Monday, 25 August 2008

चांदण्यात रात्र रात्र...

चॅलेंज खेळ मस्तच. योग्यवेळी चॅलेंज म्हणायचे, योग्यवेळी पास म्हणायचे आणि निरागस चेहरा ठेऊन बिनचूक खोटी पाने घुसडायची.
तसे आम्ही बदाम ७, गुलामचोर, ५-३-२, रमी, ७-८, छब्बु, ३०४, लॅडिस सुद्धा खेळतो. पण खरी मजा मेंढीकोट आणि कॅनवेस्टा खेळताना येते ती.
एका पावसाळ्यात गाड्या बंद पडल्याने २५-३० जण आमच्याकडे अडकली होती. २ रात्रंदिवस मेंढीकोट. सोबत डबेभरून चिवडा आणि चकल्या.
आजही आम्ही कोकणात गेलो की चांदण्यात रात्र रात्र पत्ते खेळतो. १५-१६ जण, ३ कॅट घेऊन मेंढीकोट आणि जर तरुण पिढीतील खेळाडू जास्त असतील तर कॅनवेस्टा. मग भिडू पाडताना शक्यतो नवरे आणि त्यांच्या बायका एकाच गटात येईल असे पाहायचे म्हणजे भांडणाची खुमारीच वेगळी.
तसे आमच्यात कोणी लबाडी करतच नाहीत असे नाही पण सगळा भर शक्यतो पडलेली पाने लक्षात ठेवणेआणि अंदाज बांधणे (जे हमखास चुकतात. मग आरडाओरडा, एकमेकांना टोमणे मारणे...).
मात्र एक आहे की पत्ते खेळताना भले एकमेकांच्या छाताडावर बसू, एकमेकांच्या झिंजा उपटू पण पत्ते खेळणे संपले की भांडणे पण संपतात.

No comments:

Post a Comment