Monday, 25 August 2008

सत्संग

दादरला चित्रा सिनेमाच्या समोरच्या गल्लीत शिरले की एक पोलीस चौकी लागते. तिलाखेटूनच एक सायकल दुरुस्तीचे बिननावाचे एक छोटे दुकान आहे. हे दुकान श्री. भूमकरयांचे आहे ज्यांना लोक भाऊ म्हणून ओळखतात. ह्यांचे शिक्षण बेतास बात आहे मात्रवाचन सर्वांगीण आहे.
दुकानात प्रवेश केला की समोरच हाताने लिहिलेले विविध फलक दिसतात ज्यावर अनेकसंतवचने, सुवचने, मनोगते दिसतात त्या पैकी मला भावलेले काही विचार पुढे देत आहे -
१) माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे.
२) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात.
३) अरे, मोबाईलवर २-२ तास बोलतोस आणि घरी भाजी मात्र २०० ग्रॅम आणतोस. छी! छी!
४) आपल्या मुलांची नावे टिनू, पिंकी, बंटी, रिटा अशी ठेऊ नका. मुले म्हातारी झाल्यावरकाय पिंकीआज्जी म्हणणार का?
५) मुलांना मम्मी पप्पा म्हणायला शिकवू नका. उद्या हिच मुले तुम्हाला पेकाटात लाथ घालून घराबाहेर घालवतील.
६) जीवनात लढाई करा. जिंकलात तर पृथ्वीचे राज्य भोगाल.
७) जगात सर्वात खोटारडा माणूस मोबाईलवर बोलणारा. घरी असला तरी ट्रेनमध्ये आहेसांगेल.
८) मुनी सांगती परमार्थ, संत सांगती मतितार्थ, माझ्या सारखा सामान्य म्हणतो दिड वीत पोटाची खळगी हाच खरा जीवनार्थ
९) मुलांना आणि बायकोला सुखी ठेवा, देव आपोआप भेटेल.
१०) आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका. चहा घेऊनच जा,जेवल्याशिवाय जाऊ नका असे म्हणा.
ह्या सोबत अनेक इतर ही वचने त्यांनी लिहिलेली आहेत आणि तसेच आयुष्य ते जगतात.आजपर्यंत मी त्यांच्या घरी गेले आहे आणि न जेवता परत आले असे कधी ही झाले नाहीमग ती सकाळ असो वा संध्याकाळ.
संतांनी सत्संग वर्णन केला आहे तो काही वेगळा असतो का?

No comments:

Post a Comment