गणपती ठौक नसावा? ही तुमची समाजाविषयी आस्था... उद्या शनवारवाडा ठौक नाही म्हणाल, परवा पर्वती ठौक नाही म्हणाल.
मी : तुम्हाला तरी कुठे ठाऊक आहे दशभुजा गणपती?
बा.ज.गो. : ठौक आहे.
मी : मग मला कशाला विचारताय?
बा.ज.गो. : तुम्हाला ठौक आहे की नाही ते पाहायला.
मी : पण दशभुजा गणपतीशी माझा काय संबंध?
बा.ज.गो. : सांगतो. 'पुणे शहरातील ढासळती धर्मभावना' ह्या विषयावर लेखमाला लिहितोय मी. ह्या स्टॉपवर सकाळी सात पासून उभा आहे मी. बेचाळीस लोकांत दशभुजा गणपती ठौक असलेला केवळ एक निघाला. पण त्या देवळासमोर त्याचे ष्टो दुरुस्तीचे दुकान आहे अकरा वर्षे. कधी आत दर्शनाला गेला नाही.
मी : म्हणजे दशभुजा गणपती फक्त पत्त्यापुरता.
बा.ज.गो. : हीच तर ट्रॅजेडी. देवळांचा उपयोग पत्त्यासाठी? एकदा आम्ही विचारले, डॉ. मंजुळाबाई सपाते प्रसुतीगृह कुठे आहे? तर एक गृहस्थ म्हणाला, 'सोमण मारुतीपुढे!' अरे काही सारासारविवेकबुद्धी? अरे निदान प्रसुतीगृहाच्या पत्त्यासाठी तरी मारुतीराया वापरू नका ! काय?
मी : खरे आहे.
बा.ज.गो. : एक साहित्यिक म्हणून तरी देवळात जाणे तुम्ही तुमचे कर्तव्य मानता की नाही?
मी : (देवावर भार घालून) मानतो तर...
बा.ज.गो. : मग जाता का?
मी : दशभुजा गणपतीला जात नाही.
बा.ज.गो. : I'm not particular about this Ganpati or that. (रिटायर्ट म्हातारा भडकला की इंग्रजीत फुटतो.) Any temple for the matter of that. (प्रत्येक 'द्याट' वर पाय आपटून) रोज जाता?
मी : (देवा! क्षमा कर. आपली जेव्हा भेट होईल तेव्हा खुलासा करेन.) हो. रोजच म्हणायला हरकत नाही. बा.ज.गो. : मला 'होय की नाही' चा रकाना भरायचा आहे. हो किंवा नाही.
मी : (Forgive me Oh Lord!) हो. (आता हे खोटे नाही. रोज रात्री गुडकुले विठोबाच्या देवळात काणे भटजी, विठोबा टेलर, सोपानराव हेयरड्रेसर आणि मी वरच्या नगारखान्यात रमी खेळतो. एक पैसा, शंभर पाँईंट. आषाढी कार्तिकीला काणे भटजी पाँईंट वाढवा म्हणतात पण आम्ही ऐकत नाही).
बा.ज.गो. : एक साहित्यिक ह्या दृष्टीने तुमची धर्मावर श्रद्धा आहे की नाही?
मी : श्रद्धा ही वस्तुच मुळी देव आणि धर्म ह्यांच्यावर ठेवायला तयार केली आहे असे माझे मत आहे.

