हा पदार्थ केवळ चांगली फोडणी करण्यावर अवलंबून असतो. फोडणी काजळीपूर्वक केली की पहिल्या घासातच मन तृप्त होते.
फोडणी करण्याची पद्धत - १) फोडणीचे साहित्य नेहेमी तयार ठेवावे मगच तेल गरम करायला घ्यावे. २) सुरवातीला पोह्याच्या हिशोबाने तेल घ्यावे (साधारण अर्ध्या किलो पातळ पोह्याला ३ टेबलस्पून तेल) आणि कढल्यात मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. ते जरा कोमट झाले की हाताने अर्धा चमचा मोहोरी घालावी. ३) ती तडतडायला लागली की हातात अर्धा चमचा उडिदाची डाळ तयार ठेवावी. वाट पाहावी. मोहोरीच्या तडतडण्याचा आवाज बंद झाल्याक्षणी उडिदाची डाळ घालावी. ४) ती जरा केशरी झाली की लगेच शेंगदाणे घालावेत. ५) २-४ क्षणांनंतर चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. ६) कांदा पारदर्शक झाला की हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. ७) ते तुकडे जरा मऊ झाले की थोडे हिंग शिंपडावे. ८) लगेचच अर्धा चमचा हळद घालावी आणि विस्तव बंद करावा. ९) मग अर्धा चमचा तीळ घालावे. (तीळ फोडणी विस्तवावर असताना घातले तर तडतडून भांड्याच्या बाहेर उडतात). फोडणी तयार.
(हिच फोडणीची कृति सर्वत्र वापरावी मात्र ज्या फोडणीत लसुण घालायची असते त्यात कांदा घालायचा नसतो आणि आमटी करताना फोडणीत मेथीचे दाणे पण घालतात. ह्यात नमूद केलेला चमचा हे माप मिसळण्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्याचे आहे.).
आता पातळ पोहे घ्यावेत (भाजून घेतले तर छानच अथवा तसेच पण चालतात). त्यात फोडणी घालावे. पोहे न भाजता कच्चेच घेतले असतील तर हाताने यथेच्छ दडपावेत. मग त्यात वरून कच्चा चिरलेला कांदा, टोमटो, कोथिंबीर, खवलेले खोबरे (एकत्र) जरा हाताने चुरून घालावेत. मग फक्त झार्याने एक हात मारावा. दडपे पोहे तयार.
एकावेळी मस्त वाडगाभर किंवा त्यापेक्षा जास्त खावेत. एक घास ३२ वेळा चावून खायला हरकत नाही कारण प्रत्येक चावा वेगवेगळा स्वाद देतो. (ह्या पोह्यात फोडणी करताना मिरची ऐवजी सांडगी मिरची पण घालता येते.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment