कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा.
मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या दोन्ही बाजूला काट्याकुट्या रोवून तिमक्काने जीवापाड जपलेल्या रोपट्यांचे आता डेरेदार वटवृक्ष झाले आहेत. बाजारात सुमारे ८५ कोटी रुपये इतकी किंमत असलेले हे वृक्ष वनविभागाने नुकतेच आपल्या ताब्यात घेतले. त्या बाजारभावाचा विचार कधी न तिमक्काच्या मनाला शिवला, न आज हयात नसलेल्या बिक्कालुच्या.
तिमक्काला नुकताच पंतप्रधानांच्या हस्ते सामाजिक वनीकरणासाठीचा राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देण्यात आला. कुणाही कृतार्थ आईने म्हणावं तशी तिमक्का त्यावेळी म्हणाली, "त्यांना मोठ्ठं होताना पाहणं ह्यातच माझे सुख आहे".
- मटा १९९५
Subscribe to:
Post Comments (Atom)
Very insipiring!!!
ReplyDelete