Friday 24 October 2008

उत्थान

पुण्यातील श्री. अरविंद हर्षे प्रत्येक दिवाळीला आम्हाला पत्र पाठवून एखाद्या तळागाळातील संस्थेला दिवाळीसाठी धनरुप / वस्तुरुप मदत करण्याविषयी सुचवितात. ह्या वेळी त्यांनी डॉ. भीमराव गस्ती ह्यांच्या संस्थेविषयी लिहून पाठवले आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा.

स. न. वि. वि.,

एका समर्पित कार्यकर्त्याचा अल्प परिचय - डॉ. भीमराव गस्ती, एम. टेक. पीएच. डी. मूळ बेळगावचे. रशियातून डॉक्टरेट मिळाल्यावर त्यांनी देवदासींच्या उत्थानाचे कार्य हाती घेतले. ते दु:ख त्यांनी स्वत:च्याच घरी अनुभवले होते. त्यांच्या २५ / ३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार इ. झालेल्या आहेत. निपाणीस त्यांनी १८० मुलींसाठी वसतीगृह चालू केले आहे. नुकताच त्यांना इंडियन एक्सप्रेस समुहाचा मॅन ऑफ द ईयर, २००७ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. ते अ. भा. बेरड रामोशी सेवा समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांनी विपुल लेखन सुद्धा केले आहे. त्यांचे बेरड हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांनी सामाजिक समरसता मंच प्रणित समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा भूषवले आहे. दीपावलीच्या मंगल प्रसंगी आपल्या देवदासी भगिनींची आठवण ठेऊन त्यांना भाऊबीज पाठवावी ही कळकळीची विनंती.

डॉ. भीमरावजी गस्ती, उत्थान ट्रस्ट, १७९, मारुती गल्ली, यमुनापुर, बेळगाव - ५९००१०. दु. क्र. ९७४०६३८९३०.

जळती कितीक युवती वणव्यात त्या रुढीच्या - धृ.
देवीस त्या वाहती लेकीच त्या स्वत:च्या दासी बनून जगती भोळ्या अजाण बाला - १
दृष्टीस भक्ष्य पडता झडपाच घालती ते असती दलाल जगी या नाही तयांस माया - २
स्वप्नेच रंगविती देऊन भूलथापा मुंबापुरीस नेती सांगून त्या कळ्यांना - ३
भगिनीच त्या अभागी चुकताच वाट त्यांची कोणी नुरेच वाली नरकात त्या पडता - ४
आक्रोश ऐकुनिया कृष्णापरीस 'गस्ती' जाती धावूनी ते साह्यार्थ द्रौपदीच्या - ५
'उत्थान' ते घडाया, झिजवीच 'भीम' काया नाही विराम यत्नां साथीस जाऊ त्यांच्या - ६

कळावें, आपला नम्र, अ. स. हर्षे.

No comments:

Post a Comment