(गोल पोटावरून तळव्यापर्यंत प्यांटीचं माप घेताना समोरच्या करांडे टेलर्सने टेप बेंबीपासून ओळंबा धरावा तशी सोडली आहे. हे मोहक दृश्य पाहायला मला उसंत न देता...)
बा.ग.जो. : तुम्ही सरळ हो की नाही सांगा.
मी : हो. कारण धर्मावर श्रद्धा ठेवायची नाही तर काय मुन्सिपालटी, जिल्हाबोर्ड, बसवाले, हॉटेलवाले ह्यांच्यावर ठेवायची ?
बा.ग.जो. : तुम्ही कृपा करून वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल असे उत्तर द्या. शेवटी प्रश्नचिन्ह नको.
मी : (मुकाट्याने) बरं.
बा.ग.जो. : आता सांगा धर्मावर तुमची श्रद्धा आहे की नाही ?
मी : यथेच्छ श्रद्धा आहे कारण धर्म नसता तर दसरा, होळी, दिवाळी, नारळी पौर्णिमा म्हणजे पुरणपोळी, कडबू, मोदक बघायला सुद्धा मिळाले नसते. सत्यनारायण नसता तर असला शेराला सव्वाशेर तुपाचा शिरा खायला मिळाला नसता.
बा.ग.जो. : तुमच्या बोलण्यात थट्टेचा सूर आहे. धर्म काय शिरा खाण्यासाठी आहे? (इथे बा.ग.जो. नी शीरा ताणून हा प्रश्न विचारला).
मी : शिर्‍याशिवाय सत्यनारायण करून दाखवा, होडी बुडेल.
बा.ग.जो. : तो शिरा नसतो, प्रसाद असतो.
मी : सत्यनारायणाला खारीक वाटता येणार नाही. प्रसाद म्हणून सुद्धा. माफ करा, पण तुम्ही मला छुपे कम्युनिस्ट दिसता. (होतकरू साहित्यिकांस सूचना : अधून मधून अशी टफ लाईन स्वीकारावी. कम्युनिस्ट कसे बिगर कम्युनिस्टांना प्रतिक्रांतिवादी म्हणतात तीच स्टाईल.)
बा.ग.जो. : मी कम्युनिस्ट ? दशभुजा गणपती कुठे आहे हे तुम्हाला ठौक नाही आणि मी कम्युनिस्ट ? मी : (पुण्यात नव्या एका देवाला जन्म देत) झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगा पाहू ?
बा.ग.जो. : झोपाळू नरसोबा ? पहिल्यांदाच ऐकतोय.
मी : झोपाळू नरसोबा पहिल्यांदाच ऐकताय काय? अरेरे. प्रश्न आला. झोपाळू नरसोबा सारख्या जागृत देवाचे नाव पहिल्यांदाच ऐकताय हे ऐकून आश्चर्य वाटलं. जाऊ द्या मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघाले आहेत. (होतकरू साहित्यिक प्लीज नोट : वादाच्या प्रसंगी प्रतिपक्षाने न केलेल्या मुद्द्यांवर जोर द्यावा.) सत्यनारायणाला खारका ? उद्या गोकुळाष्टमीला केक वाटाल..
बा.ग.जो. : तुम्ही हे कोणाला सांगता आहात?
मी : तुम्हाला ! इथे दुसरे आहे कोण? सॉरी, दुसरे कोणी नाही. पूर्णविराम.
बा.ग.जो. : तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. आपण राहता कुठे ?
मी : (मी इथे खरी कसोटी आहे. डिटेलवार पत्ता देऊन गोंधळात टाकायच्या शास्त्राचा अभ्यास असल्याखेरीज ह्या कसोटीला उतरता येणार नाही.) तुम्हाला झोपाळू नरसोबा ठाऊक नाही, बरं रेडेकर तालीम तरी ठाऊक असेल !
बा.ग.जो. : ती कुठेशी आली ?
मी : रविवारात. घाणेकरांच्या कोळश्याच्या वखारीला लागून.
बा.ग.जो. : काढीन शोधून. घाणेकर तालीम...
मी : घाणेकर तालीम नाही घाणेकर कोळश्याची वखार. त्याला लागून रेडेकर तालीम. रास्ते वाड्यावरून खाली या सरळ (इथे खाली येणे ह्याचा हवा तसा अर्थ घ्यावा). तिथे घाणेकर कोळश्याची वखार विचारा. तिथे घाणेकरांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठेशी राहतात? पापडवाल्या बेंद्र्यांच्या वाड्यावरून गल्ली जाते. तिच्या टोकाला माशेलकर बखळ (गल्लीला दोन टोके असतात ते विसरणे). माशेलकर बखळीत विचारायचे संपतराव लाँड्री कुठे आहे?
बा.ग.जो. : जरा सावकाश सांगा मी लिहून घेतो आहे. आताशा कापडवाल्या बेंद्र्यांच्या पर्यंत आलेलो आहे. मी : कापडवाले बेंद्रे नाहीत पापडवाले बेंद्रे. तिथे सोवळ्यातले पापड मिळतात. मग माशेलकर बखळ, मग संपतराव लाँड्री. (बस येईपर्यंत बा.ग.जो. ना घुमवायच्या बेताने) संपतराव लाँड्रीत सोनार आहेत का विचारायचे. ते तुम्हाला भोरप्यांचा वाडा दाखवतील.
बा.ग.जो. : भोरप्यांचा ? थांबा, जरा सावकाश सांगा.
मी : सावकाश काय सांगा, बस आली म्हणजे?
बा.ग.जो. : बस कशी येईल ?
मी : म्हणजे?
बा.ग.जो. : हा बस स्टॉप क्यान्सल झाला आहे.
मी : काय म्हणता ? बा.ग.जो. : अहो ! पंधरा दिवस झाले हा वनवे झालेला आहे. इकडून प्रवेश बंद. एकतरी बस इथून येऊन तिथे गेली का?
मी : मग मघाशी का नाही सांगितलत?
बा.ग.जो. : वा ! मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो, साहित्यिक असून तुम्हाला गावातले वनवे ठौक नाहीत. कमाल आहे. काय नाव तुमचे ?
मी : (स्वत:चे नवीन बारसे साजरे करत) गोविंद गोपाळ दहिभाते.
बा.ग.जो. : आजच हे नाव ऐकतोय.
मी : मी सुद्धा! (बा.ग.जो. शुद्धीवर आहेत की बेशुद्ध आहेत ते न पाहता मी सटकतो. तात्पर्य : देवावर भार घालून सुद्धा भोग सुटतातच असे नाही.)

लेखक - पु.ल. देशपांडे.

Sunday, 27 September 2009

ठकास महाठक

ठाण्यामध्ये श्री. कखग नावाचे एक मराठी लघु उद्योजक आहेत. त्यांचा कारखाना ज्या उद्योगभवनात आहे तिथे असलेल्या इतर ११ कारखान्यांचे मालक हे अमराठी आहेत. हे सर्व अमराठी मालक सदैव संघटित असतात. विशेषतः कामगारांचे शोषण करणे, चोरून वीज वापरणे, सरकारी कार्यशाळा निरिक्षकाला (फॅक्ट्री इंस्पेक्टरला) लाच देणे, शनिवारी रात्री मद्यपानी मेजवान्या झोडणे ह्या बाबतीत त्यांची मते एकमेकांशी जुळतात. श्री. कखग ह्या गटात मोडत नसल्यामुळे थोडेसे वेगळे पडतात.

तर सांगायची गोष्ट ही की दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी स्थानिक शाखेतील मावळे त्या उद्योगभवनात येऊन उत्सवासाठी काही प्रोत्साहनपर रक्कम (देणगी / खंडणी) घेऊन जातात. श्री. कखग यांची पद्धत अशी होती की ते इतर ११ मालकांकडून प्रत्येकी रु. १००/- घेऊन, घासाघीस करून, गोड बोलून मावळ्यांना रु. १५०० ऐवजी रु. ११००/- मध्ये पटवायचे आणि चहा-नाश्ता देऊन कटवायचे. ते स्वतःचे पैसे घालत नसत. कारण आपले पैसे केवळ सुरवाणी, जिज्ञासा, हरियाली इ. चांगल्या संस्थांना देण्यासाठीच आहेत ह्या बद्दल त्यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती.

