आमच्याकडे कॅस लागू झाल्यावर सुमारे २ वर्ष आम्ही फुकट दिसणाऱ्या वाहिन्याच पाहत होतो. मात्र ऑलिंपिक तोंडावर आले तसे विकतच्या वाहिन्या दाखवणारी एखादी सेवा घ्यावी की काय असा विचार मनात डोकवू लागला. टाटा स्काय, डिश टिव्ही, डब्ल्यू अँड डब्ल्यू अश्या बऱ्याचश्या सेवा त्यावेळी उपलब्ध होत्या पण अभ्यासांती केबलवाल्याचा सेट टॉप बॉक्स घेणे चांगले वाटले. त्यापाठी आर्थिक विचार तर होताच पण त्याहीपेक्षा डिडब्ल्यू हि जर्मन वाहिनी व टीव्ही ५ मोंडे ही फ्रेंच वाहिनी पहायला मिळणे आणि ते पण चकटफू हा त्या मागचा मुख्य हेतू होता. डिडब्ल्यू ही वाहिनी थोडिशी रुक्ष आणि प्रचारकीच्या अंगाने जाणारी आहे मात्र टिव्ही ५ मोंडे ही फ्रेंच वाहिनी मात्र रसिक प्रेक्षकांची मेजवानीच आहे. रोज सायंकाळी ६. ३० व ९ वाजता फ्रेंच भाषेतले उत्तमोत्तम चित्रपट व मालिका ही फ्रेंच वाहिनी इंग्रजी अनुवादासह दाखवते. ते चित्रपट व त्या मालिका पाहताना रंगून जायला होते. नुकताच पाहिलेला
'विसरलेला पियानो' हा असाच एक चित्रपट.
चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरची गोष्ट आहे. ज्युलियन हा मुलगा एका छोट्या खेड्यात राहत आहे. पियानोवादन हेच त्याच्या जीवनाचे खरे ध्येय आहे आणि वयाच्या ९-१० व्या वर्षीच त्याने ते ओळखले आहे.
मात्र त्याच्या वडिलांना हे त्याचे पियानोवादन अजिबात पसंत नाही. ज्युलियनने शाळेच्या शिक्षिकेकडून बरेच वर्ष पियानोवादनाचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले असते. तसेच तो सलग ३ वर्ष एका महत्वाच्या पियानोवादनाच्या स्पर्धेत पहिला येत असतो.
मात्र जेव्हा तो आपल्या वडिलांना आपण जन्मभर पियानो वाजवणार असे म्हणतो तेव्हा त्याचे वडिल नुसते त्याच्या पियानो वाजवण्यावरच बंदी घालतात असे नाही तर त्याला शाळा सुटल्यावर थेट आपल्या छापखान्यात कामाला ये असे बजावतात. छोट्या ज्युलियनला छापखान्यात खिळे जुळवण्याचे काम अजिबात आवडत नसते. पण तापट वडिलांपुढे त्याचे काही चालत नसते. कारण वाद घातला की फटके मिळणार हे त्याला चांगलेच माहित असते.
ही त्याची उलघाल, हा त्याचा कोंडमारा त्याची वर्ग मैत्रिण रोझीन हिला मुळीच पाहवत नाही आणि ती युक्ती काढते की ज्युलियनने शाळा सुटल्यावर थेट तिच्याकडे अभ्यासाला यावे. ह्या श्रीमंत मुलीच्या आईची रदबदली ज्युलियनचे वडिल नाकारू शकत नाहीत व त्याला नाईलाजाने रोझीनकडे अभ्यासाला जायची परवानगी देतात.
अभ्यासाच्या नावाखाली ज्युलियन आणि रोझीन रोज संध्याकाळी सायकलवरून भटकायला सुरवात करतात आणि एक दिवस ते गावकुसाबाहेरील एका निर्जन ठिकाणी असलेल्या एका छोट्याश्या खोपटात येऊन पोहोचतात आणि ज्युलियनला तिथे एक धुळ खात पडलेला एक पियानो दिसतो.
त्याचा आनंद गगनात मावत नाही. मात्र जेव्हा तो धुळ झटकून पियानो वाजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला तो पियानो बेसुर असल्याचे आढळते. दुसऱ्या दिवशी शाळेत एका मुलाबरोबर झालेल्या भांडणात तो मुलगा ज्युलियनला "देशद्रोह्याचा मुलगा" अशी शिवी देतो. ज्युलियनला ही गोष्ट लागते. तो आपल्या परीने असे का म्हटले गेले ह्याचा शोध घ्यायला सुरवात करतो.
