Monday, 25 August 2008

प्रश्नच प्रश्न चहूकडे...

मुळेकाठच्या एका दुकानात एक गिर्‍हाईक येते. दुकानदाराचे लक्ष नाही. गिर्‍हाईक घुटमळते.
शेवटी आपल्या दुकानात चोर शिरला असावा अश्या दृष्टीने पाहून दुकानदार वसकन् त्याच्यावर ओरडतो,
"क्वाय हवांय?"
"अहो, असे अंगावर काय येताय?""मग काय मुका घेऊ तुमचा?"
गिर्‍हाईक ओशाळते. भीत भीत विचारते,"डिक्शनरी मिळेल काय?""एक का हजार मिळतील, पोटमाळ्यावर हव्व्या तितक्या आहेत.""पण...""पण नाही आणि परन्तु नाही, आमचा नोकर रजेवर आहे. समोरच्या पेण्टराच्या दुकानातून आणा शिडी आणि घ्या हवी ती शोधून आणि हो, अर्ध्या तासात खाली उतरा. आम्ही रात्री दुकान ८ च्या ठोक्याला दुकान बंद करतो. नाहीतर रात्रभर उंदीर व घुशींसोबत गरबा खेळत बसावा लागेल."
(गोष्ट कल्पित: लेखक अनेक).
प्रश्न क्र. १: मराठी भाषा उद्धट आहे का?___________________________________________
माहिमचे एक श्री. हळक्षज्ञ, अतिशय व्यासंगी भाषांतरकार. मला एकदा म्हणाले, "मला फक्त ७५ पैसे (प्रतिशब्द) काम मिळते. तुमच्याकडे जास्त पैसे देणारे ग्राहक असतील तर मला द्या."
मी ठीक आहे असे म्हटले. थोडे दिवसांनी एका गुजराथी व्यापार्‍याचे काम आले जो लगेच व योग्य पैसे देणार होता. ते मी श्री. हळक्षज्ञ यांच्याकडे पाठवले.
त्यावर ह्या महोदयांनी दीड पान स्वत:ची महती व पुढे अर्धा पान मूळ हस्तलिखित किती भिकार आहे हे त्याला लिहून पाठवले. तो व्यापारी काय ते समजला.
दुसर्‍या एका प्रसंगात एक माहितीतला दिल्लीचा भाषांतरकार त्याला निकड होती म्हणून जास्त पैसे देऊन काम करून घ्यायला तयार होता. मात्र मागील प्रसंगावरून शहाणी होऊन मी ते काम श्री. हळक्षज्ञ आणि अजून २-३ जणांना पाठवले.
त्यावर श्री. हळक्षज्ञ आपल्याला आलेले दिल्लीकरांचे अनुभव - मला, त्या भाषांतरकाराला आणि वर त्या २-३ जणांना आपल्या खास शैलीत २ पाने लिहून पाठवले.
त्याखाली एक ओळ माझ्यासाठी. दिल्लीच्या लोकांची कामे मला पाठवू नयेत.
तिसर्‍या प्रसंगात मला एका अमेरिकन कं. चे $ मध्ये काम मिळाले पण मलाच वेळ नव्हता. पण चांगली संधी का सोडावी म्हणून इतर मराठी भाषांतरकारांना वेगळे आणि श्री. हळक्षज्ञ ह्यांना एक वेगळे असे पत्र लिहिले (ज्यात त्या अमेरिकन कं. विषयी काहीही माहिती लिहिली नाही).
त्यावर श्री. हळक्षज्ञ यांचे मला एक पत्र ज्यात त्यांना आधीच कसे २ मोठ्या कंपन्यांचे सध्या काम मिळाले आहे याचे रसभरीत वर्णन आणि त्याची २ मान्यवर भाषांतरकारांना CC.
शेवटी मला त्या दोन मान्यवरांचे फोन, "हे विद्वान कोण?" असे विचारणारे.
(सत्यघटना, सर्व ई-पत्रव्यवहार इंग्रजीतून).
प्रश्न क्र. २ : मराठी भाषिक उद्धट आहे का? ___________________________________________
प्रश्न क्र. ३ : मुळात मराठी भाषा उद्धट नसून रेल्वे, बँक, महापालिका अश्या सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणार्‍या मराठीचा हेल (Tone) उद्धट आहे का?

No comments:

Post a Comment