२-३ वर्षांनी इतरांना ह्या गोष्टीचा सुगावा लागला. त्यांनी सर्वांनी मिळून ठरवले की ह्या वर्षी श्री. कखग ह्यांना पैसे खर्च करायला लावायचेच. लगेच ते कखग यांच्याकडे आले व म्हणाले, "कखगभावु, ह्या वख्ताला गनेश फेस्टिवलासाठी पैसे सर्वानी वायले वायले देवुया. " कखग ह्यांनी मान डोलावली.

सालाबाद प्रमाणे जुलैमध्ये मावळे उगवले. लगेच कखग ह्यांनी त्यांचे चहा, नाश्ता देऊन प्रेमाने स्वागत केले. हवापाण्याच्या गप्पा केल्या. नंतर विनम्र स्वरांत म्हणाले की यंदा थोडी पद्धत बदललेली आहे. आम्ही सर्व लोक आपापले पैसे वेगळे देणार आहोत. हे माझे दीडशे रुपये घ्या.

पण एक सांगतो, इतर गाळेवाले उगाचच मंदीचे कारण सांगून पैसे द्यायला काचकुच करतील. हे काही बरोबर नाही. एऱ्हवी ह्यांच्याकडे पार्ट्या करायला भरपुर पैसा आहे. तुम्ही एक काम करा, प्रत्येकाकडून कमीत कमी अडिचशे घ्या, सोडू नका एकालाही. आपला उत्सव थाटामाटात झाला पाहिजे.

पुढे काय घडले ते सुज्ञांस सांगणे न लगे.

Tuesday, 28 July 2009

जंगले आहेत सुंदर, गुढ आणि घनदाट



















हिमाच्छादित संध्याकाळी जंगलाशी थांबणे - रॉबर्ट फ्रॉस्ट







Stopping by Woods on a Snowy Evening - Robert Frost








मला वाटते मला माहित आहे, ही कोणाची झाडे आहेत.
जरी त्याचे घर गावामध्ये आहे,
बर्फाच्छादित झालेली त्याची झाडे पाहण्यासाठी इथे
थांबलेल्या मला तो पाहू शकणार नाही.


Whose woods these are I think I know.
His house is in the village, though;
He will not see me stopping here
To watch his woods fill up with snow.



जवळपास कोणतीही झोपडी नसताना असे थांबणे
माझ्या शिंगराला हे नक्कीच तर्‍हेवाईक वाटेल,
(कारण) झाडी आणि गोठलेल्या तळ्याच्या मध्ये ती
संध्याकाळ आहे वर्षभरातील सर्वाधिक धुकटलेली.



My little horse must think it queer
To stop without a farmhouse near
Between the woods and frozen lake
The darkest evening of the year.




काही घोटाळा आहे का असे विचारण्यासाठी ते
खोगीराला जडवलेल्या घंटेला हलकेच झटका देते.
अन्य एकच आवाज सर्वत्र पसरलेला असतो, तो म्हणजे
हलक्या वार्‍याचा आणि खाली तरंगत येणार्‍या हिमपुंजक्यांचा.


He gives his harness bells a shake
To ask if there is some mistake.
The only other sound's the sweep
Of easy wind and downy flake.




ही जंगले आहेत सुंदर, गुढ आणि घनदाट
पण मला काही वचने पाळायची आहेत आणि
मैलोगणती जायचे आहे मी (काळ)झोप घेण्यापूर्वी
आणि मैलोगणती जायचे आहे मी (काळ)झोप घेण्यापूर्वी....


The woods are lovely, dark, and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.







Saturday, 25 July 2009

खेळ

मराठी भाषा शिकणे व शिकवणे हे दोन्ही कठिण आहे असे माझे ठाम मत आहे. उदा. आमची मुलगी मधील ‘च’ चा देशी उच्चार आमच़ा मुलगा मध्ये पर्शियन होऊन येतो. र्‍हस्व दीर्घाचे ’अनियमित’ नियम जाणून घेताना तर सर्वच मराठी जनांची फेंफें उडते, तिथे अमराठी जनांची काय कथा? इंग्रजी भाषा शिकताना जसे 'का' विचारणे व्यर्थ आहेच तशीच काहीशी स्थिती मराठी भाषा शिकताना होते. असे असताना गेल्या आठवड्यात योगायोगाने काही इंग्रजी माध्यमातील इ. ५-६-७-८ वीच्या विद्यार्थ्यांना अमराठी मुलांना मराठी शिकवायचा योग आला. 'हसत खेळत शिकविणे’ हे माझे तत्त्व असल्यामुळे एक गंमत म्हणून आपण लहानपणी खेळायचो तो ’नाव, गाव, फळ, फुल, रंग, प्राणी, पक्षी, खेळ, वस्तु’ हा खेळ घेतला. आधी मुलांना वाटले की हे सर्व इंग्रजीतून लिहायचे आहे. पण जेव्हा मराठी भाषेतील शब्द वापरायचे आहेत हे कळले तेव्हा त्यांचा विरस झाला. तरी पण त्यांनी नेटाने प्रयत्न करून, दिलेल्या संकेतांच्या आधारे बरेचसे शब्द शोधून काढले. त्यातल्या त्यात नाव, गाव, वस्तुंची नावे शोधणे त्यांना फारसे कठिण गेले नाही. मात्र ‘ह’ अक्षरावरून पक्षी शोधणे, ‘ब’ आणि ‘म’ वरूनफळे व रंग शोधणे, ‘र’ वरून खेळ शोधणे इ. इ. मला पण कठिण गेले. पुलंच्या ‘असा मी असामी’ चा पगडा असल्याने ‘ब’ आणि ‘म’ वरून रंग शोधायचा विचार आला तेव्हा मनात बैंगणी व मळखाऊ असे दोन शब्द रुंजी घालायला लागले. असो.