थोडे दिवसांनी त्याचे पियानो वरून परत आपल्या वडिलांशी मोठे भांडण होते आणि तो रागाने सायकल घेऊन थेट गावकुसाबाहेरील निर्जन घरात जातो आणि त्याला तिथेच झोप लागते. योगायोगाने त्या रात्री त्या घराचा मालक बेंजामीन रोझेनबाऊम तिथे येतो आणि त्याला हा झोपलेला ज्युलियन उचल्या वाटतो. तो ज्युलियनला उठवतो आणि पोलिसात द्यायची धमकी देतो. त्यावर ज्युलियन धीटपणे त्याला आपण चोर नसून पियानो वाजवण्याच्या ओढीने इथे येतो असे सांगतो. ह्यावर बेंजामीन त्याला घरचे काळजी करत असतील असे सांगतो आणि आता घरी जा, नंतर पुन्हा ये असे सांगतो. मात्र ज्युलियन जाण्यापूर्वी बेंजामिनला सांगतो की त्याचा पियानो बेसुर आहे आणि ज्युलियनची स्वर ज्ञान अचुक असल्याने तो बेंजामिनला पियानो सुरात लावायला मदत करू शकतो. बेंजामिनला ह्या छोट्या मुलाचे कौतुक वाटते.
इथे घरी आल्यावर नियमाप्रमाणे ज्युलियनला वडिलांचा मार मिळतो पण आपण रात्रभर कुठे होतो ते तो वडिलांना कळू देत नाही. २-३ दिवसांनी तो पुन्हा त्या निर्जन घराकडे जायला सुरुवात करतो आणि बेंजामीन त्याच्या मदतीने स्वत:चा पियानो दुरुस्त तर करतोच पण छोट्या ज्युलियनला पियानो वाजवण्याचे रीतसर प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतो.
त्याची शिकवणी ज्युलियनला बेहद्द आवडते. पण आपल्यासाठी बेंजामीन शहरातून सारखे सारखे त्या निर्जन घरी का येतो, आला तरी गावातील त्याच्या प्रशस्त बंगल्यात का रहायला जात नाही हे काही ज्युलियनला कळत नाही. बेंजामीन विषयी सर्व माहिती काढायचा तो निश्चय करतो.
थोडेच दिवसात त्याला कळते की बेंजामीन रोझेनबाऊम हा फ्रांसमधील सर्वोत्कृष्ट पियानोवादक म्हणून ओळखला जात असतो. अजून थोडी माहिती काढल्यावर त्याला कळते की बेंजामीन हा ज्यू असून जर्मन छळछावणीत त्याचे आई-वडिल, बायको-मुले सर्वजण हाल अपेष्टा सहन करत मेलेली आहेत.
स्वत: बेंजामीन कसाबसा बिर्केनाऊ छळछावणीतून वाचलेला असतो आणि ह्या सर्व दुख:द घटनांना त्याचे सख्खे आजोबाच जबाबदार असतात. छापखान्यात लागणारा कागद युद्धकाळात स्वस्तात मिळावा म्हणून त्याच्याच आजोबांनी गेस्टापोला रोझेनबाऊम कुटुंबाचा ठावठिकाणा सांगितलेला असतो.
बेंजामिनवर मुलाप्रमाणे प्रेम करणारा आणि त्याला आपला गुरू मानणारा छोटा ज्युलियन हे समजल्यावर मुळापासून हादरतो. त्याचे भाव विश्व पूर्ण ढवळून निघते. तो बेंजामिनला आपले कुटुंब हेच त्याला उध्वस्त करून टाकण्यास कारणीभूत ठरले हे सत्य सांगायचा निर्णय घेतो.
हाच ज्युलियन पुढे जाऊन फ्रांसमधील अव्वल पियानोवादक बनतो. मात्र त्याचा पुढचा प्रवास अतिशय रोचक आहे. बेंजामिनला सत्य कळते का? कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय आहे? बेंजामीन नंतर ज्युलियनचा दुसरा गुरू कोण? ज्युलियनला त्याचे संगीत द्वेष्टे वडिल पियानो शिकू देतात का? बेंजामिनचे काय होते? ह्या आणि अश्या अनेक हृदयभेदक प्रश्नांची उत्तरे पाहायची असतील तर हा सुंदर चित्रपट पहायलाच हवा.
हा दुवा क्र. १ संपूर्ण चित्रपट म्हणजे कानसेनांसाठी एक अप्रतिम मेजवानी आहे. द पियानिस्ट मधील पियानो वादन दुवा क्र. २ जसे कठोर जर्मन अधिकाऱ्याच्या मनात माणुसकी जागृत करते तसे ह्या चित्रपटातील पियानोवादन सुद्धा आपल्याला त्यातील नजाकतीने अंतर्बाह्य हेलावून सोडते.
Wednesday, 29 October 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment