Saturday, 23 August 2008

संस्कृत२

सत्यकाम जाबाली - मूळ कथा : छांदोग्य उपनिषद (IV 39-43)
छोटा सत्यकाम एके दिवशी आईला म्हणाला, "आई, मला शिकावेसे वाटते".
आई म्हणाली, "जरूर शिक. ब्रह्मज्ञानी हो."
सत्यकाम म्हणाला, "आई, आपण कोण, कुठले?"
आई म्हणाली, "बाळ, बस इथे, मी तुला सगळे सांगते."
दुसर्‍या दिवशी सत्यकाम हरिद्रुम गौतम ऋषींच्या आश्रमात गेला आणि म्हणाला, "गुरुजी, मला तुमच्याकडे शिकायचे, ब्रह्मज्ञानी व्हायचे आहे".
गौतम ऋषी म्हणाले, "बाळ बस. पाणी घे. कोण तू? कुठून आलास? तुझे वडिल काय करतात? तुझे गोत्र काय?".
सत्यकाम दृढतेने म्हणाला, "गुरुजी, माझे नाव सत्यकाम. काल मला जे आई म्हणाली तेच आज मी तुम्हाला सांगत आहे. आई म्हणाली, बाळा, मी तरुण असताना अनेक ठिकाणी दासी म्हणून राहिले. तेव्हाच तुझा जन्म झाला. तुझे वडिल कोण हे मी पण निश्चित सांगू शकत नाही. गुरुजी विचारतील तेव्हा हेच सांग की जबालेचा पुत्र म्हणून मी जाबाली."
त्यावर गौतम ऋषी म्हणाले, "जो सत्य बोलतो, निर्मळ मनाचा, निष्कलंक विचारांचा, अंतर्बाह्य पारदर्शक असतो तोच ब्राह्मण होय (नोंद घ्यावी). हे सौम्या, थोड्या समिधा आण. आपण सत्यकामाचा उपनयन विधी करू".
पुढे असा हा दासीपुत्र सत्यकाम गौतम ऋषींच्या आश्रमात राहिला. त्याने वेदाध्ययन केले. तो वेद पारंगत झाला.
[मात्र सत्यकामाला ब्रह्मज्ञानाची आस लागली होती. गौतम ऋषींचा शिष्य असतानाच त्याला ब्रह्मज्ञान मिळते पण अगदी वेगळ्या पद्धतीने ज्याची एक वेगळी कथा आहे. जी पुन्हा कधीतरी.]
(वरील सर्वांचे संवाद संपूर्ण संस्कृतमध्ये, मूळ संस्कृतमधील उपनिषद संहिता मंडईत उपलब्ध)

No comments:

Post a Comment