मला आठवलेली काही फळ, फुल, प्राणी, पक्षी, रंग व खेळ ह्यांची नावे सोबत देत आहे. त्यामध्ये आपणही भर घालावी ही विनम्र विनंती. तसेच काही शब्द मुद्दामच पांढर्‍या रंगात देत आहे. आपल्याला जमले तर आपण आधी आठवून पहा आणि आठवले नाहीच तर मात्र ते शब्द पहायला हरकत नाही.

वर्णफळफुलरंगप्राणीपक्षीखेळ
बोर, बदामबकुळबदामीबेडूक, बैलबगळा-
रामफळरातराणीराखाडी, राणीरेडा, रानगवा रानमांजरराघूरस्सीखेच
-हिरवा चाफाहिरवाहत्तीहोला, हळद्याहुतूतू
मोसंबेमोगरा, मल्लिकामोरपिशीमाकड, मगर, मांजर, म्हैसमोरमामाचं पत्र हरवलं..
खरबुज-खाकीखवले मांजर, खेचर-खो - खो
चिकूचमेली, चाफाचंदेरीचित्ताचिमणीचोरपोलीस
सीताफळ, सफरचंदसदाफुली, सोनचाफासोनेरी, सफेदसाळींदर, सरडा, ससासाळुंखी, ससाणासारीपाट
पिस्ता, पेरु, पपनसपारिजातपिवळा, पोपटीपांडा पोपटपकडापकडी
अननस, अंजीरअबोली, अर्किडअबोली, अंजिरी, आकाशीअस्वल अडईआंधळी कोशिंबीर

Wednesday, 8 July 2009

उपाय सुचवावा

मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (मुंमग्र) दादर शाखेची प्रथम बालविभागाची सदस्या होते व आता सामान्य विभागाची सदस्या आहे.

माझ्या लहानपणी दूरचित्रवाणी नावाचा सर्व मनोरंजनांच्या साधनांना भस्म करणारा असुर फारसा कोणाकडे नसल्यामुळे बालविभाग सुद्धा दणकून चालायचा. मनोरंजनाची अन्य साधने होती पण वाचनालयाला पर्याय ती होऊ शकत नव्हती.

कालांतराने ग्रंथालयाची बालविभागाची बरीच पुस्तके गहाळ झाल्यावर, वेगवेगळे सदस्य क्रमांक घेऊन झाल्यावर यथावकाश मी सामान्य सदस्या झाले. म्हणजे आता मोठ्यांच्या विभागात आले होते. इथे गुप्तेबाईंच्या सारख्या तत्पर व ग्रंथालय शास्त्रातील जणू संगणक असणार्‍या ग्रंथालय सेविका होत्या. पारायणेंसारखे त्यांना पण लाखो पुस्तकांच्यात कोणते पुस्तक कुठे ठेवले आहे, लेखक कोण, प्रकाशक कोण, मुल्य काय हे सारे तोंडपाठ असायचे. त्यावेळी सर्व ग्रंथालय सेविका उत्तम सेवा देत होत्या आणि आजही देत आहेत. तेही केवळ प्रतिदिनी रु. १/- इतक्या कमी सदस्य शुल्कात (ग्रंथालयाचे मासिक शुल्क रु. ३० आहे).

मात्र त्यावेळी माझा सदस्य क्रमांक ९०० च्या आसपास होता. तो दरवर्षी कमी होत होत आता चाळीसच्या आसपास आलेला आहे. बालविभाग तर नामशेष झालेला आहे. प्रौढांचा विभाग बहुतांशी पुस्तकांवर चालण्याऐवजी गृहशोभिका सारख्या मासिकांवर चालत आहे. अंदाजे लाखभर पुस्तके वाचकांची वाट पाहात आहेत. सर्व ग्रंथप्रेमींनी ह्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

बरेच जण म्हणतात की मुंमग्र ने आता इंग्रजी पुस्तके ठेवावीत. पण इंग्रजी पुस्तके वाचनासाठी ठेऊन मराठीचा वाचक वर्ग वाढेल असे म्हणणे फारसे सुसंगत आहे असे मला वाटत नाही. अर्थात असे होऊ पण शकेल, मला नक्की कल्पना नाही.

आपल्याला काही तर्कयुक्त विचार सुचतो का?

मला एक उपाय सुचतो तो म्हणजे शासनाने फिरते ग्रंथालय निर्माण करून मुंबईत ज्या मराठी शाळा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांच्या दरवाज्यापर्यंत ही पुस्तके न्यावीत तसेच उद्योगजगताला पुरक असणार्‍या पुस्तकांचे संच करून वेगवेगळ्या उद्योगांमध्ये ते तिथल्या चाकरवर्गाला देता येतील ह्यासाठी तिथे लघुशाखा निर्माण कराव्यात. उदा. दर आठवड्याला बँकेत अर्थशास्त्राशी संबंधित वेगवेगळी पुस्तके ठेऊन तिथल्या कर्मचार्‍यांना पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करणे.

असो. आपणही ह्या विषयावर चिंतन करावे व आपली मते मांडावीत.

Thursday, 11 June 2009

माहिती द्या

मी लहान असताना माझ्या बाबांनी आमच्या घरात टेलिफोन आणला. आमच्या आळीत आलेला तो पहिलाच टेलिफोन होय. मला अजूनही भिंतीवर लटकवलेले ते सुरेखसे चकाकणारे टेलिफोनचे यंत्र आठवते. एक लखलखीत झळाळता रिसीव्हर त्या चौकोनी यंत्राशेजारी लटकत असे. मी इतका लहान होतो की माझा हातच तिथपर्यंत पोहोचत नसे. पण मी आई त्यात बोलत असताना भारावल्यासारखा ऐकत असे.

एके दिवशी मला अनपेक्षितपणे शोध लागला - की त्या अद्भूत यंत्रात कोणीतरी एक आश्चर्यजनक व्यक्ती राहते. तिचे नाव होते "माहिती द्या" आणि तिला माहित नव्हते असे ह्या जगात काहीच नव्हते. ती कोणाचाही फोन नंबर देऊ शकत असे आणि कधीही बिनचुक वेळ सांगू शकत असे.

एकदा माझी आई शेजार्‍यांकडे गेली असता अचानकपणे माझा संबंध ह्या जादुच्या दिव्यातील परीशी आला. तळघरात हत्यारांशी खेळताना चुकून माझ्या बोटावर माझ्याच हातून हातोडी बसली. खरेतर वेदनेने अगदी कळवळायला झाले पण रडत बसण्यात काहीच अर्थ नव्हता कारण माझे डोळे पुसायला (सांत्वन करायला) घरात कोणीच नव्हते.

माझे ठुसठुसणारे, दुखरे बोट चोखत घरभर फिरताना अखेर मी जिन्यापाशी - टेलिफोनपाशी आलो !

मी तडक देवघरातील चौरंग आणायला धावलो आणि तो चौरंग ढकलत टेलिफोनखाली आणला. त्यावर चढून मी रिसीव्हर काढला व कानाला लावत म्हणालो, "माहिती द्या".

एक दोन बटने दाबली गेल्याचा आवाज आला आणि एक किनरा पण सुस्पष्ट आवाज ऐकू आला, "माहिती घ्या". "माझे बोट दुखत आहे" - मी हुंदके देत म्हणालो. ऐकणारे कोणीतरी असल्यामुळे डोळ्यातून लगेच अश्रु बाहेर पडायला लागले.

"तुझी आई घरात नाही का?" प्रश्न आला.
"घरात मी एकटाच आहे", मी रुद्ध कंठाने म्हणालो.
"बोटातून रक्त येत आहे का?"
"नाही", मी उत्तरलो, "माझ्या बोटावर चुकून हातोडी बसली आणि आता खूप दुखत आहे."
"तू फ्रिझ उघडून बर्फ काढू शकतोस का?", तिने विचारले. "हो"
"मग एक बर्फाचा तुकडा त्या दुखर्‍या बोटावर दाबून ठेव", ती म्हणाली.

त्यानंतर मी नेहेमीच सगळ्या काही गोष्टींसाठी "माहिती द्या" ला फोन करायला लागलो. मी तिला भूगोलाविषयी विचारले आणि तिने मला अरुणाचल कुठे आहे ते सांगितले, मी तिला गणिताविषयी विचारले. तिने मला मी नुकतीच बागेत पकडलेली खार फळे आणि शेंगदाणे खाते हे पण सांगितले.

मग एके दिवशी माझी आवडती पाळीव मैना गेली. मी "माहिती द्या" ला फोन करून ही दु:खद गोष्ट सांगितली. तिने ती गोष्ट शांतपणे संपूर्ण ऐकली व मोठी माणसे लहान मुलाची समजुत घालण्यासाठी जे काही बोलतात त्या पद्धतीचे ती बरेच काहीतरी म्हणाली.

पण माझे समाधान काही होईना. 'त्या सुस्वर आणि आमच्या सर्व कुटुंबाला आनंद देणार्‍या आकर्षक पक्षिणीचा असा दु:खद अंत का व्हावा? का तिने असे पिसे झडलेल्या अवस्थेत पाय वर करून पडावे?'

तिला माझ्या दु:खाचे गांभीर्य जाणवले असावे. ती पटकन म्हणाली, "पिंटू, लक्षात ठेव, इतरही अनेक जगे आहेत जिथे गाणे म्हणण्याची आवश्यकता आहे". मला आत कुठेतरी बरे वाटले.

नंतर एकदा मी फोन उचलून म्हणालो, "माहिती द्या" आणि आता तो ओळखीचा झालेला आवाज म्हणाला, "माहिती घ्या". मी विचारले, "स्टेशन शब्द इंग्रजीत कसा लिहायचा?".

हे सर्व घडले भारताच्या पूर्वेला एका छोट्याश्या शहरात. मग मी ९ वर्षांचा असताना आम्ही सुरतेला राहायला गेलो. मी खरोखरच माझ्या प्रिय मैत्रिणीला मुकलो. "माहिती द्या" केवळ त्याच जुन्या टेलिफोन यंत्रात राहात होती. सुरतेत आल्यावर कधीही चुकूनसुद्धा माझ्या मनात आमच्या दिवाणखान्यातील टेबलावर विराजमान झालेल्या नव्या टेलिफोनचा वापर करावा असे आले नाही.

पुढे जरी मी तारुण्यात प्रवेश केला तरीही मी त्या सुखद संवादाच्या मोहक आठवणी कधीही विसरू शकलो नाही. गोंधळलेल्या आणि शंकाकुल मनस्थितीत नेहेमी मला त्या प्रसन्न सुरक्षित करणार्‍या संभाषणाची आठवण येत असे. मला आता जाणवत होते की एखाद्या लहान मुलाच्या निरागस पण बालिश शंकांना उत्तरे देण्यासाठी वेळ देताना ती किती संयत, समजुतदार आणि प्रेमळ असणे गरजेचे होते ते.
नंतर काही वर्षांनी गुवाहाटीला उच्च शिक्षणासाठी जाताना मला कोलकत्याच्या विमानतळावर १५-२० मिनिटे थांबण्याची वेळ आली. मग मी सध्या तिथे राहात असलेल्या माझ्या बहिणीशी गप्पा मारल्या आणि तो फोन संपल्यावर नकळत पुन्हा फोन उचलून विचार न करता सहज म्हणालो, "माहिती द्या".

१-२ दा बटणे दाबली गेल्याचा आवाज आला आणि चमत्कार घडला, मी तोच ओळखीचा किनरा पण सुस्पष्ट आवाज पुन्हा ऐकला - "माहिती घ्या". मी काही ठरवले नव्हते पण सहज माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, "स्टेशन शब्द इंग्रजीत कसा लिहायचा?"

