Saturday, 23 August 2008

संस्कृत १

परवा एका लेखकू महाशयांनी विधान केले की त्यांना संस्कृत अजिबात कळत नाही. हे म्हणजे थोडेसे प्रसिद्धीचा हव्यास असणारे लोक जसे अधून मधून भडक व सवंग विधाने करून जनतेचे लक्ष वेधून घेतात तसा प्रकार झाला.
मी जर म्हटले, "मम नाम मृदुला । अहं दादरनगरे निवसामि । अहं प्रत्येक-बुधवासरे रेलयानेन वान्द्रानगरं गच्छामि । अहं युवति । अहं शिक्षिका । अहं अनुवादिका च। अहं भारतीया, महाराष्ट्रीया च। आशा नाम मम माता। अनंत नाम मम पिता।"
भले प्रत्येकालाच संस्कृत बोलता येत नसेल पण ही वाक्ये कळायला काही कठिणता असेल असे मला वाटत नाही. म्हणून मी म्हणेन संस्कृत अजिबात कळत नाही हे एक विसंगत विधान आहे.
पण भारतात बरेच जणांना संस्कृतभाषेबद्दल, भारतीय संस्कृतिबद्दल येता जाता काहीतरी पिंक टाकायची सवयच आहे. त्यातच त्यांना भूषण वाटते.
संस्कृतबद्दल सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही अध्यात्माची भाषा असून ती विशिष्ट जातीशी निगडित आहे. संस्कृतमधील आद्यकाव्य रामायण ज्यात १ लाखापेक्षा जास्त श्लोक आहेत ते एका वाल्मिकी नावाच्या कोळ्याने रचले आहे. संस्कृतमधील महाकवि कालिदास हा गुराखी (गवळी समाजाचा) होता. महाभारतात ज्याच्या तोंडी संस्कृत संवाद आहेत तो कर्ण सूतपुत्र (सूत=सारथी) होता. म्हणजे आजच्या काळातील ड्रायव्हर / टांगेवाला समाज.
इतकेच काय शंकराचार्याशी ज्याने वादविवाद केला तो चांडाळ (समाजाचा) म्हणजे स्मशानात काम करणारा होता. पण लोकांची उगीचच धारणा आहे की संस्कृत ही पुरोहित वर्गाची भाषा आहे आणि हा गैरसमज ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दोघांनीही मनापासून जपलाय. ब्राह्मण संस्कृतवरील आपला हक्क सोडायला तयार नाहीत आणि ब्राह्मणेतरांना आज संस्कृत शिकायची संधी असूनही ती भाषा न शिकता त्याविषयी मनात येईल ते ठोकून द्यायला आवडते. मनुस्मृती न वाचताच जाळणे हा तर नेतेमंडळींचा आवडता उद्योग.
पण अगदी अलिकडच्या काळात संस्कृत उत्तम बोलणार्‍यांमध्ये / जाणणार्‍यांमध्ये शांता शेळके (देवांग कोष्टी, विणकर समाज), मारुति चितमपल्ली (भटके विमुक्त समाज), बाबासाहेब आंबेडकर (दलित समाज), गुलाम दस्तगीर बिराजदार (मुसलमान) ही मंडळी सुद्धा आहेत.
इतकेच काय माझी मैत्रिण स्वाती जाधव उत्तम संस्कृत पण्डिता आहे. आज तिला मुंबईतील लोक संस्कृतसाठी प्रचंड मान देतात.
माझी तमाम वाचकांना एव्हढीच विनम्र विनंती की केवळ वरील मुद्द्याला अनुसरून मते द्यावीत कारण पुढील भागांत मी इतर मुद्द्यांकडे वळेनच.

No comments:

Post a Comment