Tuesday 9 December 2008

इतिहासापासून घ्यायचा बोध...

युद्ध जिंकणे जितके महत्त्वाचे तितकेच त्या युद्धात कमीत कमी प्राणहानि
होऊ देणे व युद्धानंतरचे तह, करारनामे ज्याला आपण युद्धोत्तर राजकीय
प्रक्रिया म्हणतो ते पण जिंकणे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. १९४७
पश्चात् भारताचा युद्धेतिहास काय सांगतो? जे रणभूमीत कमावले ते
आपण मेजावर गमावले आणि ते पण आपल्या असंख्य जवानांचे रक्त
सांडून. आज आपल्याला पाश्चात्य वृत्तवाहिन्या जेव्हा खंडित काश्मिर
व तो पण पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवतात तेव्हा मनस्वी दु:ख
होते. हे आपले ढळढळीत अपयश नव्हे का?

आता आपण काही युद्धोत्तर वाटाघाटीची उदाहरणे पाहू -

१) दि. २५/१०/१९५६ रोजी मोशे दायान ह्यांनी आपल्या सहकार्‍यांसमोर
संभाव्य इजिप्त हल्ल्याचा आराखडा मांडला. त्यावर सांगोपांग चर्चा झाली.
त्या बैठकीत कोणीतरी विचारले -

"सिनाय मध्ये पाय रोवण्याचा आपला विचार आहे की पुन्हा
सिनाय सोडून मागे यायचे?"

प्रश्न बरोबर होता ! देशासाठी जवानांनी आपले रक्त आणि आपल्या
गोतावळ्याचे अश्रू देऊन महत्त्वाची ठाणी जिंकून घ्यावी आणि
पोटातले पाणीही न हलल्यामुळे पोट सुटलेल्या राष्ट्राच्या म्होरक्यांनी
शांततेच्या मृगजळापाठी धावून, सेनेला ही ठाणी समझोता म्हणून
सोडायला लावायची हा प्रकार नेहेमीच घडतो.


दायान सावध होता. त्याने उत्तर दिले -

'काहीही असले तरी सिनाय जिंकून घेणे हे आपले पहिले काम आहे. मग
मागे यायला लागले तरी ही माघार आपल्या देशाच्या सरहद्दीत तरी नक्की
असणार नाही.' (संदर्भ - इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच ! पृष्ठ - ४९)

मात्र दायान जे बोलला तसेच घडले. ज्या नवजात इस्रायलच्या गळ्याला नख
लावायला क्रुर आणि खुनशी सहा शेजारी अरब राष्ट्रे टपलेली होती त्यांचा
इस्रायलने स्वबळावर व अलौकिक राजनैतिक चातुर्यावर पराभव तर
केलाच पण प्रत्येक युद्धानंतर इस्रायलचे क्षेत्रफळ वाढतच गेले.

२) युद्धानंतरचे करारनामे हे आपल्या बाजूने करण्यासाठी युद्ध जिंकायलाच
लागते असे काही नाही. युद्ध हरूनसुद्धा हे करारनामे आपल्या किमान तोट्याचे
करता येतात. उदा. मिर्झाराजेंशी युद्ध हरल्यावर शिवाजीराजांनी केलेला करार.
प्रथम मिर्झाराजे राजांना एकही गड द्यायला तयार नव्हते. पण बोलणी चालूच
ठेऊन शिवाजी राजांनी १२ किल्ले स्वत:कडे ठेवण्यात यश मिळवले. तसेच
मुत्सद्दीपणे आपल्या ऐवजी ८ वर्षाच्या संभाजीला मोगली सेवेसाठी पुढे केले.
संभाजीच्या सोबतीला नेताजीला पाठवले. चाणक्य म्हणतो, ज्या तहात सेनापती
व राजकुमार ह्यांना सैन्यासह दुर्बल राजा बलवान राजाकडे पाठवतो त्याला
'पुरुषांतर संधी' असे म्हणावे. जी 'आत्मामिष संधी' पेक्षा कितीतरी चांगली होती
ज्यात स्वत:च्या सैन्यासह दुर्बल राजा बलवान राजाकडे चाकरी पत्करतो.

मोगलांना राजांनी किल्ले २३ दिले खरे पण वास्तविक स्थिती काय होती?
पळसगड व भंडारगड हे माहुली किल्ल्याचे छोटे उपदुर्ग आहेत. पुरंदरचा
उपदुर्ग वज्रगड व सिंहगडाचाच छोटा भाग म्हणजे खंदकडा. म्हणजे
मोगलांना किल्ले दिले १९. त्यातही पुरंदर हा मोगलांनी जवळजवळ
जिंकला होता. राजांनी तो पण चातुर्याने ह्या यादीत टाकला. विसापुर,
सागरगड, माणिकगड, सोनगड, मानगड हे त्याकाळचे छोटे किल्ले होय.
सारांश राजांनी या तहात जमेल तितका आपला फायदा करून घेतला.
(वेध महामानवाचा - पृष्ठ २०९)

त्या पुढे जाऊन त्यांनी मी आपल्या वतीने आदिलशाही कायमची नष्ट
करतो असे मिर्झाराजांना मधाचे बोट लावले. खर्चासाठी दोन लाख होन
पदरात पाडून घेतले. मात्र आदिलशाही नष्ट न करता ती तशीच ठेवली.
ज्यायोगे मोगलाईला सतत आदिलशाही नावाचा आणखी एक शत्रु असेल.

३) युद्धोत्तर अंतरराष्ट्रीय राजकारणात करावयाचे डावपेच -

इजिप्तचा अध्यक्ष नासर ह्याला पहिल्यापासूनच अरब जगताचे नेतृत्व
करण्याचे डोहाळे लागलेले होते. म्हणून त्याने सत्तेवर आल्यावर इस्रायलला
पीडायचे राष्ट्रीय धोरण अधिक जोमाने पुढे चालू ठेवले. त्याचाच एक भाग
म्हणून सुवेझ कालवा व तिरानचे आखात दोन्ही इस्रायलच्या जहाजांना
बंद करून टाकले. ह्या नाकेबंदीने इस्रायलचा श्वास गुदमरू लागला. पण
तूर्त त्यांना इशारे देण्याशिवाय काहीच करता येत नव्हते. मात्र पुढे जाऊन
सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या नादात इजिप्तने दुखावले इंग्लंडला
कारण करारानुसार सुवेझ कालवा 'कंपनी' कडे अजून १२ वर्षे असायला हवे
होते. तसेच ह्याच कालव्यातून इंग्लंड आपले तेल स्वस्तात आयात करीत होते.
इंग्लंडला व फ्रेंचांना हे कृत्य आततायी पणाचे वाटले. त्यानंतर अँग्लो-फ्रेंचांनी
नासरच्या हातातून सुवेझ कालवा सुटून अंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली येण्यासाठी
इस्रायलच्या बाजूने उभे राहायचे ठरवले. सालाबाद प्रमाणे इजिप्तचा ह्या युद्धात
दणकून पराभव झाला. आपल्या नागरिकांच्या १४-१६ हजार खाजगी गाड्या,
दुसर्‍या महायुद्धातील पिस्टन विमाने आणि सर्व शेजारी अरब राष्ट्रांनी एकत्र
करून ओतलेल्या सैन्याच्या तुलनेत एक-शतांश सेना असताना सुद्धा ही
लढाई इस्रायलने जिंकली ज्यात त्यांना अँग्लो - फ्रेंचांचा फारसा फायदा झाला
नाही. मात्र न्युयॉर्कला बसून संयुक्त राष्ट्र संघटनेत सर्व इतर बडी राष्ट्रे
शांततेच्या नावाने गळा काढत होती.
तिथे त्यांना अँग्लो- फ्रेंचांचीच मदत
होणार होती.

ह्यावेळी अँग्लो - फ्रेंचांनी मोठी गमतीदार भूमिका घेतली. इजिप्त व इस्रायलला
खलिता पाठवला की सुवेझ कालवा परिसरातून १० मैल फौजा पाठी घ्या व
युद्ध ताबडतोब बंद करा. तसेच १२ तासात सुवेझ कालव्यातून सर्व वाहतुक
खुली करण्यात यावी नाहीतर नाहीतर आमचे सैन्य सुवेझचा तात्पुरता
कबजा करतील.

ह्यावर इस्रायलने सर्व अटी मान्य असल्याचे कळवले. अपेक्षेप्रमाणे नासेरने
हा खलिता धुडकावला व अँग्लो - फ्रेंच सैन्य इजिप्त विरुद्ध युद्धात उतरले.
तिकडे संयुक्त राष्ट्र संघटनेत ठरावांचा तमाशा चालूच होता. इस्रायलने
ताबडतोब युद्धबंदी करावी म्हणून त्याच्यावर दबाव आणण्याचे अमेरिका,
रशिया आणि भारताचे राजकारण चालू झाले होते.

बेन गुरीयन सेनाधिकार्‍यांना म्हणाला, "कशाला फिकिर करता त्यांची.
जोपर्यंत ते सर्व न्युयॉर्कला बसून शंख करीत आहेत आणि आपण
सिनाय मध्ये आहोत तो पर्यंत परिस्थिती काही फारशी वाईट नाही."

राजधानीत बसून आपल्या लढणार्‍या सैनिकांचे पाय ओढायची रीत
इस्रायल मध्ये नव्हती.