२ मिनिटे नि:शब्द शांततेत गेले आणि मृदु आवाजात उत्तर ऐकू आले, "एव्हाना तुझे दुखरे बोट बरे झाले असेल ना..."

मला हसू फुटले. "म्हणजे ती तूच आहेस अजूनही", मी म्हणालो, "तुला काही कल्पना आहे का तुझे माझ्याशी बोलणे हे त्या काळात माझ्यासाठी किती महत्त्वाचे होते ते?"

"तुला काही कल्पना आहे का?" ती म्हणाली, "तुझे माझ्याशी बोलणे हे त्या काळात माझ्यासाठी किती खास होते ते? मला कधीच मुलबाळ झाले नाही. मी आतुरतेने तुझ्या फोनची वाट पाहात असे." मी तिला सांगितले की कशी वारंवार मला तिची आठवण येत असे आणि मी तिला गहिवरून विचारले की परत कोलकत्याला येईन तेव्हा मी तिला फोन करू शकतो का?

ती म्हणाली, "जरूर कर आणि मी नसले तर सरोजिनी आहे का ते विचार". नंतर ३ महिन्यांनी मी काही कामानिमित्त कोलकत्याला परत आलो, ह्या वेळी एक वेगळाच आवाज माहिती देण्यासाठी पुढे आला. मी सरोजिनी आहे का असे विचारले.

"तू तिचा मित्र आहेस का?"
"हो, अगदी जुना मित्र".
"मला सांगायला वाईट वाटते पण सरोजिनी गेले काही महिने आजारपणामुळे आमच्याकडे अर्धवेळ नोकरी करीत होती. ती गेल्या महिन्यात वारली".

मी फोन ठेवणारच होतो पण तो आवाज म्हणाला, "एक मिनिट, तुझे नाव पिंटू आहे का?" मी हो म्हटले.

"असे असेल तर तुझ्यासाठी एक निरोप आहे. सरोजिनीने तो लिहून ठेवला आहे. मी वाचून दाखवते - त्याला सांगा, पिंटू, लक्षात ठेव, इतरही अनेक जगे आहेत जिथे गाणे म्हणण्याची आवश्यकता आहे. मला काय म्हणायचे ते त्याला नक्की कळेल".

मी तिचे आभार मानून फोन ठेवला. मला नक्कीच माहित होते की सरोजिनीला काय म्हणायचे होते ते.
___________________________________________________________________

मी जरी अनुवाद क्षेत्राशी संबंधित असले तरी आता पावेतो कधीही मराठी ललित साहित्याचा अनुवाद केलेला नव्हता. मात्र आज एक प्रयोग म्हणून एक अग्रप्रेषित हृद्य लघुकथा अनुवादित करत आहे. हा अनुवाद करताना थोडेसे स्थानिकीकरणाचे स्वातंत्र्य सुद्धा घेतले आहे. मूळ कथा इथे वाचता येईल. आपल्यापैकी कोणालाही जमले तर मी दिलेली कथा शब्दरचना, विशेषनामे आपल्या कल्पनेप्रमाणे, आवडीप्रमाणे बदलून इथे प्रतिसादात संपूर्ण घालावी व चांगला अनुवाद कसा करता येईल ह्याचा वस्तुपाठ घालून द्यावा ही विनंती.

Tuesday, 2 June 2009

नृशंस


माझे वडिल इझ्रायल प्रेमी असल्याकारणाने आमच्या घरात सर्वांत जास्त पुस्तके इझ्रायल, ज्यू, ज्यू तत्वज्ञान, दुसरे महायुद्ध ह्या संदर्भात होती. ना.ह. पालकरांचे "इझ्रायल, छळाकडून बळाकडे" मी अनेकदा वाचले. त्यावेळी मला दोन गोष्टींचा प्रचंड अभिमान वाटत असे - १) जगाच्या पाठीवर भारत हा असा एकच देश आहे जिथे ज्यू धर्मीयांचा केवळ ते ज्यू आहेत ह्या एका गोष्टीमुळे छळ झाला नाही. २) ना.ह. पालकरांच्या लिखाणाची दखल घेऊन त्यांना अभिवादन म्हणून इझ्रायलमध्ये एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले (लक्षात घ्या की इझ्रायल हा एक आकारमानाने महाराष्ट्राच्या १/३ देश आहे).


त्यानंतर वि. ग. कानेटकरांचे "इझ्रायल, युद्ध, युद्ध आणि युद्धच" हे पुस्तक वाचले. इझ्रायल सारखे एक चिमुकले राष्ट्र जन्मल्याक्षणी सहा क्रुर व खुनशी इस्लामी शेजार्‍यांशी कसा लढा देते व पुढे पण वेळोवेळी अतुट राष्ट्रनिष्ठा, विजिगिषु वृत्ती आणि योग्य राजकीय डावपेच ह्यांच्या जोरावर ते कसे सततच्या लढाया जिंकत जाते ते मूळातूनच वाचण्याजोगे आहे.

मी अनेकदा पाहते की लोक म्हणतात की अमेरिकेचा पाठिंबा होता म्हणून इझ्रायल तगले. पण इझ्रायल जरी अमेरिकेचे सहाय घेत असले तरी ते एक व्यापाराचा भाग म्हणून. त्यात कोणताही मिंधेपणा नाही. अनेकदा इझ्रायलने अमेरिकेला न पटणारे निर्णय घेतलेला आहेत. प्रत्येक इझ्रायली परराष्ट्रमंत्र्याने अमेरिकेला बजावले आहे की इझ्रायलला अमेरिकेची गरज नसून अमेरिकेला शीतयुद्धात मध्यपूर्वेत गैर-इस्लामिक सहयोगी म्हणून इझ्रायलची गरज आहे व अमेरिकेची अर्थव्यवस्था ज्यू धनिकांच्या हातात आहे.

