गेल्या आठवड्यात माझ्याकडे एक बेल्जिअन आला होता. त्याला मुंबईतील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, परळ बैल-घोडा रुग्णालय, माझी शाळा, नवीन वांद्रे वरळी सेतू इ. ठिकाणे दाखवली. हा वांद्रे वरळी सेतू दाखवताना मी थोडे फाटकाच्या आत गेले तेव्हा तिथल्या दरवानाने इथे सामान्यजनांना आत यायला परवानगी नाही असे म्हटले. त्यावर मी त्यांना माझ्याबरोबर असलेल्या पाहुण्यांना ह्या सेतू विषयी जाणून घ्यायचे आहे असे म्हटले.
त्यावर लगेच त्याने आम्हाला घालायला हेल्मेट्स दिली आणि पुढे जाऊन तो पूल पहायला दिला आणि त्या विषयी सविस्तर माहिती सुद्धा दिली. तो पूल पहायला दिला आणि त्याविषयी सविस्तर माहिती सुद्धा दिली.
मनांत विचार आला की हा माणूस गोऱ्या कातडीचा युरोपीयन होता म्हणून कदाचित आमचे दिलखुलास आदरातिथ्य झाले, हेच जर का त्याच्याजागी माझी अमेरिकन कृष्णवर्णीय मैत्रिण शेली असती तर झाले असते का?
आजही आपण कृष्णवर्णीय अमेरिकन, आफ्रिकन आणि आशियायी पर्यटकांची दखल तरी घेतो का? ज्या उत्साहाने आपण श्वेतवर्णीय अमेरिकन, युरोपीयन,रशियन अगदी नेमके बोलायचे तर उझबेकी, कझाकी पर्यटकांचे सुद्धा आगत स्वागत करतो त्याच्या निम्म्याने तरी आपण ह्या कृष्णवर्णीय अमेरिकन, आफ्रिकन आणि आशियायी पर्यटकांना एक व्यक्ती म्हणून किंमत देतो का?
मुक्ता चित्रपटात एक प्रसंग आहे. मुक्ताचा अमेरिकन मित्र येणार म्हणून कणसे पाटील मंडळी अतिशय खुश असतात आणि जेव्हा तो प्रत्यक्ष येतो तेव्हा त्याचा कृष्णवर्ण पाहून अनेकांचे चेहरे उतरतात, एव्हढेच नव्हे तर त्याच्या विषयी कुत्सित बोलले पण जाते.
असे असताना आपण भारतीयांना रंगभेद, वर्णभेद ह्या विषयी बोलायचा नैतिक अधिकार उरला आहे का? आपल्याला काय वाटते?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment