Friday, 14 November 2008

२ मजेदार अनुभव

मी पूर्वी एका तंत्राधारीत बीपीओ मध्ये काम करत होते. तिथे अक्षरश: देशाच्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी होती. आम्ही एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्या पाखाळ्या काढायचो. कोणालाही त्यात काहीच गैर वाटत नसे. तिथे आमच्या मित्रमंडळींच्यात एक अरुण होता तो उ. प्र. चा होता. तो काही म्हणाला की आम्ही म्हणायचो, "बोलला भैय्या मेंदू".
एकदा तो म्हणाला की तुम्हाला मला स्वत:ला आलेले भैय्या मेंदुचे दोन अनुभव सांगतो. मी रिलायन्सच्या बीपीओ मध्ये होतो. आम्हाला रिलायन्सची मोबाईल सेवा घेतलेल्यांचे फोन घ्यावे लागायचे. एके दिवशी एका ग्राहकाचा फोन आला. (मूळ संवाद हिंदीत)
ग्रा. : माझ्याकडे सलीमचा फोन आहे तो बरोबर चालत नाहीये. अरुण : सलीमचा फोन तुमच्याकडे कसा? ग्रा. : तो मीच वापरतो. अरुण : सलीमचा(चोरलेला)फोन तुम्ही वापरणे बरोबर नाही. प्रत्येकाने स्वत:चा फोन वापरावा. ग्रा. : मी कोणता फोन वापरावा हे सांगणारे तुम्ही कोण? माझ्याकडे पैसे आहेत, मी घेतला तो वापरायला. तुमचे काय जाते? अरुण : सलीम कुठे आहे? ग्रा. : इथेच आहे.
(मग सुमारे अर्धा तास डोकेफोड केल्यावर कळते की ग्राहकाचा फोन सलीमचा नसून रिलायन्सचे स्लीम फोन मॉडेल आहे).
दुसऱ्या वेळी अजून एका ग्राहकाचा फोन आला.
अरुण : नमस्कार, रिलायन्स ग्राहकसेवा आपले स्वागत करीत आहे. ग्रा. : मी कालच हा फोन विकत घेतला. मला कालच्या मॅडमजींशी बोलायचे आहे. अरुण : साहेब, आपल्याला काय हवी ती मदत मी करतो.
ग्रा. : आपला आवाज मला आवडला नाही. मॅडमजींना फोन द्या. मला त्यांच्याशीच बोलायचे आहे.अरुण : असा आम्हाला फोन दुसऱ्यांकडे देता येत नाही.
ग्रा. : तरी पण मला मॅडमजींशीच बोलायचे आहे. अरुण : नक्की?
ग्रा. : तुम्हाला मी सांगतो ते कळत नाही का? अरुण : ठीक आहे. तुमचा फोन कुठला आहे?
ग्राहक मॉडेलचे नाव सांगतो. अरुण : तुमच्या फोनवर १२३ दाबा आणि डावीकडचे लाल बटण दाबा. (तीन वेळा पीप, पीप, पीप आणि फोन बंद होतो).
आम्ही हे ऐकून पोट धरधरून हसलो. आपण पण हा लेख हलकेच घ्यावा ही विनंती. कृपया ह्यात प्रांतवाद आणू नये.

1 comment:

  1. आमच्या वेळी असं नव्हतं, बाई!

    बाप रे, म्हणजे वय काय आपले? का पुलं म्हणतात तसे "पुण्यात शिशुवर्गापासून ओंकारेश्वरापर्यंत... कुठेही जा,
    एकच वाक्य आपल्या वेळी नव्हते बुवा असले." :)


    हे असे जोक सरदारांच्या नावावर चालायचे! तेव्हा कसं प्रसन्न वाटायचं!!

    असे तुम्हाला प्रसन्न वाटत असेल तर तुम्ही दुवा क्र. १ वाचायलाच हवा. तुमचा सरदारजी लोकांविषयीचा दृष्टिकोन नक्की बदलेले अशी आशा आहे.

    आताचा कळिकाळच वाईट आलाय त्याला बोलायचं?

    हे मात्र खरे, काही लोकांना विनोद सुद्धा पचायला जड जातात. विनोदाची मजा घ्यायची सोडून चित्त देऊन बोजड
    प्रतिसाद लिहित बसतात.

    काय तर म्हणे भैया मेंदू! आणि प्रांत का काय म्हणतात तसला वाद! कसचं काय नि कसचं काय!!!
    एक घटकाभर खळखळून हसायची चोरी मेली! जळो देवा भली!!

    हुं, खरे तर मला भैय्यांचा अजिबात राग नाही. भाजप-शिवसेनेची मत खाण्यासाठी काँग्रेस पाठिंबा देऊन राजकडून
    ज्या निवडणूक खेळ्या करते आहे त्या पण मला पसंत नाहीत. मला वाटते ह्या सर्व द्वेष भावनांचे मुख्य कारण
    भाषावार प्रांत रचना ह्या विषवल्लीत आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार जर प्रांत रचना झाली असती तर कदाचित्
    आजची परिस्थिती वेगळी असती. चालायचे.

    भैय्या मेंदू, जाट डोके, तात्या चिंगुसी (ही व्यक्ती नाही. मराठी लोकांना इतर भाषिक तात्या म्हणतात व मराठी
    जेवणातील चिंगुसी हा त्यांचा आवडता विषय आहे ) हे आम्ही ज्या वेळी म्हणायचो त्यावेळी भाषा-विद्वेष इतका
    नव्हता आणि मी पण अल्लड होते. आता मी हे शब्द वापरत नाही.

    ReplyDelete