तसेच केवळ अमेरिकेच्या पाठिंब्यावर जर कोणतेही राष्ट्र सशक्त बनू शकते असे जर कोणाला म्हणायचे असेल तर त्यांनी आज पाकिस्तानची अवस्था पाहावी. असो.

पुढे पुढे, इ. ९-१० मध्ये असताना इंग्रजी पुस्तके वाचायची सवय लागली. एनिड ब्लिटन, एरिक क्येस्तनर वैगरेंची पुस्तके वाचता वाचता लिऑन युरिसचा "एक्सोडस" हा पहिलाच मोठा ग्रंथ वाचला. खरेतर ती एक सुरस कादंबरी आहे. मात्र त्यातील प्रसंग हे सत्य घटनेवर आधारित आहेत. कादंबरी वाचत गेले आणि मला तिचे वेडच लागले. तिचे इतके वेळा पारायण केले की कित्येक उतारे तोंडपाठ झाले. सुरवातीला इंग्रजी शब्दांचे अर्थ संदर्भाने कळायचे. मग मी एकदा न कळलेले शब्द लिहून काढायचा व शब्दकोशात त्याचा अर्थ शोधायचा व मग पुन्हा एकदा तो उतारा वाचायचा असे चालू केले. मग ही कादंबरी पुन्हा नवी होऊन समोर आली.

विशेषत: ऑश्विट्झ, ट्रेबलिंका, बिर्केनाऊ वै. ची वर्णने वाचून अंगावर काटा उभा राहिला. युरोप आणि रशियातून ज्यूंचा समूळ नि:पात करायचा ह्या वेड्या विचारांपायी ज्या क्रुरतेने ६० लाख ज्यूंची ह्या छळछावण्यातून निर्मम हत्या करण्यात आली ती वर्णने वाचवत नाहीत. त्यातूनही जे बचावले त्यांची, विशेषत: मुलांची शारीरिक व त्याहीपेक्षा जास्त मानसिक अवस्था पाहून मन विदीर्ण होते.




आज हे सर्व आठवायचे कारण की भारतात सध्या हिस्टरी वाहिनीवर आश्विट्झ विषयी विशेष मालिका चालू आहे. ती पाहिल्यावर मनाला प्रश्न पडतो की कोणाचीही एखाद्या गोष्टीबद्दल, समाजाबद्दल इतकी टोकाची मते कशी काय बनू शकतात? मात्र जर समाजातील काहींची अशी मते बनली तरी त्यांच्या अमानवी आज्ञांचे पालन समाजातील इतर माणसे उदा. आईखमन, डॉ. योसेफ मिंगेल इ. कशी काय करू शकतात?


एखादा डेन्मार्क सारखा देश सोडला तर सरसकट सर्व युरोपीय देश ह्या ज्यूंच्या कत्तलीकडे डोळेझाक करतात किंवा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याकरता स्वत:हून आपल्या देशातील ज्यूंना जर्मनांच्या ताब्यात देतात. जणू काही ज्यूंचे शिरकाण ही त्यांची स्वत:चीच इच्छा जर्मन गेस्टापो पूर्ण करीत असते. उदा. रशियामध्ये अनेक शतके ज्यूंच्या कत्तली (पोग्रोम) उघड चालू होत्या. रस्त्यात चालणार्‍या एकट्या दुकट्या ज्यूंना ठार मारणे हा काहींचा छंद होता. रशियन सरकारच अश्या गोष्टींना सतत प्रोत्साहन देत असे.
पुढे ऑश्विट्झ सारख्या छळ छावण्या झाल्यावर गाड्या भरभरून ज्यू संपूर्ण युरोप आणि रशियातून आणण्यात आले. फार कमी सहृदय लोकांनी ह्या काळात ज्यूंना आश्रय व रसद दिली. पोलंडसारख्या देशात तर दुसरे महायुद्ध संपल्यावर जे दुर्दैवी ज्यू छळ छावण्यांमधून कसेबसे वाचून परत आपल्या घरी परतायचे ह्या विचारांनी परत येताना दिसले त्यांना पोलिश लोकांनी प्रचंड विरोध केला. हे सर्व समाजशास्त्राच्या दृष्टीने अनाकलनीय आहे.

Thursday, 23 April 2009

कोकण प्रवास

माझे कोकणात पूर्वी बरेचदा येणे जाणे असल्याने प्रवासाच्या दृष्टिने माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्या इथे नमुद करू इच्छिते.

१) कोकण रेल्वे - हिचे नाव बदलून गोवा - मंगळूर रेल्वे करायला हरकत नाही. कारण गाड्यांना कोकणात थांबे कमी. बर्‍याच स्थानकांवर गाड्या थांबत नाही. काही ठिकाणी तर किमान राजापुर सारख्या महत्त्वांच्या स्थानकांवर तरी ही रेल्वे थांबवावी म्हणून लोकांना आंदोलने करावी लागली. मुख्य महसूल गोवा आणि पुढच्या भागातील स्थानकांवर उतरणार्‍या प्रवाशांकडून. २) एकच रुळ असल्या कारणाने लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य. बरेचदा गाड्यांच्या वेळापत्रकात गडबड झाली की लहान अंतरावर जाणार्‍या गाड्यांना बाजूला ठेऊन लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुढे काढले जाते. ३) भुसभुशीत जमीन पोतामुळे दरडी कोसळणे, रुळावरून गाडी घसरणे इ. प्रकार घडतात (विशेषत: पावसाळ्यात). ४) बरीचशी स्थानके मूळ गावापासून बरीच लांब. त्यामुळे रेल्वे तिकिट दर कमी असले तरी पुढे रिक्षाने त्याच्या २-३ पट पैसे टाकून आपल्या गावाला जाणे म्हणजे पैशाचा अपव्यव तर होतोच पण रिक्षा मिळाली नाही तर टेम्पो वैगरेने किमान महामार्गाने तरी कसबसे यावे लागते. मगच पुढचे वाहन मिळू शकते. उदा. आमच्या गावाला जर जायचे असेल तर आडवली ह्या स्थानकावर (इथे कोकण रेल्वेच्या काही मोजक्याच गाड्या थांबतात) उतरून (रु. १००) रिक्षाने किंवा टेम्पोने लांज्यापर्यंत (रु. १००) आणि मग एस्टीने किंवा ती मिळाली नाही तर पुन्हा स्थानिक रिक्षाने (रु. १००) गावापर्यंत पोहोचावे लागते. ५) सुट्ट्यांच्या दिवसात आरक्षण मिळणे कठिण. आरक्षण असले तरी बरेचदा गाडीत इतकी प्रचंड गर्दी असते की जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. असो.

