Sunday 16 November 2008

भोजनापूर्वी


गेल्या उन्हाळ्यात आम्ही कोकणात गेलो होतो. तिथे देव-धामापुर एस्टी थांब्याच्या शेजारी आम्ही भावंड षट्कोनी जिरा बिस्किटे, शेवेचे लाडू, चिंच गोळ्या इ. घेण्यात गुंतलो होतो तेव्हा सहज हा फोटो घेतला.

मात्र नंतर निवांतपणे हा फोटो पाहताना हसू आवरेना. त्याला कारण होते, थांब्यावरील जाहिरात... भोजनापूर्वी, शौचानंतर लाईफबॉय.

मात्र गेल्याच महिन्यात १५ आक्टो. २००८ ला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे (युएन्ओ) पहिला जागतिक हस्तप्रक्षालन दिवस साजरा झाला आणि आज जेव्हा मी ही जाहिरात पाहते तेव्हा हसू येण्याऐवजी ह्या विषयाचे गांभीर्य कळते.

भोजनापूर्वी व शौचानंतर हात धुणे का महत्वाचे -


हात साबणाने धुणे हा जुलाब व श्वसनसंबंधी रोगांवर सर्वोत्तम आणि स्वस्त असा प्रभावी इलाज आहे
ज्या रोगांमुळे विकसनशील देशातील लाखो मुले प्रत्येक वर्षी प्राणाला मुकतात.


ह्या साध्याश्या उपायाने असे मृत्यू अर्ध्यावर येतात हे अभ्यासांती दिसून आलेले आहे. इतकेच नव्हे तर युरोप, अमेरीकेतील बरेच लोक पूर्वी शौचानंतर केवळ कागदाचा उपयोग करीत होते ते सुद्धा गेले काही दशके भारतीय जीवनशैलीप्रमाणे पाण्याचा वापर करत आहेत.

एखादी साधी गोष्ट आचरणात आणली तर एव्हढा मोठा फरक पडत असेल तर आपण सर्वांनी ही गोष्ट मुख्यत: लहान मुलांच्या मनांवर बिंबवायलाच हवी. भारतात आपण लहान मुलांना शौचानंतर पाणी आणि साबण वापरायचे शिकवतोच पण जेवण्यापूर्वी हात धुतलेच पाहिजेत अशी जबरदस्ती करतो का?

खरे तर जेवण्यापूर्वीच नव्हे तर काहीही सटरफटर खाण्यापूर्वीसुद्धा आपण हात स्वच्छतेकडे मुलांचे लक्ष वेधले पाहिजे. मला स्वत:लाच संगणक पिशाच्चाने घोसाळले आहे. मी बरेचदा कळफलकावर टंकन करताना कोरडे पदार्थ वाडग्यात घेऊन अधून मधून खात असे. उदा. वेफर्स, पॉप कॉर्न, शेंगदाणे इ.इ. तोच उष्टा हात परत कळफलकाला लावत असे. मात्र हात धुणे ह्या संकल्पनेचे महत्व पटल्यापासून आता मी काळजी घेते. संगणकासमोर असताना काहीही खात नाही.

No comments:

Post a Comment