शेवटी वाढते दडपण पाहून नाईलाजाने इस्रायलच्या प्रतिनिधीने संयुक्त
राष्ट्र संघटनेत ४ नोव्हेंबरला सकाळी जाहीर केले की 'ताबडतोब शस्त्रे
म्यान करायची आमची तयारी आहे मात्र इजिप्तने अशीच तयारी दाखवली
पाहिजे.' हे ऐकताच अँग्लो -फ्रेंचांना धक्का बसला व त्यांनी इस्रायलला
सांगितले इतक्यात युद्धबंदी स्विकारू नका.

त्याच दुपारी अँग्लो - फ्रेंचांवर उपकाराचा आव आणून इस्रायलच्या
प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र संघटनेत घोषणा केली की मी जे सकाळी
सांगितले ते सभागृहाला नीटसे कळलेले दिसत नाही. शस्त्रसंधी व
समझोते हे प्रयोग पूर्वीपण झालेले आहेत. इस्रायलने युद्ध थांबवावे
असे वाटत असेल तर इजिप्तने खालील गोष्टींचा समाधानकारक
खुलासा केला पाहिजे. त्या पुढील प्रमाणे - ......


मात्र असे करताना ' इजिप्तवर स्वारी करणारा देश म्हणून एकट्याने
आरोपीच्या पिंजर्‍यात जाण्यापेक्षा अँग्लो - फ्रेंचांसह पिंजर्‍यात दाखल
होणे अधिक हिताचे' हा साळसुद हिशोब त्यापाठी होता. अश्या रीतीने
४ मार्चपर्यंत आपले राजकीय कौशल्य पणाला लावून इस्रायलने युद्धबंदी
स्विकारली ज्यात नासरचे नाक कापले गेले कारण त्यानेच सुवेझ कालवा
आणि तिरानचे आखात बंद करून कुरापत काढलेली होती, सुवेझ कालवा,
शार्म-अल-शेख आणि गाझा पट्टीत 'संरासं' ची शांतिसेना ठेवण्यात आली
आणि नेहेमीप्रमाणे इस्रायलच्या ताब्यात पूर्वीपेक्षा जास्त प्रदेश आला.

आता आपण भारताची युद्धोत्तर कामगिरी पाहू -

१९४८ मध्ये भारतीय फौजा काश्मिरमध्ये बंडखोरांविरुद्ध भूभाग जिंकत
असताना अचानक त्यांना थांबण्याचे आदेश देण्यात आले आणि आपण
स्वत:च युद्धबंदी स्विकारून पाकव्याप्त काश्मीर जन्माला घातला. http://www.tribuneindia.com/1999/99jul12/mailbag.htm

१९६२ हे तर दुर्बळांच्या शांतीप्रियतेच्या कश्या चिंधड्या उडतात त्याचे
धडधडीत उदाहरण म्हणावे लागेल. राजकारणात भाबडेपणाची फार मोठी
किंमत मोजावी लागते ती देशाला, सामान्य जनतेला. असो.

१९६५ चे युद्ध आपण लौकिकार्थाने जिंकले, आपल्या सैन्याने लाहोरपर्यंत
धडक मारली होती पण...

आपण ताश्कंद करार स्विकारून पुन्हा खंडित काश्मीर स्विकारला. ज्यात
सामरिक दृष्ट्या महत्त्वाची ठाणी पाकिस्तानकडे गेली.

१९७१ च्या युद्धात भारत जिंकला पण बांगलादेश नावाची एक कर्कगाठ
आपल्या काखेत आपणच निर्माण केली. बांगलादेशातील काही भूभाग
आपल्या ताब्यात ठेवून त्यांच्या नकाशात पाचर मारायचे सोडून नंतर
आपण त्यांना 'तीन बिघा' नावाचा भूपट्टा आपण त्यांना अमर्यादित
काळासाठी भाड्याने दिला. मातृभूमीचा काही भाग भाडेपट्ट्यावर देणारा
भारत हा जगात पहिलाच देश असेल. असो. काहीच नाहीतर निदान
पाकिस्तानच्या ९०,००० सैनिकांच्या सुटकेच्या बदल्यात आपले जे सैनिक
युद्धबंदी म्हणून पाकिस्तानच्या कारागृहात १९४८, १९६५ पासून सडत होते
त्यांची तरी सुटका करता आली असती तरी खुप झाले असते.

हा सर्व इतिहास बघता जो पर्यंत भारताला धूर्त, कणखर व प्रखर
देशभक्त नेतृत्व
(जे सध्यातरी भारताच्या राजकीय क्षितिजावर
दिसत नाही ते) मिळत नाही तो पर्यंत भारताने पाकिस्तानशी
युद्ध सुरू न केलेलेच बरे. निदान आपल्या जवानांचे रक्त तरी
फुकाफुकी सांडणार नाही. त्यांचे प्राण बहुमुल्य आहेत.

2 comments:

  1. जबरदस्त विश्लेषण!!!

    -अभी

    ReplyDelete
  2. तुमचे लिखाण आणि माहिती खूपच प्रभावशाली आहे. मला वाचायला नक्की आवडेल.

    -अभी

    ReplyDelete