दुसरा पर्याय खुष्कीच्या मार्गाचा - बरेच जण स्वत:च्या वाहनाने कोकणात जातात. मात्र सार्वजनिक वाहतुकीने जायचे असेल तर एस्टीने जाणे सर्वाधिक सुरक्षित. कारण प्रशिक्षित चालक आणि बस पंक्चर (मराठी?) झाली तर तातडीने जवळपासच्या आगारातून दुसर्‍या बसची सोय केली जाते. तिसरे महत्त्वाचे म्हणजे चालकांना दारू पिण्यास मनाई आहे. तसेच एस्टी ठरल्या वेळेला निघते. प्रवासी (सीटा) भरेपर्यंत खोळंबा करत नाही. तसेच एस्टिचे जाळे सर्वदूर पसरले आहे. एका ठिकाणी गेले किदुसर्‍या ठिकाणी जावयाची एस्टी संबद्ध (Connected) एस्टी त्याच आगारात मिळू शकते. आम्ही आजही कोकणात जाताना लाल रंगाच्या / एशियाड एस्टीने जाणे पसंद करतो. पण चांगल्या स्वच्छतागृहांचा अभाव हे मात्र एस्टी प्रवास टाळण्यास कारणीभूत ठरू शकते.

कोकणात खाजगी ट्रॅव्हलर्सच्या व्होल्व्हो वाहतुकीने जाणे हे मात्र एक दिव्य आहे. १) गाड्या बेदम हाणणे. वेगाची ऐशी तैशी. १ दिवसात एकच वाहन चालक एकाच गाडीला सहज ६००-७०० कि.मी.चा प्रवास घडवतो. २) अशिक्षित चालक ३) व्यसनी चालक ४) बसमधील प्रत्येक सीट भरेपर्यंत जागोजागी गाडी थांबवणे. ५) नंतर वाट्टेल तशी गाडी हाणून वेळेची भरपाई करणे. ६) गाड्या केवळ महागड्या धाब्यांवरच थांबवणे जिथे अनेकदा जेवण शिळे, बेचव असते किंवा उपलब्ध नसते. ७) अपघात झाला तर प्रवाश्यांसाठी विमा संरक्षण नसणे. ८) क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे. ९) प्रवाश्यांशी दादागिरी / पैशावरून भांडणे. १०) ह्या खाजगी गाड्या अनेकदा भंगारातून सेकंडहँड घेतलेल्या असतात. त्यांची पुरेशी देखभाल केलेली नसते. ११) टुकार मराठी चित्रपट भसाड्या आवाजात लावणे.

तिसरा मुद्दा येतो तो महामार्ग १७ वरील रस्त्यांची स्थिती आणि वाहतुक खोळंबा (Traffic Jam) ह्यांचा.
सध्या कोकणातील मुख्य रस्ते नारायणकृपेने चांगले झाले आहेत. मात्र अनेक ठिकाणी ते रुंदीला कमी आहेत. वडखळ नाका वैगरे अशी ठिकाणे आहेत जिथे हमखास वाहतुक खोळंबा होतोच होतो. तसेच घाटात अशिक्षित चालकांमुळे / डुलकी लागल्यामुळे होणारे अपघात, खाजगी वाहतुकदारांच्या बेफाम गाड्या हाकण्यामुळे होणारे अपघात, पावसाळ्यात रस्ते निसरडे झाल्याने अपघात अश्या अनेक कारणामुळे अनेकदा प्रवास ५-६ तास विलंबाने होतो. जो प्रवास एर्‍हवी ८ तासांत होतो त्याला कधीकधी १४-१६ तास सुद्धा लागतात. तसेच पावसाळ्यात कित्येकदा पूर येतात. प्रवास अधिकच अवघड ठरतो.
ह्या सर्व गोष्टींना चांगला पर्याय हा जलवाहातुकीचा ठरू शकतो. कोकणातील मुख्य बंदरांचा सर्वांगीण विकास करणे त्यासाठी महत्त्वाचे ठरेल. १) गाळ काढणे २) व्यावसायिक जेट्टी बांधणे ३) संबद्ध वाहतुकीचा योग्य पर्याय ठेवणे. उदा. गेटवेला अलिबाग तिकिट काढले तर रेवस पर्यंत बोटीने प्रवास करावा लागतो आणि तिच बोट कंपनी पुढे त्याच तिकिटात अलिबाग पर्यंत आपल्या बसने लगेच नेऊन सोडते. ४) वेगवेगळ्या प्रकारची वाहतुक उपलब्ध करणे उदा. सामान्य, जलद, ऐषो-आरामी इ. तसेच वेगवेगळ्या प्रवासी आणि पर्यटन योजना जाहीर करणे. ५) व्यापारी वाहतुकीसाठी गोद्या बांधणे.

ह्या पर्यायामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल ह्यात शंका नाही मात्र त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी. (क्रमश:)