बरेचदा लोक मुंबईला समजण्यात चूक करतात. कोणाला ती भावनाशून्य वाटते कोणाला ती रूक्ष वाटते, कोणाला ती बाकीच्यांची पर्वा न करता सतत धावत राहणारी वाटते. पण हे मुंबईला आयुष्यातून १-२ वेळा वा कधीच भेट न देता केवळ चित्रपटातून मुंबईला पाहणार्यांचे मत झाले. खरी मुंबई वेगळीच आहे आणि ती वेळोवेळी स्वत:चे वेगळे दर्शन घडवते.
एका लेखकाने तिचे अचूक वर्णन केले आहे. तो म्हणतो, मुंबईच्या रेल्वेत दारातले लोक तुम्हाला आत घुसू देणार नाहीत पण एकदा का तुम्ही आत शिरलात की हेच लोक तुम्ही दारातून खाली पडू नये म्हणून तुमचा तोल सावरतील. तुम्हाला दरवाज्यात उभे राह्यला बळ देतील. तुम्हाला स्वत:त सामावून घेतील.
आम्ही मुंबईकरांनी प्रत्येक आपत्तीत हेच अनुभवले आहे. आणीबाणीच्या प्रसंगात मुंबईकर दुसर्यासाठी आपला जीव सुद्धा धोक्यात घालतो. संकटकाळी समोरच्याला जमेल ती मदत करणे हाच अस्सल मुंबईकराचा धर्म होय.
एकच उदाहरण द्यायचे म्हणजे बाँबस्फोट इ. झाल्यावर रक्त देण्यासाठी लागणारी रांग. अगदी लांब लांबहून लोक त्यासाठी ज्या ठिकाणी निकड असेल त्या ठिकाणी पोहोचतात. तरुण, वयस्क, बायका कोणीही मागे राहात नाही.
मुख्य म्हणजे रक्तदानात दिवाभीत समजला जाणारा गुजराती समाज विशेष पुढे आहे आणि मराठी तरुण थोडा मागे आहे. चालायचेच.
मी तर म्हणेन रक्तदान असे दान आहे की ज्यामुळे तुमच्या खिशाला काही तोशीस पडत नाही. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे फारच थोडे रक्त आपल्या शरीरातून काढले जाते जे २४ तासांच्या आत भरून निघते.
विशेषत: रक्ताचा कर्करोग किंवा काही दुर्मिळ आजारी व्यक्तींसाठी निरोगी लोकांनी मुद्दाम रक्त दिले पाहिजे. कारण अश्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. पण बरेचदा आपण बघतो की रुग्णांचे जवळचे नातेवाईकसुद्धा रक्त द्यायचे टाळतात. ह्या पाठी अनेक गैरसमज कारणीभूत आहेत.
१) रक्त दिल्याने एड्स होतो - हल्ली सर्वत्र इंजेक्शनसाठी "वापरा आणि फेकून द्या" पद्धतीच्या सुया वापरल्या जातात. रक्त घेताना लागणारी सर्व उपकरणे निर्जंतुक केलेली असतात.
२) रक्त दिल्याने अशक्तपणा येतो - जर रक्त देण्यापूर्वी व दिल्यानंतर भरपूर खाल्ले तर कुठल्याही प्रकारे अशक्तपणा अथवा थकवा जाणवत नाही असा माझा अनुभव आहे. कॉफी आणि बिस्किटे तर रक्तदान केल्यावर डॉक्टर लगेचच देतातच.
असो. ह्या विषयीचे इतर गैरसमज ह्या मंचावरील डॉक्टर मंडळी दूर करतीलच. पण मी एव्हढेच म्हणेन की दिलेल्या रक्तामुळे आपल्या शरीरात जी रक्ताची कमी निर्माण होते ती २४ तासांत भरून निघतेच वर आपल्या शरीराकडून नवीन रक्ताची निर्मिती झाल्याने प्रसन्न वाटते.
भारतीयांसाठी दुवा क्र. १ ही एक अशी निरपेक्ष वेबसाईट आहे जिथे प्रत्येक सुदृढ व्यक्तीने नाव नोंदविले पाहिजे. ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या जवळ रक्त देण्याची सोय उपलब्ध करून देते.
अर्थात आंतरजालावर शोधले तर इतरही अश्या प्रकारचे काम करणार्या वेबसाईट मिळतीलच.
पूर्वी म्हणायचे,
अन्नदानं महादानं विद्यादानं अत: परम् ।
मी म्हणेन,
रक्तदानं परमोच्चदानं नेत्रदानं च सर्वोच्चेति ।
Saturday, 23 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment