मध्यम शरीरयष्टी. सावळा वर्ण. उजव्या गालावर गोचिडासारखा मस. धारदार नाक. झुबकेदार मिशा. डोक्यावरील वरचेवर कापलेली लॉनसारखी कटिंग. अघळपघळ धोतर. पितळी बटनांचं खमीस. पटका मात्र लोकांनी दोनच ठिकाणी पाहिला. बुलाखराव घरी असले तर बैठकीतल्या खुंटीवर, नाहीतर त्यांच्या बगलेत. तसा माणूस वचक्या. समोरच्या माणसावर खेकसणारा. पण मुळातच फार भाबडा, ढेकळासारखा विरघळणारा.
बुलाखराव रस्त्यानं निघाले की कामदार मागेपुढे चालायचा, चिंतामन, बाप्पुंचा चिंत्या. पटका बगलेत. तो बगलेतून घसरत घसरत लोंबकळायचा, वडाच्या पारंब्यांसारखा. कधी कधी त्याचा शेंडा घासत जायचा. मातीवरून... शेणाच्या पोवट्यावरून. पण कामदार चिंत्या सांगत नसे. तो सरावानं शहाणा झाला होता. कुणीतरी तो पटका पाहून म्हणायचा, "बाप्पूऽऽ वो बाप्पूऽऽ, तुमचा पटका खाली घासत राह्यला नाऽ !".
"मंगऽ घासते त् घासते. तुया काय बापाचं जाते. आऽऽ ! मोठा आला उजागर. शानपना सांगते. आऽऽ." तसा सांगणारा तिरकट तिरकट निघून जायचा.
चालता चालता त्यांचे पान खाणे चालूच. हे पान खाणंही तसंच जगावेगळं. भल्या मोठ्या नक्षीदार चंचीचा कसा ते डाव्या हाताच्या अंगठ्याला गुंडाळायचे. पानाचे देठ तोडून नुसतं पानच तोंडात टाकायचे.
"मंगऽऽ चिंत्याऽऽ, दिस्लेत काय कुठी हरनंबिरनं? मईत नाईत बारभाईत. आऽऽ!" पान चावता चावता बाप्पू.
"नाईऽऽ जीऽऽ !" चिंत्या.
"लेकाऽ बसल्या बसल्या कामून घोंगडं झटकतं? जाय. त्या लायनू जागल्याले इचार. पयत पयत जाय !"
त्यांच्या नजरेसमोर चिंत्या दुडकी चाल धरायचा. नजरेआड गेला की धीमे धीमे चालायचा. हे सुद्धा तो सरावानं शिकला होता. पाटलानं पळ म्हटलं की पळायचं. पण तेव्हढ्यापुरतं. त्यांच्या नजरेसमोर.
मग पाटलांना आठवायचं, आपण नुस्तं पान खाल्लं. मग ते चुनाळूतील चुना बांधलेल्या छत्रीच्या काडीनं काढायचे. तो बोटानं ओरपून दाताला पुसायचे. तेव्हढ्यात रस्त्यावरील बंडी पाहून, "काबे, ओ किस्न्या, तुया बंडीनं रस्ता अळोला ना रेऽऽ आऽऽ ! रस्ता काय आपल्या बापाचा हाय काय रे. आऽऽ!"
"आत्ताच सोळ्ळी बाप्पू. नेतो वाडग्यात." किसना.
पण ऐकायला बाप्पू जागेवर कुठे? ते आपले पुढे गेलेले. तेव्हढ्यात त्यांना आठवायचं, आपण नुस्ता पान-चुनाच खाल्ला. मग ते सुपारीचा खांड तोंडात टाकायचे.
समोरून आलेल्या रामा मांगानं 'मायऽ बापऽ' म्हटलं.
"काबेऽ ओ राम्या ! ते मसनातली काटी कोनं तोळ्ली रेऽ ! आऽऽ ! "
आऽऽ ! म्हणताना ते उजवी भुवई ताणून बुबुळं वर न्यायचे. मानेला किंचित झटका द्यायचे.
"नाईऽ जीऽऽ बाप्पू. म्या नाई तोळ्ली जीऽऽ ! कालपास्नं मले त् बयतन नाई सापळ्लं. माई चूल नाई पेटली. मंग म्या काटी कसी तोळलीशीन जीऽऽ !" रामा.
"आऽऽ !!! तुया नाई तोळ्ली. जायऽ वाळ्यात जाय अन् मोठ्या पाटलीनले अद्लीकभर जेवारी मांग. जायऽ आऽऽ !"
तेव्हढ्यात त्यांना आठवायचे की आपण काथ नाही खाल्ला. मग ते काळ्या काथाचा खडा तोंडात टाकायचे. पण आता तोंडात पान, चुना आणि खांड यांचा पत्ता नसे. कडुशार तोंड झालेलं वाटून ते तंबाखुची चुक्टी तोंडात टाकायचे आणि चावडीच्या पायरीवर पाय ठेवायचे.
____________________________________________________________________ वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं? वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?सांगा बरं! ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी, प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!
Friday, 28 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment